December 5, 2024
Maharashtra assembley election 2024 today voting
Home » महाराष्ट्रात महायुद्ध
सत्ता संघर्ष

महाराष्ट्रात महायुद्ध

महाराष्ट्रात महायुद्ध
आज महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यात मतदान होणार असून ९ कोटी ७० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकूण ४१३६ उमेदवार मैदानात असून २० लाख ९३ हजार युवा मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

डॉ. सुकृत खांडेकर

मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेमुळे यंदाची निवडणूक सुपर हिट ठरली, तर भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमुळे प्रचारयुद्ध शिगेला पोहोचले. ‘एक है तो सेफ है’, व्होट जिहाद, मतांचे धर्मयुद्ध अशा घोषणांनी वातावरणही तापले. गद्दार विरुद्ध निष्ठावान, महायुती विरुद्ध महाआघाडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे यंदाच्या महायुद्धाला स्वरूप आले आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जरी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिले असले तरी त्यावर हक्क कुणाचा शिंदेंचा की ठाकरेंचा याचा कौल या निवडणुकीत मतदार देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने जरी अजित पवार यांच्या पक्षाला दिले असले तरी त्यावर खरा हक्क कुणाचा पक्षाचे संस्थापक शरद पवारांचा की, त्यांच्याविरोधात बंड करणाऱ्या अजितदादांचा याचा निर्णय जनतेच्या न्यायालयात होणार आहे.

या निवडणुकीत जसे एकनाथ शिंदे व अजितदादा यांची कसोटी आहे तसेच पाच वर्षांपूर्वी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असा घोषा लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचेही करिअर निकालानंतर ठरणार आहे.सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने महायुतीवर महाराष्ट्रात मात केली. राज्यातील मतदारांनी महाआघाडीचे ३१ खासदार निवडून दिले व महायुतीचे केवळ ९ खासदार लोकसभेत पाठवले. आता विधानसभा कोणाच्या ताब्यात देणार, हे आज राज्यातील मतदार ठरवणार आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर महायुती सरकारचे धाबे दणाणले. लोकसभेचे वातावरण विधानसभेला राहिले, तर राज्याची सत्ता गमवावी लागेल, हे भाजपालाही कळून चुकले. एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू करून मास्टर स्ट्रोक मारला आणि राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींची व्होट बँक आपल्याकडे म्हणजे महायुतीकडे वळवून घेतली.

राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये प्रमाणे तीन महिन्यांचे पैसे जमा झाल्याने त्यांचा विश्वास शिंदे सरकारवर बसला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता मिळाल्यावर लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचा वादाही शिंदे-फडणवीस व अजिदादांनी केला आहे. लाडक्या बहिणींचा महायुतीला मिळत असलेला उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद पाहून महाआघाडीनेही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दरमहा ३००० रुपये व मोफत बस प्रवासाचे गाजर दाखवले आहे.

महादेव जानकर हे भाजपापासून दूर आहेत. लोकसभा निकालानंतर महायुतीला लाडकी बहीण अचानक कशी आठवली असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. लाडकी बहीण यंदाच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार असे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अशी भाजपाने दिग्गज नेत्यांची फौज प्रचारात उतरवली होती.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी वड्रा, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोट, माजी केंद्रीयमंत्री सचिन पायलट, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार अशी बड्या नेत्यांची टीम काँग्रेसने आणली होती. यंदाच्या निवडणुकीत उबाठा सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो मोठ्या फलकांवर व जाहिरातींवर लावून प्रचार केला.
शिवसेनाप्रमुखांचे नाव घेऊन दोन्ही पक्षांनी मते मागितली.

उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांना मिळालेला धारावी पुनर्विकास प्रकल्प हा प्रचारात धारदार मुद्दा होता. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी धारावी प्रकल्पाचा उल्लेख करून अदानी व भाजपा यांचे कसे साटेलोटे आहेत याचा जप केला. राहुल गांधींनी तर अदानी व मोदींचे एकमेकांना नमस्कार करतानाचे फोटोही दाखवले. खरे तर लहान-मोठे उद्योगपती व उद्योजक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटत असतात.

नेतेही त्यांच्याशी चांगले संबंध ठेऊन असतात मग निवडूक प्रचारात अदानींना टार्गेट करणे हे कितपत योग्य आहे? स्वत: अजित पवार यांनी २०१९ मध्ये राज्यात भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस असे सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत अदानींच्या निवासस्थानी अमित शहांच्या उपस्थितीत बैठक झाल्याचा गौप्यस्फोट एका मुलाखतीत केला.

अमित शहा व शरद पवार यांची नावे त्यांनी घेतल्याने दुसऱ्याच दिवशी घुमजाव करण्याची पाळी त्यांच्यावर आली. आपण सत्तेवर आल्यानंतर अदानींना मिळालेले धारावीचे कंत्राट रद्द करू असे ठाकरे यांनी अनेक जाहीर सभांमधून सांगितले आहे. महाआघाडी सत्तेवर आल्यास सूडबुद्धीने सरकार चालवणार का? अजितदादांवर भाजपने आणि स्वत: पंतप्रधानांनी ७० हजार कोटी सिंचन घोटाळा झाल्याचे आरोप केले, त्यांना जेलमध्ये टाकू असे २०१९ मध्ये भाजपा नेते सांगत होते, मग हा आरोप खोटा होता का, अजितदादा स्वच्छ झाले का, याचे उत्तर भाजपने कधी दिले नाही. गेल्या दोन वर्षांत शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे मिळून ८० आमदार फुटले. पक्षांतर बंदीचा कायदा असूनही त्यांची फूट कायदेशीर ठरवली गेली व बंडखोरांच्या गटांना निवडणूक आयोगाने मान्यता दिली. महाराष्ट्रात पक्षांतर बंदीचा कायदा गुंडाळून ठेवलाय का? सर्वोच्च न्यायालयात ही तारीख पे तारीख चालू आहे.

गेल्या पाच वर्षांत राज्यात राजकारणाचा चिखल झाला त्याला जबाबदार कोण, त्याची शिक्षा कोणाला, कोणाला निवडून दिले व ते नंतर कुठे गेले हे मतदारांना समजत नाही का? दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांत फूट पडल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रथमच मतदान होत आहे. ५ वर्षांत जे मतदारांनी अनुभवले त्याचा मतदान करताना ते निश्चितच विचार करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरले. मेट्रो, बुलेट ट्रेन, जलशिवार, समृद्धी मार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, हे सर्व मोठे प्रकल्प ठाकरे सरकारने रोखले होते, त्यांना आपण गती दिली असा त्यांनी दावा केलाय. पालघर हत्याकांडाची चौकशी ठाकरे सरकारने थांबवली, कोविडच्या नावाखाली धार्मिक सणांवर ठाकरे सरकारच्या काळात निर्बंध लादले गेले, महापालिकेत मोठा खिचडी घोटाळा त्यांच्या काळातच झाला. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात न जाता फेसबुक लाईव्ह करीत बसले.

अशा आरोपांचा भडीमार त्यांनी ठाकरेंवर केला. त्याला प्रत्युत्तरही महाआघाडीने दिलाच. हिट अॅण्ड रनमध्ये देशात महाराष्ट्र दुसरा आहे. लाडक्या मित्राला शिंदे सरकारने (धारावी) २ लाख कोटींची भेट दिली, गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार, वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअर बस, आंतरराष्ट्रीय वित्तिय केंद्र, हिरा उद्योग, असे साडेसात लाख कोटी गुंतवणुकीचे व ५ लाख रोजगार देणारे महाराष्ट्रातील प्रकल्प मोदी सरकारने दुसऱ्या राज्यात पळवले.

अडीच वर्षांत राज्यात २४ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. अशा आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्र गेले महिनाभर ढवळून निघाला. विधानसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा कोणी आणला नाही, पण ३७० वे कलम आपण कसे रद्द केले असे मोदी-शहांनी ठासून सांगितले. वाढते नागरीकरण, वाढती लोकसंख्या, नागरी सुविधांवर पडणारा ताण, परप्रांतीयांचे लोंढे, वाढलेले विजेचे दर, अपुरा पाणीपुरवठा, शेतकरी आत्महत्या, हमी भाव मिळत नसल्याने असलेले शेतकरी असंतोष, शहरातील वाहतुकीची कोंडी, शाळा प्रवेशांची डोकेदुखी, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, उपनगरी गाड्यांतील अफाट गर्दी, बेकायदा बांधकामे, घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती, सतत वाढणारी झोपडपट्टी, महागाई व सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर प्रचारात चर्चा झाली नाही.

बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, गद्दारांना पाडा, राहुल गांधी फेक है, आधी मनसे आता गुनसे, लढणारा महाराष्ट्र होऊ, घरात बसणारा नाही अशा मुद्द्यांभोवती निवडणूक फिरत राहिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर काटोल येथे झालेला हल्ला व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे त्यांना विरोधी पक्षाने नालासोपारा येथे घातलेला घेराव अशा घटना महाराष्ट्राला भूषणावह नाहीत. अमित शहांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीचे १६० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असे भाकीत वर्तवले आहे. लोकसभा निवडणुकीला तर भाजपाची अब की बार ४०० पार अशी घोषणा होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, मला मत म्हणजे भाजपाला नव्हे, महायुतीला मत. महाराष्ट्रातील महायुद्ध कोण जिंकणार, कोणाचे सरकार स्थापन होणार याची सर्व देशाला उत्सुकता आहे. आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही असे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोघांनीही जाहीर केले आहे. त्यामुळे निकालानंतर पुढे काय होणार याचे गूढ वाढले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading