January 7, 2026
Social activist Vrushali Mane spreading constitutional awareness through Constitution School initiatives
Home » संविधान शाळेचे स्वप्न पाहणारी मुलुंडची वृषाली…
मुक्त संवाद

संविधान शाळेचे स्वप्न पाहणारी मुलुंडची वृषाली…

जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ४
३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज वृषाली माने यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक, अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

गेल्या काही वर्षांत संविधानाची पायमल्ली करायची जशी काही फॅशन आलीय. संविधान बदलायची भाषा केली जातेय. संविधानाचा प्रचार प्रसार, संविधान समजून घेणे, संविधान रॅली, संविधानावर व्याख्याने असे विविध उपक्रम समाजात राबवले जात आहेत. संविधानाने आपल्या प्रत्येकाला जे हक्क व अधिकार दिलेत तेच मुळात सामान्य माणूस समजून न घेता आपली वाटचाल करत आहे व नको ते विचार आचरणात आणत आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्यं महत्त्वाची असताना समाजात जाती व धर्माचे द्वेषमूलक वातावरण निर्माण केले जात आहे. यासाठी अनेक लोक आज कार्यरत आहेत. अशाच संविधान शाळेचे स्वप्न पाहणाऱ्या मुलुंडच्या वृषाली माने..!

त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम. ए. हिस्टरी स्पेशल, कवयित्री आणि व्याख्याता सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख. ताईंचे घराणे वारकरी संप्रदायातील होते. त्यांचे आजोबांचे भजनी मंडळ होते. वडील तबला, डग्गा वाजवायचे. त्यांचं तबला, ढोलकी दुरुस्ती व विक्रीचे दुकान होतं. त्यांच्या एकत्र कुटुंबात एकूण १० मुले होती. परिस्थिती जेमतेम होती. कित्येक वेळा दिवसभर वडील गिऱ्हाईकाची वाट पहायचे. दिवस मावळायला एखादं गिऱ्हाईक यायचं, वडील म्हणायचे, ‘पांडुरंगलाच चिंता, उपाशी पोरं कशी झोपणार?’ मग भरपूर चटणी टाकून केलेला भात ९ मोठी माणसं आणि १० लहान मूल तो भात खाऊन झोपायची.

ताईंच्या घरात काका भगवान अवघडे हे पहिले पदवीधर आणि नोकरी करणारे होते. त्यानंतर मुलींमध्ये वृषाली ताई पहिल्या एमए. त्यांचे काका हे दलित पॅंथर संघटनेशी जोडले गेले. त्यानंतर कार्यकर्त्यांचे घर म्हणून ताईंच्या कुटुंबाची ओळख झाली. अण्णा काकांकडूनच सामाजिक कार्याचे बाळकडू ताईंना मिळाले व त्यांच्या मनात ती ओढ निर्माण झाली. आजही त्यांच्या मार्गदर्शनातून मी सामाजिक कार्य करत आहे असे ताई सांगतात.

वृषाली ताईंचा सामाजिक कामाचा झपाटा प्रचंड आहे. घरातून संधी मिळाली मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. संविधान लोकजागर परिषद ( मुंबई विभाग प्रमुख), राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन (कोअर कमिटी मेंबर), इंडियन सोशल मुव्हमेंट (पदाधिकारी), माणुसकीची शाळा नियोजन कमिटी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता, महिला समता पक्ष कमिटी मेंबर, आंबेडकर स्त्री संघटन कार्यकर्ता संविधान कार्य शाळेच्या ट्रेनर म्हणून काम असा त्यांचा मोठा आलेख आहे.

मुळात माहेरचे वारकरी कुटुंबाचा संस्कार असताना त्या संतांचे पुरोगामी विचार पुढे नेताना फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या सर्व महान स्त्री आणि पुरुषांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी चौकात रोडवर जयंती साजरी करतात. राष्ट्रीय सन 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. मुलुंड कॉलेजमध्ये त्यानिमित्त स्पर्धेचे आयोजन करून संविधान दिनादिवशी संविधान रॅलीचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर भारतातील पहिली संविधान लिपी पुस्तिकाच्या (लेखक भगवान अवघडे) च्या साह्याने संविधानिक मूल्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान शाळा घेण्यासाठी प्रशिक्षणार्थींची कार्यशाळा तीन दिवसीय प्रशिक्षण घेतात. त्याच्या ऑनलाइन संविधान कार्यशाळाही घेतात. मेहतर समाजाला सामाजिक स्थान मिळवून देण्यासाठी मेहतर मिष्ठान्न भंडार सहकार तत्वावर निर्मिती करण्याचे कार्य चालू आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी ऑडिट मुंबईतील रेल्वे स्टेशन व बस डेपोच्या ठिकाणी करण्याचे काम स्त्रीमुक्ती संघटनेबरोबर त्या करत आहेत. रोडवर बेवारस पडलेल्या माणसांना त्या आसरा मिळवून देतात. मणिपूर व बदलापूर प्रकरण, स्वारगेट सारख्या,रोहित वेमुला हत्याकांडाच्या न्याय प्रकरणांसाठी रस्त्यावरचा संघर्ष करून न्याय मिळवून देण्यासाठी त्या आवाज उठवत आहेत.

आज अशी विविधांगी कामे घराबाहेर करत असताना सुरुवातीच्या काळात त्यांच्या घरातूनच त्यांना मानसिकता बदलासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. लग्न झाल्यानंतर सासरकडचं कुटुंब हे दैववादी, अंधश्रद्धा, पूजा अर्चा करणारे आणि महिलांनी घर सांभाळायचं अशा विचारांचे होते. त्यांचे सासरे फिल्म इंडस्ट्रीत मोठे एडिटर होते. प्रगत विचारांचे होते तरीसुद्धा सुनेच्या डोक्यावरील पदर खांद्यावर आलेला त्यांना पटत नव्हता. काही काळाने मात्र विभक्त कुटुंब झाल्यानंतर ताईंनी स्वतःचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केलं आणि सासरकडची धाकटी सून असूनही नोकरी आणि सामाजिक काम करण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या. त्याला घरातल्यांचा विरोध होता परंतु पतीची साथ होती.

नोकरी सोबतच हळूहळू ताईंनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. स्वतःच्या घरातील देव- देव पूजाअर्चा व बाकी परंपरागत रूढी बंद करून विज्ञानवादी विचारसरणी फुले- शाहू- डॉ. आंबेडकर यांच्या पुस्तकांचे वाचन सुरु करून घरामधील देवांचे विसर्जन केले. घराच्या दर्शनी भागात भारताच्या संविधानाची उद्देशिका हॉलमध्ये लावलेली आहे. ‘हा एक प्रकारचा विद्रोही संघर्ष माझ्या एकंदरीत कुटुंबामध्ये करून त्यांनी हे वैचारिक परिवर्तनातून मिळवलेले यश आहे. सध्या मी एक सामाजिक कार्यकर्ता संविधान प्रचार, प्रसारक, एक कवयित्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण झाली आहे याचे सर्व श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. महत्त्वाचं म्हणजे जीवनभर साथ देणारे माझे पती हे कायम माझ्याबरोबर असतात आता ते समविचारी झाले आहेत. त्यामुळे आणि माझे काका भगवान अवघडे (आण्णा ) यांचे मार्गदर्शन मला आजही मिळते आहे.’ असे ताई आनंदाणे व अभिमानाने सांगतात. आजच्या परिस्थितीत देव नाकारणे किंवा घरातील देव विसर्जित करणे ही साधी गोष्ट नाही त्यासाठी भयमुक्त व्हावे लागते व विचार निर्भिड व्हावे लागतात.

ताई सध्या खूप मोठं स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगून आहेत. प्रत्येक गल्ली, मोहल्ला आणि शहरात, गावात संविधान शाळा निर्माण करायची आहे, त्यासाठी त्या स्वतः विविध ठिकाणी ट्रेनिंग देत आहेत आणि स्वतः अभ्यास करून शिकतही आहे. अनेक महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या आपापल्या क्षेत्रात यशस्वीही होतात. परंतु वृषाली ताईंनी स्वीकारलेली संविधान शाळेची वाट आजच्या परिस्थितीत तितकीशी सोपी नाही. आपण त्यांना साथ देऊयात. त्यांचे बळ वाढवूयात. संविधान समजून घेऊयात. त्याचा प्रचार प्रसार करूयात आणि ते अंगीकारूयात.

अशा विविध सामाजिक कामे करत असताना स्वतःच्या घरात बदल करून संविधान शाळेचे स्वप्न पाहणाऱ्या या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान…

न्या खन्ना यांनी संविधानाच्या आत्म्याला शब्द दिले – न्या. भूषण गवई

भारताचे संविधान गोष्टीरुपात समजून घेण्यासाठी वाचा डॉ. यशवंत थोरात यांची पुस्तके

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading