संत कुणाला म्हणावे? याचे उत्तर आहे की, ज्याच्या विचारांचा अंत नाही तो संत. संत अनंत असतात, ते आपल्या विचाराने समाजाला प्रेरीत करुन आदर्शवादाचे प्रतिक म्हणून सर्वांसमोर उभे राहतात. जो जो संत ।तो तो अनंत । जो विभक्त नाही ।तो तो भक्त ।।
– प्रा डॉ धनराज ल. खानोरकर
मराठी विभागप्रमुख
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी. जि – चंद्रपूर
भ्रम :9403304543
ई-मेल khanorkardhanraj17@gmail.com
‘बंडखोरपणा ‘ हे काही संतांचे मुख्यत्वे मुख्यतत्व होते. ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, तुकाराम, जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा,अलीकडील राष्ट्रसंत तुकडोजी, समाजसंत गाडगेबाबा आदी संतांनी जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा बंडाचे निशाण हाती धरले. त्यांच्या ओव्या अभंगात तशी उदाहरणे पाहायला मिळतात. यात तुकोबा अग्रेसर असून जातीव्यवस्थेला नाकारणारा आणि मानवतावादी विचाराचा पुरस्कार करणारा विद्रोही संत आहे. बंडखोरी हा त्यांचा स्वभाव असून भल्याभल्यांचे वाभाडे तुकोबाने काढले आहे. गाडगेबाबांनीही स्पष्ट शब्दांतून इशारा देत आपल्या कीर्तनातून मानवतावादच पेरण्याचा प्रयत्न केला.
‘संतसाहित्य ‘ हा आपला सांस्कृतिक मौलिक ठेवा आहे. ते मायमराठी माणसांचे लोकसंचित आहे. ज्या साहित्यावर झडप घालावी आणि त्यातून जीवनरस घ्यावा, इतके सुंदर, संस्मरणीय व संस्कारमूल्यवादी साहित्य कोणते असेल तर ते संतसाहित्य आहे. जातीव्यवस्थेला नाकारणारे आणि मानवतावादाचा जयजयकार करणारी ही लोकचळवळ ‘भक्तीगंगेच्या वाटेवर ‘निर्माण झाली. मायमराठीच्या दरबारात आपल्या खास बाण्याने हे परिवर्तनवादी विचार मध्ययुगीन मराठीच्या कालखंडात समाजमनावर बिंबवले गेले. फाटलेल्या समाजाला आपल्या प्रबोधनाच्या धाग्याने शिकण्याचे फार मोठे कार्य संतांनी केले. संत लोकशिक्षक झाले, समाजाचे रक्षक झाले, आपल्या आचरणाने समाजापुढे एक आदर्श संतांनी उभा केला. लोकतत्वीय विचारातून आचार आणि शुध्द मनातून आपल्या भावभक्तीने त्यांनी समाज बांधला. विज्ञान, निष्काम कर्मयोग आणि चित्तशुध्दीवर त्यांनी भर देऊन लोकांच्या मनातील तण साफ केला, म्हणूनच आजच्या वर्तमानात या बहूश्रृत संतविचाराची समाजाला प्राणवायूसारखी गरज आहे.
संत कुणाला म्हणावे ? याचे उत्तर आहे की, ज्याच्या विचारांचा अंत नाही तो संत. संत अनंत असतात, ते आपल्या विचाराने समाजाला प्रेरीत करुन आदर्शवादाचे प्रतिक म्हणून सर्वांसमोर उभे राहतात. जो जो संत ।तो तो अनंत । जो विभक्त नाही ।तो तो भक्त
संत, तुम्हां -आम्हांला पसंत का ? तर ते आपल्या जीवनात वसंत फुलवितात. जो देवापासून विभक्त नाही तो खरा भक्त आणि भक्तीभावासाठी जो भूकेला असतो तो देव. तुकोबा म्हणतात, “देवा होईन मी भिकारी ।पंढरीचा वारकरी ” पंढरीचा पांडुरंग हा लोकदेव. दरवर्षी कार्तीक, माघ, आषाढी एकादशीला नित्यनेमाने वारी करणारा तो वारकरी. “ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी ।त्याने पथ्थ सांभाळावी ” वारकऱ्यांना खोटे बोलता येत नाही. ‘एकशे आठ मण्यांची तुळशी माळ ‘ हे वारकऱ्यांचे मंगळसूत्र नित्यनेमाने पंढरीला ये – जा करणे याला वारी म्हणत असलेतरी अन्याय, अत्याचार याच्यावर सतत वार करणारा तो वारकरी.
ज्ञानोबा, चोखोबा, तुकोबा, ऐकोबा यांचा खरा देव एकच तो म्हणजे विठोबा. मुक्ताई, जनाई, सोयराई यांची खरी देवी रुख्माई. देवाच्या दर्शनाने सुखी झालेले हे संत ‘ज्ञानाशिवाय भक्ती नाही ‘हे समाजाला शिकवितात. ” मुळात मध्ययुगीन संतसाहित्य ही भक्तीचळवळ होती. या गृहितकाजवळ आपण थांबतो. त्यामुळे ईश्वरभक्ती, उपासना हेच या साहित्याचे विषय आहेत, असे गृहित धरले जाते. परंतु संतकवी लौकिक जीवनाविषयी काही एक भूमिका अधिकारवाणीने घेतात याकडे आपले दुर्लक्ष होते. ‘कष्ट करुनि मेळवावा । तोचि घास अपुला ।।’ असे म्हणणारे नामदेव असोत किंवा ‘जे कन्यापुत्रासी तेची दासा आणिक दासी ‘म्हणणारे तुकाराम असोत, त्यांची मांडणी आचरणशुध्दीकडून भक्तीकडे अशी होती. त्याचवेळी ही चळवळ ही अभिव्यक्ती चळवळ होती.’
लिहणे ‘या गोष्टीशी ज्यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही असे कुंभार, न्हावी, माळी, तेली, खाटीक, दासी, महार, वेश्या हे सगळे आत्मविश्वासाने काहीतरी म्हणू इच्छितात, लिहू इच्छितात हे कशाचे लक्षण आहे? ” व्यक्त होणे हा प्रत्येकाचा स्वभाव असला तरी परिपूर्ण अभिव्यक्ती साधली जात नाही. ज्ञानेश्वरादी संत आपले म्हणणे विठ्ठलासमोर मांडतात, म्हणजेच ते अभिव्यक्त होतात.
आज संवाद संपलेला दिसतो. कुणी दुःखाचेही बोलत नाही अन् पाहिजे तेवढे सुखाचेही बोलत नाही. अशाअवस्थेत संतांनी जे आपले म्हणणे मांडले, दुःख अभंगांतून, ओव्यांच्यारुपाने सांगितले त्यापासून आपण प्रेरणा घेऊन आपले लौकिक जीवन सुखी केले पाहिजे. बोलल्याने मन हलके होते, म्हणून’ तुकोबा बोलाचीच कढी बोलाचाच भात’ करतात. म्हणूनच, “संतसाहित्याचे नाते एका बाजूला बुध्दाच्या करुणेशी आणि दुसऱ्या बाजूला आजच्या स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता या तत्वाशी जुळणारे आहे, याचा शोध आणि बोध या साहित्यातून घेता येतो “
स्वातंत्र्याचा आणि समतेचा झेंडा संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात रोवला. याला ल. रा. पांगारकर ‘अध्यात्मिक लोकशाही ‘म्हणतात. आज लोकशाहीच्या नावावर भांडवलदारांची, धनदांडग्यांची हुकुमशाही चाललेली दिसते. खऱ्या लोकशाहीची मूल्ये संतसाहित्यातून आजच्या राजकारण्यांनी, समाजकारण्यांनी शोधून घ्यावी आणि भारतीय समाजाला सशक्त बनवावे.
आजच्या अनास्थेच्या रोगाला बळी पडलेल्या समाजाला, विद्यार्थीवर्गाला आणि एकंदरीत मानवाला त्यातून बाहेर काढण्यासाठी’ संतसाहित्य ‘ ही संजीवनबूटी आहे. संतसाहित्यात संस्काराची शिदोरी आहे. सुष्ट -दृष्ट प्रवृत्तीचा संघर्ष आहे. समाजशास्ञीय दृष्टीकोन आणि समभाव, समर्पणवृत्ती आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. विवेकनिष्ठा आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे. अनिष्ठाकडून इष्ठाकडे प्रवास आहे. अविश्वासाकडून विश्वाकडे झेप घेण्याची ताकत आहे. याच कारणाने संतसाहित्य हे ‘अक्षर वाडःमय’ठरले आहे. आज जगरहाटी दुबळी, निराश, दैववादी झालेली दिसते आहे. चत्मकारासाठी आपण आपला कोपरा राखून ठेवला आहे, त्यावरचा उपाय म्हणजे संतविचारमूल्ये समाजात रुजवून त्याचा प्रचारप्रसार करणे गरजेचे आंम्ही समजतो.
“तेराव्या शतकात अखेरीस ज्ञानेश्वर व नामदेव यांनी महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीला प्रारंभ केला. प्राप्त परिस्थितीला अनुसरुन त्यांनी समाजाला नवे विचार दिले. क्षुद्र देवतांचे पूजन, वर्णविषमता, कर्मकांड इत्यादींमुळे समाजात सामान्य व्यक्तीच्या विकासाला वाव नव्हता. अशावेळी स्वधर्म, सामाजिक नीती आणि जातीभेदातीत अशी मानवतेची शिकवण देणे आवश्यक होते. त्यासाठी ज्ञानेशांनी गीताभाष्याच्या निमित्ताने, चिद् विलासवाद व अजातवादाच्या आश्रयाने आपले तत्वज्ञान मांडले आणि समाजास निष्काम कर्मयोग शिकविला. “
संसारात राहूनही भक्ती करुन उद्धार करता येतो. ‘प्रपंच नेटका करावा’यावरही संत कटाक्ष टाकतात. सामान्यांची भाषा आणि सर्वसामान्य जनांचे विषय घेऊन संतांची दिंडी अटकेपार गेली. “कलियुगात पोटासाठी खूप संत झालेत. त्यांचे मन सदाबाहेर असते. ते अल्पविद्यापरी गर्वशिरोमणी असतात. अशा तकलादू स्वंयघोषित संतांना तुकोबा, ऐकोबाने वाट दाखविले. अशांवर तीक्ष्ण प्रहार केला. “डोई वाढवुनि केश । भूते आणिती अंगात ।तरी ते नव्हति संतजन । तेथे नाही आत्मखूण ।।” इतक्या स्पष्ट आणि सोप्या भाषेत संत तुकारामांनी सांगूनही आज अनेक जनलोक, बायाबापडे चमत्कारी मागे लागतांना दिसतात. त्यांना संतसाहित्य पथदर्शक ठरु शकते. भोंदू साधू, बाबा, महाराज, असाधू यांच्यावर कठिण शब्दात प्रहार करुन संत आपल्याला त्यांच्यापासून सावध राहायला सांगतात. हा संतांनी दिलेला इशारा लाखमोलाचा असला तरी समाजातील जनता त्यापासून कोसो मैल दूर आहे.
एखाद्या बुवाने चमत्कार दाखविला की लागलिच आपण नमस्कार करतो, मग त्याला शरण जातो. तो हळूहळू आपल्याला लुबाडतो. आपली हाती मग काहीही राहत नाही. म्हणून त्याक्षणीच जागे होऊन संतांच्या डोळस ज्ञानाचा अंगीकार करणे अत्यावश्यक आहे.
दुःख पेलण्याची ताकत संतसाहित्य देते. जे जे संतपदाला पोहचले, त्यांनी त्यांनी दुःखाला वाचा फोडण्याचं फार मोठे कार्य केले आहेत. “प्रतिभावंताकडे दुःख पेलण्याची अमर्याद क्षमता असते” असे मॅथ्यू आर्नोल्ड नावाच्या शास्ञज्ञाचे म्हणणे आहे . यापुढे जाऊन तो म्हणतो की, “प्रतिभावंत दुःखातून नवनिर्मिती करीत असतो. ” या त्यांच्या मताशी मी सहमत आहे, याचे कारण असे की, सारे संत व त्यांचे अक्षर साहित्य ही त्यांच्या अपार दुःखातून झालेली नवनिर्मितिच आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ किंवा अलिकडील समाजसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आधी दुःख भोगले मग लोकांना सांगीतले. जो वेदना भोगतो तोच उत्तम साधना करु शकतो, असे म्हंटले तर वावगे ठरु नये.
याचकारणाने वाल्मिकीने शोकाचा श्लोक केला, ज्ञानोबाने दुःखाची ओवी केली, नामदेव आपल्या वेदनेचे कीर्तन करतो, तुकोबा अपार दुःखाचा अभंग करतो, जनाई कष्टाची ओवी बांधते तर सोयराई, कान्होपाञा आलेल्या समरप्रसंगाचे अभंगगीत गाते. गाडगेबाबाच्या कीर्तनात दुःखातून सुखी होऊन माणसं वावरातल्या कणसाप्रमाणे डोलतात, वं तुकडोजी महाराज आपल्या अपार कष्टाचे भजन करतात आणि ‘खंजेरी’ तालावर सारा भारत डोलवितात.
संतांचे हे वाडःमय म्हणजे ‘दुःखाचे महासागर, अनुभवाचे आगर आणि दुःखातून सुखाकडे जाण्याचा महामार्ग आहे. म्हणून ‘आनंद तरंग ‘या ग्रंथात डॉ रामचंद्र देखणे म्हणतात की, “माणसाचे जीवन हे साहित्य, संगीत आणि कलेशी जोडले की, जीवनाच्या आनंदाची अनुभूती आपोआप उभी राहते. जीवनात व्यवस्था नाही, कार्यकारण नाही, रचना नाही, सुसंगती नाही हे पाहून माणूस उदिग्न होईल. त्यामुळे त्याला कुठे व्यवस्था, रचना, सुसंगती दिसली की तयाला आनंद होतो. समाधान वाटते आणि त्या विसंगत जीवनात आपणही आपल्या अल्प कुवतीप्रमाणे काही रचना करावी, काही सुसंगती निर्माण करावी असे त्याला वाटते. “
हे अगदी खरे आहे. संतसाहित्याचा विचार केला तर संताचे साहित्य हे अनुभवाचे खडे बोल आहेत. “अनुभव आले अंगा । तया मी लोका सांगतसे ।।” असे अनुभवाअंती तुकोबा साक्ष देतो.याअनुषंगाने मानवी जीवनातील अनुभवाची अभिव्यक्ती म्हणजेच खरी कला होय. संत हे खरे कलावंत आहेत. त्यांनी आपले दुःख साहित्यातून मांडले आणि बहुजनांना बोलके केले. संतांचे हे महत्तकार्य कधीही विसरता येत नाही. वर्तमान स्थितीत आपल्यावर कासळलेले एखादे डोंगर असेल तर आपण पार खचून जातो. संत खचले नाही तर त्यांनी ओवी ,अभंग रचले, ते तुमच्या आमच्या सुखासाठी. सामान्य माणसाला जीवनधर्म शिकविण्यासाठी, यातील मर्म, जीवनधर्म आपण केव्हा वेचणार आहोत? याचा विचार क्षणोक्षणी करणे महत्वाचे आहे.
‘संतसाहित्य ‘ हे काळाच्या कसोटीवर टीकून राहिलेले साहित्य आहे. बंडखोरी, विद्रोह, अस्सल भाव आणि जीवनाचे मर्म संतांनी साहित्यातून उलगडले. म्हणूनच तर, “महात्मा फुल्यांनी अभंगाचा रचनांध आपल्या ‘अखंडा’त वापरला आणि तुकोबाला महासाधू म्हटले. डॉ आंबेडकरांनी आपल्या ‘बहिष्कृत भारत ‘,’महानायक’ या मुखपत्रात संतवचनांना शीर्षस्थानी घेतले, हे समजून घेतले तर सामाजिक स्तरावरील संतसाहित्याचे मोल आपणास स्पष्टपणे अधोरेखित करता येईल. “
अनेक आक्रमणे महाराष्ट्रावर झाली ती संतांनी, समाजसुधारकांनी पेलली. महाराष्ट्र आणि मराठी माणूस वाचविला, हा इतिहास आहे. मग तो देवगिरीचा यादव असो की बेदरचा बादशहा. यांना शह देण्याचे महत्तकार्य संत करत आले. पोटपाण्याचा आपला व्यवसाय त्यांनी कर्ममय विठ्ठल केला. गोरोबा काका, सावता माळी, नरहरी सोनार, चोखामेळा, परिसा भागवत, विसोबा खेचर, सेना न्हावी व पुढे जाऊन एकनाथ, रामदास, तुकाराम, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशी थोर परंपरा आपल्याला लाभली. ही संतकृपा समाजबांधणीसाठी होती. यांनी ‘जगाचा संसार ‘ सुखाचा करुन तिन्ही लोकांत आनंद भरण्याचे काम केले. हे संतविचार आज देव्हा-यातून व्यवहारात आणणे लाखमोलाचे आहे.
लोकपरिवर्तनाची ही चळवळ आज बिघडलेल्या समाजाला घडविण्याचे काम करणार आहे. परिवर्तन ही काळाची गरज असल्यामुळे या संथ समाजाला संतविचारच तारु शकणार आहेत. अंधश्रध्दा आज समाजात वाढलेली दिसते. त्यावरचे उत्तर संतसाहित्यात आहे. जातीव्यवस्था निर्मुलन अजूनही झाले नाही. याची उपाययोजना संतविचारात मिळते. संत क्रांतीदर्शी होते. ते केवळ ‘टाळकुटे’ नव्हते तर समाजात पुरोगामी विचार फुंकणारे होते,यादृष्टीने त्यांच्या विचाराची मौलिकता अपार मोलाची आहे.
संतसाहित्याची मिमांसा करीत असतांना असे दिसते की, संतसाहित्य मांदियाळीत फक्त पुरुष संतच होते, असे आपल्याला म्हणता येत नाही. यात विलक्षण रचना करणाऱ्या अनेक जातीधर्मातल्या स्ञियाही होत्या. पुरुषांच्या बरोबरीने त्याही चंद्रभागेतीरी अवतरल्या दिसतात. यात ज्ञानोबाची बहिण मुक्ताई आहे,चोखियाची महारी सोयराबाई आहे, नामदेवाची दासी जनाबाई आहे, नाथपूर्वकालिन कान्होपाञा आहे, तुकोबाची शिष्या बहेणाबाई आहे. या सा-या महिलांनी आपल्यापरिने खारीचा वाटा उचलल्याचे दिसते. ‘स्ञि-पुरुष समानता ‘हे सूञ संतसाहित्यात बघायला मिळते आपले लौकिक जीवन सांभाळून पारलौकिक होण्याच्या वाटेकर या महिला कुठेही कमी पडल्या नाही.
जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा त्यांनी आवाज उठविला आहे. विठ्ठलालाही शिव्यांची लाखोली जनाई, सोयराई वाहतेच ना?मुक्ताई कुटअभंग रचते. ” मुंगी उडाली आकाशी । तीने गिळले सूर्याशी ।थोर नवलाव झाला ।वांझे पूञ प्रसवला ।।” लहानग्या मुक्ताईचा हा असा मुक्त अविष्कार वाखाण्याजोगा आहे. सोयराबाई विठ्ठलाजवळ आपले गऱ्हाणे मांडते, “जन्म घेता उष्टे खाता ।लाज न ये तुजले चित्ता ।।” आपल्या हिणजातीविषयी तिच्या मनात चिंता आहे, म्हणून ती चक्क लोकदेव विठ्ठलालाच बोलते.
बहेणाई तर ज्ञानदेवाने रचलेल्या एकंदरीत भागवत संप्रदायाची महती थोडयाथोडक्या शब्दांत ‘संतकृपा झाली । इमारत फळा आली ‘ या अभंगातून स्पष्ट करते. कान्होपाञा ही शामा गणीकेची कन्या. सुंदर, सोज्वळ या कन्येला तीची आई आपल्याच व्यवसायात आणू पाहते, परंतु या प्रकारावर ती कडाडून हल्ला चढविते.वारक-यांच्या वारीत जाऊन ती विठ्ठलाला आपली आपबिती सांगून ‘नको देवराया अंत पाहू आता।प्राण हा सर्वथा फुटो पाहे ।।’ या अभंगातून आपल्या मनाची आर्तता सिध्द करतो.’ विषयत्याग करुन नामभक्ती करा ‘हा सल्ला कान्होपाञेने दिलेला आहे. ‘पतित तू पावना पावना । म्हणविशी नारायणा रे! ‘ ही रचना म्हणजे तिचा मनाचा अत्युच्च विलास आहे, म्हणूनच तिच्या अभंगरचनेला ‘ हद् याचे आरसे ‘म्हंटले गेले आहे. शेवटी कान्होपाञेने विठ्ठलाच्या पायावर आपले डोके ठेवून प्राण त्यागला. तिला जिथे पुरण्यात आले तिथे एक वृक्ष उगवला.वारकरी त्याला कान्होपाञेचा झाड म्हणतात पण त्याचे खरे नाव ‘तरटी वृक्ष ‘ असे आहे. ही कान्होपाञा बंडखोर कवयिञी असून तिने आपला आवाज विठ्ठलापर्यंत पोहचविला आहे. स्ञीमन विदीग्न झाले तर ते काय करते? याचा आलेख कान्होपाञेने आखून दिला आहे.
या साऱ्या संतकवयित्रीत जिला ‘संतवाटीकेतील जाईची वेल ‘म्हणून गौरविल्या गेले ती म्हणजे जनाबाई.”स्वतःला ‘नामयाची जनी ‘म्हणविण्यातच जीवनाचे सार्थक मानणा-या जनाबाईचे सुमारे साडेतीनशे अभंग उपलब्ध आहेत. स्ञीमनाचा हळूवारपणा आणि भक्तीची उत्कटता तिच्या सर्व अभंगामध्ये ओथंबलेली दिसते. परमेश्वरप्राप्तीची तळमळ आणि आर्तता यातून तिच्या ब-याचशा अभंगाचे लेखन झालेले आहे. त्यामुळे तिचे हे अभंग म्हणजे उत्कट भावगीतांची मालिकाच वाटते. “
जनाई नामदेवाच्या कुटुबांत वाढली त्यामुळे नामदेवाची आई गोणाई, बायको राजाई, बहिण आऊबाई, लेक लिंबाई, सूना लाडाई, गोडाई व येसाईशी तिचा संबंध आला. नामदेवाच्या विठ्ठलभक्त कुटुंब सहवासात राहून जनाईलाही काव्य स्फुरले. आपल्या मनातील भावभावनांना तिने शब्दरुप दिले. तिचा एकेक अभंग म्हणजे भक्तीरसाने भरली तुडूंब नदी वाटते. संतवाटीकेतील स्ञीया अशा व्यक्त होत गेल्या. संपूर्ण या कवयिञिनी विठ्ठलाविषयी असीम भक्ती व्यक्त करुन समाजमन सजग करण्याचे व आपल्या भावविश्वातून, उपदेशपर अभंगातून जनसामान्याना उत्तम धडे देण्याचे पुण्यकर्म केले आहे.
या सर्व संतमंडळीचा समान भक्तीमार्गाचा धागा होता. अखिल मानवजातीच्या अभ्युदयासाठी या लोकचळवळीने रणशिंग फुंकले. देव दगडात नाही माणसात आहे, हे ओरडून सांगीतले. समाजाला नैतिकतेची शिकवण दिली. कर्मठपणावर वार केले. अंधश्रध्दांच्या मूळाशी जाऊन लोकांना खरे विवेकज्ञान दिले,म्हणून आजच्या समाजात प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगायचे असेल तर या संतविचाराची कास धरणे गरजेचे आहे. आज धार्मिक क्षेञाचे बदलते स्वरूप लक्षात घेता भावभक्ती कमी आणि अवडंबरच जास्त माजविले जाते. पूर्वी जे प्रयत्न झाले नाही ते प्रयत्न संतांनी समाज अन् माणूस घडविण्यासाठी केले,त्यासाठी संत चंदनासारखे झिजले. घरावर तुळशीपञ ठेवून ‘जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती ‘ जन्माला आल्या आजच्या विज्ञान अन् तंञज्ञान युगात संतविचाराची ही शिदोरी आपल्या तारणार आहे. पोथीनिष्ठ विचारांना आज पेव फुटले आहे. गावोगावी भागवत प्रवचनाच्या नावावर अनेक बाबा, महाराज लुबाडत आहेत. मंञतंञ दीक्षा देणे चालूच आहे. देवाला कोंबड, बोकड कापून नवस देण्याची प्रथा बंद झालेली नाही. देवदासीसारख्या प्रवृत्तीवर पूरता अंकुश नाही.
बुध्दीप्राणाम्यवाद आपण झुगारुन दिला आहे. विवेकाचा दीवा विझलेला आहे. अशा विचिञ अवस्थेत समाज सापडला असल्यामुळे समाजाच्या आमुलाग्र जागृतीसाठी, मानवाच्या उत्थानासाठी, समाजाच्या शुध्दीकरणासाठी संतसाहित्य, संतविचारमूल्ये आपल्या मनात, जनात रुजणे अत्यंत गरजेचे आहे. या आजच्या विषन्न विचिञाचे उत्तर संतांच्या विवेकवादी विचारसरणीत नक्कीच आहे.त्यामुळे धर्मजीवनातील ‘साचलेपणा ‘ निघून जाण्यास मदत होऊन ‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी ‘ मिळायला वेळ लागणार नाही.
संदर्भग्रंथ सूची
- पठाण ताहेर एच, कदम न. ब. (संपा.) :संतसाहित्यमिमांसा ,शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर 2017,पृष्ठ क्र.230
- तञैव — — — -:पृष्ठ क्र. 231
- नसिराबादकर ल. रा. : प्राचीन मराठी वाडःमयाचा इतिहास, फडके प्रकाशन, कोल्हापूर 1988,पृष्ठ क्र. 77
- देखणे रामचंद्र :आनंद तरंग, अनुबंध प्रकाशन, पुणे 2007,पृष्ठ क्र. 17
- नसिराबाधकर ल. रा. : उनि. पृष्ठ क्र. 84