December 30, 2025
Devendra Fadnavis and Thackeray brothers political face-off ahead of Mumbai Municipal elections
Home » देवाभाऊ विरूध्द ठाकरे बंधू…
सत्ता संघर्ष

देवाभाऊ विरूध्द ठाकरे बंधू…

स्टेटलाइन-

ठाकरे बंधुंची पत्रकार परिषद होती की फॅमिली फोटो सेशन होते अशीही नंतर चर्चा झाली. रश्मी ठाकरे, आदित्य , शर्मिला ठाकरे व अमित यांच्यासह व्यासपीठावर ठाकरें बंधुंचे फोटोसेशन पार पडले. पत्रकार परिषदेत मुंबईच्या व मुंबईकरांच्या कोणत्याही मुद्यावर चर्चा झालीच नाही. युती केवळ मुंबई – ठाण्यापुरतीच आहे की इतरत्रही, याचेही उत्तर मिळाले नाही. स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी दोन नेते एकत्र आलेत अशीही प्रतिक्रीया भाजपाकडून आली.

डॉ. सुकृत खांडेकर

येत्या पंधरा जानेवारी रोजी राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेवर वाट्टेल ते करून सत्ता काबीज करायची अशी रणनिती भाजपाने आखली आहे. राज्यात व केंद्रात सत्ता असुनही भाजपला मुंबईवर स्वबळावर कधी सत्ता मिळवता आली नाही. राज्यात सत्ता असुनही मुंबईला भाजपचा महापौर देता आला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन मुंबई महापालिकेवर युतीची सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी वीस वर्षाची कटुता विसरून महापालिका निवडणुकीसाठी युती केल्याचे जाहीर केल्याने देवाभाऊ विरूध्द ठाकरे बंधू असा सत्ता संघर्ष सुरू झाला आहे.

मुंबई महापालिकेचे या वर्षीचे बजेट ७५ हजार कोटी आहे. पुढील वर्षी ते ९० हजार कोटी होऊ शकते. मुंबई महानगर प्रदेशात मुंबई, ठाणे, कल्याण- डोबिंवली, नवी मुंबई, वसई- विरार, मिरा- भायंदर, भिवंडी- निजामपूर, उल्हासनगर, पनवेल अशा महापालिकांचे मिळून एक लाख कोटीपेक्षा जास्त बजेट आहे. म्हणूनच भाजपाला या सर्व महापालिकांवर सत्ता काबीज करायची आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आज एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला शिवसेना हे नाव व धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. शिंदे व त्यांचा पक्ष भाजपबरोबर सत्तेत भागीदार आहे. दुसरीकडे पक्षाचे नाव गमावलेले उद्धव ठाकरे व बंधू राज ठाकरे हे दोघेही कुठे सत्तेत नाहीत. देवाभाऊ व एकनाथभाई यांच्याबरोबर राज्याची बलाढ्य सत्ता आहे. केंद्राचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे. दुसरीकडे शिवसेनाप्रमुखांची पुण्याई व ठाकरे नावाचा ब्रँड बरोबर घेऊन उद्धव व राज यांना महापालिका निवडणूक लढवावी लागते आहे.

प्रादेशिक व भाषिक अस्मिता या मुद्द्यांवर करूणानिधी, जयललिता, एम. के स्ट’लिन किंवा चंद्राबाबू नायडू यांनी दक्षिणेत सत्ता काबीज केली, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधे वर्चस्व निर्माण केले. पण शिवसेनाप्रमुखांना किंवा त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाला तसे यश महाराष्ट्रात कधीच संपादन करता आले नाही. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक म्हणजे ९४ नगरसेवक एकदा निवडून आले होते. सन २०१७ मधे शिवसेनेचे ८४ नगरसेवक होते. ठाकरे बंधुंच्या दोन्ही पक्षांना मिळून या संख्येच्या जवळपास तरी यश मिळू शकेल का ?

ठाकरे बंधुंची युती झाली म्हणून दोन्ही पक्षाच्या सैनिकांनी मुंबई -महाराष्ट्रात गुलाल उधळून जल्लोश साजरा केला, मिठाई वाटली. पण नाशिक येथे रात्री जल्लोश करणारे उबाठा सेनेचे दोन माजी महापौर दुसऱ्या दिवशी मंत्री गिरीश महाजनांच्या साक्षीने भाजपमध्ये दाखल झाले. भाजपाबरोबर युती करून निवडणूक लढविणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला चाट देऊन काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली होती. मग रात्री ठाकरे बंधुंच्या नावाने जयजयकार करणारे दिवस उजाडताच भाजपात गेले तर त्यांना अडवणार तरी कोण ? ठाकरे बंधू एकत्र झाले, याचा आनंद सर्वांना झाला, बरे झाले, कटुता संपली अशीच भावना सर्वत्र आहे. पण शिवसेनाप्रमुखांच्या हयातीनंतर बंधुंचा जनसंपर्क, संघटन आणि जनमानसात विश्वासार्हता किती आहे, हा कळीचा मुद्दा आहे.

देशात मोदी पर्व सुरू झाल्यानंतर सन २०१५ ते २०१८ या काळात राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने विलक्षण घो़डदौड केली. या काळात २७ महापालिकांमधे २७३४ पैकी १०९९ नगरसेवक भाजपाचे निवडून आले. पुणे, नागपूर, पिंपरी- चिंचवड, नाशिकमधे भाजपाने मुसंडी मारली. याच काळात अविभाजित शिवसेनेचे ४८९, काँग्रेसचे ४३९ , अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचे २९४ , मनसेचे ३६ , बसपाचे ३८ व अपक्ष ८९ नगरसेवक होते. जून २०२२ मधे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकविल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोतच बदलला. त्यानंतर वर्षभरात अजितदादा पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे विभाजन झाले. त्यामुळे जानेवारीत होणाऱ्या महापालिका निवडणुकीत अगोदर झालेल्या निवडणुकांची तुलना करणे योग्य होणार नाही. निवडणुका जाहीर झाल्या की ठाकरेंच्या पक्षाकडून मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे आणि मुंबईतील मराठी माणूस धोक्यात आहे अशी आवई उठवली जाते. मराठी माणसाचे रक्षणकर्ते आपणच आहोत, असे भासवले जाते. मुंबईत मराठी माणूस परप्रांतीयांच्या गर्दीत घुसमटतो आहे हे वास्तव आहे. मुंबईत आता जेमतेम पंचवीस- तीस टक्के तरी मराठी भाषिक उरले आहेत का, हे जनगणना झाल्यानंतरच समजू शकेल.

गेल्या दहा बारा वर्षात मुंबईतील हिरे उद्योगापासून अनेक उद्योग- व्यवसाय अन्य राज्यात हलवले गेले. मुंबई महाराष्ट्रात येणारे मोठे उद्योगही दुसऱ्या राज्यात वळवले गेले. मराठी भाषिकांना गुजराती वसाहतीत फ्ल’ट नाकारल्याच्या अनेक घटना घडल्यात. संघ परिवारातील एक वरिष्ठ पदाधिकाऱ्याने घाटकोपरला येऊन गुजराती प्रेम व्यक्त केले होते. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल की जे भाजपाचे आहेत, त्यांनी तर गुजराती- मारवाडी लोक मुंबई चालवतात असे भाष्य केले होते. महायुती सरकारकडूनच महाराष्ट्रात शाळांमधे हिंदी भाषा सक्तिने लादण्याचा प्रयत्न केला गेला. बेरोजगार मराठी तरूणांची संख्या प्रचंड आहे आणि रस्ते व पदपथांवर अमराठी फेरिवाल्यांचे सर्वत्र आक्रमण मोठे आहे. मुंबईतील मराठी शाळा धडाधड बंद होत आहेत व शाळांच्या जागा बिल्डर्सला दिल्या जात आहे, त्याविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलीस परवानगी नाकारतात. असे अनेक मुद्दे आहेत की मराठी माणूस महाराष्ट्राच्या राजधानीत उपेक्षित आहे. ठाकरे बंधुंनी मराठीचा मुद्दा निवडणुकीच्या निमित्ताने मांडला पण मराठी माणसाच्या हितासाठी ते काय करू शकतात याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. मराठीच्या मुद्यावर केवळ भावनेला हात घालून मते मिळविण्याचे आता दिवस राहिलेले नाहीत.

ठाकरे बंधुंच्या संयुक्त पत्रकार परिषदेचा गाजावाजा मोठा झाला. मिडियाने त्याला मोठी प्रसिध्दी दिली. दोन्ही बंधु घरातून निघाल्यापासून मराठी वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले. जणू पुतिन व झेलन्स्की भेटतात एवढे महत्व ठाकरे बंधुंना दिले अशी खिल्ली स्वत: देवाभाऊंनीच उडवली. पण वरळीला झालेली पत्रकार परिषद युतीची घोषणा करून अवघ्या दहा मिनिटांतच त्यांनी का गुंडाळली हे समजले नाही. आम्ही का एकत्र आलो हे सांगितले नाही. आमचा कार्यक्रम काय, कोण किती जागा किती लढवणार, वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे, मातोश्रीवरचे बडवे व कारकून हा विषय आता संपला का, मनसेने तर एकोणीस वर्षात आठ दहा वेळा तरी राजकी भूमिका बदलल्या असतील, मोदींना पाठिंबा का दिला, का काढला, मनसेच्या भूमिकेत एकसंघपणा नाही. मग ठाकरे बंधुंची घोषणा ही महापालिका निवडणुकीपुरतीच आहे काय ? भाजपासारख्या बलाढ्य पक्षाशी फार काळ लढू शकणार नाही, याची कल्पना दोन्ही बंधुना असणारच. उध्दव ठाकरेंच्या पक्षाने अगोदर वर्षानुवर्षे भाजपबरोबर निवडणूक लढवली, नंतर काँग्रेसबरोबर सत्ता उपभोगली आता या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात महापालिका निवडणुकीत लढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

ठाकरे बंधुंची पत्रकार परिषद होती की फॅमिली फोटो सेशन होते अशीही नंतर चर्चा झाली. रश्मी ठाकरे, आदित्य , शर्मिला ठाकरे व अमित यांच्यासह व्यासपीठावर ठाकरें बंधुंचे फोटोसेशन पार पडले. पत्रकार परिषदेत मुंबईच्या व मुंबईकरांच्या कोणत्याही मुद्यावर चर्चा झालीच नाही. युती केवळ मुंबई – ठाण्यापुरतीच आहे की इतरत्रही, याचेही उत्तर मिळाले नाही. स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी दोन नेते एकत्र आलेत अशीही प्रतिक्रीया भाजपाकडून आली. हा प्रितीसंगम नव्हे, भिती संगम अशी टिंगल केली गेली. ठाकरे म्हणजे मराठी नाही आणि ठाकरे म्हणजे मुंबईही नाही, असा षटकार नंतर देवाभाऊंनी मारला. निवडणूक प्रचारात यावेळी लाव रे तो व्हिडिओ चे नवीन प्र्योग बघायला मिळतील याचे संकेत मात्र राज ठाकरेंनी दिले आहेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हाच आत्महत्या रोखण्यावरील उपाय

महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

अमितभाईंचा ऊर्जामंत्र…

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading