July 27, 2024
Kamathipura special article by Ajay Kandar Male domestic and foreign alike
Home » पुरुष घरचा आणि बाहेरचा सारखाच
मुक्त संवाद

पुरुष घरचा आणि बाहेरचा सारखाच

दुर्दैवाने देहविक्री व्यवसायात गेलेल्या मुलीने देहविक्री करून घरी पैसा दिलेला चालतो; पण ती मुलगी परत घरी आलेली चालत नाही. असं सांगताना तोंडातलं पान पचकन थुंकत तनिषा म्हणाली, ‘साला आदमी तो बडा हरामी है!

कामाठीपुरा देहविक्री करणाऱ्या वस्तीमधील कुंटणखाना चालविणाऱ्या तनिषाने ज्या पद्धतीने एक जात पुरुष वर्गावर थुंकण्याचा प्रयत्न केला तो प्रकार पाहून अंगावर शहारेच आले. तिच्या मते पुरुष घरचा असो किंवा बाहेरचा पुरुष हा पुरुषच असतो. बाईला जरा स्वातंत्र्य मिळालं आणि ती मोकळेपणाने बोलायला लागली, की बाईकडे संशयानेच तो बघतो. खरं तर तनिषाकडून देहविक्री करणाऱ्या महिलांच्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी जॉन भाई आणि मी, दोघे टॅक्सीतून उतरलो आणि सगळ्या जगावर अंधार पसरलाय अस वाटू लागल. खूप दूरवर महिला रस्त्याच्या बाजूला उभ्या होत्या. त्या सगळ्यांना पाहून फारच संकोचल्यासारखे वाटू लागले.

माझी ही स्थिती जॉन यांच्या लक्षात आली असावी. त्यांनी माझा हात आपल्या हातात घट्ट धरला. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या बहुसंख्य महिला जॉन यांना ओळखत होत्या. जॉन यांना त्या आपला भाऊ म्हणायच्या. त्यातील अनेक जणींबरोबर चालता चालता बोलत जॉन एका मोठ्या गल्लीत मला घेऊन गेले. त्या गल्लीतील एका अंधाऱ्या खोलीत आम्ही प्रवेश केला. जॉन यांना बघून सोप्यावर बसलेल्या अनेक महिला एकदम उठल्या. त्यांनी जॉन यांना नमस्कार केला. इतक्यात त्या जिथे बसल्या होत्या तेथील लाईट कोणीतरी लावली आणि जिथे सर्वत्र अंधार पसरला होता तिथे जॉन यांच्या आगमनाने उजेडच उजेड झाला.

खरं तर आम्ही खोलीत प्रवेश केला तेव्हा तिथे बसलेल्या महिलांच्या अंधारातील सावल्या पाहून मनात एक प्रकारची अनामिक भीती वाटून गेली होती; पण अशा अवस्थेतही त्या महिलांनी जॉन यांना उठून आदराने जो नमस्कार केला तो कधीही विसरता येण्यासारखा नव्हता. जॉन यांनी या महिलांच्या आयुष्यात नव्याने उजेड आणण्याचा प्रयत्न चालविला होता. लाईट लावली गेल्यावर आम्ही दोघंही तिथेच एका सोप्यावर बसलो. खुंटणखाना चालविणाऱ्या तनिषा या महिलेशी माझी ओळख करून दिली आणि ते तिला म्हणाले,”हे पत्रकार आहेत”.तुम्हाला या कोरोना काळात काय काय समस्या आहेत ? हे सांग यांना.

एवढ्यात ती महिला माझ्याकडे बघून म्हणाली, ये जॉन भाई है ना, ओ भले आदमी है. हमारी सबकी देखभाल करते है। लेकीन इस कोरोना काल मे सरकार की नियत अच्छी है। फिर भी सरकारने जो मदत हमारे लिए घोषित की है वो हमारे पास आती ही नही। अर्थात हे तिचं सांगणं खरंच होतं.

कोरोना काळात राज्य शासनाने समाजातील तळातला वर्ग उपाशी राहू नये म्हणून खूप चांगल्या योजना आखल्या आणि त्या प्रत्यक्षात अंमलात आणल्या. मात्र ज्यांना खरी मदतीची गरज होती अशा वर्गापर्यंत ती मदत योग्य वेळी पोहचू शकली नाही. याला प्रशासन व्यवस्था बऱ्याचअंशी जबाबदार होती. त्या महिलेशी मग खूप गप्पा झाल्या. त्यातून कोरोना काळात देहविक्री करणाऱ्या महिलांची दैन्यावस्था कळून आली.

देहविक्री करणारा महिला वर्ग आणि त्यांची वस्ती याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकूण समाजाचा चांगला नाही. हे जग बदनाम आहे. अशाच नजरेने सर्वजण या वर्गाकडे बघत असतात. समाजातील सर्व स्तरातील वर्गाची हीच दृष्टी असते. स्वतःला सामाजिक कार्यकर्ते विचारवंत आणि अभ्यासक म्हणविणाऱ्या लोकांचेही या महिलांकडे बघण्याची दृष्टी अपवाद वगळता अजूनही बदललेली नाही. देहविक्री व्यवसाय कोणतीही महिला स्वतःच्या इच्छेने स्वीकारत नाही. या महिला या व्यवसायात येण्याची त्यांची वेगवेगळी मजबुरी असते. एकदा ती या व्यवसायात आली की त्यातून बाहेर पडणे फारच कठीण असतं. किंबहुना बाहेर पडल्यानंतरही अशा बाईकडे बघण्याची समाजाची नजर बदलत नाही. तिला सामाजिक स्थान मिळत नाही. कायमच तिला बाहेरच्या जगात फटकून राहावं लागतं.

हे सर्व हा कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेच्या बोलण्यातून जाणवत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोना काळात देहविक्री करणाऱ्या महिलांना हव्या त्या सुविधा मिळाल्या नाहीत. तनिषा सांगत होती, इथल्या आजूबाजूच्या सगळ्या वस्तीमध्ये सरकारकडून मदतीचे वाटप झाले; परंतु खरी गरज आम्हा महिलांना असताना आमच्या या वस्तीमध्ये कोणत्याही प्रकारची मदत पोहोचू शकली नाही. कोरोनामुळे बाहेर फिरण्यावर मर्यादा आली आणि एकमेकांच्या संगतीमुळे कोरोनाची लागण आपल्यालाही होऊ शकते या भीतीने या काळात ग्राहक आमच्या वस्तीकडे फिरत नाही. मग तुम्हीच सांगा “हमारा पेट कैसा भरेगा?” इस वस्ती मे रहने वाली लडकी लोगों की तबीयतही बराबर नही है।इसलिये दवा पानी को भी पैसा लगता है।हा पैसा आणायचा कुठून? असा सवाल तिने केला.

मी तिला विचारलं. मग या महिला – मुली आपल्या गावी गेल्या नाहीत का ? या काळात. त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून मी आवक झालो. ती म्हणाली, पुरुष हा पुरुष असतो मग तो घरचा असो नाहीतर बाहेरचा. त्याला आपल्या घरची प्रत्येक स्त्री पवित्र लागते. प्रसंगी देहविक्री करून घरच्या मुलीने घरी पैसा दिलेला चालतो; पण ती मुलगी परत घरी आलेली चालत नाही. असं सांगताना तोंडातलं पान पचकन थुककत तनिषा म्हणाली, ‘साला आदमी तो बडा हरामी है.’ तनिषाचं म्हणणं शंभर टक्के खरं होतं.

कोरोना काळात जॉन यांनी मला देहविक्री करणाऱ्या महिलांच्या समस्येची फोनवर माहिती घेऊन ती प्रसिद्ध करायला सांगितली होती. मी ती प्रसिद्ध केल्यावर अनेकांनी अतिशय संवेदनशिलतेने, आस्थेने यासंदर्भात प्रतिसाद दिला मात्र काही पुरुषांनी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या विरोधात प्रतिक्रिया देऊन आपल्यातील असंवेदनशीलता आणि पुरुषी अहंकार दाखवून दिला. सोलापूरहून शास्त्री नामक व्यक्तीने फोन करून सांगितले, की या महिला आहेत म्हणूनच आमच्या बायका – मुली सुरक्षित आहेत, असं सांगतानाच या महिला बदनाम नाहीत. तर त्या बदाम आहेत, असंही ते म्हणाले आणि माझ्याबरोबर वादावादी घालताना मी सर्व धर्माचा अभ्यासक आहे असंही सांगितलं. समाज सुधारला, सुधारला असं म्हटलं जात असलं तरी त्याच समाजातील पुरुषीवृत्ती तशीच आहे. याचाच हा अनुभव होता.

अजय कांडर,
लेखक विख्यात कवी,व्यासंगी पत्रकार आहेत – 9404395155


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी

भक्ताला आत्मज्ञानी करण्याकडेच सद्गुरुंचा ओढा

इतिहास मांडताना अहिंसेची बाजू समजून घ्यावी – उपिंदर सिंग

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading