July 27, 2024
Need to stop trolling by law
Home » ट्रोलींग कायद्याने बंद करण्याची गरज
संशोधन आणि तंत्रज्ञान

ट्रोलींग कायद्याने बंद करण्याची गरज

विलास पाटणे

33 वर्षीय आय. टी. व्यावसायिक व्ही. रम्या चेन्नईमधील आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत आपल्या सात महिन्यांच्या मुलीला स्तनपान करीत होत्या. नंतर त्यांचे छोटे बाळ हातातून निसटून पहिल्या मजल्यावरील पत्र्यावर पडले. 15 मिनिटांच्या प्रयत्नानंतर बाळाला वाचविण्यात लोकांना यश मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. लोकांनी व्ही. रम्याना जबाबदार धरुन ट्रोल करणेस सुरुवात केली. स्थायिक टी. व्ही. चॅनल्सनेही त्यांचे वर्णन ‘निष्काळजी आई’ असे केले होते.

हेच रम्यांसाठी जीवघेणे ठरले. ट्रोलींगमुळे त्रासलेल्या व रम्या आपले पती व आपल्या दोन मुलांसह (5 वर्षाचा मुलगा व 7 महिन्यांची मुलगी) कोईम्बतूर येथे माहेरी आल्या. रविवारी रम्याचे आई-वडील आणि पती लग्नाला गेले होते. पराकोटीच्या द्वेषाच्या ट्रोलींगमुळे त्या नैराश्येच्या गर्तेत गेल्या. ते घरी परतले तेव्हा त्यांना रम्या मृत आढळल्या. दुर्दैवी घटनेनंतर रम्या नैराश्य व तणावाखाली आयुष्याशी झुंजत होत्या. त्यांच्यावर मानसिक उपचार सुरु झाले होते.

रम्यांचे पती हे देखील आयटी व्यावसायिक आहेत. अशारितीने समाजातील अनेक घटक दुसऱ्याला त्रास देण्याच्या हेतूने व काहीजण त्यात आनंद मिळविणेचे हेतूने जीवघेणे ट्रोलींग करीत असतात. या घटनेमुळे जीवघेण्या ट्रोलींगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ट्रोलिंगची तशी सरळधोपट व्याख्या नाही. परंतु ट्रोलींग म्हणजे भ्रामक आणि व्यत्यय आणणार ऑनलाईन वर्तन, ज्यात लोकांना जाणीवपूर्वक उत्तेजन आणि त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषमुलक शेरेबाजी व टिपण्या केल्या जातात. एखाद्या वादामध्ये शब्दांची आणि अभिव्यक्तीची व सभ्यतेची मर्यादा ओलांडलेली नसते, अशा चर्चेला ट्रोलींग म्हणता येत नाही. पण जिथे समोरच्या व्यक्तीला जाणिवपूर्वक त्रास देण्याचा, नामोहरम करण्याचा, शारिरीक आणि मानसिक इजा पोहोचण्याचा, लैंगिक छळ करण्याचा बदनामीचा हेतू असतो त्याला सर्वसाधारणपणे ट्रोलिंग म्हटले जाते. सभ्य भाषेत वाद होवू शकतो. परंतु एखादी व्यक्ती जाणिवपूर्वक गलिच्छ शब्दात लिहायला सुरुवात करते. त्यात ट्रोलींग म्हणता येईल.

मनोविकारतज्ज्ञांच्या मतानुसार सायकोपाथ म्हणजे समाजविरोधी दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्तीच व्यक्तिमत्त्वात असते. (1) दुस-याला त्रास देण्यातून आनंद मिळविणे, (2) वैयक्तिक मतभेद हेवेदावे, (3) राजकीय व विचारधारेतील मतभेद, (4) संबंधित व्यक्तींचे लैंगिक अग्रक्रम न पटल्याने, (5) प्रकाशझोतात राहण्याचा अट्टाहास किंवा आवडत्या व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी सर्वसाधारणपणे ट्रोलींग केले जाते.

काही ट्रोल्स चुकीच्या माहिती पसरविण्यासाठी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी वापरतात. यामुळे व्यक्तींची सुरक्षा आणि गोपनीयता धोक्यात येवू शकते. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 67 व 67अ अन्वये आक्षेपार्ह, बदनामीकारक व खोडकर संदेश पाठविल्यास त्या संबंधी सायबर गुन्हा दाखल होवू शकतो. अर्थात भारतीय राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा व व्याप्ती लक्षात घेवूनच या कायद्याच्या तरतुदी लागू होतात. भारतीय दंडविधान कायदा कलम 499 अन्वये अश्लिल चित्रे, व्हीडीओ अथवा संदेश समाज माध्यमावर प्रसारीत केल्यास कारवाई होवू शकते. तसेच भारतीय दंडविधान कलम 503 प्रमाणे गुन्हेगारी स्वरुपाची धमकी असेल तर कारवाई होवू शकते.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये. यापुढे खाजगी कंपन्यांना संशयित किंवा दोषींचे नाव, पत्ता, ईमेल इत्यादी माहिती उपलब्ध करुन द्यावी लागणार असा कायदा येतो आहे. ट्रोलींगमधून आक्षेपार्ह पोस्टींगबद्दल युजरसह कंपनीला जबाबदार धरणेत येणार आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारच्या म्हणण्यानुसार , ऑनलाईन डिजिटल जगात अराजकतेला कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जावू शकत नाही. न्यूझिलंड देशात धोकादायक असलेले डिजिटल कम्यूनिकेशन बिल संसदेने मंजूर केले आहे. कंपन्यांना असे संदेश 24 तासात हटवणे बंधनकारक राहणार आहे. इंग्लंडमध्ये समाजमाध्यमावर त्रास देणे, पाठलाग करणे हा गुन्हा मानला जावू शकतो. खासदर स्टेला केसी याना अश्लील व आक्षेपार्ह ट्रोल केल्याबद्दल पीटर नन याना दीड महिन्याची शिक्षा झाली.

समाजमाध्यमांच्या व्यापक प्रसारामुळे घराघरातील संवाद अलिकडे खुंटला आहे. तरुण मुलांना व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्राम डी.पी.वर व्यक्त करणेची सवय लागली आहे. नव्या पिढीच जगण इंटरनेट आणि समाजमाध्यमावर अवलंबून आहे. महाविद्यालयीन स्तरावर सायबर सुरक्षेविषयी खबरदारी घेतली पाहीजे. ट्रोलींग ही विकृत मानसिकता आहे, हे मुलांवर बिंबवणे गरजेचे आहे.

भारतात व्ही. रम्यासारखे अनेक निष्पाप बळी ट्रोलींगमुळे गेले आहे. जनतेच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण करण्याचा अधिकार या ट्रोलर्सना कोणी दिला ? स्वतःच फिर्यादी व न्यायाधिश बनून आक्षेपार्ह भाषेत निकाल देणे, कोणत्याही परिस्थितीला न्यायालयीन चौकटीत बसत नाही. समाजात अलीकडे सहवेदना कमी झाल्याचे हे लक्षण आहे. ट्रोलसंबंधी कठोर कायदा अपेक्षित आहे. परंतु सर्व प्रश्न कायद्याने सुटणार नाहीत. ट्रोलर्सनी समाजभान ओळखून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडता कामा नये.

 अॅड. विलास पाटणे
(लेखक रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अर्थसंकल्पाचा काय होईल परिणाम ? किसानसभेने व्यक्त केली चिंता

मराठी साहित्य संमेलन आयोजक संस्थाना अर्जाचे आवाहन

चांदोलीत निसर्ग पर्यटनास प्रारंभ या निमित्ताने अभयारण्याबाबत…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading