महाराष्ट्रात शाहू महाराजांमुळेच लोककल्याणकारी राज्याची प्रस्थापना: डॉ. भालचंद्र मुणगेकर
पुरोगामी विचारांवर हल्ले होत असताना त्यांचा आक्रमक विचारांनी प्रतिरोध केला जाणे गरजेचे आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे चक्र पूर्ण होऊन नव्याने पुरोगामी विचारपरंपरा प्रस्थापित होणे आवश्यक आहे.
– श्रीमंत शाहू छत्रपती महाराज
कोल्हापूर: महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची प्रस्थापना करणारे राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि राजर्षी शाहू संशोधन केंद्र यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ते बोलत होते. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते.
‘राजर्षी शाहूंचे अर्थकारण आणि त्याची विद्यमान प्रासंगिकता’ या विषयाच्या अनुषंगाने बीजभाषण करताना डॉ. मुणगेकर म्हणाले, शाहू महाराजांनी सर्व समाजघटकांचा साकल्याने विचार केला. सामाजिक समावेशनाची प्रक्रिया जेव्हा चर्चाविश्वातही नव्हती, त्या काळात वंचित, शोषित घटकांच्या समावेशी वृद्धीचा त्यांनी कृतीशील विचार केला. मिळकतीच्या स्रोतांचे व्यवस्थापन आणि प्राप्त मिळकतीचे समान आणि एकाच वेळी वाटप, याचा विचार म्हणजे राजकीय अर्थकारण. झिरपणीच्या सिद्धांतास शाहू महाराज नक्कीच अनुकूल नव्हते. त्यांनी राजकीय अर्थकारणाच्या आधारेच लोककल्याणाची अनेकविध कामे मार्गी लावली. त्यातून शेतकरी, कष्टकरी, शोषित, वंचित, दलित अशा समग्र घटकांना सामाजिक न्याय प्रदान केला. भांडवलशाहीतील आर्थिक केंद्रीकरणाला विरोध करणारे त्या काळातील देशामधील एकमेव संस्थानिक म्हणजे शाहू महाराज होते. त्यांचा भर विकेंद्रीकरणावर होता. अवघ्या नऊ लाख लोकसंख्येच्या संस्थानामध्ये भांडवलशाहीला त्यांनी विरोध केलाच, पण सर्व प्रकारच्या मर्यादा तोडून महाराजांनी त्यांचे कार्य उभारले. त्या अर्थाने ते एक कृतीशील विचारवंत होते.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांत एक समान सूत्र असल्याचे सांगून डॉ. मुणगेकर म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकरी, दलित, शूद्रातिशूद्र यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठविला. जमीनदारी प्रवृत्तीवर, कुळकर्ण्यांवर घणाघात केला. डॉ. आंबेडकर यांनी भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे देशाचे शत्रू असल्याचे सांगितले. या दोघांनी विषमतेच्या झळा सोसलेल्या होत्या. शाहू महाराजांनी प्रत्यक्ष वेदना सोसल्या नसल्या तरी त्यांच्या संवेदनशील मनाने त्या टिपल्या होत्या आणि त्याविरुद्ध कृतीसाठी ते प्रतिबद्ध होते. मानवी भांडवलामध्ये गुंतवणूक केल्याखेरीज तरणोपाय नाही, हे शाहू महाराजांना समजले होते. म्हणूनच १९१७ साली त्यांनी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. शाहूंच्या कारकीर्दीच मानवी भांडवलात गुंतवणुकीची अशी अनेक उदाहरणे दिसतील. त्यामुळे सर्वंकष मानवी विकासासाठी ते आग्रही असल्याचे दिसते.
आज उच्चभ्रू, उच्चवर्गीय व उच्चवर्णीय महिला फुले, शाहू, आंबेडकरांचे ऋण मानत नाहीत, हा एक मोठाच पेच आहे. हा पेच सोडविणे, हे आज आपल्यासमोरचे आव्हान आहे. आज आपण खूप सुरक्षित राहू लागलो आहोत. धोका पत्करल्याखेरीज कोणतेही सामाजिक प्रबोधन करता येणार नाही. तथापि, झालेच तर ते खूपच तकलादू स्वरुपाचे असेल, असा इशाराही डॉ. मुणगेकर यांनी दिला.
मानवी भांडवलामध्ये गुंतवणूक करण्याचा एक महत्त्वाचा धडा राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला दिला आहे. त्या मार्गावरुन चालण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामध्ये शिक्षण, आरोग्य सुविधा आदी बाबींचा समावेश असायला हवा. अशा प्रत्येक क्षेत्रातील शाहू महाराजांच्या योगदानाचा विचार ज्या त्या विभागाने केला, तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वावर नव्याने प्रकाश टाकला जाईल.
– डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. जयसिंगराव पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. अवनीश पाटील यांनी आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.