December 12, 2024
DTS Technology will write new history in the field of technology
Home » तंत्रज्ञान क्षेत्रात डीटीएस तंत्रज्ञान, नवा इतिहास लिहिणार
संशोधन आणि तंत्रज्ञान

तंत्रज्ञान क्षेत्रात डीटीएस तंत्रज्ञान, नवा इतिहास लिहिणार

डायरेक्ट टू सेल !

आता एलान मस्क यांनी जगाला जोर का झटका जोरसे दिला आहे. त्यांच्या स्टारलिंक कंपनीने नवीन घोषणा केली आहे. आता म्हणे मोबाईलला सिमची गरज असणार नाही. मोबाईल फोन हे थेट उपग्रहाशी जोडले जातील. पूर्वी टेलिव्हिजन चॅनेलसाठी डीटीएच म्हणजेच ‘डायरेक्ट टू होम’ तंत्रज्ञान आले होते. यामध्ये उपग्रहांपासून आलेल्या सिग्नल घराजवळ बसवलेली डिश पकडून दूरदर्शन संचाला पुरवत असे. तसेच आता उपग्रहावरून येणारे सिग्नल मोबाईल पकडणार आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेला तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा ‘सिलसिला’ कोठे थांबायचे नावच घेत नाही. या कालखंडात मानवाच्या जीवनात, जीवनशैलीमध्ये अमुलाग्र बदल झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर कोणी म्हटले असते, अमेरिकेतील नातेवाईकाला भारतातून तत्काळ, थेट संपर्क साधता येईल, त्याच्याशी प्रत्यक्ष बोलता येईल, तर त्याला निश्चितच वेड्यात काढले गेले असते. मात्र बघता बघता अनेक क्रांतीकारी शोध लागत गेले, बदल घडत गेले आणि हे शक्यही झाले. जीव, रसायन आणि भौतिकीच्या वाढत्या आकलनातून, माहिती विश्लेषणाच्या वाढत्या वेगामुळे, शोधांचा आणि शोधांचे तंत्रज्ञानात रूपांतर करण्याचा वेग प्रचंड वाढला. संवाद साधण्यासाठी फार फार वर्षांपूर्वी खास दूत पाठवला जात असे. पुढे पक्ष्यांचा या कामासाठी वापर करण्यात येऊ लागला. कवी कालिदास यांनी तर चक्क ढगांना म्हणजेच मेघांना आपल्या सखीला संदेश पोहोचवण्याचे कार्य दिले आणि यातून मेघदूत लिहिले.

विज्ञानातील शोधांचे तंत्रज्ञानात रूपांतर करून निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे मानवी जीवन सुखकर होते, हे लक्षात आल्यानंतर मानवाने विज्ञान संशोधनावर लक्ष केंद्रित केले आणि संशोधनाची गती वाढली. संदेश नेणाऱ्या मानवी दूतांना, पक्ष्यांना मध्येच पकडून ज्याला संदेश द्यावयाच्या त्याच्याऐवजी भलत्यालाच तो मिळाल्याचे दाखले आपणास मिळतात. सतराव्या शतकात सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने दळणवळणाच्या क्षेत्रात, संदेश वहनाच्या क्षेत्रातही वेगाने संशोधनास सुरुवात केली. यातून प्रथम पोस्ट खात्याची सुरुवात झाली. पोस्टाने पाठवलेले पत्र देशातल्या देशातही काही महिन्यांनी मिळत असे. मात्र अशा दोन देशातील व्यक्तीमधील पत्रसंवादातून पु. शि. रेगे यांची ‘सावित्री’ कादंबरी तयार झाली. विद्युत ऊर्जेच्या शोधानंतर अनेक शोध लागले. त्यातील महत्त्वाचा शोध होता तो टेलिग्राफ यंत्रणेचा.

टेलिग्राफ यंत्रणेचा शोध लागल्यानंतर सुरुवातीला एकावेळी एकच संदेश जात होता. लवकरच यामध्ये बदल होऊन एकाचंवेळी अनेक संदेश पाठवणे शक्य झाले. त्यानंतर दुरध्वनीचा शोध लागला. दुरध्वनीला अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील सादरीकरणानंतरही या शोधाला खेळणे म्हणून पाहिले जात असे. मात्र लवकरच त्या तंत्रज्ञानातही बदल होऊ लागले. सुरुवातीला बेल एटी अँड टीचा या क्षेत्रात एकछत्री अंमल होता. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्या शोधाने जगाला वेडे केले होते. तरीही सुरुवातीला दूरगावी फोन लावण्यासाठी ट्रंक कॉल नोंदवावा लागत असे. क्रमाने नंबर लागत असत. सुरुवातीला दोन-तीन दिवसही प्रतिक्षा करावी लागत असे. पुढे हा कालावधी कमी होत गेला. मात्र डिजिटल तंत्रज्ञान आले आणि हा प्रतिक्षा कालावधी संपला. सुरुवातीचे फोनचे उपकरणही भारी असायचे. फोनवर गोल डायल असायची. त्यामध्ये बोट घालून नंबर फिरवावे लागत. पुढे मात्र नंबर दाबण्यासाठीची सुविधा आली. पुढे बाहेरगावी फोन करण्यासाठी एसटीडी सुविधा आली. गावोगावी एसटीडी बुथ तयार झाले. एसटीडी बुथवरून एख्याद्या सख्याने सखीला फोन लावावा आणि तो तिच्या बापाने किंवा आईने उचलावा, असे अनेक प्रसंग अनेकांना अनुभवावे लागले. यातून अनेक सासऱ्यांना अमरिश पूरी. प्राण आणि सासूला ललिता पवार अशी टोपण नावेही मिळाली.

पुढे पेजरचे युग आले. हो तेच पेजर, ज्यांच्यामध्ये स्फोट घडवून इस्राईलने वेगळी भीती निर्माण केली. पेजरवर लघुसंदेश पाठवता यायचा. पेजर कमरेला लावून अनेकजन मिरवत. पेजर जणूकाही स्टेटस सिंबॉल बनत होता. त्याचवेळी त्याचा गर्व मोबाईल तथा भ्रमणध्वनीने उतरवला. भ्रमणध्वनी येताच पेजर लुप्त झाले. आता केवळ गोपनिय कामासाठी पेजर वापरात आहेत. अनेकांना नोकियाचे ते मोबाईल आठवत असतील. पुश बटनचे छोटे फोन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आणि मोबाईल मध्यमवर्गीयांच्या हातातही दिसू लागले. त्यातही वेगाने बदल होत गेले. मोबाईलसाठी एक सिम खरेदी करणे गरजेचे असायचे. टॉवरवरून सिग्नल मिळायचा आणि टॉवर जवळपास नसेल तर मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज दाखवत असे. आज अशा फारच कमी जागा आहेत की, जेथे संपर्कक्षेत्र नाही. त्यामुळे मानवाचे खाजगी आयुष्य जगापुढे येऊ लागले.

मोबाईलमध्ये लवकरच स्पर्शसंवेदी म्हणजेच टच स्क्रीन उपकरणे आली. त्यासोबत अनेक कारणांसाठी मोबाईल हे एकच उपकरण पुरेसे होऊ लागले. मोबाईलमध्ये कॅमेरा आला आणि प्रत्येकजन फोटोग्राफर झाला. त्यामध्ये रेडिओच काय दूरचित्रवाणीचे कार्यक्रमही पाहता येणे शक्य झाले. यासाठी अर्थातच आंतरजालाची गरज होती. ती मोबाईल नेटवर्कमधून पूर्ण केली जाऊ लागली. टू-जी वरून सुरु झालेला हा नेटवर्कचा सिलसिला आज ५-जीपर्यंत पोहोचला आहे आणि आताच ७-जीच्या गप्पा सुरू झाल्या आहेत. आंतरजालावरून माहिती शोधण्यापलिकडे जात अनेक कारणासाठी मोबाईल हे एकच उपकरण पुरेसे असले तरी त्याला सिमची गरज आहे. नेटवर्कची गरज आहे आणि त्यासाठी टॉवरसुद्धा गरजेचे आहेत.

मात्र आता एलान मस्क यांनी जगाला जोर का झटका जोरसे दिला आहे. त्यांच्या स्टारलिंक कंपनीने नवीन घोषणा केली आहे. आता म्हणे मोबाईलला सिमची गरज असणार नाही. मोबाईल फोन हे थेट उपग्रहाशी जोडले जातील. पूर्वी टेलिव्हिजन चॅनेलसाठी डीटीएच म्हणजेच ‘डायरेक्ट टू होम’ तंत्रज्ञान आले होते. यामध्ये उपग्रहांपासून आलेल्या सिग्नल घराजवळ बसवलेली डिश पकडून दूरदर्शन संचाला पुरवत असे. तसेच आता उपग्रहावरून येणारे सिग्नल मोबाईल पकडणार आहे. म्हणूनच याला डीटीएस किंवा ‘डायरेक्ट टू सेल’ तंत्रज्ञान म्हटले आहे. यासाठी कोणत्याही विशिष्ट सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरची गरज असणार नाही. यामुळे वापरकर्त्याला अतिवेगवान आंतरजाल उपलब्ध होईल. डीटीएस सेवेला ॲडव्हान्स्ड सॅटेलाईट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणतात.

सध्या ही प्रणाली संदेश पाठवणे आणि बोलण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. लवकरच यामध्ये आंतरजालाचाही समावेश होईल. यामुळे दळणवळण, कृषी आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल. काही सॅटेलाईट संपूर्ण जगाला आपल्या छत्राखाली आणतील. टॉवर्सची गरजच उरणार नाही. तरीही ग्राहकाला २५० ते ३०० एमबीपीएस वेगाने इंटरनेट मिळेल. कनेक्टिव्हिटी नाही असा जगाचा कोपराही उरणार नाही. म्हणजेच ‘तेथे रेंज नव्हती’, ही थापाड्यांना थापही मारता येणार नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डीटीएस तंत्रज्ञान, नवा इतिहास लिहिणार हे मात्र निश्चित !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe