November 21, 2024
Dam Overflow in Rainy season but water scarcity in summer
Home » धरणे भरूनही पाणी टंचाई !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

धरणे भरूनही पाणी टंचाई !

पूर्ण क्षमतेने भरलेली धरणे उन्हाळ्यात कोरडी पडण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. हे कारण अनेकांच्या लक्षात आले आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. महाराष्ट्रातील अनेक धरणे गाळाने भरली गेली आहेत. त्यामुळे धरणांचे पात्र उथळ झाले आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे

पाऊस पडतो. पूर येतो. धरणे भरतात. तरीही डिसेंबर जवळ येताच पाण्याची टंचाई सुरू होते. काही गावात तर पावसाळा सुरू असतानाच पाण्याची टंचाई सुरू होते. गावोगावी पाण्यासाठी लोकांचे हाल कसे होतात याच्या बातम्या वाहिन्यावर दाखवल्या जातात. पावसाळ्यात पूराच्या आणि हिवाळा-उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या बातम्या, महाराष्ट्राच्या प्राक्तनात लिहिल्या आहेत. हे का घडते, कसे घडते, याचा आपण साकल्याने विचार करण्याची गरज आहे. यामागचा भूगोल आणि विज्ञान समजून घेणे आणि निदान यापुढे तरी विवेकाने जगणे गरजेचे आहे.

पृथ्वीवर दरवर्षी पाऊस पडतो. जगभरात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणापेक्षा दोन इंच जास्त म्हणजेच ४३ इंच पाऊस भारतात पडतो. भारताच्या सरासरीपेक्षा पाच इंच जास्त पाऊस महाराष्ट्रात पडतो. आमची धरणे काठोकाठ भरतात. उलटून वाहू लागतात. तरीही उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते. याचे पहिले कारण म्हणजे महाराष्ट्रात पावसाचे पुरेसे पाणी साठवू शकेल अशी व्यवस्था अद्याप निर्माण करू शकलो नाही. महाराष्ट्रात १८२१ धरणे आहेत. यात १७ मोठी धरणे, १७३ मध्यम आणि १६३१ छोटे तलाव आहेत. यामध्ये पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी केवळ सहा टक्के पाणी साठवले जाते. पावसाचे १०० लिटर पाणी जमिनीवर उपलब्ध होत असल्यास, त्यापैकी केवळ सहा लिटर पाणी तलावात साठवले जाते. उरलेल्या पाण्यापैकी केवळ दहा लिटर पाण्याचे पुनर्भरण होते, म्हणजे जमिनीत मुरते. काही भागात सात तर काही भागात ३० टक्के पाण्याची वाफ होते. म्हणजे ७ ते ३० लिटर पाण्याची वाफ होते. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण १७ टक्के इतके होते. नद्यांच्या प्रवाहातून वाहत जाऊन १०० लिटर पाण्यापैकी ६७ लिटर पाणी समुद्राला मिळते. हे समुद्राला मिळणारे पाणी अडवायला पाहिजे आणि ते पाणी जमिनीत जिरवायला पाहिजे.

…हे भुकंपावेळी मोठ्या हानीला कारण

महाराष्ट्रातील जमिनीखाली बेसॉल्ट खडकाचा थर येतो. बेसॉल्ट खडकामध्ये लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त आहे. इतर खडकाच्या तुलनेत सिलिकाचे प्रमाण कमी असते. हा खडक ज्वालामुखीच्या थरातून तयार होतो. यामध्ये भेगा कमी असतात. त्यामुळे या खडकामध्ये पाणी पाझरण्याचे प्रमाण अत्यल्प असते. या खडकाच्या खाली शेकडो वर्षांपूर्वी साठलेले पाणी कुपनलिका खोदून आपण उपसण्यास सुरुवात केली. जेवढे पाणी जमिनीतून जेवढे पाणी उपसतो, तेवढे पाणी पुन्हा जमिनीत शिरत, मुरत नाही. त्यामुळे जमिनीमध्ये पोकळी निर्माण झाली. ही पोकळी फार मोठी आहे. जमिनीतील पाणी आतून लाव्हा रसाच्या ज्या धडका खाली घन भूस्तराला बसतात, त्यांच्यासाठी शॉक ॲबसॉर्बरचे काम करत असतात. मात्र पोकळी निर्माण झाल्याने शॉक ॲबसॉर्बर नष्ट पावत आहेत. हे भुकंपावेळी मोठ्या हानीला कारण आपण निर्माण करत आहोत.

धरणात मुरणारे पाणी किती ?

त्याचवेळी आपण तलावात जे काही पाणी साठवत असतो, त्या पाण्याचा स्वत:चा जमिनीवर दाब निर्माण होत असतो. या दाबामुळे खालच्या भागात असणारे पाणी भूगर्भात निर्माण झालेल्या पोकळीकडे पूर्वीपेक्षा जास्त वेगाने धावत असते. धरण क्षेत्रात असे पाणी पाझरून आजूबाजूच्या पोकळीत जात असल्याने धरणातील पाण्याचे प्रमाण घटत असते. भूगर्भातील पाणी आपण जितके जास्त वेगाने उपसत जाऊ, तितक्याच वेगाने त्याची जागा घेण्यासाठी पाणी जमिनीत धावते. यामुळे धरणातील पाण्यात घट होते. हे असे पाण्याचे मुरणे किती आहे, याची मोजदाद करता येणे शक्य नसल्याने यावर आज कोणीही फारसे बोलताना दिसून येत नाही. मात्र भूगर्भातील घटते पाणी, हे दुर्लक्षित राहिलेले महत्त्वाचे कारण बनत आहे.

बाष्पीभवन रोखण्यावर प्रयत्न गरजेचे

जागतिक तापमान वाढीने बाष्पीभवनाचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातही धरणाचे पात्र मोठे असेल आणि खोली कमी असेल तर हा वेग आणखी वाढत आहे. त्यामुळेही पाण्याच्या बाष्पीभवनामध्ये मोठी वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी कमी होत आहे. यावर तोडगा काढणे कोणा एका देशाला शक्य नाही. त्यासाठी सर्वच देशांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र हव्या त्या वेगाने याबाबत सकारात्मक प्रयत्न होत नसल्याने यावर आपण आपले प्रयत्न करत राहणे, एवढेच राहते.

मृत पाणीसाठ्यात घट…

पूर्ण क्षमतेने भरलेली धरणे उन्हाळ्यात कोरडी पडण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. हे कारण अनेकांच्या लक्षात आले आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. महाराष्ट्रातील अनेक धरणे गाळाने भरली गेली आहेत. त्यामुळे धरणांचे पात्र उथळ झाले आहे. त्यामुळे धरणाच्या एकूण साठवण क्षमतेइतके पाणी साठतच नाही. पावसाळ्यात धरणाचे दरवाजे उघडले गेले की आपण खूश होतो. मात्र जेवढे साठणे अपेक्षित असते, तितके पाणी साठतच नाही. तरीही तलावाची सुरुवातीची साठवण क्षमता गृहित धरून सर्व आकडेवारी जाहीर करण्यात येते. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा आजही तेवढाच मिळत असला तरी मृत पाणीसाठा वेगाने घटत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली होत असल्याचे लक्षात येते.

शहरांचा वाढता विस्तार…

याखेरीज सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तलावांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शहरांचा वाढत असणारा विस्तार आणि स्थानिक स्वराज्य संस्थाचे बेफिकीर होणे हे आहे. कोणत्याही तलावातून शहराला होत असणारा पाणी पुरवठा दिवसेंदिवस वाढत आहे. शहराची लोकसंख्या, शहरातील घरे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला पुरेसे पाणी पुरवणे आवश्यक असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था प्रति माणसी प्रति दिन किती पाणी पुरवले जाते, याचेही भान राखणे आवश्यक आहे. मात्र हे प्रमाण खूपच वाढले आहे. मात्र वाढती लोकसंख्या आणि पाणी पुरवठ्याचे अतिरेकी प्रमाण हे तलावातून अतिरिक्त पाणी उपसण्यास कारणीभूत ठरत आहे.

यावर उपाय जनतेनेच करण्याची गरज आहे. आपण अत्यंत जबाबदारीने पाणी वापरण्याची गरज आहे. जमिनीतून पाणी कमीत कमी उपसायला हवे. ऊस, द्राक्षे, हळद अशी पिके योग्य ठिकाणीच लावायला हवीत. डोंगराच्या टोकावर ऊसासारखी पिके घेण्यासाठी कुपनलिकांचा वापर करून जमीन शुष्क करत आपण फार मोठ्या संकटाला आमंत्रण देत आहोत. हे टाळायलाच हवे.

डॉ. व्ही. एन. शिंदे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading