पंडित सत्यदेव दुबे पुरस्कार अभिनेत्री शुभांगी भुजबळ,
लेखक भाऊ पाध्ये पुरस्कार कवी सायमन मार्टिन
तर गोपाळराव दुखंडे पुरस्कार मधुकर मातोंडकर यांना जाहीरअकरा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप
कणकवली – कोकणातील नाट्यकर्मीनी एकत्र येत नाटक – चित्रपट, साहित्य आणि चळवळ यांच्यासाठी पुरस्कार योजना यावर्षीपासून चालू केली आहे. दीप तारांगण क्रिएशन्स या संस्थेतर्फे हे पुरस्कार घोषित करण्यात आले असून नाट्य आणि चित्रपट या विभागात देण्यात येणारा पंडित सत्यदेव दुबे पुरस्कार विचारशील अभिनेत्री शुभांगी भुजबळ (मुंबई) यांना तर साहित्य विभागात देण्यात येणारा ज्येष्ठ लेखक भाऊ पाध्ये पुरस्कार ज्येष्ठ कवी तथा सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन (वसई) आणि साहित्य सांस्कृतिक सामाजिक चळवळ विभागात देण्यात येणारा गोपाळराव दुखंडे पुरस्कार ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर (सिंधुदुर्ग) यांना जाहीर करण्यात आला आहे.
11000 (अकरा हजार) रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुढील काही दिवसात मुंबई रविंद्र नाट्य मंदिर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार समितीचे संयोजक कवी अजय कांडर, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्य लेखक उदय जाधव, नाट्य निर्मात्या दीपा सावंत खोत यांनी दिली आहे.
समाजाने आपल्याला अनेक गोष्टी दिलेल्या असतात आपणही समाजाचं काहीतरी देणे लागतो. या भावनेने ही पुरस्कार योजना चालू करण्यात आली असून दरवर्षी नाटक/ चित्रपट, साहित्य आणि सांस्कृतिक- सामाजिक चळवळ अशा क्षेत्रातील प्रत्येक एका गुणवंत व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.
मान्यवर परीक्षकांनी यावर्षीची ही पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.
नाट्य / चित्रपट विभाग
पंडित सत्यदेव दुबे स्मृती पुरस्कार
शुभांगी भुजबळ /अभिनेत्री,मुंबई
परीक्षक
प्रेमानंद गज्वी /ज्येष्ठ नाटककार
दीपक राजाध्यक्ष/ नामवंत रंगकर्मी
उदय जाधव/ नाट्यलेखक, दिग्दर्शक
२
साहित्य विभाग
ज्येष्ठ लेखक भाऊ पाध्ये स्मृती साहित्य पुरस्कार
सायमन मार्टिन / कवी व सामाजिक कार्यकर्ते,वसई
परीक्षक
नीतीन रिंढे /नामवंत समीक्षक
रणधीर शिंदे / सुप्रसिद्ध समीक्षक
अजय कांडर / कवी आणि ज्येष्ठ पत्रकार
३
साहित्य,सांस्कृतिक,सामाजिक चळवळ कार्य
गोपाळराव दुखंडे स्मृती पुरस्कार
मधुकर मातोंडकर / सांस्कृतिक कार्यकर्ते, सिंधुदुर्ग
परीक्षक
कॉ. कुंदा प्रमिला निळकंठ/ सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या
कॉ. सुबोध मोरे /सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते
दीपा सावंत खोत (नाट्य निर्मात्या)
शुभांगी भुजबळ या रंगभूमी, चित्रपट, मालिका व वेबमालिका अशा विविध क्षेत्रांत गेली दोन दशके कार्यरत असलेल्या अभिनेत्री आहेत. स्वतःची वैचारिक भूमिका घेऊन कामं करणारी अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जातात. मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स पदवी घेतलेल्या व भरतनाट्यम-कथ्थकचे प्रशिक्षण मिळवलेल्या शुभांगी यांनी “व्हय, मी सावित्रीबाई” या नाटकातून विशेष लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी मराठी-हिंदी चित्रपटांसह सामाजिक उपक्रमांत सक्रिय भूमिका बजावली असून, झी नाट्यगौरव, झी गौरव, सारखे नामांकित, मानाचे पुरस्कार मिळवले आहेत.
कवी सायमन मार्टिन हे समाजाशी बांधिलकी ठेवून कृतीशीलतेने सामाजिक काम करणारे कवी असून लिहिणं आणि जगणं यात फार अंतर राहू नये ही भूमिका घेऊन ते निष्ठेने काव्य लेखन करतात. राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनिष्ट पडसादाचे तीव्र प्रतिबिंब त्यांच्या कवितेत आढळते.
मधुकर मातोंडकर हे तळ कोकणातील ज्येष्ठ साहित्य सांस्कृतिक कार्यकर्ते असून तळ कोकणात गंभीर साहित्य चळवळ सुरू ठेवण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, समाज साहित्य प्रतिष्ठान आधी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी नव्या गुणवत्ता असणाऱ्या लेखक कवींना मंच उपलब्ध करून दिला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर या तीनही मान्यवरांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असल्याचेही श्री कांडर, श्री जाधव आणि श्रीमती सावंत खोत यांनी स्पष्ट केले. अधिक माहितीसाठी संपर्क – 98208 32619
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.