बाबासाहेबांचे केवळ चरित्र सांगणे, हे या संग्रहाच्या लेखनामागचे प्रयोजन नाही. त्यांच्या कार्याचे वेगळेपण कथन करणे, त्यांच्या कार्यामागे असलेल्या प्रेरणांचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप समजून सांगणे आणि बाबासाहेबांच्या विचारकार्याची प्रस्तुतता विशद करणे हा या कवितासंग्रहाच्या लेखनाच्या मुळाशी कवीचा हेतू आहे.
एकनाथ पाटील,
इस्लामपूर, जि. सांगली
माहे ऑगस्ट २०२२ चा काळ. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ अशी अनोखी घोषणा दिली होती. सारा देश तिरंगामय करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ज्यामुळे कदाचित देशासमोरचे सगळे प्रश्न जणू चुटकीसरसे निकालात निघणार होते. मात्र त्याच वेळी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सुराणा गावातील शाळेत एक घटना घडली. तिसऱ्या इयत्तेत शिकणारा नऊ वर्षांचा इंद्रकुमार मेघवाल हा अस्पृश्य समाजातील लहान मुलगा तहान अनावर झाल्याने शाळेतल्या शिक्षकांसाठीच्या माठातले पाणी पितो. त्याच्या या कृतीमुळे ‘पाणी बाटवले’ म्हणून संतापलेला वरिष्ठ जातीतला त्याचा शिक्षक इंद्रकुमारला बेदम मार देतो. परिणामी अस्पृश्यतेचा अर्थही माहीत नसलेल्या त्या लहानग्या निष्पाप जिवाला उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्येच आपला प्राण गमवावा लागतो. ज्याने विद्यार्थ्यांच्या कोवळ्या, संवेदनशील मनांवर योग्य संस्कार करून जुन्या रूढी, प्रथा, परंपरांच्या जोखडातून त्यांना मुक्त करणे आणि त्यांच्या आयुष्याला माणूसपणाकडे नेणारे दिशादर्शन करणे अपेक्षित असते; तो गुरूच जातीयवादी मानसिकतेतून इंद्रचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची; त्यांनी उभारलेल्या पाणी हक्कासाठीच्या चवदार तळे सत्याग्रहाची या देशाला अजूनही किती गरज आहे याकडे लक्ष वेधणारी, कोणाही संवेदनशील माणसाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी, मती बधिर करून टाकणारी, स्वातंत्र्याच्या अन्वयार्थाचा पुनर्विचार करायला लावणारी ही घटना आहे.
सार्वजनिक हौदावरचे पाणी प्यायल्यामुळे सुमारे शंभर वर्षांपूर्वी कोल्हापूर संस्थानात गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजातील तळातल्या माणसाला सवर्णाची मारहाण सहन करावी लागली होती. तेव्हा राजर्षी शाहू महाराज ठामपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले होते आणि गंगारामचा आत्मसन्मान त्यांनी जिवंत ठेवला होता. या घटनेनंतर लगेचच त्यांनी संस्थानातल्या विहिरी आणि पाणवठे सर्व जातिधर्मातल्या नागरिकांसाठी खुले असतील असा अतितातडीचा आदेश काढला आणि तो तितक्याच तातडीने अमलातही आणला. संस्थानाच्या सरकारी खजिन्यातून विशेष बाब म्हणून पैसा खर्च करून मोक्याच्या ठिकाणी गंगारामला त्यांनी सत्यसुधारक हॉटेल काढून दिले आणि स्वत: महाराज नियमितपणे लवाजम्यासह तिथे चहा प्यायला जात होते. त्या प्रतिकूल काळात शाहू महाराजांनी जातिअंताचे जे कृतिशील आणि क्रांतिकारी पाऊल उचलले, ते पाऊल उचलायला आजचे आमचे राज्यकर्ते धजत नाहीत. त्यांच्याकडे तशी इच्छाशक्ती दिसत नाही आणि त्यामुळेच जागोजागी आपल्याला आजही व्यवस्थेचे बळी ठरलेले गंगाराम आणि इंद्र दिसतात. गंगाराम ते इंद्रकुमार हा आपला आधुनिक समजल्या जाणाऱ्या काळातला नामुष्कीजन्य सामाजिक प्रवास आहे आणि त्याची दिशा बदलणे, ही काळाची गरज आहे. समाजातल्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहणारा कोणताही गंभीर प्रवृत्तीचा लेखक आपल्या भोवतालातले प्रश्न आपल्या लेखनाच्या केंद्रस्थानी आणत असतो. बाबासाहेबांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहानंतरही पुढे कितीतरी वर्षांनी पाण्यावरून गावगाड्यात झालेल्या दलित सवर्ण संघर्षाचे चित्रण भास्कर चंदनशिव यांच्या ‘पाणी’ कथेत झालेले दिसते. या कथेनंतर खूप काळ उलटून गेल्यावरही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पाणी हक्कासाठी बळी गेलेला इंद्रकुमार आपल्याला दिसतो. या अशा वर्तमान सामाजिक पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांच्या विचार – कार्याचे जागते भान देणाऱ्या दीर्घ कवितेवरचे ‘युगानुयुगे तूच संदर्भ आणि अन्वयार्थ’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
मराठी भाषेत दीर्घ कवितेची परंपरा खूप जुनी आहे. आधुनिक काळातही मोजकी तरीही महत्त्वाची दीर्घ कविता मराठीत लिहिली गेली आहे. या परंपरेत आता अजय कांडर हे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. अजय कांडर हे मराठीतील गंभीर प्रवृत्तीचे कवी आहेत. ‘आवानओल’ (२००५) आणि ‘हनी इलो’ (२०१२) या दोन कवितासंग्रहांनंतर डिसेंबर २०१९ ला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचा ‘युगानुयुगे तूच’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्याची समकालीन प्रस्तुतता विशद करणारा तिसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. लोकवाङ्मय गृहाने तो प्रकाशित केला आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये कवी कांडर यांचा महात्मा गांधी यांचे जीवनकार्य आणि विचारांवर आधारित ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ हा आणखी एक दीर्घ कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजकारणाचे आधारस्तंभ असलेले महापुरुष होते. दोघांनीही भारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला निर्णायक वळण दिले आहे. गांधी-आंबेडकर विचारधारांच्या समन्वयाचे स्वप्न पाहणाऱ्या या कवीला या दोन्ही महापुरुषांवर कविता लिहावीशी वाटणे, ही भारतीय समाजाच्या वाटचालीची कवीने सुचविलेली भविष्यकालीन दिशा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. सामाजिक विषमतेविरोधातले त्यांचे पथदर्शी काम जागतिक स्तरावरही मैलाचा दगड ठरावे इतके अनुकरणीय आहे. एकाच वेळी बौद्धिक आघाडीवर आणि रस्त्यावरच्या संघर्षातही तितक्याच हिरिरीने ते अग्रभागी असायचे. विचारांप्रति त्यांची असणारी निष्ठा अवर्णनीय होती. बाबासाहेब काळाच्या कितीतरी पुढचा विचार करीत होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक लेखक विचारवंत आणि कलावंतांच्या आस्थेचा, अभिमानाचा आणि प्रेरणेचा विषय होते. वैचारिक साहित्याच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांच्याविषयी विपुल लेखन झाले आहे. सर्जनशील लेखनाच्या प्रांतातही विविध वाङ्मय प्रकारात त्यांच्याविषयी मोजकेच तरीही अत्यंत महत्त्वाचे लेखन झाल्याचे दिसते. आंबेडकरी साहित्याच्या निर्मितीच्या मुळाशी तर त्यांच्या वैचारिक लेखनाची सशक्त प्रेरणा आहे. एका कविता वाङ्मय प्रकाराचा जरी विचार करायचा झाला, तरी डॉ. आंबेडकरांना केंद्रस्थानी ठेवून तुलनेने मोठ्या प्रमाणावर कविता लिहिली गेली आहे. नामदेव ढसाळ आणि यशवंत मनोहर यांनी तर त्यांच्यावर दीर्घ कविता लिहिल्या आहेत. त्याच परंपरेत आता अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच या कवितासंग्रहांची भर पडली आहे. बाबासाहेबांचे केवळ चरित्र सांगणे, हे या संग्रहाच्या लेखनामागचे प्रयोजन नाही. त्यांच्या कार्याचे वेगळेपण कथन करणे, त्यांच्या कार्यामागे असलेल्या प्रेरणांचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप समजून सांगणे आणि बाबासाहेबांच्या विचारकार्याची प्रस्तुतता विशद करणे हा या कवितासंग्रहाच्या लेखनाच्या मुळाशी कवीचा हेतू आहे. मात्र कोणाही महापुरुषाचे तत्त्वज्ञान एका कवितेत बांधणे ही मोठी कठीण गोष्ट असते. माणुसकीच्या इतिहासाचा आणि तत्त्वज्ञानांचा अंत करणाऱ्या या संभ्रमात तर ती अधिक कठीण आहे. अजय कांडर यांनी मात्र ती लीलया पेलली आहे. त्यामागे त्यांची स्वतःची अशी एक ठाम लेखनविषयक भूमिका आहे.
‘लेखन हा व्यवस्थेत केलेला हस्तक्षेप असतो’ या स्वतःच्याच मनोगतातील कवीच्या या विधानानुसार बिघडलेल्या वर्तमानाविषयी कवी या कवितेतून काही आक्षेप नोंदवतो आणि त्याच्या दुरुस्तीविषयीची आस बाळगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे, हाच आजच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अध: पतनावरचा ठोस उपाय असल्याचे कवितेतून सूचित करतो. बाबासाहेबांच्या अनेक अलक्षित पैलूंबर या कवितेतून त्यांनी प्रकाश टाकला आहे. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांना समजून घेण्याच्या अनेक शक्यता या कवितेतून खुल्या होत जातात. ज्या शोषितांसाठी बाबासाहेबांना लढायचे होते. ते शतकानुशतके जातीसह अनेक प्रकारच्या गुलामगिरीमध्ये अडकून पडलेले होते. धर्म आणि जातव्यवस्थेने त्यांना माणूसपणाचे सगळे हक्क नाकारलेले होते. मात्र त्यांना या कसल्याही प्रकारच्या गुलामीची जाणीव नव्हती आणि तरीही बाबासाहेब त्यांच्या हक्कांसाठी न्यायाच्या चौकटीत राहून लढत होते. एकाच वेळी अनेक पातळीवर लढली गेलेली ही निकराची लढाई होती. या लढाईचे अनेक कंगोरे या कवितेतून उलगडत जातात आणि त्यांची लढाई ही कशी जाती पलीकडची माणूसपणाची लढाई होती, हे या कवितेतून स्पष्ट होत जाते.
कवितेच्या वाचनानंतर न्यायासाठी, समताधिष्ठित समाजरचनेच्या निर्मितीसाठी शोषणाच्या विरोधात प्राणपणाने लढणाऱ्या एका लढाऊ मूकनायकाची उत्तुंग प्रतिमा वाचकाच्या नजरेसमोर उभी राहते. गद्य स्वरूपाच्या चरित्रलेखनातून अथवा चरित्रपर कादंबरी लेखनातून मुळातली नायकाची अशी प्रतिमा उजागर करीत नेणे, लेखकाला अधिक सोपे असते. कवितेसारख्या वाङ्मय प्रकारात हा तोल सांभाळणे अधिक कठीण असते. कवी अजय कांडर असा तोल सांभाळून बाबासाहेबांच्या तितक्याच उदात्त आणि भव्यदिव्य कार्याला न्याय देण्यात यशस्वी झाले आहेत. या कवितेचे कथन इतके प्रभावी आहे की, तत्त्वज्ञान आणि वैचारिकता हे तिचे गाभाघटक असूनही ती वाचनीय झाली आहे. साधी सोपी सहज संवादी शैली हा तिचा महत्त्वाचा विशेष आहे. दीर्घ असूनही कविता वाचताना सलगतेत कुठेही खंड पडत नाही. हा संवाद जणू आपल्या समोरच घडतो आहे, अशी अनुभुती वाचकाला येते. ओघवती, संयमी आणि प्रवाही भाषा हे या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
हळुवारपणे मनाचा ताबा घेणारी या कवितेची भाषा कवी आणि काव्यनायक यांच्यामधील भावसंबंधाचे पापुद्रे उलगडत जाते. एकेरी संबोधनामुळे कवीचे बाबासाहेबांसारख्या उत्तुंग काव्यनायकाशी असलेले निकटत्व प्रत्ययाला येते. संतपरंपरेतले संतकवी आपल्या अभंगवाणीमधून विठ्ठलाशी ज्या प्रकारचे नाते जोडतात, तशाच प्रकारचे नाते कवी इथेही जोडू पाहतो. संतांच्या कवितेतील आर्तता इथेही तीव्रतेने जाणवते. मात्र संतकवितेत शरणवृत्तीने आलेला श्रद्धाळू भाबडेपणा इथे नाही. बाबासाहेबांच्या प्रत्येक विचार आणि कृतीकडे कवी अत्यंत डोळसपणे पाहतो आणि आजच्या संदर्भात त्यांचा विचार कसा समकालीन आहे आणि तो प्रत्यक्ष कसा आचरणात आणता येईल, असा विचार करतो. एकेरी संबोधनाने या लेखनाला एक प्रकारची भावनिक उत्कटता प्राप्त झाली आहे आणि त्यामुळे वाचकाला जणू बाबासाहेबांशीच थेट संवाद केल्याचा प्रत्यय येतो.
‘तू तुझे भक्त होण्याचे
सगळे विचार नाकारलेस
तरी मी गात राहिलो तुझ्याच भक्तीचे गोडवे
मग तुझ्याच विचाराचे
बोट धरून चालताना लक्षात आले
तुला भजत राहण्यापेक्षा
इथल्या निसर्गानुसारच जगणं म्हणजे
तूच पुन्हा पुन्हा विचाराच्या बिजातून रुजून येणं’….
अशा आत्मपरीक्षणाने सुरुवात करणारी ही कविता प्रारंभी स्वतःच्याच आत्मचिकित्सेची भूमिका घेते आणि त्या उजेडात बाबासाहेबांच्या विचारांसह त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंना कवेत घेते. मुक्तगद्य असूनही या कवितेला जशी स्वतःची एक आंतरिक लय आहे, तशीच स्वतःची एक सथ गतीही आहे. या गतीच्या ओघातच बाबासाहेबांच्या विचारकार्याचे अनेक पैलू तितक्याच हळुवारपणे उलगडत जातात. जितक्या हळुवारपणे ते उलगडत जातात तितक्याच उत्कटतेने कवी आणि बाबासाहेब यांच्यातील नाते अधिक घट्ट होत जाते. वाचकाला ते अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडते. तात्त्विक विषय असूनही या कवितेत कुठेही जडपणा आलेला नाही. दलित कवितेचा अपरिहार्य भाग असलेला विद्रोहाचा वरचा सूरही या कवितेत नाही किंवा कुठे आक्रस्ताळेपणा नाही. अतिशय संथपणे आणि संयमाने हा संवाद वाचकांच्या मनाचा ताबा घेतो. आजच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वर्तमानाशी बाबासाहेबांच्या विचारांची असलेली सांगड तपासून पाहण्याचा आणि स्वतः सह वर्तमानाच्या परखड चिकित्सेचा कवीने केलेला या कवितेतला प्रयत्न मुळातूनच समजून घेण्यासारखा आहे. ज्यामुळे बाबासाहेब शोषित पीडितांच्या मुक्तीविषयीचा काळाच्या कितीतरी पुढचा विचार करीत होते. याचा प्रत्यय येतो. दीर्घ कवितेत अखेरपर्यंत आशयावर पकड ठेवणे, तिचे सूत्र, आंतरिक लय आणि वाचनीयता टिकवून ठेवणे ही एक कठीण गोष्ट असते. या कवितेत कवी कांडर यांनी या गोष्टी साध्य केल्या आहेत. संवाद हे या कवितेचे महत्त्वाचे बलस्थान आहे.
अपवाद वगळता अनेक कवी, लेखक आणि विचारवंतांनीही ‘दलितांचे नेते’ अशी बाबासाहेबांची एक साचेबद्ध प्रतिमा उभी केली आहे. जी बाबासाहेबांच्या कार्याला संकुचित करते. एकीकडे गावकुसाबाहेर फेकल्या गेलेल्या बांधवांना ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश देणारे बाबासाहेब दुसरीकडे सर्व जातिधर्मातल्या सर्वहारा लोकांना सोबत घेऊन जाणारा प्रगतीचा समतेचा, डी कास्ट होण्याचा खूप लांब पल्ल्याचा व्यापक रस्ता दाखवतात, असे कवी जेव्हा नमूद करतो, तेव्हा जातीच्या चौकटीपल्याड उभ्या असलेल्या बाबासाहेबांचे विशाल दर्शन घडते. बाबासाहेबांनी दाखविलेल्या या रस्त्यावर कुठेही, कसल्याही धोक्याची शक्यता नसल्याचा निर्वाळा कवी देतो. ‘या रस्त्यावरून चालणाऱ्याने सगळ्या अहंकारांना त्याग करून केवळ माणसासाठी जगावं या बाबासाहेबांच्या आग्रहामुळे अनेकांचे जगणेसुद्धा समृद्ध झाल्याचे कवी सांगतो.
बाबासाहेबांनी जे जे लढे उभारले, ते नैतिकता आणि सत्याच्या बळावर यशस्वी केले. या सगळ्या संघर्षात व्यवस्थेशी लढताना ते कुणाही व्यक्तीच्या अथवा समूहाच्या विरोधात नव्हते, तर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विषमतेमुळे पिढ्यानपिढ्या जे जे परिघाबाहेर फेकले गेले होते. जन्मावर आधारलेल्या जातव्यवस्थेने ज्यांना नाकारले होते, त्या सर्वच माणसांना सन्मानाने जगण्याच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या बाजूने ते सर्वशक्तिनिशी उभे होते. सर्व प्रकारच्या भेदाच्या भिंती नष्ट करण्यासाठी त्यांनी जो संघर्ष उभा केला, तो रचनात्मक संघर्ष असल्याचे कवी आवर्जून नोंदवतो. विधायक स्वरूपाच्या या संघर्षातून बाबासाहेबांनी एका उदात्त आणि रचनात्मक मूल्यव्यवस्थेची मांडणी केली आहे. या मूल्यव्यवस्थेच्या मुळाशी तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आधार आहे. बुद्ध ही बाबासाहेबांची ऊर्जा आणि ताकदही आहे. जोपर्यंत जगात तहान आहे, तोपर्यंत या जगात बाबासाहेबांचा विचार अटळ असल्याचेही हा कवी आवर्जून सांगतो. या विचारामागे माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी, ही त्याची साधी अपेक्षा आहे आणि त्यासाठी अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाताना कसलाही भेद न करता त्यांनी सर्वांच्याच हाती विचारांचा नवा दिवा दिल्याचेही कवी सांगतो. मात्र विचारांच्या या उजेडात परस्परांचे हात हातात घेऊन भविष्याची वाटचाल करण्यात आपण आज कमी पडतो आहोत.
शतकानुशतके व्यवस्थेने ज्यांना तहानलेले ठेवले. त्यांना बाबासाहेब पाण्याचा नवा आणि व्यापक अर्थ कसा समजून सांगतात आणि पाणीच त्यांची कशी शक्ती बनते, याचे विश्लेषण या कवितेत येते. जागतिक स्तरावर आज ‘पाणी’ हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात आज चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या समन्यायी पाणी वाटपाच्या संकल्पनेचा आग्रह बाबासाहेबांनी खूप आधी धरलेला होता. काळाच्या कितीतरी पुढचा विचार ते करीत होते. त्यामुळे जगात जोपर्यंत तहान असणार आहे. तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार टिकून राहणार असल्याची ग्वाही कवी देतो.
पुस्तकांमधून बाबासाहेब भेटले आणि त्यांच्यामुळे जातीच्या कोडलेल्या वर्तुळातून आपण मुक्त झाल्याची स्पष्ट कबुली कवी या कवितेत देतो. दैववाद नाकारणाऱ्या विचारांच्या प्रगल्भतेची वाट बाबासाहेबांच्या ग्रंथांमधून सापडल्याचे आणि आत्मसन्मानासह व्यक्तिस्वातंत्र्याचे मोल बाबासाहेबांमुळेच समजल्याचे तो मान्य करतो. तरीही बाबासाहेबांचे तो दैवतीकरण करीत नाही. दैवतीकरणाने महापुरुषांचा पराभव होती आणि अनेकदा स्वतःला त्या त्या महापुरुषांचे अनुयायी म्हणवून घेणारेच अशा दैवतीकरणात आघाडीवर असतात. त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. एकदा दैवतीकरण केले की, विचारांच्या बांधिलकीचे बंधन राहात नाही आणि सोयीनुसार महापुरुषांचा उपयोग करून घेण्याची मोकळीक राहते. खरा अनुयायी त्या त्या महापुरुषांच्या विचारांचे बोट धरतो आणि कोणतीही किंमत मोजून त्या प्रमाणेच वर्तन करतो. इतरांपेक्षा कितीतरी वेगळा विचार व कृती करणाऱ्या आणि प्राणपणाने आपल्या भूमिकेशी ठाम राहाणाऱ्या बाबासाहेबांना माणूस म्हणून स्वीकारण्याचा डोळसपणा कवी या कवितेत दाखवतो. त्या डोळसपणासोबत ओघानेच येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे भानही तो प्रकट करतो.
या कवितेतील बराचसा भाग बाईविषयीच्या चिंतनाने व्यापलेला आहे. स्त्रियांविषयी अपार करुणा बाबासाहेबांच्या मनात होती. त्या करुणेचा अंश या कवितेतही सापडतो आणि त्यामुळेच ‘बाईचंच काळीज लाभी मला’ अशी प्रार्थना कवी करतो. बाईच्या सन्मानासाठी गावाविरुद्ध लढा उभारणाऱ्या आपल्या निरक्षर तरीही अनुभवाने समृद्ध असलेल्या आजीकडूनच बाबासाहेबांच्या विचारांचा सशक्त वारसा आपणाला मिळाल्याचे तो सांगतो. मोठ्या प्रमाणावर जातीयता पाळली जात असल्याच्या काळात थेट जातीयतेलाच आव्हान देणारी आणि गावगाड्याचं समूहभान जपणारी गावकुसाच्या आतलीच ही म्हातारी आजी या कवितेत भेटते.
‘जो महापुरुष बाईला स्वातंत्र्य देण्यासाठी झटेल, तोच समजावा साऱ्या समाजाचा’ असा बाबासाहेबांशी प्रत्यक्ष नातं सांगणारा आणि जातीच्या उतरंडीला थेट धक्का देणारा नवा क्रांतिकारी विचार ती सांगते. गावगाड्यातल्या नव्या पिढीच्या दृष्टीने हो विचार खूपच महत्त्वाचा आहे. दलित सवर्ण सहसंबंधाचे मराठी साहित्यात अत्यंत दुर्मीळ असलेले दर्शन या कवितेत घडले. वेळोवेळी ज्यांच्याबरोबर शत्रुत्व कधीच नव्हते. बाबासाहेबांनी टोकाचा संघर्ष केला; त्यांच्या बरोबर त्यांचे होते ते वैचारिक मतभेद होते. माणसामाणसातल्या भेदाच्या भिंती नष्ट करणाऱ्या या लढाईत ते सर्वहारा माणसांच्या बाजूने उभे असल्याच्या वास्तवाकडे ही कविता लक्ष वेधते. बाईला इथल्या परंपरेने कसे सर्वांगाने बंधनांमध्ये जखडून ठेवले आहे. याचा एक विस्तृत पट या कवितेतून उलगडत जातो. बाईविरोधी धर्म परंपरांचे उत्खनन करणारे, त्यांची परखड चिकित्सा करणारे, बाईच्या जीवनात क्रांती घडवून आणणारे विशाल अंतःकरणाचे मातृहृदयी बाबासाहेब या कवितेत आपल्याला भेटतात.
धर्माचे अवडंबर माजवून व्यक्तिगत हितसंबंध जपणाऱ्यांच्या, जातिभेदाचा पुरस्कार करणाऱ्यांच्या पंगतीत जाऊन बसणे लोकांना आज प्रतिष्ठेचे वाटू लागले आहे. बुद्धिभेदाच्या नव्या क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. त्या आधारे धर्माचा अजेडा राबवून सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांकडून उद्याच्या काळात धर्मग्रंथांनाच संविधानाचा दर्जा दिला जाण्याचा धोका ही कविता व्यक्त करते. त्यामुळे भविष्यात इथल्या लोकशाहीलाच नख लावले जाण्याची शक्यताही व्यक्त करते. माणसांचे शोषण करणारा ‘धर्म माणसांसाठी की, माणूस धर्मासाठी?’ असा मूलभूत प्रश्नच कवी उपस्थित करतो. जात आणि धर्मामुळे होणारे अध: पतन रोखायचे असेल, तर शाहू- फुले-आंबेडकरांच्या समताधिष्ठित विचारांचीच या देशाला अधिक गरज असल्याच्या वास्तवाकडे ही कविता निर्देश करते.
बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या कितीतरी पैलूंचे व्यापक दर्शन या कवितेतून घडते. अस्पृश्यांचे मुक्तिदाते, शोषितांच्या मनात आत्मविश्वास आत्मसन्मान जागवणारे, माणसांवर प्रेम करायला शिकवणारे, समन्यायी पाणी वाटपाचा क्रांतिकारी विचार कृतीत आणणारे, सर्वाना सोबत घेऊन जाणारे, शुद्ध मन जपण्याचा संदेश देणारे, भूमीवरच्या प्रत्येकाच्या हातात विचारांचा नवा दिवा देणारे, गुलामांना गुलामीची जाणीव देणारे, अन्यायग्रस्तांच्या मनात माणुसकीची – संघर्षाची ज्योत पेटवणारे, माणसांच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे, ज्ञानाचे विचारांचे महत्त्व जाणणारे, देव आणि नशीब नाकारणारे, बाईंचा सन्मान करणारे, धर्म आणि परंपरेची चिकित्सा करणारे, समतेचे तत्त्वज्ञान सांगणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे, शेती विकासाचे नवे सूत्र सांगणारे, शेतीतल्या कुळांना न्याय मिळवून देणारे, शेतीच्या विभाजनाला विरोध करणारे. लोकसंख्यावाढीला आळा घालण्यासाठी कुटुंबनियोजनाचा प्रगत उपाय सुचवणारे भांडवलशाही व्यवस्थेच्या विरोधात उभे राहाणारे आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीचा अन्वयार्थ इथल्या भूमीत रुजवणारे ‘युगानुयुगांचे महानायक’ अशी असलेली बाबासाहेबांची बहुआयामी प्रतिमा या कवितेतून अधिकाधिक ठळक होत जाते. जी प्रतिमा आज समाजामध्ये अधिक खोलवर रुजवण्याची आणि तिचे जतन करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि तेच या कवितासंग्रहांच्या निर्मितीमागचे खरे प्रयोजन आहे.
कवितेच्या शेवटाकडे येतानाही कवी आत्मटीकेची, भोवतालासह सतत स्वतःला तपासत राहण्याची स्वतःलाच प्रश्न विचारण्याची भूमिका कायम ठेवतो. माणसांविषयीचा कळकळा त्याच्या शब्दा शब्दांतून पाझरत राहतो.
‘माझ्या रक्तात
कोणत्याच जातीच्या थेंबाचा अंशही कधी मिसळू नये
असा मानवतेचा वाहता झरा सतत पाझरत राहावा
मला धर्माची ओढ कधीही नव्हतीच
तरी प्रेम म्हणजे धर्म या ओढीची आस
माझ्या मेंदूत दिवसेदिवस शतपटीत वाढत जावी
जो गावगाडा एकत्र येतो
समूहाने बोलू पाहतो
त्याच्या पाठीवर जातीचे अक्षरही न उठो
जे शहर श्रमकर्त्यांच्या घामाने जाते भिजून
तिथे सर्व धर्माच्या अन्नाचा होतो काला
तिथल्या धर्ममार्तंडांची वाचा झडो हिंसा आणि क्रौर्याचा
गिरवला जातो पाढा
त्या शाईलाही समतेचा पान्हा फुटो !’
अशा व्यापक प्रार्थनेच्या माध्यमातून मानवी कल्याणाची उद्याची जातपातधर्मपंथविरहित एकात्म समाजाची दिशा ही कविता सूचित करते. आजचा काळ वेगवेगळ्या अस्मितांच्या उच्चरवाचा अतितीव्र कल्लोळाचा, धर्मा-धर्मातील आणि जाती-जातीमधील टकरावांचा काळ आहे. बाबासाहेबांसारखा महापुरुष जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात त्यांचे पारंपरिक विरोधक यशस्वी होत आहेत. तोच त्यांचा छुपा अजेंडा आहे. समाजाच्या सर्व स्तरांत बाबासाहेब रुजणे, हे अशा लोकांच्या संकुचित राजकारणाला बाधक ठरणारे आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या सार्वत्रिकीकरणाचा प्रयत्न ते सतत हाणून पाडत आले आहेत. अपवाद वगळता बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारेही त्यांच्या या अशा राजकारणाला बळी पडत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांऐवजी त्यांना सोयांच्या प्रतिमेत अडकवण्याचे आणि त्या माध्यमातून स्वतः चे स्वार्थ साधण्याचे राजकारण खेळले जात आहे. समाजासमाजात दुही निर्माण करून राजकीय हितसंबंध जपणाऱ्या एका व्यापक कटाचा हा भाग आहे. अशा वेळी सर्वसामान्य माणसांनी सावध असले पाहिजे. याचे भान ही कविता देते आणि म्हणूनच ‘अरिष्ट काळातील चिंतनशील कविता’ अशा शब्दात दिलीप चव्हाण यांनी या कवितेचा आवर्जून उल्लेख केला आहे.
एकीकडे ‘एक राष्ट्र एक धर्म’ अशा आंधळ्या अतिरेकी राष्ट्रवादाच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. दुसरीकडे उजव्या शक्तीच्या कार्यक्रमांमध्ये सोयीनुसार जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या प्रतिमांचे प्रदर्शन मांडून ‘बाबासाहेब आमचेच’ असा संभ्रमही निर्माण केला जातो आहे. ज्या राजकीय पक्षांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावावर मते मागितली आणि दीर्घकाळ सत्ता भोगली, ते आज भरकटलेले आहेत. विचारांचे पकडलेले उरलेसुरले बोटही त्यांनी कधीचेच सोडलेले दिसते. देश आणि विविध राज्यांच्या पातळीवर कसलेही वैचारिक अधिष्ठान नसलेल्या विधिनिषेधशून्य राजकीय आघाड्या आकाराला येत आहेत आणि अल्पकाळात त्या मोडल्याही जात आहेत. ज्या डाव्या पुरोगामी चळवळींनी ही विचारधारा ताकदीने पुढे न्यायला हवी. त्यांचा आवाज आज कमालीचा क्षीण झाला आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा ज्या चळवळीचे अस्तित्व आज दिसले आहे. त्यांना अंतर्गत मतभेदांनी ग्रासले आहे. या सगळ्या पडझडीच्या वर्तमानात शेती परंपरेतून पुढे आलेल्या आणि गावगाड्यातल्या समूहजगण्याचे भान असलेल्या अजय कांडर यांच्यासारख्या कवीला बाबासाहेबांवर कविता लिहावीशी वाटणे, ही उद्याच्या काळाच्या दृष्टीने सुचिन्ह असलेली घटना आहे. या सगळ्या परिस्थितीतून बाबासाहेबांचे विचार आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील, असा विश्वास ही कविता जागवते.
व्यवस्थापरिवर्तनाचा कृतिशील विचार सांगणारी ही कविता आहे. जात्यंध आणि धर्माध शक्तीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत निघाल्याच्या आजच्या संभ्रमाच्या आणि परस्परांबद्दलच्या संशयकाळात जाती-जातीमधला. धर्मा-धर्मामधला सहसंवाद वाढला पाहिजे. परस्परांचे हात हातात घेऊन भविष्याची वाटचाल केली पाहिजे. सहसंवादाचा हा रस्ता अधिकाधिक भक्कम झाला पाहिजे. विस्तारित झाला पाहिजे. उद्याच्या काळात जगभरातल्या कुठल्याही निष्पापाला केवळ दलित असल्या कारणाने कधी आपला प्राण गमवावा लागू नये. केवळ पाणीच नव्हे, तर सन्मानाने जगणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. असे ठणकावून सांगणारे आवाज वेगवेगळ्या जातीसमूहांमधून पुढे आले पाहिजेत, त्यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. अशा सुसंवादाच्या शक्यतेच्या वाटा या कवितासंग्रहाने खुल्या केल्या आहेत, हेच या कवितासंग्रहाचे मोठे यश आहे.
पुस्तकाचे नाव – युगानुयुगे तूचः संदर्भ आणि अन्वयार्थ
संपादक – एकनाथ पाटील, इस्लामपूर.
प्रकाशन – लोकवाङ्मयगृह प्रकाशन, मुंबई
किंमत – २०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.