सभोवतालच्या संघर्षमय जगण्यातून आणि त्यांच्या आलेल्या अनुभवातून जन्माला आलेल्या लक्ष्मण दिवटे यांच्या कथा आहेत. एकंदरीत दिवटे यांच्या या कथासंग्रहातील कथांना वास्तवदर्शी अनुभवांचा आधार असल्याचे जाणवते. त्यामुळेच सभोवतालच्या संघर्षातील बारीक सारीक गोष्टी टिपणारा एक चांगला कथासंग्रह म्हणून उसवण या कथासंग्रहाचा उल्लेख करावा लागतो.
अंबादास केदार
मु. पो. देऊळवाडी, ता. उदगीर, जि. लातूर मोबाईल – 9604354856
मराठी साहित्यात तसे पाहिले तर कथा वाङ्मय प्रकाराला फार महत्वाचे स्थान आहे .स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतांशी लोक लिहिण्यावाचण्याच्या प्रांतात आलेले नव्हते. हरिभाऊ आपटे आणि श्री. म. माटे अशा काही मोजक्या कथाकरांचा अपवाद वगळता सामान्य माणूस पुढे आलेला नव्हता. परंतु 1945 पासून नवकतेचा बहर सुरू झाला. गंगाधर गाडगीळ, पु.भा. भावे ,अरविंद गोखले आणि व्यंकटेश माडगूळकर या कथाकारांनी खऱ्या अर्थाने नवकथा समृद्ध केली. नंतरच्या काळात शिक्षणाचा प्रसार वाढत गेला. त्यामुळे नवा वाचक आणि नवा लेखक साहित्याच्या प्रांतात प्रवेशित होऊ लागला.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ग्रामीण कथेची निर्मिती होत असली तरी साठोत्तर काळापासून मात्र ती दृष्टी बदलली आणि मराठी कथेचा चहूबाजूनी विकास होऊ लागला. विशेषतः दलित, ग्रामीण, स्त्रिया यांचे प्रतिबिंब त्यात उमटू लागले. सामाजिक जाणिवेच्या कथा प्रामुख्याने पुढे येऊ लागल्या. शिक्षणाचा प्रसार, समाजात झालेली जागृती ,आत्मभान यामुळे नवनवे घटक साहित्य प्रवाहात येऊ लागले. ग्रामीण कथा ही ग्रामीण माणसाचा, समाजाचा, बदलत्या जीवनाचा शोध घेऊ लागली आणि त्या ग्रामीण कथेत गाव बदलाच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या समस्या, कुटुंबाचे विभक्तीकरण, मानवी नात्यातील गुंतागुंत, बलूतेदार ,शेतकरी -शेतमजूर यांच्या जीवनात आलेले प्रश्न, सावकारी, सहकार, शिक्षण घेणारे तरुण, विविध संस्थांनी केलेले हस्तक्षेप, अशा अनेक बाबींच्या अनुषंगाने येणारे चित्रण समांतरपणे येत गेल्याचे दिसू लागले .
शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, उद्धव शेळके, द .म. मिरासदार यांची जुनी पिढी मागे जाऊन चि. त्रा. खानोलकर, विजया राजाध्यक्ष ,श्री. दा. पानवलकर, दिलीप चित्रे, कमल देसाई, जी. ए. कुलकर्णी, आनंद यादव, रा. रं. बोराडे, दत्ता भोसले, भास्कर चंदनशिव, चारुता सागर, महादेव मोरे, बाबाराव मुसळे, योगीराज वाघमारे, चंद्रकुमार नलगे अशा नव्या लेखकांची फळी समोर आली. आपल्या कथामधून त्यांनी बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव समोर आणले. सत्तरच्या दशकानंतर मात्र ग्रामीण जीवनात झपाट्याने परिवर्तन झाले. ग्रामीण माणसांच्या व्यथावेदना शब्दबध करणारी गंभीर कथा लिहली जाऊ लागली.
1990 नंतर खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आले आणि त्यातून माणूस आर्थिक लाभाकडे वळू लागला. त्यासोबत नवे लेखक नव्या जाणिवासह सामील झाले. नवे नवे प्रश्न घेऊन ते समोर आले. भास्कर चंदनशिव, बाबाराव मुसळे, जगदीश कदम, श्रीराम गुंदेकर, शिवाजी मरगीळ, सदानंद देशमुख याशिवाय भास्कर बडे, विलास सिंदगीकर इत्यादी कथाकारांनी ग्रामीण जीवनाच्या जीवन जाणिवा आपल्या कथेतून प्रगट केल्या.
खऱ्या अर्थाने कोणतीही साहित्यकृतीही त्या त्या काळाची अपत्ये असते. ती काळाच्या मुशीतून जन्मलेली असते. कोणतीही साहित्यकृती याला अपवाद असण्याचे कारण नाही. याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण दिवटे यांच्या “उसवण “कथासंग्रहाचा विचार करावा लागेल. लक्ष्मण दिवटे हे या नवशिक्षित पिढीतील नवे कथाकार आहेत. त्यांचा हा “उसवण “पहिलाच कथासंग्रह आहे . या कथासंग्रहात एकूण 17 कथा समाविष्ट केलेल्या आहेत. या त्यांच्या कथा ग्रामीण पर्यावरणाबरोबरच शेतीमातीशी नाळ जोडणाऱ्या कथा आहेत. स्वतः लक्ष्मण दिवटे हे ग्रामीण भागात जन्मले, वाढले, आजही ते ग्रामीण भागातच राहतात. ते व्यवसायाने प्राथमिक शिक्षक आहेत. लेखक सुद्धा एक समाजाचा संवेदनशील घटकच असतो. म्हणून समाजात राहत असताना त्यांच्या अंतहृदयाला जे अस्वस्थ करीत असते त्यांनाच ते शब्दबद्ध करण्याची धडपड करतात. लक्ष्मण दिवटे हे ग्रामीण भागात राहत असल्यामुळे ग्रामीण भागातील घडणाऱ्या घटना, प्रसंग, त्या परिसरातील भांडणे, शेतीच्या वाटण्या, उपासमार, संघर्ष, ओढाताण, या सर्व प्रश्नांची जाण त्यांना आहे. मराठवाड्यातील जीवनाशी समरस होऊन लक्ष्मण दिवटे यांनी स्वतः अनुभवलेल्या जीवनातील कटू प्रसंगातून कथा लिहिण्याचा घेतलेला ध्यास हा वाचकाच्या मनाला जाऊन भिडणाराच आहे.
आजचे ग्रामीण जीवन हे बेभरवशाचे झाले आहे. त्यात लहरी पाऊस , शेतकऱ्यांना धान्याला मिळणारी मातीमोल किंमत, भ्रष्ट शासनाकडून होणारी पिळवणूक, उदासीनता ,गटागटात विभागलेली माणसे ,अंधश्रद्धेची लागलेली कीड, एकत्र कुटुंबाला जात असलेले तडे, यामुळे ग्रामीण जीवन अस्थिर झाले आहे .या अस्थिर झालेल्या व्यवस्थे कडे बघून हा लेखकही अस्वस्थ होताना दिसतो.” उसवण” या त्यांच्या कथासंग्रहातील काही कथा अस्वस्थ करणाऱ्या आहेत.
ग्रामीण जीवनाचा पट समर्थपणे उलगडणारा “उसवण” हा कथासंग्रह. शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न, निसर्गापुढे असाहाय्य ठरलेला माणूस ,शेतकऱ्यांची होणारी दमकुंडी आणि शोषणाबरोबरच वाट्याला आलेला संघर्ष, काबाडकष्ट करूनही कांद्याला भाव मिळत नाही या निराशा पोटी जीवन जगणारा दत्तू ‘ठिगळ ‘या कथेतून त्यांनी चितारलेला आहे. तर ‘गोधडी ‘या कथेत दिवटे यांनी एक दुःखाची करून कहाणीच उभी केली आहे. आज माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. जवळची नाती सुद्धा दूर होत आहेत. खऱ्या अर्थाने ‘गोधडी’ ही आई-वडिलांच्या कष्टमय आयुष्याचे प्रेममय प्रतीकच असते. जिव्हाळ्याच्या आठवणी गोधडीत सामावलेले असतात. एवढेच नव्हे तर प्रेमालाही प्रेम देणारी खरी उबदार माया त्यात असते. परंतु ही उबदार माया विसरून गणेश मुंबईला आपल्या बायकोसह राहायला जातो. आणि तुकाराम बाबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्याला क्षय रोगाने ग्रासले जाते आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. तुकाराम बाबाच्या खडतर आयुष्याचे चित्रण करणारी कथा आहे .
या कथासंग्रहातील” आस्वाचा पूर” ही कथा वेगळ्या वळणावरची कथा आहे. रोहिणी आणि तिचा नवरा पावसाच्या पुरात वाहून जातात. पुरामुळे त्यांचा बळी जातो. ही कथा वेगळ्या वळणाची असली तरी मनाला अधिकच हळवी करून जाते. पोळ्याच्या सणासाठी भाड्याने बैल आणून इरस पूर्ण करणाऱ्या इसणूचा बेगडीपणा उघडा पडतो .चहूबाजूनी निराशेच्या गर्तेत तो सापडतो .विहिरीत पडून बळी ठरणाऱ्या बैलाचे चित्रण करणारी” बेगड” ही कथा.
लक्ष्मण दिवटे प्राधान्याने ग्रामीण भागातील पिचलेल्या, कष्टकरी ,पराभूत झालेल्या माणसांचे चित्रण करताना दिसतात. 21 व्या शतकात माणसे विज्ञान वादाचा मुखवटा घेऊन वावरत असताना सुद्धा आजही ग्रामीण भागात अंधश्रद्धा मानणारी मनोवृत्ती दिसून येते.अशीच त्यांची अंधश्रद्धेवर प्रहार करणारी ‘खीळ ‘ही कथा. मूल होत नाही म्हणून लक्ष्मीआईला नवस केला जातो. आणि मरीबाला पोतराज करून सोडले जाते. मरीबाच्या अंगात वारं शिरत नाही. केलेला खर्च वाया जातो .कर्जाचा डोंगर दलबाच्या अंगावर उभा राहतो. दलबाच चाती फिरावं तसं मन फिरायला लागतं. शेवटी मरीबाच आपल्या बापाला म्हणतो ,”बापू हे सारं ढोंग अस्तया” अंगात वार येत नस्तंया. म्या कुणाचं ऐकणार नाही. मला शिकायचं आहे.” बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेला मरीबा केस कापून शाळेत जायला लागतो. परंपरा आणि परिवर्तनाचे सर्व सूक्ष्म संदर्भ टिपणारी खीळ ही कथा वाचणीय वाटते. अंधश्रद्धेला खीळ बसणारी आणि परिवर्तनवादी विचार मांडणारी कथा मोठ्या ताकदीने लेखकांनी उभी केली आहे.
सुगीचे दिवस चालू असतानाच ऊस तोडणीचे काम सुरू होते. ऊस तोडणी कामगार ऊस तोडणी साठी तयार होतात. मुकादमाचाही धंदा जोरात चालू होतो. धंदा जोरात चालू असताना वासनेच्या आहारी जाऊन मोहनराव चंपाच्या नादी लागतो. तो तिच्या प्रेमात पडतो. एवढेच नाही तर तिच्यासाठी एक महालही बांधून देतो. सुखानं चालत असलेला मोहनरावाचा संसार चंपाच्या नादी लागल्यामुळे उध्वस्त होतो. याचं चित्रण ‘रुतलेला काटा ‘या कथेत आले आहे .लेखकांनी वाचण्याच्या आहारी गेलेल्या मनोवृत्तीचे चित्र तर केले आहेत पण त्याचबरोबर माणसांच्या भावभावनांचे चित्रणही सूक्ष्म रीतीने केले आहे.
भारतीय कुटुंब व्यवस्था डबघाईला आली आहे. यात स्त्रियांच्या वाट्याला आलेलं जगणं, त्यांची स्थिती आणि दैन्यावस्था दारिद्र्याने गारठून गेलेल्या जीवाला किमान मुलाच्या रूपाने तरी उब मिळावी ही माफक अपेक्षा असते. परंतु ही अशा सुद्धा कुसाकाकूच्या जीवनात फोल् ठरते. याचे हृदयद्रावक चित्रण लक्ष्मण दिवटे यांनी ‘आईचं घर ‘या कथेतून मांडले आहे. हाडाचं काडं करून कुसाकाकू आपल्या मुलांना लहानाचं मोठं करते. त्यांना शिकविते, त्यांचे लग्न करून देते. घरी सुना येताच तिच्या घरात खटके उडायला लागतात .पोटची मुलंही तिला दूर करतात. काठीचा आधार घेत ती आपलं जीवन जगते. दोन मुलं असूनही म्हातारपणी तिची आभाळ होते. एका अभागी कुटुंबातील स्त्रीची शोकांतिका लेखकाने ‘आईचे घर ‘या कथेत मांडलेली दिसते .
खेड्यातील स्त्री ही कमालीची शोषित असते. अनेक बंधने तिच्यावर लादली जातात .व काही बंधने तिने स्वतःने निर्माण केलेली असतात. नवऱ्याचा मार सहन करणे, उपासतापास करणे, वृत्तवैकल्य करणे, मुलासाठी नवस करणे, अशा अनेक गोष्टीला तिला सामोरे जावे लागते. खरे तर प्राचीन काळापासूनच स्त्रियांना समाजात दुय्यम वागणूक देण्यात येते. स्त्रीयांच्या जन्मा आधीच गर्भातच तिची हत्या केली जाते. आपला देश हा पुरुषप्रधान देश असल्याने मुलगा हा वंशाचा दिवा आहे अशी समजूत फार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु लेखकांनी ‘हीच माझी मुले ‘या कथेत मुलीला मुलगा समजणारा संदेश दिला आहे. आणि ग्रामीण माणसापर्यंत तो आता पोहोचतो आहे. याची शाश्वती देणारी ही कथा आहे .ग्रामीण कथेच्या प्रवाहातील हीवेगळी अशी कथा आहे. ग्रामीण माणसांचे मानसिक परिवर्त नावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. तसेच पारंपारिक विचाराला छेद देणारी ही कथा आहे.
गावकी या कथेत गावगाड्याबाहेरील दलितांचे दुःख एकूनच त्यांच्या जीवनाचा पट लेखकाने उलगडून दाखविला आहे. कथेतील खुशाबा हा गावकी करतो. त्या बदल्यात गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन भाकरी गोळा करून आपली भूक भागवितो .अशा गाव गाड्या बाहेरील दलितांचे दुःख लेखकाने मांडले आहे. उच्च वर्णीयाकडून होणारे शोषण त्यांची सरंजामशाही वरती, मूकपणे अन्याय सहन करणारा समाज याचे चित्रण या कथेत येताना दिसते. दलित व सुवर्णामधील जीवघेणी विषमता या कथेत दिसून येते .माणूस म्हणून ज्यांचे मूल्य अव्हरले गेले आहे, ज्यांना माणसाचा स्पर्श नाकारला गेला अशा दलित समाजातील मांगा, महारांची माणसं गावकी करायची ही गावकी करण्याची प्रथा बंद झाली पाहिजे असा परिवर्तनवादी विचार ‘गावकी’ या कथेतून मांडलेला आहे. तत्त्वज्ञानाने जागृत झालेल्या दलित मनाचे चित्रण लेखकाने सूक्ष्मपणे केलेले दिसते.
आत्महत्येपासून प्रावर्त करीत परिवर्तन घडविणारी कथा म्हणजे ‘आपण सारे जगू या’ ही कथा. हरीच्या गळ्याभोवती सावकारी फास आवळला जातो .तेव्हा तो आपली म्हैश सावकाराला देण्याचं कबूल करतो. लेकराच्या तोंडचं दूध सावकार काढून घेण्याचा प्रयत्न करतो. हरी सावकाराच्या जाचाला कंटाळून मनात आत्महत्याचा विचार करतो परंतु त्याची मुले त्याला आत्महत्या करू देत नाहीत .आपण सारे जगू या असा सकारात्मक संदेश ते देतात. हरी यांच्या आयुष्यातील नकारातून सकारात्मक दृष्टिकोन कसा तयार होतो याचे चित्रण या कथेत केले आहे. खंबीरपणे आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन पुन्हा उभे राहणे हे लेखकाने या कथेच्या माध्यमातून मांडलेले दिसते. मुख्या प्राण्यावर असणारा जीव आणि त्यासाठी गळ्यातील विकावे लागणारे मंगळसूत्र आणि सर्जाच्या अकाली मृत्यूमुळे परभाच्या संसाराची झालेली ‘उसवण’ हृदयाला भेदून जाणारी अशीच आहे. परभा मुकादमाकडून उचल घेतो. त्याला मुकादमाची काळजी वाटते. सर्जा गेल्यामुळे बैलगाडी कशी हाकायची ? आणि घेतलेली उचल कशी फेडायची? ही एकच चिंता परबाला सतावत होती. सर्जाच्या जाण्यानं त्याच्या आयुष्याची उसवण तर होतेच पण ऊस तोडणी करून संसार जोडताना अख्ख्या आयुष्याची कशी उसवण होते याचे भेदक चित्रणाबरोबरच लेखकांनी दुष्काळात जीवन जगत असताना सोसावे लागणारे हाल, त्याच बरोबर ऊसतोड कामगारांचे विश्व चित्रीत करण्याचा प्रयत्न उसवण या कथेमधून केलेला दिसतो.
लक्ष्मण दिवटे यांच्या कथालेखनातील विषयात वैविध्य आहे. खेड्यातील अज्ञान, परंपरागतता, उच्चनीच्चतेची भावना, याची त्यांना जशी जाणीव आहे तद् वतच पुन्हा पुन्हा निसर्गाच्या आवकृपेमुळे ग्राम जीवनाची होणारी वाताहात आणि भोगाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा याची तर त्यांना जाणीव आहेच, पण बदलणाऱ्या ग्राम वास्तवात ग्रामीण माणसाने काय केले पाहिजे याचेही त्यांना भान आहे. सुतारकीचा धंदा करून पोट भरणारा पोपट घरकुल आल्यामुळे आपलं घर बांधाय काढतो. घर बांधून पूर्ण होते. पोपटआपली जमीन सासूच्या नावावर करून देतो. ती सासूच्या नावावर केलेली जमीन परत नावावर करून घेण्याअगोदरच सासू मरते .आणि सीमाचा भाऊ वापस जमीन करून देत नाही .शेवटी पोपट आणि सिमाला ‘पाचर ‘बसते अशी बेईमान होणारी माणसं कशी पाचर मारतात अशी विचार करायला लावणारी नव्या धाटणीची ‘पाचर ‘ही कथा मनाला अस्वस्थ करून सोडल्या वाचून राहत नाही.
आई बापाला देव मानणारा हा भारत देश आहे पण या देशातच आई बापाला दूर लोटणारी मुलंही आज आपणाला पाहावयाला मिळतात. हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून आई आपल्या मुलांना मोठं करते. त्यांना सांभाळते. पण त्यांचे लग्न झाल्यावर ती दूर जातात आणि आई बापाची घालमेल होते. एकाच कुटुंबात एकमेकांच्या आधाराने जगणारी माणसे अनेकदा एकमेकाशी निर्दयी होतात. आणि त्यातूनच काहीच्या वाट्याला दुःखाचा भोग येतो. अशा असाहाय्य झालेल्या माणसाचे जगणे जोडवं ‘या कथेतून विकारासह व्यक्त केले आहे. जोडवं या कथेतील राघूअण्णा आणि गोदाकाकू आपल्या मुलासाठी आपली शोशिकता आणि श्रम पणाला लावतात. मुलांच्या वागण्याने आणि एकूणच माणसाचे वर्तन आणि परिस्थितीमुळे वाट्याला आलेले ताण -तणाव सहन करण्याशिवाय पर्याय नसतो.
‘ मातीच इमान ‘ही अहंकार आणि गर्वहरण करणारी कथा नव्या धाटणीने समोर येते. बहिणीमध्ये आलेला दुरावा, कलह निर्माण करणारी ‘थोरली बहीण’ ही कथा आहे. माणसांच्या ठिकाणी आशावाद जबर असला तरी परिस्थिती मात्र भयंकर आहे. कारण समस्या अनंत आहेत. त्यांच्या मुळाशी स्वार्थ आहे. आपल्या स्वार्थापोटी वागणारी ठकी आक्रमक होताना दिसते. ‘शिवावरचा गाडा ‘ही कथा अशाच एका मनोव्यस्थेला बांधलेली कथा आहे. खेडवळ माणसे परंपरा टाकत नाहीत. अंधश्रद्धेवर आघात करणारी कथा वाचनीय आहे. ‘उसवण ‘या कथासंग्रहातील’ आई’ ही शेवटची कथा .अनेक प्रश्न घेऊन डोक्यात काहूर उठवू पाहणारी ही कथा.
ग्रामीण जीवन शेतीशी निगडित आहे .ग्रामीण साहित्यात ग्रामीण कथेमध्ये हे दर्शन येणे अपरिहार्य आणि अपेक्षित आहे. ‘उसवण ‘या कथासंग्रहातील बऱ्याच कथा ह्या शेतीशी निगडित आहेत. बीड परिसरातील शेतकऱ्यांच्या व्यथा ,वेदना मांडल्या आहेत. निसर्गापुढे शेतकरी कसा हादबल होतो याचे वास्तव चित्रण त्यांनी केले आहे. माणसातले माणूस पण हरवत चाललंय अशा काळात आणि अशा गावात माणसात राहून लक्ष्मण दिवटे सारखे नवे लेखक जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून उमटणे स्वाभाविक आहे. आणि ते कमी अधिक प्रमाणात ‘उसवण’मधील या कथामधून उमटलेले आहे. दिवटे यांची कथा गाव आणि शेती संस्कृतीचा दैनंदिन जगण्यांमधील तीळ पकडणारी कथा लिहित आहेत. परिश्रमाला पर्यायच नाही ;अशा वातावरणात खेडी अजूनही रडत आहेत. मुळात परंपरा टाकून देता येत नाहीत ;या घालमेलीत माणसाला किंमत नाही असं तीरपागडं खेड्यांच्या कुचंबनेला अधिक गडक करीत चाललं आहे. ही अवस्था दिवटे यांच्या कथा मधून सामर्थ्यासह प्रगट होते. या दृष्टीने त्यांचा उसवण हा कथासंग्रह लक्षणीय म्हटला पाहिजे. विशेष म्हणजे हा कथाकार नवखा असतानाही पुनरावृत्त होऊ देत नाही. नव्या कथाकाराला न केलेला अशा प्रकारची एक सलग निवेदनशैली दिवटे यांना गवसली आहे.
कृषीनिष्ठ संस्कृतीचा कलात्मक आविष्कार दिवटे यांच्या कथांमध्ये आढळतो. शेतकरी ,शेतमजूर ,बलुते -आलूते यांचे परस्पर संबंध शेतीमुळे घट्ट आवळलेले आहेत .ग्रामीण माणसांचा विचार शेती आणि पशुधन, जनावरे वगळून करता येत नाही. शेती आणि शेतीवर निर्वाह करणारा सबंध दिवटे यांनी उभा केला आहे .ग्रामीण वास्तवाला उभे करण्यासाठी त्यांनी निवडलेले विषय आणि अनुभव चित्रेअत्यंत पूरक अशी आहेत. हा कथासंग्रह ग्रामीण जीवनातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विसंगतीवर आणि रूढी, परंपरा, वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, अज्ञान, दारिद्र्य, मानवी प्रवृत्ती बरोबरच परिवर्तनशील विचारांच्या माणूसपण शिकविणाऱ्या या कथा आहेत ‘.
उसवण ‘या कथासंग्रहातील सतरा ही कथांचे अवलोकन केले तर काय दिसते? लक्ष्मण दिवटे यांना वर्तमान ग्राम वास्तवाचे उत्तम भान आहे .या वास्तवातील विविध समस्याचे आणि ग्रामीण माणसांच्या वृती प्रवृतीची ,त्यांच्या व्यथा वेदनांची आणि त्यांच्या दुःख भोगाची जाण आहे. कथेच्या प्रांतात लक्ष्मण दिवटे नवखे असले तरी त्यांच्या कथेतील भाषेचे सामर्थ्य हे उद्याच्या येणाऱ्या ग्रामीण लेखकांना विचारात घ्यावे लागेल असेच आहे. त्यांनी भाषेचा वापर सहज केलेला दिसतो. हेच त्यांच्या भाषा लेखनाचे मोठेपण मानावे लागेल. दिवटे यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी मराठवाडा असल्याने त्यांच्या कथासंग्रहातील भाषेला मराठवाडी मातीचा वास लाभलेला आहे. खेड्यातील माणूस जी बोलीभाषा बोलतो त्या बोलीतूनच त्याचे अंतरंग अधिक परिणामकारकतेणे व्यक्त होते. याचा साक्षात्कार ‘उसवण ‘मधून येताना दिसतो. अनेक करुणा जनक आणि नाट्यपूर्ण घटना -प्रसंग प्रस्तुत कथासंग्रहातील कथा मधून आलेले आहेत. मराठवाड्यातील विशेषत: बीड जिल्ह्यातील आजच्या ग्रामीण वास्तवाचे चैतन्यपूर्ण रेखाटन करणारा असा हा ‘उसवण ‘कथासंग्रह आहे .या संग्रहातील गोधडी, आसवांचा पूर, खीळ,गावकी ,पाचर ,उसवण ,जोडवं, इत्यादी कथा या दृष्टीने फारच महत्त्वाच्या व विलक्षणीय विषयाला हात घालणा-या आहेत.
या त्यांच्या उसवण कथासंग्रहातील सर्व कथेतून आलेली माणसे आणि त्यांच्या संवादातून येणाऱ्या भाषेचे वेगळेपण ठळकपणे लक्षात येते. “काय चाललंय पाटील बर हाय नव्ह? “व्हय खरंच म्हणायचं ” “पाटील वरिस? झालं बाबापेक्षा पोरगच वाढाय लागलय? “व्हय, की आवंदा सगळं मिटवून टाकतो” ” आहो सगळं कोण माघतंय. अजून दहा वर्षे राहू द्या की! अशा प्रकारच्या बोलीभाषेतील संवादामुळे कथा अधिक प्रत्येकारी होताना दिसतेच. पण कथेतील वातावरण निर्मिती ही छान होते बोलीभाषेतील शब्द वातावरण निर्मितीला पोषक ठरतात. जशी पात्र आहेत तशी त्यांची भाषा वापरण्यात लेखक यशस्वी दिसून येतो.
सभोवतालच्या संघर्षमय जगण्यातून आणि त्यांच्या आलेल्या अनुभवातून जन्माला आलेल्या लक्ष्मण दिवटे यांच्या कथा आहेत. एकंदरीत दिवटे यांच्या या कथासंग्रहातील कथांना वास्तवदर्शी अनुभवांचा आधार असल्याचे जाणवते. त्यामुळेच सभोवतालच्या संघर्षातील बारीक सारीक गोष्टी टिपणारा एक चांगला कथासंग्रह म्हणून उसवण या कथासंग्रहाचा उल्लेख करावा लागतो.
पुस्तकाचे नाव – उसवण ( कथासंग्रह )
लेखक – लक्ष्मण दिवटे
प्रकाशक – पायगुण प्रकाशन,अमरावती ( मो.९०११३९४९०५ )
पृष्ठे – १५६
मूल्य – ७२ रुपये
मुखपृष्ठ – सरदार जाधव