October 16, 2024
New Variety of Sugarcane Phule Sugarcane 13007
Home » Privacy Policy » ऊसाचा नवीन वाण : फुले ऊस १३००७
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऊसाचा नवीन वाण : फुले ऊस १३००७

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या संशोधन केंद्रावरून सन २०२३ साली अखिल भारतीय ऊस समन्वित योजनेच्या द्विपकल्पीय विभागातून महाराष्ट्रासह इतर सहा राज्यासाठी ऊसाचा फुले ऊस १३००७ हा नवीन वाण प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणाची निर्मिती फुले २६५ आणि कोएम ०२५४ या वाणाच्या संकरातून करण्यात आली आहे. फुले ऊस १३००७ हा वाण ऊस व साखर उत्पादनात को ८६०३२ या वाणापेक्षा सरस असून सुरू, पूर्व आणि आडसाली या तिन्हीही हंगामासाठी उपयुक्त आहे.

या वाणाचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता होय. याशिवाय क्षारयुक्त जमिनीतही याची उगवण होत असून उत्पादनक्षमता देखील चांगली आहे.

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता तपासणीचा अभ्यास केला असता. यामध्ये एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात या वाणास देण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाळ्या थांबविण्यात आले होते. त्यानंतर नियमित पाणी देवून निष्कर्ष तपासले असता नियमित पाण्यापेक्षा उत्पादनात केवळ १६ टक्के व साखर उत्पादनात १३.९८ टक्के घट आली.

भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांचेकडून या नविन वाणाची शिफारस महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या सात राज्यात लागवडीसाठी करण्यात आली आहे. ही शिफारस करताना पुढील घटकांचा विचार करण्यात आलेला आहे.

राज्यस्तरीय उत्पादन

राज्यस्तरीय चाचण्यांमध्ये सुरू हंगामात हेक्टरी १२९ टन, पूर्वहंगामात १३६ टन, आडसाली १४७ टन आणि खोडवा उत्पादन हेक्टरी १२१ टन मिळाले. साखर उत्पादन अनुक्रमे हेक्टरी १८.४४, १९.४०, २०.५३ आणि १७.१० टन मिळाले. हे ऊस उत्पादन तुलनात्मक वाण को ८६०३२ पेक्षा सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडवामध्ये अनुक्रमे ८.७२, १३.००, ९.१४ आणि ११.२२ टक्के आणि साखर उत्पादन ९.०५, १०.९८, ६.१० आणि १०.२५ टक्के अधिक मिळाले. फुले ऊस १३००७ या वाणाचे व्यापारी शर्करा प्रमाण सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडवा अनुक्रमे १४.२२, १४.१९, १३.९५ आणि १४.०२ टक्के मिळाले.

द्विकल्पीय विभागात ऊसाचे उत्पादन

अंतिम चाचणीमध्ये तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ आणि महाराष्ट्रात राज्यातील १२ ठिकाणी फुले ऊस १३००७ या जातीचे उत्पादन को ८६०३२, कोसी ६७१, कोएसएनके ०५१०३ या प्रचलित वाणापेक्षा अनुक्रमे ११.२२, २९.७० आणि १९.७८ टक्के अधिक मिळाले. खोडव्याचे ऊस आणि साखर उत्पादन को ८६०३२ पेक्षा अनुक्रमे १०.८७ टक्के आणि १२ टक्के अधिक मिळाले. हा वाण १२ ठिकाणी देशात साखर आणि ऊस उत्पादनात पहिला आलेला आहे.

द्विकल्पीय विभागात उत्पादन वाढ घटकांचा अभ्यास

उसाचा सरासरी व्यास, उसाची कांड्यापर्यंत सरासरी उंची, उसाची हेक्टरी संख्या आणि उसाचे सरासरी वजन याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये फुले ऊस १३००७ या जातीच्या उसाचा सरासरी व्यास २.८० सेंमी मिळाला. हा व्यास को ८६०३२ पेक्षा अधिक दिसून आला आहे.

उसाची सरासरी उंची (सेंमी) मध्ये फुले ऊस १३००७ या जातीची उंची २६६ सेंमी मिळाली. ही उंची को ८६०३२ पेक्षा अधिक आहे. एका उसाच्या सरासरी वजनामध्ये फुले ऊस १३००७ जातीचे वजन १.५३ किलो मिळाले. हे वजन को ८६०३२ पेक्षा जास्त आढळून आले.

फुले ऊस १३००७ वाणाची वैशिष्टे

  • कांडयाचा रंग हिरवा, पाचट निघाल्यानंतर रंग पिवळसर हिरवा, उंच वाढणारी, शंक्वाकृती नागमोडी कांडी, मध्यम आकाराचा अंडाकृती डोळा, डोळ्यापुढे खाच नाही.
  • मध्यम रुंदीची सरळ वाढणारी गर्द हिरवी पाने, पानावर कूस नाही, पाचट सहज निघते.
  • मध्यम जाडीचा दशी न पडणारा ऊस, संख्या जास्त चांगला खोडवा, लालकूज, काणी, मर, पिवळा पानांच्या रोगास प्रतिकारक्षम, तांबेरा, तपकिरी ठिपके, पोक्का बोइंग रोगांना प्रतिकारक.
  • खोड कीड, कांडी कीड व लोकरी मावा किडींना कमी बळी पडणारी जात.
  • तुरा उशीरा व कमी प्रमाणात येतो.

बियाणे संपर्क डॉ. डी. एस. थोरवे, बियाणे विक्री अधिकारी, मऊसंकें, पाडेगाव, मो.नं. ९८८१६४४५७३


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading