July 21, 2024
Ficus India Special article by Netra Palkar Apte
Home » वटवृक्षास बॅनयन ट्री नाव कसे पडले ? जाणून घ्या…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वटवृक्षास बॅनयन ट्री नाव कसे पडले ? जाणून घ्या…

ग्रँडफादर ट्री : वटवृक्ष

वटवृक्षाला हिंदू धर्मात पूजेचे स्थान मिळाले आहे. वटसावित्रीची कथा या वृक्षाबरोबर गुंफली गेली आणि हा वृक्ष पूजनीय ठरला. या कथेतील सावित्री जितकी मोठी आणि आदर्श मानली जाते, तितकाच वडही निसर्गातील एक मोठा आणि आदर्श वृक्ष आहे. निसर्गातील वडाचे स्थान व उपयोग लक्षात घेतले, तर तो पूजनीय आहे असे निश्चितच म्हणता येईल.

वड हा मूळ अंजीर वर्गातील वृक्ष आहे. या वर्गात 600 पेक्षा जास्त वृक्ष प्रकार आहेत. पिंपळ, अष्टा, उंबर हे या वर्गातील इतर काही वृक्ष. वडाचे वनस्पती शास्त्रीय नाव ‘फायकस बेंगालेंसिस’ असे आहे. अतिशय समर्पकपणे हा वृक्ष ‘ग्रँडफादर ट्री’ म्हणून ओळखला जातो. इंग्रजीत या वृक्षाला बॅनयन ट्री असे म्हणतात. हे नाव युरोपियन लोकांनी पाडले आहे. इराणच्या आखाताच्या आसपासच्या प्रदेशात, या प्रकारच्या वृक्षांच्या सावलीत बसून, भारतातून आलेले व्यापारी वस्तुंची देवाण-घेवाण व इतर व्यवहार करीत असत. अशा बनिया म्हणजेच व्यापारी लोकांवरून बॅनयन ट्री हे नाव रूढ झाले.

भारतीय उपखंडात हा वृक्ष सर्वत्र आढळतो. हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जंगलात ही झाडे रानटी स्वरूपात आढळतात. भारतात इतरत्र सपाटीचा भाग, रस्त्यांच्या कडेला, माळराने व खेडोपाडी हा वृक्ष लावलेला आढळतो. या वृक्षाची उंची 70 ते 100 फुटापर्यंत असते. सदापर्णी या प्रकारात हा वृक्ष मोडतो. झाडाला नवी पालवी फेब्रुवारी व मार्च महिन्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्यात येते. नोव्हेंबर ते जानेवारी हा फुले येण्याचा काळ आहे. आपण ज्याला फळे समजतो, ती प्रत्यक्षात फळे नसून, लहान लहान फुले एकत्र असलेला फुलांचा एक बटवा असतो. यामध्ये काही मादी फुले व काही वंध्य फुले असतात. वडाच्या फुलातील परागीभवन अंजीरमाशी (फिग व्हास्प) या विशिष्ट माशी द्वारा होते. ही माशी आकाराने लहान असते. फळाला भोक पाडून ती आत जाते व त्यातील वंध्य फुलात आपली अंडी घालते आणि उबवते. याप्रमाणे फळातच माशीची नवनिर्मिती होते. एकावेळी 30 ते 40 माशांचा जन्म होतो. या माशा पुंकेसर घेऊन फळाबाहेर पडतात व दुसऱ्या फळातील स्त्रीकेसराकडे नेतात. त्यानंतर फलधारणा होते. आपण ज्यांना फळे म्हणतो, ते उन्हाळ्याच्या सुमारास पिकतात. तोपर्यंत त्यांच्यात फलधारणा झालेली असते व लहान आकाराच्या बिया तयार झालेल्या असतात. पिकलेली फळे लालसर व मऊ होतात व हळूहळू गळून पडतात. या फळातील बिया वाऱ्याने व इतर पक्षांमार्फत इतरत्र जातात आणि त्यांच्या विष्ठेमार्फत रुजून नवीन झाड तयार होते.

वडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आडव्या वाढणाऱ्या फांद्यांना मुळे फुटून ती जमिनीत रुजतात व वृक्षाला आधार देतात. मुळे जमिनीत फार खोलवर जात नाहीत, तर ती आडवी पसरतात. मुख्य खोड, उपखोडे व पारंब्या यांचे एक जाळे तयार होते. अशा वृक्षांचे आयुष्य शेकडो वर्षांचे असू शकते. विकासाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे या वृक्षांना स्वाभाविक मृत्यू नसतो. निसर्गामध्ये या गुणधर्मामुळे त्यांचे एक खास असे स्थान आहे. त्यांचा प्रचंड विस्तार, दीर्घायुष्य यामुळे वडाची स्वतःची अशी एक स्वतंत्र प्रणाली तयार होते. परिस्थितीच्या दृष्टीने तुलनेने स्थिर स्वरूपाची ही प्रणाली पक्षी, कीटक व यासारख्या इतर जीवांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे.

दीर्घायुषी वड विविध प्रकारच्या जीवांना आश्रय देतात. वडाची फळे अनेक पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे. वाघळांची आकाराने सर्वात मोठी अशी फलाहारी जात या वडाच्या आधाराने वस्ती करून राहते. यामुळे त्यांचे नावच वटवाघुळ असे पडले आहे. आपल्या घराजवळ एखादा वटवृक्ष असेल, तर त्या वृक्षाच्या आधारे किती वेगवेगळे जीव जगत असतात, याचे उत्तम प्रकारे निरीक्षण करता येते.

अशा विस्तीर्ण वृक्षाच्या खोडात धनेश (हॉर्न बिल) आपली लिंपून बंदिस्त केलेली घरटी बनवतात. पोपट, तांबट, सुतार, कावळे, साळुंक्या, घारी, गिधाडे तसेच काही जातींचे ससाणे इत्यादी पक्षी वडाच्या जाड फांद्यांच्या बेचक्यातून आपली काट्याकुट्यांची घरटी बनवतात. तसेच साळुंखी, बुलबुल, कोकिळा, पारवे, पावशा, हळद्या, हरियाल यांची वडाची फळे खाण्यासाठी झुंबड लागलेली असते. वडाच्या फांद्यांवर वाढणाऱ्या बांडगूळाच्या फुलातील मध चाखायला फुलटोचे येतात. सुभग, नाचरा, सातभाई, चष्मेवाला इत्यादी पक्षी पानामागे दडलेले व फळातील बारीक कीटक खाण्यासाठी वडाकडे येतात. वडावर मधमाशांचे एखादे पोळे असेल तर कोतवाल, वेडा राघू इत्यादी पक्षांची विशेष चंगळ असते. त्यामुळे अशा वडावर पक्षांचा गलका जास्तच आढळतो. वडाच्या फांद्यांच्या बेचक्यात खारी शेवरीचा कापूस, मऊ गवत इत्यादी वापरून आपले घरटे बनवतात.

जंगलातील मोठ्या वृक्षांच्या ढोलीचा उपयोग वाघ, कोल्हे, अस्वल, रानमांजर इत्यादींनी केल्याच्या नोंदी व निरीक्षणे आहेत. माकडं, वांदर यांचे कळप वडाची फळे फस्त करतात. वडाखालच्या पालापाचोळ्यात सापसुरळी, गोम तसेच खोडावर पाली, धामण, हरणटोळ यासारखे साप, सरडे आणि बिळातून मुंग्या, वाळव्या इत्यादी जीव आसरा घेतात. एखाद्या वडाच्या झाडाच्या आधारे पक्षी, प्राणी, कीटकांच्या जास्तीत जास्त जाती एकमेकांच्या सहवासात राहताना आढळतात. विविध अधिवासात आढळणारे वडाचे झाड, प्रचंड विस्तार आणि खाद्याची विपुलता यामुळे वडाच्या अवतीभोवती एक मोठी परिसंस्था तयार झालेली आढळते. असे विशेष स्थान इतर झाडांना अभावानेच मिळते.

वडाच्या झाडाच्या सर्व भागात औषधी गुणधर्म आहेत. शेतकऱ्यांच्या हातापायास पावसाळ्यात भेगा पडतात, वडाचा चीक लावल्याने त्या भरून येतात. दात किडल्याने होणाऱ्या वेदना, हा चीक दातात भरल्यास थांबतात. सांधेदुखी, कंबरदुखी अशा आजारात या चिकाचा लेप लावतात. ताप आला असता, वडाची तीन-चार गळलेली पाने तांदुळाच्या पेजेत उकळून देतात, त्यामुळे घाम लवकर येतो व ताप उतरण्यास मदत होते. वडाची फळे मधुमेहावर औषध म्हणून वापरतात. सर्पदंश झाला असता, वडाची साल वाटून त्यावर लावतात. परंब्यांचा उपयोग केसाच्या तेलामध्ये केला जातो.

अजूनही बऱ्याचशा खेडेगावांमध्ये गावाच्या मध्यभागी मोठा पार असलेला वड असतो. हा पार गावातील सगळ्यात महत्त्वाची जागा असते. गावसभा, गप्पांचे अड्डे, काही छोटेखानी व्यवसाय याच वडाच्या दाट शीतल छायेत रंगतात. वडाच्या लाकडाचा उपयोग जळणा व्यतिरिक्त फारसा होत नाही. मात्र पारंब्या चिवट आणि मजबूत असल्याने त्या दोरीसारख्या वापरता येतात. वडाच्या पानांपासून पत्रावळ्या बनवतात.

अलीकडे शहरी भागात या वृक्षांच्या विस्तारास अनुकूल अशी परिस्थिती राहिलेली नाही. विकासाच्या नावाखाली असलेले जुने, मोठाले वृक्ष छाटले आणि तोडले जात आहेत. वडाच्या पारंब्या वारंवार कापल्या गेल्यामुळे वडाचा होणारा विस्तार थांबतो आणि अवजड माथ्याचे हे वृक्ष पावसाळ्यात कोसळतात.

भारतीय संस्कृतीत वटवृक्षाला अखिल विश्वाचे प्रतिक मानले आहे. असा वृक्ष लावणे हे पुण्याचे काम मानले जाते. मात्र हेच वृक्ष वटपौर्णिमेच्या आधी अमानुषपणे छाटले जातात. एका दिवसाच्या, काही मिनिटांच्या पूजेतून पुण्य कमावण्यासाठी वडासारख्या पूजनीय वृक्षाची कत्तल केली जाते. आपल्या पूर्वजांनी निसर्गचक्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या वृक्षाचे संरक्षण व्हावे या हेतूनेच वटपौर्णिमेसारखे सण सुरू केले. मात्र आज याच हेतूचा विसर पडलेला आहे.

आज या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची फांदी आणून तिची पूजा करण्यापेक्षा, एखादा वटवृक्षच दत्तक घेण्याचा आपण संकल्प करू या आणि आपल्या अवतीभोवती असलेली वडाची झाडं वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहू या.

सौ. नेत्रा पालकर-आपटे, रत्नागिरी


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अस्सल ग्रामिण जीवनाला न्याय देणारा आसक्या कथासंग्रह

सर्वसामान्यांच्या जगण्याची धग प्रतिबिंबित करणाऱ्या आतल्या विस्तवाच्या कविता

तुम्हाला अभिनेता व्हायचे आहे, मग हे ऐकाच…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading