घाटकुळ एक प्राचीन काळातील गजबजलेले शहर होते. येथील प्राचीन किल्ल्याच्या टेकडीत किती प्राचीन इतिहासाचा खजिना दडलेला आहे हे एक महाकोडेच आहे. पुरातत्व विभागाने या स्थळाची दखल घेऊन या “बाल्लेकिल्ला टेकडी” चे उत्खनन करावे जेणेकरून या भागातील प्राचीन संस्कृतीची ओळख अभ्यासकांना होईल आणि भूगर्भात लपलेला इतिहास जगासमोर येईल. येथे होत असलेल्या अठराव्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाच्या निमित्ताने घाटकुळ या गावाबद्दल….
अरूण झगडकर
शिक्षक तथा इतिहास अभ्यासक
गोंडपिपरी जि.चंद्रपूर
9405266915
इतिहासाच्या पाऊलखुणा वेनातटावर (वैनगंगा) आढळून येतात. अनेक प्राचीन साहित्यात या भागातील वैभवशाली इतिहासाचा उल्लेख केलेला आढळतो. पुराणातील- महाभारतातील विविध पर्वात या परिसराचा उल्लेख आढळतो. “चंद्रपूरचा इतिहास” या पुस्तकाचे लेखक अ.ज. राजुरकर यांनी या भागातील नंदवर्धन या ठिकाणी वाकाटकांची राजधानी होती असे म्हटले आहे. वैनगंगा नदी काठावरील वर्धेच्या संघाचा उल्लेख महाभारतातील वन पर्वात आलेला आहे. राजूरकर यांच्या पुस्तकात धाबा, भंगाराम तळोधी, तारसा, घाटकुळ, हरणघाट, मार्कंडा, महाल आमगाव या वैनगंगेच्या काठावरील गावांचा उल्लेख येतो.
पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ हे आताचे छोटेसे गाव आणि पूर्वी गजबजलेले परगण्याचे ठिकाण वैनगंगा नदी काठी वसलेले आहे. आता ते सुरक्षित उंच ठिकाणी स्थलांतरित झाले आहे. या गावाच्या सीमावर्ती भागात, नदीकिनाऱ्यावर प्राचीन अवशेष आढळून येतात. भग्न अवस्थेत असलेल्या शिव मंदिर, गणेश, अन्नपूर्णा, विष्णू, शिवलिंग, नागाचे काळ्या दगडावरील कोरीव शिल्प, नागवंशीय संस्कृतीच्या नागकन्यांची शिल्पे अजूनही येते बेवारस स्थितीत शेतशिवरात पडलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांना शेतात काम करतांना बहामनी सल्तनच्या काळातील तांब्याचे नाणे सापडत आहेत. दगडाच्या विविध वस्तू, माती पासून बनवलेली भांडी, मनी, विविध कलाकुसरीच्या वस्तू, कवड्या या परिसरात आढळून येतात.
घाटकुळातील एका शेतकऱ्याने विहिरीच्या बांधकामासाठी खोदकाम केले असता त्याला विटांनी बांधलेली विहीर सापडली. विहिरीतील गाळ काढतांना गाळात मोठमोठे हाडे आढळून आली. भीतीपोटी त्याने ती विहीर बुजवून टाकली. ही विहीर ज्या विटांनी बांधलेली होती, त्या विटांचा आकार, लांबी, रूंदी आणि उंची बघता या विटा सातवानकालीन विटांशी साम्य करतात. घाटकुळ या गावाला खूप प्राचीन वारसा लाभलेला दिसून येतो. परंतु इतिहासकारांनी या परिसरातील प्राचीन वैभव्याची कसलीही दखल घेतलेली नाही. या भागाची माहिती पुराणात सापडते. महाभारत, रामायण व इतर पुराणात वैनगंगा व वर्धा नदीच्या संगमाची माहिती आलेली आहे. तसेच बाराव्या शतकाळापासूनचा उल्लेख काही प्रमाणात आढळून येतो.
पुर्वीच्या काळात घाटकुळ हे खूप मोठे शहर असावेत असा अनुमान काही अभ्यासकांनी काढलेला आहे. कारण वैनगंगेच्या त्याकाळातीला प्रसिद्ध राजघाटावरूनच आता या गावाला घाटकुळ नाव पडले असावेत. भौगोलिक सीमारेषेनुसार हा परिसर दक्षिण कोसलमध्ये येत होता. पुराणात दंडकारण्य म्हणून या भागाचा उल्लेख आढळतो. या भागावर मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, परमार, यादव, गोंड आणि भोसले यांचे राज्य होते.
गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा येथे चेरकालीन दोन बौद्ध स्तूप आढळले आहेत. ते स्तूप ज्या विटांनी बांधलेले आहेत तशाच विटा घाटकुळ आणि शिवणी संगमावरील कमलाई बेटावर आहेत. तसेच चिनी प्रवासी ह्युऐनत्संग यांच्या प्रवासवर्णनात (इ. स. ६२९ ते ६४५) या भागाचा उल्लेख आढळून येतो. ते लिहितात की, नागार्जुन विदर्भात जन्मला होता. तो अल्पायुषी असेल असे भाकीत वर्तविल्यामुळे त्याचा अंत डोळ्यासमोर नको म्हणून मातापित्यांनी त्याला दूर पाठवले. पुढे तो बौद्ध धर्माचा मोठा आचार्य झाला. सातवाहन वंशातील २९ वा राजा विजय सातकर्णी यांनी बोधिसत्व नागार्जुनासाठी संघाराम बांधला होता. हा संघाराम वैनगंगेच्या तीरावर होता असा उल्लेख सापडतो. अ.ज. राजुरकर आणि अनेक इतिहासकारांच्या मते आताचे मार्कंडा येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिर या ठिकाणी बौद्धविहार असल्याचे नमूद केले आहे. त्याचा पुरावा म्हणून मार्कंडा मंदिरात एक शिलालेख लिहिलेला दगड मिळाला होता. कदाचित हाच नागार्जुनचा संग्राम असावा असा तर्क काही अभ्यासकांनी काढलेला आहे.
घाटकुळ येथे नैताम(महात्तम) नावाचे गोंडकालीन राजे राज्य करीत होते. असे वयोवृद्ध लोक सांगतात. परंतु इतिहासात या राज्याचा कुठे उल्लेख आढळत नाही. भोसल्यांच्या काळात घाटकुळ येथे घनघोर युध्द झाल्याची नोंद आहे. चंद्रपूरच्या गोंडराजांनी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारल्यामुळे हा प्रदेश भोसल्यांनी काबीज केला होता.कदाचित नैताम या राजाने भोसलेंना विरोध केला असावा. त्यामुळे मुधोजी भोसल्यांनी नैताम राजांचे अस्तित्व पूर्णपणे नेस्तनाबूत केले असावेत असाही तर्क लावल्या जातो.कारण आज या गावात एकही गोंड कुटुंब शिल्लक राहिले नाही. या दहशतीच्या वातावरणात काही कुटुंब गावापासून दूर बाजूच्या गावात स्थायिक झाली तर काहींनी जंगलातील डोंगरांचा आसरा घेऊन ठाण मांडले असावेत. म्हणून आजही घाटकुळच्या उत्तरेला डोंगर पायथ्याशी १००टक्के गोंड जमातीच्या लोकवस्तीचे ठाणेवासना नावाचे गाव वसलेले आहे.
ज्या लोकांना नदीच्या पलीकडे हाकलून लावले ते कधीच परत आले नाहीत. तेथेच ते भोसल्यांची शरणागती पत्करून आणि जंगले तोडून शेती करू लागले. म्हणून आजही मुधोजींच्या नावाने वैनगंगेच्या पूर्व काठावर मुधोली नावाचे चार छोटी छोटी गावे वसलेली आहेत. असे म्हणतात की अजूनही नैताम आडनावाचा व्यक्ती नावेने नदी पार करून घाटकुळला येत नाहीत. म्हणजेच प्राचीन काळापासून गजबजलेला परगणा आता एका लहानशा गावात दिसून येतो. ज्या नदिकाठावर जुने गाव हौते त्या ठिकाणी एक फार मोठे उंच ठिकाण आहे.
या टेकडीला नैताम राज्याचा बालेकिल्ला या नावाने संबोधतात. या प्राचीन टेकडीवर प्राचीन संस्कृतीचे वैभव असून अनेक शिल्प दडलेली आहेत. बालेकिल्ल्याच्या परिसर जवळपास अर्धा कि.मी.चा आहे. सध्या याच टेकडीच्या परिसरात वैनगंगा नदीवर मोठ्या पूल झालेला आहे. या रस्त्यामुळे टेकडीचे दोन भाग झाले आहेत. ही प्राचीन टेकडी वैनगंगा नदीच्या उजव्या काठावर वसलेली आहे नदी काठावर एक बुरुज आताही आपली साक्षी देण्यासाठी उभा आहे. या बालेकिल्ला एक प्राचीन इतिहासाच्या खजिना दडलेला असावा असा अनुमान काही अभ्यासकांनी काढलेला आहे. मात्र भारतीय पुरातत्व विभागाचे याकडे पुर्नत: दुर्लक्ष होत आहे. काही लोकांनी टेकडीवर अतिक्रमण करून शेती केली असून तेथे विविध पिके लावलेली आहेत. विशेष म्हणजे या टेकडीच्या परिसरात घाटकुळच्या कुंभार बांधवांनी मडक्यासाठी माती नेणाऱ्यांना प्राचीन नागराणीचे शिल्प आढळून आले. ते शिल्प अजूनही त्याच प्राचीन टेकडीवरील असून यासारखे अनेक प्राचीन शिल्पांच्या खजिना या टेकडीच्या भूगर्भात दडला असण्याची शक्यता आहे. आज जरी या ठिकाणी बालेकिल्ला राहिलेला नाही तरी नैताम (महात्तम) राजांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसं बघितलं तर आदिवासी राजांच्या इतिहासात नैताम नावाचा राजा झालेला नाही. त्यामुळे या प्राचीन टेकडीला असेच नाव देऊन संबोधले जात असावेत. असे बोलले जात आहे. त्या ठिकाणाचे उत्खनन केल्यास फार मोठा इतिहास जगासमोर येऊ शकतो.
एकेकाळी घाटकूळ हे गाव परगण्याचे मोठे शहर असल्याचा उल्लेख अ.ज.राजुरकर या इतिहास अभ्यासकांनी “चंद्रपूर जिल्ह्याचा प्राचीन इतिहास” या पुस्तकात केलेला आहे. वैनगंगेच्या काठावरील परगण्याचे ठिकाण असलेल्या या स्थळांकडे इतिहासकारांचे लक्ष कदाचित गेले नसणार. त्यामुळे घाटकुळ हे गाव आणि तेथील वैभव्य ऐतिहासिक स्थळांच्या यादीत आलेले नाहीत.
नदीकाठावरील बाल्लेकिल्याचे कोणतेही अवशेष सुद्धा शिल्लक नाहीत. कारण पन्नास वर्षापूर्वी नदीकाठावरून गाव उंचभागावर स्थलांतरीत झाले तेव्हा त्या बाल्लेकिल्याचे दगड घरकामात वापरल्याचे बोलले जाते. बाल्लेकिल्लाच्या परीसरांचे निरीक्षण करीत असतांना एका उंच ठिकाणी काही शिल्पे आढळून आलीत. या शिल्पाचे निरीक्षण केले असता ही सर्व स्री शिल्प होती. ही शिल्पे उभी असून अत्यंत सुंदर कलात्मक पध्दतीने शिल्प कलावंतांनी कोरलेली आहेत. स्री शिल्पाच्या कानात मोठी कर्णकुंडले आहेत .कर्णकुंडले आज स्रिया जशी सुवर्णाची कर्णकुंडले घालतात त्या आकाराची म्हणजे कानांच्या खालील पाळीतून कानाच्या वरच्या भागात सुवर्णाचे डिझाईन परीधान केलेले दिसून येते. दोन्ही हातात मोठमोठी बाजुबंध परीधान केलेली आहेत.
या शिल्पातील स्रीने आजच्या स्रियां जसा टाॅप परीधान करतात त्याप्रमाणे शरीरावर टाॅप परीधान केलेला आहे. टाॅपवरील पायांच्या वरील त्रिकोणी डिझाईन शिल्पात स्पष्ट दिसून येते. शिल्पाच्या डाव्या हाताच्या मनगटांवर एक लहान मुलगा उभा आहे. स्त्रीने दोन्ही हातांनी दीप धरलेला असून उजव्या हातांनी तो दीप विझू नये म्हणून दीपावर आडवा धरलेला आहे. स्री शिल्पाच्या डोक्यावर एका नागाचे छत्र धारण केलेले असून. नागाच्या शरीराचा भाग हा स्रिच्या पाठीवर आलेला आहे. हे स्री शिल्प हातात दीप घेऊन द्वीपपुजन करण्याकरीता जात आहे असे ह्या शिल्पावरुन दिसून येते. शिल्पाच्या नाग छत्रावरुन ह्या स्रियां नागवंशीय राजघराण्यातील होत्या हे सिध्द होते. कदाचित हे स्री शिल्प नागवंशीय नागराणीचे असावेत असा तर्क प्रत्यक्षदर्शी बघितलेल्या अभ्यासकांनी लावलेला आहे.
या प्राचीन किल्ल्याच्या टेकडीत किती प्राचीन इतिहासाचा खजिना दडलेला आहे हे एक महाकोडेच आहे. पुरातत्व विभागाने या स्थळाची दखल घेऊन या “बाल्लेकिल्ला टेकडी” चे उत्खनन करावे जेणेकरून या भागातील प्राचीन संस्कृतीची ओळख अभ्यासकांना होईल आणि भूगर्भात लपलेला इतिहास जगासमोर येईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.