September 7, 2024
Dr. Sunita Savarkar and Laxmikant Dhond this year's Kurundkar research grant
Home » डाॅ.सुनीता सावरकर, लक्ष्मीकान्त धोंड यांना या वर्षीची कुरुंदकर संशोधनवृत्ती
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

डाॅ.सुनीता सावरकर, लक्ष्मीकान्त धोंड यांना या वर्षीची कुरुंदकर संशोधनवृत्ती

  • डाॅ. सुनीता सावरकर या छत्रपती संभाजीनगरच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागात अधिव्याख्याता म्हणून कार्यरत
  • लक्ष्मीकान्त धोंड हे छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी केन्द्रातील उद्घोषक म्हणून सेवानिवृत्त

नांदेड – नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केन्द्राच्या वतीने दरवर्षी ‘नरहर कुरुंदकर संशोधनवृत्ती’ दिली जाते. या वर्षी आलेल्या प्रस्तावांमधून डाॅ. सुनीता सावरकर व लक्ष्मीकान्त धोंड यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती डाॅ. भगवान अंजनीकर यांनी दिली आहे.

डाॅ. सुनीता सावरकर या छत्रपती संभाजीनगरच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागात अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचे योगदान हे त्यांचे विशेष अभ्यासक्षेत्र असून ‘ढोर-चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिध्द झाला आहे. डाॅ. सावरकर यांनी ‘महाराष्ट्रातील प्रबोधन : ढोर समाजातील आद्य समाजसुधारक सावित्रीबाई बोराडे’ या विषयावर प्रस्ताव पाठवला होता.

लक्ष्मीकान्त धोंड हे छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी केन्द्रातील उद्घोषक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. नाट्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली असून अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. ‘गाहासत्तसई’ हा आद्य मराठी कवितासंग्रह हा त्यांचा विशेष अभ्यासविषय आहे.’ ॠग्वेदातील नाट्यसंहिता’ या पुरस्कारप्राप्त ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे. श्री.धोंड यांनी ‘नरहर कुरुंदकरांचे ‘रंगशाळा’:एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधन प्रस्ताव सादर केला होता.

प्रा.दत्ता भगत, डाॅ. श्रीनिवास पांडे व डाॅ. अभय दातार यांच्या निवड समितीने या संशोधकांची कुरुंदकर संशोधनवृत्तीसाठी निवड केली आहे. या संशोधकांचे केन्द्राच्या वतीने अभिनंदन करण्यात येते असे संचालक डाॅ. भगवान अंजनीकर यांनी कळविले आहे.

आद्य समाजसुधारक सावित्रीबाई बोराडे यांचे कार्य अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या विषयावर संशोधन करताना अनेक पातळ्यावर काम करावे लागणार आहे. ही एका मागासवर्गीय समाजातून आलेली स्त्री आहे. ढोर समाजातील या स्त्रियांच्या वाट्याला सामाजिक दुरावलेपण आलेले असूनही ही स्त्री पुण्यामध्ये येऊन शिक्षण घेते. सामाजिक क्षेत्रात ही स्त्री काम करते. यांनी केलेले काम अद्याप उजेडात आलेले नाही यामुळे हा विषय माझ्यासाठी एक आव्हान आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रोजगार, उद्योजकता वृद्धीसाठी पदवी शिक्षण पद्धतीत बदलाची गरज

गुळवेलाचे औषधी उपयोग

अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप पोलंडला रवाना

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading