नंदवाळ जसंजस जवळ येवू लागायच तसतसे पायही बोलू लागायचे. डोक्यावरच्या सूर्यासोबत उत्साहाने देखील माध्यान गाठलेली असायची आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंची भेंडबत्ताशांची दुकानं मग खुणवायला लागायची. विठ्ठल तर तिथेही असायचाच की..डोळ्यांच्या कोपऱ्यांतून त्या खाऊ खेळण्यांच्या दुकानांकडे बघत आमची दिंडी मंदिरापर्यंत पोचायची आणि साऱ्यांना बयाजवार दर्शनासाठी रांगेत उभं केलं जायचं.
मानसी चिटणीस, चिंचवडगाव, पुणे
मोबाईल 9881132407
आषाढ महिना सुरु होतो. त्याच्या एकल सरी झरू लागतात तशा आठवणीही मनाच्या आभाळात दाटून येतात आणि मन धाव घेऊ लागते नंदवाळ कडे. नुकतीच शाळा सुरू झालेली असायची. वह्या पुस्तके यांचा नवा गंध मनाला सुखवायचा पण जास्त ओढ असायची आषाढी एकादशीची,नंदवाळ वारीची. आषाढमेघांतून झरणा-या सरींप्रमाणे मनात झरत रहायची त्या सावळ्याची लोभस मुर्ती..
महालक्ष्मी मंदिरात किर्तन महोत्सव सुरू व्हायचा. अनेक राज्यांतले जेष्ठ श्रेष्ठ किर्तनकार हजेरी लावायचे. आपल्या ओघवत्या वाणीने आसमंत विठ्ठलमय करायचे. या मेळ्यातच मला माऊली,तुकाराम यांच्यासोबत जनी,कान्होपात्रा सखू भेटल्या. मी सात/वर्षाची असल्यापासून आई मला या किर्तन महोत्सवात घेवून जात होती. आजही या अवलिया किर्तनकारांचे शब्द मनात अबीर गुलाल उधळत राहतात. तर, आषाढी जसजशी जवळ यायची तसतशी नंदवाळ वारीचे वेध लागायचे. कोल्हापूर शहरापासून हळदी कांडगाव सोडलं की नंदवाळ म्हणून एक छोटसं गाव आहे. विठ्ठलाचे हॉलीडे होमच जणू ,जे प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी आम्ही सगळे गल्लीवाले कोल्हापूर ते नंदवाळ पायी चालत जायचो. ती आमची मिनी वारीच असायची. आठवडाभर आधीपासून तयारी सुरू असायची. टाळ,मृदुंग,पताका,तुळशी वृंदावने आदी सारी जय्यत तयारी केली जायची आणि मग वारीचा,माउलीला भेटायचा दिवस उजडायचा. इतर दिवशी धो धो कोसळणारा पाऊसही रिमझिम सरींसोबत झिम्मा फुगड्या खेळायला तयार व्हायचा.
पहाटे पाच वाजता सारी गल्ली जागी व्हायची. सडासारवणे, आंघोळी पंघोळी पटापट उरकल्या जायच्या आणि सारेजण वारीसाठी एकत्र जमायचे. मुली आणि बायकांनी नऊवारी साड्या, मुले आणि मोठे लोक लेंगा झब्बा घालत. मुलांच्या हातात टाळ तर मुलींच्या डोक्यावर छोटी तुळशीवृंदावने असत. एव्हढा जामानिमा झाला की ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम’ असा जयघोष व्हायचा आणि दिंडी चालू लागायची नंदवाळ ची वाट. रस्त्यात आमच्यासारख्याच अनेक छोट्या छोट्या दिंड्या गाठ पडायच्या. मग आमचा उत्साहही झेंडे नाचवायचा. ‘मुखी नाव घ्या हो विठाईचे पाऊल चालावे पंढरीचे’ याच नादात माउलीला बघायची भेटायची ओढ लागायची.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामगजर सतत कानी पडायचा. आम्हाला सोबत करायला पाऊसही आपल्या सरींची दिंडी घेऊन हजर असायचा.
मधेच एखादी चुकार एकल सर झरून जायची आणि विठूमाऊलीच्या नामात विरघळायची. पावसाच्या थेंबांबरोबरच भक्तीचे आभाळ दाटून यायचे. थेंबांची सर आता गाभुळलेले मेघ पांघरून
हिरवा डोंगरमाथ्यावर पोचलेली असायची आणि आमची दिंडी नंदवाळच्या वेशीत.. पुढे मात्र चालण्याची कसरत करायला लागायची कारण पुढची वाट शेतीमातीची आणि दरवेळी चिखलाच्या मेंदीने सजलेली असायची. नुकतीच तरारून आलेली रोपटी आमच्या आवाजानं डोळे चोळत जागी व्हायची आणि पानांचे टाळ वाजवत आमच्यासोबत विठूनामात सामील व्हायची. आम्ही पांडूरंगाला भेटायला चाललोय हे त्यांना कोण सांगत असेल? असा तेव्हा मला नेहमी प्रश्न पडायचा.असं वाटायचं पाय जणू पंढरीची वाट चालतायतं अन् मनात तो पांडूरंग रुजतोय. देहावर शिंपण होतेय कोवळ्या पाऊसधारेची…सारच अलौकिक…! भारलेलं आसमंत आणि त्या सावळ्या माऊलीला भेटण्याची ओढ. नकळतं वय होत विठ्ठलाचा महिमा फक्त गोष्टींमधून आणि अभंगातून अनुभवलेला तरीही ओढ वाटायची त्या सावळ्या खट्याळ सख्याला बघण्याची.
नंदवाळ जसंजस जवळ येवू लागायच तसतसे पायही बोलू लागायचे. डोक्यावरच्या सूर्यासोबत उत्साहाने देखील माध्यान गाठलेली असायची आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंची भेंडबत्ताशांची दुकानं मग खुणवायला लागायची. विठ्ठल तर तिथेही असायचाच की..डोळ्यांच्या कोपऱ्यांतून त्या खाऊ खेळण्यांच्या दुकानांकडे बघत आमची दिंडी मंदिरापर्यंत पोचायची आणि साऱ्यांना बयाजवार दर्शनासाठी रांगेत उभं केलं जायचं. मंदिरातल्या स्पिकरवर कोणीतरी अभंग गात असायचं. मधूनच पुन्हा माऊलीच्या नावाचा गजर व्हायचा. त्यावेळी वय,मोठेपण,जात-पात,धर्म,पत सारंकाही अदृश्य व्हायचे आणि अवघा रंग एक व्हायचा,पांडुरंग. सारंकाही त्याच्या सावळ्या रंगात रंगून जायचे. एक एक करत सारेजण रांगेतून माऊलीच्या पायावर डोकं टेकवायचे,क्षण दोन क्षण ते आपल्या मायेसोबत विटेवर उभे असलेले,भक्तांना भेटायला आतुरलेले सावळे परब्रह्म डोळ्यांत भरून घ्यायचे आणि कृतार्थ मनाने पुढे व्हायचे.एक नवी उर्जा घेऊन पुन्हा नव्याने आयुष्यात रुजायचे.अवघा रंग एक झाला,रंगी रंगला श्रीरंग ..काय सांगू बाई काहिचीया बाही; विठ्ठले अर्पिले देहभान ठायी..असे काहिसे व्हायचे. नंतर पुढचे काही दिवस विठ्ठल आभाळ होऊन तरंगायचा तनामनावर..
रुढार्थानं भलेही आपला हा देह कर्मांची गती भोगतोय पण विठूनामाची ही एकलसर सा-यांनाच भिजवते अन् त्या नामस्मरणानं सद्गदित होऊन डोंगरावर उतरलेल्या मेघांप्रमाणे मन गाभूळतं..पैलतीरावरचा पांडूरंग साद घालतो मुक्तीची..ज्यानं नामसंकिर्तानाची हिरवाई रुजवलीय,षड्रिपूरुपी खडकावर आणि उचंबळून आणलीय लीनतेची भावना..तो पांडूरंग,विठ्ठल,परब्रह्म.
कैवल्याच्या दारी..मुक्तीचे अंगण..!आहाहा..!केवळ एवढ्या दोन शब्दांनीच अवकाशाला गवसणी घातलीय असे वाटते. पाऊस हा नुसता पाऊस नाहीये..तर तो कैवल्याच्या दारी पडणारा पाऊस आहे..कृपादृष्टीचा पाऊस आहे..मुक्तीचे अंगण हा पाऊस भिजवतो.कैवल्यरूपी अशा सद्गुरूच्या कृपादृष्टीचा हा पाऊस मुक्त करतो सा-याच जंजाळातून. …..आणि हे कैवल्य युगानुयुगे उभे आहे..पंढरीत .आपल्या हरैक भक्ताला आपल्या मायेच्या अबीरात त्यानं माखून टाकलय.
सचैल भिजवणा-या या विठूभक्तीच्या पावसातला प्रत्येक थेंब एकेक वारकरी आहे…जो स्वतःच न्हाऊन निघालाय या साधनेच्या पावसात…विठूदर्शनाने या थेंबाचे सार्थक होईल.अवघी पंढरी गर्जेल विठूनामाच्या गुलालात माखून जाईल..रंगेल नामाच्या अबीरात अन म्हणेल,’ सावळा गे माये..रुपे सुंदर सावळा गे माये..’ पांडूरंग हरी वासूदेव हरी..
मानसी चिटणीस, चिंचवडगाव, पुणे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
उरावर नाच