March 23, 2023
Ficus tree article by Ajitkumar Patil
Home » सदापर्णी वृक्ष उंबर अर्थात औंदुंबर
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सदापर्णी वृक्ष उंबर अर्थात औंदुंबर

उंबर सदापर्णी वृक्ष आहे याला संस्कृतमध्ये ‘औदुंबर’ हे नाव आहे हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल.

– अजितकुमार पाटील

सांगली

उंबराच्या झाडाचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात. त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता. सालीचा उपयोग उत्तम काळा रंग बनविण्यास होतो.

पक्षी ही उंबर फळे खातात, त्यांच्या विष्ठेतून उंबराच्या बीजांचा प्रसार होतो. उंबराला फूल नसते, असा एक गैरसमज आहे. उंबराचे फळ म्हणजे त्या वनस्पतीचा पुष्पसमूहच असतो. हे फळ कापल्यास ही फुले दिसतात. त्यात नरफुले, मादीफुले आणि नपुंसक (वांझोटी) फुले अशी तीन प्रकारची फुले असतात.

ब्लास्टोफॅगा सेनेस या चिलटाएवढ्या कीटकांची मादी अंडी घालण्यासाठी उंबराच्या खालच्या बाजूने आत प्रवेश करते आणि नपुंसक फुलामध्ये आपली अंडी घालते. तिच्या अंगावर दुसऱ्या फुलाकडून येताना माखले गेलेले असंख्य परागकण असतात. ज्या छिद्रातून ती आत शिरते, त्याच्या तोंडाशी आतील बाजूला वळलेली अनेक ताठ कुसळे असल्याने तेथून ती बाहेर पडू शकत नाही. बाहेरचा मार्ग शोधताना तिच्या अंगावरील परागकणांचे उंबरातील मादीफुलांवर सिंचन होते आणि ती आतच मरून जाते.

कालांतराने उंबरातील नरफुले बहरतात. याच सुमाराला कीटकाच्या अंड्यांतून पिले बाहेर पडतात व वाढतात. त्यांच्या नर-माद्यांचा समागम होऊन नर मरतात. फलित माद्या बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. याच वेळी त्यांच्या अंगावर नरफुलातील परागकण माखले जातात. उंबराच्या वरच्या छिद्राजवळील कुसळे मऊ झाली असल्याने माद्या तेथून सहज बाहेर पडतात आणि अंडी घालण्यासाठी दुसऱ्या कच्च्या उंबराकडे जातात. अशा प्रकारे हे चक्र चालूच राहते. ब्लास्टोफॅगा सेनेस हा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. त्यांच्या सहजीवनातून कीटकांचे प्रजनन आणि वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात.

Related posts

नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न – मोदी

स्विटकाॅर्नपासून खमंग चिवडा कसा तयार करायचा ?

राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

Leave a Comment