राजर्षी शाहूंच्या काळातही जेवणावळी असायच्या पण त्याचा उद्देश समाजात एकोपा राहावा हा होता. समाजात निर्माण झालेले गैरसमज, भेदभाव दूर व्हावेत, समाजातील सर्वांनी एकत्र यावे. ही उद्दिष्टे त्यामागे होती. त्याचा परिणामही झाला. समाजातील अनेकांचे प्रश्न या जेवणावळीच्या निमित्ताने सोडवले जायचे. काहींना यामुळे आधार मिळायचा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तैसा माजे स्त्रिया धनें । विद्या स्तुती बहुतें मानें ।
एके दिवसींचेनि परान्नें । अल्पकु जैसा।। २२७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा
ओवीचा अर्थ – एका दिवसाच्या परान्नाने जसा दरिद्री पुरूष उन्मत होतो, तसा जो स्त्रिया, धन, विद्या, स्तुति व बहुमान यांनी मस्त होतो.
निवडणुका हा खेड्यात उत्सुकतेचा विषय असतो. गावात गट-तट हे असतातच. गल्ली, गल्ली, घरे-घरे गटातटात विभागलेली असतात. हा या गटाचा तो त्या गटाचा असा स्पष्ट भेद असतो. इतकेच काय तर दुसऱ्या गटातील एखादी व्यक्ती तिरडीला उपस्थित राहिली तर त्याची चर्चा होते. कितीही जवळचा असला तरी गटातटांनी एकमेकांत भिंती उभ्या केल्या जातात. इतकी राजकीय परिस्थिती सध्या बिघडलेली आहे. जेवणावळीत दुसऱ्या गटातील माणूस दिसला तर हा इथे कसा? त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले जाते. फोडाफोडी जेवणावळीतच समजते. लग्न समारंभाच्या पंगतीत ही फुटाफुट स्पष्ट दिसते. पूर्वीच्या काळीही जेवणावळी असायच्या पण त्यांचा उद्देश हा वेगळा होता. सभा-समारंभाचा उत्साह यामुळे भंग होत नव्हता. पण आता तसे होत नाही.
राजर्षी शाहूंच्या काळातही जेवणावळी असायच्या पण त्याचा उद्देश समाजात एकोपा राहावा हा होता. समाजात निर्माण झालेले गैरसमज, भेदभाव दूर व्हावेत, समाजातील सर्वांनी एकत्र यावे. ही उद्दिष्टे त्यामागे होती. त्याचा परिणामही झाला. समाजातील अनेकांचे प्रश्न या जेवणावळीच्या निमित्ताने सोडवले जायचे. काहींना यामुळे आधार मिळायचा. समाधान मिळायचे. जमीनदार, भटभटजी मंडळींचा मात्र याला तीव्र विरोध होता. अशाने समाज बाटला जाईल असा त्यांचा समज होता. चार लोक एकत्र आले तर उद्या त्यांच्या विरोधात आवाज उठविला जाईल अशी भीती त्यांना होती. यासाठी त्यांनी समाजात भेद, दुफळी निर्माण केली होती. फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती होती. या जेवणावळींनी याला पायबंद बसला होता. यासाठी त्यांनी अशा जेवणावळींना विरोध केला. दुसऱ्याचे जेवण जेवल्याने आपण बाटतो. त्याचे पाईक होतो. असा समज त्यांनी पसरविला.
आताचे राज्यकर्तेही नेमके याच भावनेचा फायदा घेत आहेत. निवडणुका जवळ आल्या की त्यांच्या जेवणावळी सुरू होतात. या जेवणावळींनीच ते निवडणूक जिंकतात. ज्याने जेवणावळी दिल्या नाहीत तो उमेदवार निश्चितच निवडणुकीत पराभूत होतो. निवडून आलेला नेता निवडणुकांनंतर दिलेल्या जेवणावळी मात्र वसूल करतो. असे हे अन्नदानाचे राजकारण केले जाते.
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. गरजूंना अन्न द्यावे त्यातून समाधान मिळते. आशीर्वाद मिळतात. पण त्याचा गैरफायदा घेणे निश्चितच भूषणावह नाही. एका दिवसाच्या परान्नाने आपण काही त्याचे देणे लागत नाही. कोणी गैरफायदा घेत असेल तर अन्न खाऊनही त्याला विरोध केला जाऊ शकतो. इतका हक्क आपणास घटनेने दिला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.