March 30, 2023
Mandakini Patil Poetry Book Review by sangeeta arbune
Home » समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणाऱ्या कविता
मुक्त संवाद

समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणाऱ्या कविता

स्वचा शोध घेतानाच ही कविता मानवी जगण्यातली जटिलता, अटळता, भयग्रस्तता, परिस्थिती शरणता त्याबरोबरच परस्पर संबंधातील साचलेपण, रुतलेपण, त्यातली व्याकुळता, अधोरेखित करत जाते… आणि अंतिमतः ती समूहमनाची होऊन जाते.

संगीता अरबुने

समकालीन कवितेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांनी वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या मंदाकिनी पाटील यांच्या ‘आत्मपीठ’ या संग्रहातील कविता म्हणजे त्यांच्या संवेदनशील मनाचा चिंतनशील, आणि बुद्धीनिष्ठ आविष्कार आहे. प्रखर असा आत्मिक हंकार आहे. यातील कविता जितकी आस्तित्व भानाची आहे तितकीच ती समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणारी आहे.

या कवितेचा आंतरिकतेशी जेवढा घट्ट अनुबंध आहे तेवढीच ती भवतालाशी एकरूप होताना दिसते. त्यातली घाई गडबड, काळाचं सुसाटनं दिवसरात्रीचं हुंकारणं, ऋतूंचं हेलकावणं हे सगळंच ती मानवीय पातळीवर विलक्षण संवेदनशीलतेने समजून घेते. आणि आपल्या विचक्षण प्रतिभेने त्याला एका उंचीवर घेऊन जाते.

स्वचा शोध घेतानाच ही कविता मानवी जगण्यातली जटिलता, अटळता, भयग्रस्तता, परिस्थिती शरणता त्याबरोबरच परस्पर संबंधातील साचलेपण, रुतलेपण, त्यातली व्याकुळता, अधोरेखित करत जाते… आणि अंतिमतः ती समूहमनाची होऊन जाते. त्यातली धारदार शब्दकळा, प्रतिमा प्रतीकांचं वेगळेपण, तितकंच नेमकेपण याबरोबरच कवयित्रीची प्रगल्भ अशी जीवनजाणीव यामुळे या कवितांमधील आशयाचा पोत अधिक अधिक घट्ट होताना दिसतो. त्याचे अंतस्तर उलगडताना एकीकडे आपण भोवंडून जातो तर दुसरीकडे त्यातल्या अनुभुतीशी आणि अभिव्यक्तीशी आपण आतून जोडले जातो. हेच या संग्रहाचं यश म्हटलं पाहिजे.

पुस्तकाचे नाव – आत्मपीठ
कवयित्री – मंदाकिनी पाटील
प्रकाशन – शब्दालय प्रकाशन

मंदाकिनी पाटील यांच्या आत्मपीठमधील एक कविता...

कदंबा

 तू रूजलास ती जमीन तशी खडबडीतच
पण मोठ्या तोलामोलानं जपलं तिनं तुझं वृक्षपण
तू वाढत राहिलास फांद्यांच्या पिसाऱ्यात
अवकाशाच्या रेषा जुळवीत
 आणि इकडे......

तुझ्या पानापानांतून लगडत राहिले
नाजूक वर्तुळांचे देखणे सुमनसोहळे
त्यांच्या सुगंधी सुमधुरतेवर
भारद्वाजाचेही मन जडले
पण तू स्थितप्रज्ञ
माथ्यावर घेत आभाळाचे डोहकडे
तू  साधा सरळसोट !

अस्वस्थेचे पोपडे फेडत फेडत
आपोआपच झळाळून उठलेलं तुझं खोड
कृष्णस्पर्श भिनलेलं तुझं प्रगल्भ दर्शन
भक्कम करतं मला
कितीही झाली जरी मनाची मोडतोड
तुझं माझ्या अंगणात असणं
आश्वासक करत जातं मला माझं जगणं

जेव्हा तुझ्या लांबचलांब फांद्या
फिरतात माझ्या घराच्या छतावरनं
कनवाळू बापानं फिरवावा हात
जसा मुलीच्या माथ्यावरनं
शांतरसाचा परिपोष अनुभवत जातं मन
तुझं हे

माझ्यासह घरादाराला वेढून उरलेलं अस्तित्व सघन
संजीव आहे तुझ्यात माझ्या बापाचं बापपण
 बा कदंबाS असाच सळसळत राहा तू !
तुझ्या या मुलीच्या जीवाचं तुला लिंबलोण

 मंदाकिनी पाटील, बदलापूर

Related posts

कोरोना काळातील मार्गदर्शक कथा…

Saloni Art : असे रेखाटा खरेखुरे नयन

वसंतोत्सव

Leave a Comment