April 15, 2024
Vipashana meditation for mental health article by rajendra ghorpade
Home » मानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त
विश्वाचे आर्त

मानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त

असे म्हणतात की अनुभवाशिवाय बोलू नये. हे तितकेच खरे आहे. यासाठीच श्री. एस. एन. गोयंका यांच्या मार्गदर्शनात संचलित विपश्यनेच्या दहा दिवसांच्या आळते येथील शिबीरमध्ये मी सहभागी झालो. यामध्ये मला अनेक अनुभव आले. विशेषतः मानसिक आरोग्याच्या दृष्टिने विपश्यना निश्चितच फायदेशीर आहे. मज्जासंस्थेची कार्यक्षमता सुधारते हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. या कार्यशाळेत आलेल्या अनुभवावर आधारित हा लेखप्रपंच…

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

काय झाडी, काय डोंगर आणि पक्षांचा किलबिलाट अशा या निसर्गरम्य वातावरणात गेल्यावर मन प्रसन्न होते. आळते येथील विपश्यना केंद्राचा परिसर असाच निसर्गरम्य आहे. या परिसराचे सौंदर्य पाहूनच शहरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनाने आलेला थकवा दूर होतो. दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरासाठी आदल्यादिवशी मी आळते येथील केंद्रात हजर झालो. त्याच दिवशी धो धो पाऊस कोसळत होता. डोंगर, झाडीत असणारे हे केंद्र टेकलेल्या ढगांत लुप्त होऊन गेले होते. पावसाळी वातावरणाने ओला चिंब झालेला हिरवागार परिसर डोळांना वेगळाच गारवा देत होता. दहा दिवस साधना कशी करणार ही लागून राहीलेली चिंता प्रवेशाच्या दिवशीच असणाऱ्या या आल्हादायक वातावरणाने दूर निघून गेली. कारण हे आपणास जमणार का ? मोबाईलची रिंग वाचली नाही तरी कासाविस होणारा जीव, सकाळी उठल्या उठल्या दारावर पडलेला पेपर वाचायला नाही मिळाला तर होणारी अस्वस्थता अशा अनेक बेचैन करणाऱ्या दररोजच्या घटनांपासून दूर एकांतात आपण जातो आहोत. तेथे गप्प बसणे, न बोलता राहाणे जमणार नाही. एक-दोन दिवस बरे वाटेल पण नंतर कंटाळा येईल असेच काहीसे वाटत होते. पण या प्रसन्न वातावरणाने आणि मोरासह विविध पक्षांच्या मधुर आवाजाने दहा दिवस कसे गेले हेच समजले नाही.

विपश्यना काय आहे याची उत्सुकता होती. साधनेची ही पद्धती जाणून घेण्याची इच्छा होती. यासाठीच मन इकडे ओढले गेले होते. दहा दिवस मौन व्रतात राहायचे तितके सोपे नाही. दैनंदिन जीवनात आपण तसे करूही शकत नाही. आजचे मोबाईलचे जग आणि मौन व्रत. मन सतत कोणत्याना कोणत्या विचारात सातत्याने गुरफटत राहाते. मनाची स्थिरताच धकाधकीच्या जीवनाने लुप्त झाली आहे. अशावेळी शांत कोठे तरी जावे. निवांतपणा मिळावा हा उद्देश होताच. विरंगुळा म्हणून, बदल म्हणूनही याकडे पाहीले गेले. पण अध्यात्म हे काही बदल म्हणून स्विकारायचे नसते. हे सुद्धा मनात होते. मुळ आव्हान होते हे कीआपणास जमणार का ? जमले तर याचे फायदे निश्चितच आहेत हे सुद्धा विचार मनात घोळत होते. मनाला थोडी विश्रांती मिळावी या उद्देशाने या शिबिरात गेलो अन् अनेक अनुभव घेऊन, खूप काही शिकून आनंदी होऊन बाहेर पडलो.

आनंदाने मनाचे आरोग्य सुधारते. पण आनंद अनेक प्रकारचा असतो. कशातून आनंद होतो याला महत्त्व आहे. शेजाऱ्याचे वाईट झाले म्हणून सुद्धा आपणाला आनंद होतो. हा आनंद आपणला सुख देतो. पण हा खरा आनंद आहे का ? सात्विक आनंद आहे का ? मनाला सदैव आनंद मिळाला तर मनाचे आरोग्य निश्चितच सुधारते. पण आनंद कशातून मिळायला हवा. याचा विचार करायला हवा. साधनेतून मिळणारा आनंद हा सात्विक असतो. हा आनंद सदैव आपल्यातील सात्विक वृत्ती वृद्धींगत करतो. यामुळे साधनेतील आनंद हा आरोग्यासाठी लाभदायक असतो. विपश्यनामध्ये असाच सात्विक आनंद सातत्याने मिळतो. साधनेतील हा आनंद मानसिक आरोग्यासाठी गरजेचा आहे. यासाठी विपश्यना शिबिर करण्याची खरी गरज आहे. दहा दिवसांच्या कालावधीमध्ये केलेल्या साधनेतून मिळालेली उर्जा वर्षभर पुरेल. असा हा मिळालेला आनंद आपल्या दैनंदिन जीवनात लाभदायक ठरतो. हा आनंद सदैव राहावा यासाठी विपश्यना साधना कशी गरजेची आहे याची अनुभूती यातून येते.

मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी, मानसिक आरोग्य सुधारावे यासाठी विपश्यना केंद्रात एकदा तरी जरूर जावे. मनाला व्यत्यय देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा येथे काळजी कशी घेतली जाते. यातून मनामध्ये होणारा बदल दैनंदिन जीवनात आणण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच आपले जीवन आनंदमय होईल. आनंदी मनाने आरोग्य सुधारते. हा अनुभव या शिबिरात निश्चितच आपणाला येतो. कोणाकडे पाहायचेही नाही ? नजर खाली ठेवून चालायचे. यातून मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यायची असते. दहा दिवसांच्या कालावधीत मनाची एकाग्रता साधायची असते. येथे असणारे धम्मसेवकही किती नम्रपणे वागतात हे पाहून आपल्यातीलही नम्रपणा जागा होतो. त्यांची नम्रता आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न आपण केल्यास निश्चितच आपले जीवन सुखी होईल. मंगल होईल.

दहा दिवस साधनेत रमायचे असते. यातून आपणाला होणारा त्रास आनंदाने स्वीकारायचा असतो. त्या त्रासात आपण गुंतायचे नसते. मन त्यातून पुढे नेत राहायचे असते. म्हणजेच जीवनात येणाऱ्या अडीअडचणीत आपण गुंतायचे नसते. मन त्यात गुंतवून त्रास करून घ्यायचा नाही. साधनेतील ही सवय आपल्या दैनंदिन जीवनात निश्चितच लाभदायक अशी ठरणारी आहे. अध्यात्मिक विकासातील बदल आपल्या जीवनातही बदल घडवतो. आपले जीवन मंगलमय करतो. हे प्रत्यक्ष आपण विपश्यनातून अनुभवायचे असते. कोणताही बदल हा पटकण होत नसतो. त्याला कालावधी हा लागतो, पण सकारात्मक विचाराने हा बदल घडवायचा दृढनिश्चय करायचा असतो. तशी मनाची तयारी करायची असते.

Vipashana meditation for mental health article by rajendra ghorpade
Vipashana meditation for mental health article by rajendra ghorpade

दहा दिवसांच्या साधनेत पित्त जळते. मौनामुळे मनामध्ये एक वेगळीच शांती उत्पन्न होते. मन प्रसन्न होते. मंगलमय विचारांमुळे शरीरातील नाड्या, रक्त वाहिन्यातून शुद्ध विचाराचा प्रवाह सुरु होतो. यातून मज्जासंस्थेची कार्यक्षमता सुधारते. शरीरातील सर्व प्रवाहाची कार्यक्षमता उत्तेजित होते. यातून मनाची स्थिती बळकट होते. चेहऱ्यावरील तजेलपणा वाढतो. आरोग्याच्यादृष्टीने हे बदल निश्चितच उपयुक्त असे आहेत. मेंदुची, बुद्धीची कार्यक्षमता सुधारल्याचाही परिणाम पाहायला मिळतो. हे बदल अनुभवल्यानंतर पुन्हा याकडे ओढा कायम राहातो. अनुभवातूनच खरी अध्यात्मिक प्रगती होत असते. यासाठी पुन्हा पुन्हा ही साधना समजून घेत जीवनात कार्यरत राहील्यास सर्व जीवनच मंगलमय होईल.

Related posts

कोल्हापुरात २०-२१ जानेवारीला जनवादी साहित्य संमेलन

मनानेंच मागे हटवा मनातील विषय

ज्ञानेश्वरीसह गीता तत्त्वज्ञान नित्य नुतन

Leave a Comment