केरळला ‘देवभूमी’ ( God’s Own Country) का म्हणतात याचा पुरेपूर प्रत्यय तिथले निसर्गसौंदर्य पाहून आला. खरेच दाट, आकाशाला स्पर्श करणारी, हिरवीगार जंगले, स्वच्छ निळेशार समुद्रकिनारे, उतारावर विस्तीर्ण सपाट, पोपटी रंगांचे चहाचे मळे, उंच डोंगरावरून धबधबा कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, खाली उतरलेले कापसासारखे ढगांचे पुंजके पाहून आपण पृथ्वीवर नव्हे स्वर्गातच असल्याचा भास नक्की होतो. एवढे मात्र खरे.
अॅड. सौ. सरीता सदानंद पाटील.
वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे.
९९६९९५६४४४
हवामानाच्या बातम्या ऐकून आम्ही जरा सांशक होतो कारण आम्ही मे च्या शेवटी म्हणजे ३१ मे रोजी आम्ही दोघे आणि आमची मुलगी ठाण्याहून केरळ सहलीला जाणार होतो. सहलीचे सर्वकाही नियोजन मुलीनेच केले होते. त्यामुळे तीच सगळी विचारपूस करत होती. यावर्षी देशभरात मान्सून अगदी वेळेवर आणि तोही या वर्षी जास्त १०६ टक्के म्हणजे १९ मे रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये व केरळात १ जून रोजी सुरु होणार असे वारंवार बातम्यांमधून प्रसारित होत होते. या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस १९-२० मे पासूनच सुरु झाला होता. केरळातही २० मे पासून पाऊस जोरात सुरु होता. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून पर्यटकांना आणि स्थानिक लोकांनाही अडचणी येत होत्या. जर मान्सूनचा जोरात पाऊस सुरु झाला तर आम्ही ठरवलेल्या ठिकाणी फिरू शकणार नाही असे क्षणभर मनात येऊन सुद्धा गेले. मग आम्ही तिथल्या सहलीच्या संदर्भातील स्थानिक व्यक्तीला फोन करुन पावसाविषयी, हवामानाविषयी विचारले तर त्यांनी या पावसाचा तुमच्या सहलीवर काही एक परिणाम होणार नाही, असे सांगून आम्हाला थोडे बिनधास्त केले. तसेच केरळची सहल केलेल्या मित्र-मैत्रीणीनाही याबाबत विचारले, पावसात केरळ हिरवेगार, सुंदर दिसते तुम्ही नक्की जा असेच त्यांनी सांगितले. म्हणून आम्ही काही होऊ दे केरळच्या सहलीला जायचे नक्की केले.
३१ मे रोजी पहाटे ७.३० च्या विमानाने मुंबईवरून आम्ही निघालो अगदी दीड-पावणे दोन तासांत कोचीला पोहोचलो देखील. आमचा तिथला गाडीवाला आम्हाला ५ ते १० मिनिटांत न्यायला आला. आमचा देवभूमिचा प्रवास सुरु झाला. आम्ही संध्याकाळी मुन्नारला मुन्नार क्वीन हॉटेलला मुक्कामला जाणार होतो. त्याआधी ज्याच्या एका बाजूने काही ठिकाणी चायनीज फिशिंग नेट लावलेले तर दुसऱ्या बाजूने हिरवेगार खारफुटीचे दाट जंगल असलेल्या कोची लेकमध्ये बॅकवाटर बोटिंग केले. तिथे आम्ही ४०/४५ मिनिटे बोटिंग करताना दोन्ही बाजूने हिरवीगार झाडी, मध्येच दिसणारे हिमालयीन गिधाड म्हणजेच ब्राऊन रंगाचे गरुड, करड्या रंगाचा हेरॉन, किंगफिशर, पांढरे, काळे बगळे असे पक्षी पाहिले. शांत, खोल, दाट खारफुटीची झाडी व थंड हवेतील प्रवास खूप आल्हाददायक होता. तिथून कोची फोकलेर म्युझियमला भेट दिली. इथे १६ व्या /१७ व्या शतकातील खूप जुन्या जीवनावश्यक विविध वस्तू, फोटोग्राफ्स, प्राचीन शिल्पे, पेंटीग्स, दागिने यांचा अप्रतिम संग्रह आहे. मुन्नारला पोहोचण्यास चार तासांचा प्रवास होता. पण अगदी नागमोडी वळणे, स्वच्छ तुरळक रहदारी असलेले रस्ते, दोन्ही बाजूनी हिरवीगार नारळ, केळी, फणस, निलगिरी आणि इतर भरपूर झाडांची दाट जंगले पाहून मन अगदी प्रसन्न होते. शिवाय त्यावेळी पाऊस असल्याने दाट जंगलातून. उंच टेकडीवरून कोसळणारे पांढरेशुभ्र मोठे- छोटे खळाळणारे धबधबे पाहून अगदी डोळ्याचे पारणे फिटले.
दुसऱ्या दिवशी १ जूनला सकाळी पहाटे हॉटेलच्या गच्चीतून अगदी नजरेच्या टप्प्यात ऊंच डोंगरांवर झाडांमध्ये असलेले पांढऱ्याशुभ्र ढगांचे पुंजके व दाट धुके पाहून आपण स्वर्गातच आहोत असा भास झाल्यावाचून राहत नाही. सकाळी ब्रेकफास्ट नंतर पश्चिम घाटावर वसलेले एराविकुलम राष्ट्रीय पार्क पाहायला गेलो. घाट चढत २ कि. मी. चालत चालत जाताना मार्गावर निलगिरी सोनेरी शेळ्या पहिल्या. फोटो काढताना त्या आपल्या पिलांसकट अगदी शांत उभ्या होत्या. त्यंIचे संरक्षण करण्यासाठी केरळ सरकारने राष्ट्रीय पार्क घोषित केले आहे. येताना निम्म्यातच पाऊस जोरात आला पण खाली येऊन बसमध्ये बसलो आणि बसमधून घाटमाथ्यावरून कोसळणारे पुन्हा धबधबे पाहायला मिळाले त्यामुळे वरुणराजाचे आम्ही आभारच मानले.
सकाळी घाटावरून खाली बघताना खोल दऱ्यातून पसरलेले ढग आणि धुके किती आल्हाददायक अनुभव होता तो! इथल्या घाटमाथ्यावर निलकुर्निजी नावाची दुर्मिळ वनस्पती जी १२ वर्षातून एकदाच फुलते ती पाहायला मिळाली पण आता फुलली नव्हती. निळसर जांभळ्या रंगाची फुले २०१८ साली फुलली होती असे म्हणतात. मुन्नार मधील इद्दुक्की धरण, एको स्पॉट तिथले नदीकाठची दाट झाडी पाहून मन अगदी प्रसन्न होते. पुन्हा मुन्नारहून खाली येताना एका बाजूला टेकडीवर विस्तीर्ण पसरलेले हिरवेगार चहाचे मळे व दुसऱ्या बाजूला दाट जंगलांनी आच्छ्दलेली दरी व त्या दरीत खाली उतरलेले ढग, अहाहा!! किती सुंदर दृश्य होते ते! हिरवीगार धरणीमाता जणू हिरवा शालू परिधान करुन, नटून थटून नववधूच बसली आहे असे वाटते आणि तिचे चुंबन घेण्यासाठी आकाशातील पांढरेशुभ्र ढग जणू खाली उतरले आहेत कि काय याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
केरळात रस्त्याच्या दुतर्फा अगदी आकाशापर्यंत पसरलेली दाट जंगले पाहून केरळ सरकारने पर्यावरणाचे अगदी जीवापाड संवर्धन केले आहे याची आवर्जून जाणीव होते. शिवाय केरळ सरकारने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व सोयी केल्या आहेत. आल्याकडेही याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने कोकणला पर्यटन केंद्र म्हणून घोषित करून प्रवासाचे सर्व पर्याय रेल्वे, बस, विमान यांची वारंवारिता वाढवून, नैसर्गिक स्त्रोतांचे जतन करुन, सागरी किनारे स्वच्छ ठेवून, पर्यटनातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवले पाहिजे. पर्यटनामुळे स्थानिकांनाही भरपूर रोजगार मिळू शकतो. त्यासाठी स्थानिकांनीही विरोध नाही केला पाहिजे. कारण केरळ व कोकण दोघांची नैसर्गिकता यामध्ये बरेच साम्य आहे.
ठेक्काडीची हत्तीवरची सफारी आमच्यासाठी नवीन अनुभव होता. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्यामध्ये हत्ती हा सर्वात शहाणा प्राणी आहे, हे त्या दिवशी अनुभवले आणि तेथे कथ्थक मनोरंजन केंद्रात जाऊन कथक नृत्यातील क्रोध, प्रेम, करुणा, हास्य, धैर्य, भय, किळस, आश्चर्य, आणि शांती या नवरसाचे सुंदर सादरीकरण अगदी जवळून पहिले. ठेक्काडीहून आलेप्पीला येताना पुन्हा विस्तीर्ण चहाचे मळे आणि नागमोडी वळणे व आल्हाददायक हवामान त्यामुळे मधेच चहाच्या मळ्यात उतरून ती आकाशापर्यंत पसरलेलली हिरवीगार दृश्ये भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्यात कैद केल्यावाचून राहवले नाही. अल्लेप्पीचा बोटहाउस मधील अनुभव तर अवर्णनीय होता. लगेच बोटीमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वागत पेय (ज्यूस) दिले जाते. नंतर अख्खा दिवस बॅकवाटरमधून बोटिंगचा सुंदर व अद्वितीय अनुभव डोळ्यात साठवत पूर्ण दिवस कसा निघून गेला कळले सुद्धा नाही.
अलेप्पिला केरळमध्ये अलाप्पुझा म्हणूनही ओळखले जाते. येथे मनिमाला, पंबा आणि आचानकोवील या तीन नद्यांचा संगम आहे त्यंIचे पाणी समुद्रासारखे विस्तीर्ण पसरलेले आहे. किनाऱ्यावर असलेली हिरवीगार नारळाची झाडे व निळे आकाश व नजरेच्या पलीकडे पसरलेले गोडे पाणी व मधूनच येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक किती विहंगम दृश्य होते ते! म्हणूनच अलेप्पीला “व्हेनिस ऑफ इंडिया” असे म्हणतात. हाउसबोट मधील घरगुती पद्धतीने बनवलेले दुपारचे जेवण खूपच रुचकर होते. संध्याकाळी डिनरला त्यांचे चिकन असतेच पण जास्तीचे हवे असेल तर किनाऱ्यावरील मार्केट मधून आपण हवे ते मासे, खेकडे, झिंगे खरेदी करून द्यायचे व आपण सांगू तसे ते बनवून देतात.
त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी एक दिवस वरकला बीचला आलो. एकदम स्वच्छ किनारा, समुद्रातील निळेशार पाणी व किनाऱ्याला येवून थडकणIऱ्या लाटा मनIला मोहवत होत्या. बीचफेसिंग हॉटेल असल्यामुळे रात्री शांत वातावरणात सागरातील लाटांची गाज ऐकू येत होती. त्यामुळे पुन्हा सकाळी लवकर किनाऱ्यावर जाऊन मज्जा करण्याचा मोह आवरला नाही. शेवटी आम्ही त्रिवेंद्रममधील प्राणीसंग्रहालय पाहून पद्मनाभ स्वामींच्या मंदिराला भेट देवून तिथले निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून, त्रिवेंद्रम विमानतळावर मुंबईला येण्यासाठी आलो. त्याआधी केरळचे पारंपारिक केळीच्या पानावर वाढलेल्या अन्नाचा (साध्या थाळी) आस्वाद घेतला. पूर्ण ट्रीपमध्ये कुठेही जेवणाची अडचण आली नाही.
केरळच्या ६/७ दिवसाच्या प्रवासात रस्त्यावर कुठेही कचरा किंवा भिकारी, गर्दुला अजिबातच दिसला नाही. पाच-सहा दिवसांत एवढे फिरलो पण थकवा बिलकुल आला नाही. तिथले लोक सुद्धा खूप साधे, अथित्यशिल व नम्र आहेत. केरळला ‘देवभूमी’ ( God’s Own Country) का म्हणतात याचा पुरेपूर प्रत्यय तिथले निसर्गसौंदर्य पाहून आला. खरेच दाट, आकाशाला स्पर्श करणारी, हिरवीगार जंगले, स्वच्छ निळेशार समुद्रकिनारे, उतारावर विस्तीर्ण सपाट, पोपटी रंगांचे चहाचे मळे, उंच डोंगरावरून धबधबा कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, खाली उतरलेले कापसासारखे ढगांचे पुंजके पाहून आपण पृथ्वीवर नव्हे स्वर्गातच असल्याचा भास नक्की होतो. एवढे मात्र खरे. आमची जूनमधील ट्रीप, ट्रिपचा हंगाम नसतानासुद्धा खूप यशस्वी ,परिपूर्ण झाली म्हणून देवाचे मनोमन आभार मानले. विविध निसर्गसौंदर्यIने नटलेली केरळची देवभूमी प्रत्येकाने एकदा तरी जरूर पहावी.
अॅड. सौ. सरीता सदानंद पाटील.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
खूप छान प्रवास वर्णन स्वर्ग च आहे केरळ…