देह आणि आत्मा वेगळा आहे. हा अनुभव ज्याला आला तो खरा ज्ञानी. आत्मा हा अमर आहे. नित्य, अविनाशी आहे हे जो जाणतो, तो खरा ज्ञानी. आत्म्याचे येणे आणि जाणे हे जो जाणतो तो खरा ज्ञानी.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे ।
तें तया दिसे । ज्ञानास्तव ।।६१५।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – तरी परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवास येते.
अध्यात्म ज्ञान हे नित्य आहे. बाकीची जी ज्ञाने आहेत, ते सर्व अज्ञान आहे. आत्मा हा अमर आहे. हे जाणणे हेच खरे ज्ञान आहे. आत्मा कायमस्वरूपी आहे. तोकधीही नष्ट होत नाही. नष्ट केला जाऊ शकत नाही. हा नित्य अनुभव ज्याला असतो. तो खरा आत्मज्ञानी. संसारात अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असतात. त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो, पण आत्मज्ञानी व्यक्ती या प्रश्नांनी व्यथित होत नाही. संसारातील सुखाने ती व्यक्ती कधीही हुरळून जात नाही किंवा दुःखाने कधीही निराश होत नाही. इतकी स्थिरता त्याच्या मनामध्ये असते.
प्रत्येकाच्या जीवनात चढउतार हे येतच असतात. या सर्वांपासून जो विचलित होत नाही, तो खरा ज्ञानी. आत्मा आणि देह हे वेगवेगळे आहेत. आत्मा हा देहात आला आहे, पण तो देहापासून मुक्त आहे. देह नाशवंत आहे. आत्मा हा अविनाशी आहे. आत्मज्ञान प्राप्तीनंतरच आत्मा तृप्त होतो. तोपर्यंत त्याची धडपड सुरू असते. देहात येणे आणि जाणे हे चक्र सुरू असते. जन्म-मृत्यूच्या या चक्रात तो अडकलेला असतो.
आत्मज्ञान प्राप्तीनंतर त्याला या चक्रातून मुक्ती मिळते. देह आणि आत्मा वेगळा आहे. हा अनुभव ज्याला आला तो खरा ज्ञानी. आत्मा हा अमर आहे. नित्य, अविनाशी आहे हे जो जाणतो, तो खरा ज्ञानी. आत्म्याचे येणे आणि जाणे हे जो जाणतो तो खरा ज्ञानी. या ज्ञानाच्या अनुभवासाठी जो धडपडतो तो खरा ज्ञानी. सद्गुरू कृपेने, भक्तीने जो हे ज्ञान हस्तगत करतो तो आत्मज्ञानी. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म-मरण नाही. म्हणूनच संतांची समाधी ही संजीवन आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.