June 15, 2024
Teak wood tree article by dr V N shinde
Home » कणखर साग…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कणखर साग…

घराचे बांधकाम करायची चर्चा सुरू झाली, की प्रथम आठवणारे झाड म्हणजे सागवान. सागवानाचे लाकूड प्रत्येकाला हवे असते. घराच्या दरवाजाचे लाकूड सागवानाचे असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र या लाकडाच्या उपयुक्ततेआड त्याचे इतर गुण झाकून जातात. सागवानाच्या बियांचे तेल, लाकडाचे तेल याचे अनेक फायदे आहेत. सागवान अनमोल तर आहेच; पण तो शेतकऱ्याचे शेत पिकवत वाढतो. प्रत्येकाने आपल्या बांधावर लावावा आणि मुलांचे भविष्य निश्चिंत करावे, असा हा वृक्ष आहे… प्रत्येकाने जरूर लावावे असे सागवान … अशा या सागवानाविषयी सारे काही…

डॉ. व्ही. एन. शिंदे

उपकुलसचिव,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

माणूस गरीब असो वा श्रीमंत, स्वतःचे हक्काचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते कसे असावे याच्या संकल्पना, रूपे वेगळी असतील. मात्र घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या लाकडाचा विषय निघताच एकच झाड डोळ्यासमोर येते आणि ते असते सागवानाचे ! दरवाजे, चौकटी, खिडक्या, कपाटे या साऱ्यांसांठी सागवानाच्या लाकडालाच प्राधान्य असते. सागवानाच्या लाकडाचे महत्त्व इतके मनावर बिंबले गेले आहे की, देवघर असो किंवा फर्निचर प्रत्येक लाकडाच्या वस्तूसाठी सागवानच वापरले पाहिजे, असा प्रत्येकाचा आग्रह असतो. सागवानाच्या टिकाऊपणावर लोकांचा जो विश्वास आहे, त्याला तोड नाही.

सागवान मूळ भारतीय वृक्ष. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील भारत, बांग्लादेश, इंडोनशिया, मलेशिया, म्यानमार, थायलंड, श्रीलंका या देशांमध्ये अनेक वर्षांपासून या झाडाचे वास्तव्य आहे. हे झाड आणि त्याचे महत्त्व येथील रहिवाशांना माहीत आहे. याच्या लाकडाचे महत्त्व जसजसे इतर देशांना समजले, तसतसे इतर देशांनी सागवानाची लागवड सुरू केली. आफ्रिका, क्युबा, व्हिएतनाम, पनामा, दक्षिण अमेरिका, बाझील, आणि वेस्ट इंडिजच्या बेटांवर सागवानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली. आज जगभरात ३० लक्ष हेक्टरवर सागाची लागवड केलेली आहे. जगातील एकूण सागवानाच्या जंगलाच्या ४४ टक्के जंगल भारतात आहे. इंडोनेशियात ३१ टक्के जंगल आहे. म्यानमारमध्ये केवळ सहा टक्के जंगल असले तरी जगातील सागवान व्यवहारात ब्रम्हदेशचा वाटा निम्मा आहे. सागवानाला संस्कृतमध्ये शाक, खरच्छद, अर्जुनोपम, द्वारदा म्हणून ओळखले जाते. मराठीतील सागवान किंवा हिंदीमध्ये सागून, गुजरातीमध्ये साग, कन्नडमध्ये तेगीन किंवा तेगू किंवा त्याग, मलायी भाषेत टेक्कू, फाती, ओरियामध्ये सिंगुरू, तमिळमध्ये टेक्कूमारम, तेलगूमध्ये अडवीटेक्कू, इंग्रजीमध्ये टिक ट्री, इंडियन ओक, शीप ट्री या नावाने ओळखले जाते. म्यानमारमध्ये क्यिन, लिऊ, फ्रान्समध्ये टेक, स्पेनमध्ये टेका, थायलंडमध्ये माइसाक इंडोनेशियात जाती म्हणून ओळखले जाते. संस्कृतमधील शाक नावापासून भारतीय भाषांतील नावे आली असावीत, असे मानले जाते. मलायी भाषेतील टेक्कू नावाचे पोर्तुगीजमध्ये टेका झाले आणि त्याचे इंग्रजीमध्ये टिक झाले. या झाडाचे शास्त्रीय नाव टेक्टोना ग्रँडिस असे आहे. यातील टेक्टोना ग्रीक भाषेतील टेक्टन म्हणजे सुतार या शब्दावरून आला आहे. तर लॅटिन भाषेतील ग्रँडिस म्हणजे भव्य किंवा मोठे. त्याच्या भव्य पानावरून ग्रँडिस हे नाव घेण्यात आले आहे. याचे कुटुंब व्हर्बेनिसी आहे.

सागवानाच्या जनुकीय अभ्यासातून दोन मूळ प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक वाण मूळ भारतातील, तर दुसरा म्यानमार आणि लाओस प्रांतातील आहे. आज सागाच्या तीन जाती आढळतात. यातील टेक्टोना ग्रँडिस जात भारतात सर्वत्र आढळते. मात्र दक्षिण आशियातील सर्वच देशात कमीजास्त प्रमाणात हे तिन्ही वाण आढळतात. भारत आणि म्यानमार या दोन देशांमध्ये सागाची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. साग पानगळ वृक्ष आहे. सागाच्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. जंगलात सूर्यप्रकाशाची गरज पूर्ण करण्यासाठी सागवानाची झाडे उंच वाढतात. सागाची झाडे एकाच जागी वाढत नाहीत. ती दूर दूर विखुरलेली असतात. कदाचित आपल्या वाढीचे क्षेत्र आपल्यासाठी ते आखून घेत असावेत. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत सागवान वाढतो. उदासीन पाणी उपलब्ध असल्यास साग जोमाने वाढतो, म्हणजेच अल्कली किंवा आम्लयुक्त जमिनीत साग नीट वाढत नाही. कोरड्या वातावरणात सागवानाची वाढ हळू होते. कमी पावसाच्या भागापासून ८००० मिलीमीटर पावसाच्या प्रांतात साग आढळतो.

साग समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंचीपर्यंत चांगला वाढतो. १३  सेल्सियसपासून ४३ सेल्सियसपर्यंतच्या तापमानात सागवान वाढतो. पन्नास वर्षांत सागवान जमीन आणि वातावरणानुसार २० ते ५४ मीटर वाढतो. जगातील सर्वात मोठे सागवानाचे झाड थायलंडमध्ये आहे. या झाडाचा चार फूट उंचीवर व्यास ३.२ मीटर तर एकूण उंची ४६ मीटर आहे. म्यानमरमध्ये असणारा सर्वात मोठा सागवान वृक्ष २.४ मीटर व्यासाचा आणि ४६ मीटर उंचीचा आहे. भारतातील सर्वात मोठा सागवृक्ष केरळमधील परांबीकुलम येथे आहे. य झाडाचा व्यास २.१ मीटर आणि उंची ४० मीटर आहे. सागाचे झाड ५०० वर्षांपर्यंत जगते.

सागाची झाडे बियांपासून तयार होतात. बिया रूजण्यास भरपूर उष्णता म्हणजेच सूर्यप्रकाश लागतो. ही उष्णता आगीपासूनही मिळते. जमिनीवर असणाऱ्या बिया कमी प्रमाणात रूजतात. मातीत असणाऱ्या बियांना आगीपासून संरक्षण मिळते. या बियांचे कठीण आवरण सैल पडते. बिया चांगल्या रूजतात. मात्र त्यासाठी पुरेसा प्रकाश आणि जमिनीत ओल असणे आवश्यक असते. जुन्या बिया नव्या बियांपेक्षा चांगल्या रूजतात. सागवानाच्या बिया थंड पाण्यात भिजूवन त्या वाळवतात. त्यामुळे  बियांचे आवरण सैल होते आणि बिया चांगल्या रूजतात. कलमे बांधून रोपे बनवण्याचे तंत्रही विकसित झाले आहे.

मुळांना फुटवे फुटूनही त्याची रोपे बनतात. मात्र त्यासाठी मुळे उघडी पडावी लागतात. मुळे मातीच्या वर आली की त्याला कोंब फुटतो. तसेच खाली मुळे वाढू लागतात. बियांपासून रोपे उगवताना सुरूवातीची दोन पाने गोलाकार असतात. नंतर येणारी पाने रूंदीपेक्षा लांबीने जास्त असतात. पाने समोरासमोर येतात. ती साधी असतात. पानांची लांबी ३० ते ७० सेंटीमीटर तर रूंदी २५ ते ४० सेंटिमीटर असते. पानांचा आकार लंबगोलाकृती किंवा खोडाकडे पसरट आणि टोकाकडे निमुळती होत जाणारी असतात. पान जेथे खोडाला चिकटलेले असते तेथूनच पानाला सुरुवात होते. पानावरील मुख्य शिरेपासून उपशिरा आणि पुन्हा लहान शिरा फुटत जातात. पानांवर नक्षीदार शिरा-उपशिरांचे जाळे बनते. शिरा आणि उपशिरा या पानाच्या खालच्या बाजूस बाहेर आलेल्या असतात. तर सूक्ष्म उपशिरा पानाला आत ओढून घेतात. यामुळे पानाला एक प्रकारचा खडबडीतपणा येतो. झाड जसजसे वाढत जाते, तसतसा पानाची लांबीप्रमाणे रूंदीही वाढते. पानाच्या आकाराच्या तुलनेमध्ये देठ खूपच छोटे असते. देठापासून सुरू होणारी शीर लहान होत पानाच्या टोकाला संपते. पान वरच्या बाजूला हिरवे असते. खालच्या बाजूला दाट लव असते. दाट केसाळ रचनामुळे खालच्या बाजूला पान पांढरट बनते. ही लव कोवळ्या खोडावरही असते. खोड मोठे होताच लव निघून जाते आणि खोड हिरवे होते. पानाला जागोजागी कीड खाते. त्यामुळे पानांवर जाळीदार रचना दिसतात. पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरपासून झाडावर पिवळे ठिपके दिसायला सुरुवात होते. पानावर हिरव्या आणि पिवळ्या रंगाची मुक्त उधळण होत असते. हिरव्या-पिवळ्या रंगातील असे पान, कुशल चित्रकाराने चित्र काढल्यासारखे हे चित्र असते. या काळात जर पाऊस पडला तर सागाचे सौंदर्य आणखी खुलून दिसते.

काही दिवसात पाने पूर्ण पिवळी होतात आणि जानेवारीपर्यंत सर्व पाने गळून जातात. बहुतांश पाने पिवळी झालेला साग एखाद्या सुवर्णमुकुट घातलेल्या राजासारखा दिसतो. मात्र विज्ञानाच्या दृष्टीने ही त्यागाची तयारी असते. हिरवी, जाडजूड पाने पिवळी होत वाळत जातात, गळून जातात. जमीन ओलसर असेल किंवा काळ्या जमिनीतील सागाची पाने मार्चपर्यंत झाडावर टिकून असतात. सागाला पावसाळा सुरू झाल्यानंतरच नवी पालवी फुटते. ऐन उन्हाळ्यात सावलीची गरज असते, तेव्हाच याची पानगळ झालेली असल्याने सावलीसाठी साग उपयोगाचा नाही. हिरव्यागार पानांनी समृद्ध असणारा साग काही दिवसांतच सर्व पर्णपरित्याग करतो. एखाद्या सुखी, समृद्ध, समाधानी घरातील ज्येष्ठाने अचानक संन्यास घ्यावा, असेच हे असते.

Teak wood tree article by dr V N shinde

खोड सरळ वाढत जाते. रोपे लहान असतानाच लावणे चांगले असते. सागाचे झाड मुरमाड जमिनीतही चांगले वाढते. झाड सातआठ फूट उंचीचे होताच त्याला फांद्या फुटू लागतात. पानाच्या बेचक्यातून येणाऱ्या या फांद्या वेळोवेळी छाटाव्या लागतात. फांद्या खोडापासून काही अंतर ठेवून कापाव्या लागतात. खोडाला घासून फांद्या कापल्या तर सालीला इजा होऊ शकते. सुरुवातीला येणाऱ्या खोडाचा आकार चौकोनी असतो. कोवळ्या फांद्याही चौकोनी असतात. कडेला पन्हाळीसारखा आकार असतो. चौकोनी आकाराचे खोड हिरवे असते. पुढे खोडाचा रंग पांढरा होत जातो. खोड दंडगोलाकार आकाराचे बनते. खोडाला वारंवार फांद्या येतात. त्याला काही वर्षे कापत जावे लागते. खोड दहा ते पंधरा सेंटिमीटर व्यासाचे झाल्यानंतर त्या भागात फांद्या येणे बंद होते. खोडाचा विस्तार वाढत जातो. झाडाची उंची दिडशे फुटापर्यंत वाढते. झाडाच्या फांद्यांमुळे पन्नास फूट व्यासाचा घेर बनतो. झाडाचा वरचा भाग अर्धगोलाकार बनतो. झाड पुरेसे मोठे झाल्यानंतर खोडावर काही ठिकाणी खोबण्या येतात. झाडावरील साल धागेदार असते. साल राखाडी, भुरकट रंगाची असते. सालीवर भेगा असतात. सालीचे बाहेरचे आवरण हळूहळू गळत राहते. सालीचे बाह्यावरण पडले की आतील कोवळी साल गुलाबी दिसते. मात्र काही दिवसच. साल चार ते अठरा मिलीमीटर जाडीची असते.

सागाचे झाड सहा वर्षांचे होताच त्याला फुलोरा यायला सुरुवात होते. मात्र विपुल प्रमाणात फुले येण्यासाठी झाड पंधरा वर्षांचे व्हावे लागते. भारतात नवीन पाने हा कळ्यांचा गुच्छ घेऊनच येतात. फांद्याच्या टोकाला हजारो कळ्यांचा गुच्छ हळूहळू विस्तारत झुपक्यात रूपांतरित होत जातो. झुपक्याचा आकार कोनासारखा, तळाकडे मोठा एक फुटापर्यंत असतो आणि शेंड्याकडे टोकदार बनत जाणारा असतो. जून ते ऑगस्टमध्ये फुले फुलतात. हवामानानुसार हा कालावधी थोडाफार बदलताना आढळतो. उत्तर गोलार्धातील सागवान फुलण्याचा कालावधी हा जून ते ऑगस्ट तर दक्षिण गोलार्धात डिसेंबर ते मार्च असा असतो. सागवान फुलण्याचा आणि सूर्यप्रकाशाचा संबध आहे. सागवानाच्या शेंड्याच्या फांद्यांना फुले येतात. ज्या भागात सूर्यप्रकाश पोहोचत नाही, अशा फांद्यांना फुले येत नसल्याचे संशोधकांच्या निरीक्षणातून आढळून आले आहे. सागवानाची फुले सहा ते आठ मिलीमीटर लांबीची असतात. सर्वसाधारण फुलांचा रंग पांढरा असतो. क्वचित लालसर गुलाबी रंगही आढळतो. २० ते ९० सेंटिमीटर लांबीच्या गुच्छामध्ये १२०० ते ३७०० फुले असतात. पापुआ न्यू गिनी येथील सागवानाच्या गुच्छात ८००० पर्यंत फुले येतात.

कळ्या काही दिवसांत फुलायला सुरूवात करतात. पहाटेच कळ्यांचे पांढऱ्या फुलांमध्ये रूपांतर होते. फुलांना मन प्रसन्न करणारा मंद गंध असतो. फुलांचा झुपका कक्षीय असतो. सागाची फुले द्विलिंगी असतात. त्यातील अनेक फुले वांझ असतात. वांझ फुलांमध्ये परागीभवन होत नाही. सहा पांढऱ्या तळाशी जोडलेल्या पाकळ्या असतात. या प्रत्येक पाकळीच्या तळापासून पुंकेसर वरपर्यंत येतात. आतमध्ये सहा असमान दल असतात. वरपर्यंत आलेले पिवळे परागकोष या फुलांना आणखी आकर्षक बनवतात. फनेलसारख्या फुलाच्या तळाशी गोलाकार दोन मिलीमीटर आकाराचे केसाळ अंडाशय असते. झुपक्यातील सर्व फुले फुलण्यासाठी दोन ते चार आठवड्याचा कालावधी लागतो. झुपक्यातील ३० ते ३०० फुले दररोज फुलतात. गुच्छातील अगोदर खालची फुले फुलण्यास सुरुवात होते आणि शेवटी टोकाची फुले फुलतात. सकाळपर्यंत फुले परागीभवनास सज्ज होतात. फुलांमध्ये मध येतो. मधाला आकर्षित होऊन कीटक फुलांकडे येतात. साग फुलांचे परागीभवन शक्यतो किटकांमार्फत होते. काही वेळा वाराही परागीभवनाचे कारण ठरतो. दिवसभर हा मध येत असतो. त्यामुळे फुलांवर दिवसभर फुलपाखरे, मुंग्या, मधमाशा आणि किटकांचे बागडणे सुरू असते. फुलांचे आयुष्य एक दिवसाचे असते. दुसऱ्या दिवशी परागीभवन न झालेल्या फुलांचा आणि परागीभवन झालेल्या फुलांतील पुंकेसर आणि पाकळ्यांचा झाडाखाली सडा पडलेला दिसतो. जितके झाड मोठे आणि विस्तारलेले, तितका हा सडा दाट पडतो. पावसाळ्याचे दिवस असल्याने या फुलांना जमिनीवर विसावलेले क्वचितच पाहावयास मिळते.

फलन न झालेली फुले खाली जमिनीवर पडली, तरी गुच्छातील दांडे मात्र तसेच असतात. ज्या फुलांचे फलन होते, त्याच्या पाकळ्या खाली पडतात आणि फुलातील बाह्य संदले अंडाशयावर आपले आवरण घालतात. त्यावर सूक्ष्म केसाळ रचना असते. त्यांचा रंग हिरवा असतो. जन्मास येणाऱ्या बाळाची कोणास नजर लागू नये, याची जणू ही संदले काळजी घेत असतात. मुल कितीही मोठे झाले तरी ते आईला लहान वाटते आणि ती त्याची काळजी करतच राहते. तसेच हे फळ मोठे झाले, परिपक्व झाले आणि गळून जमिनीवर आले तरी हे आवरण तसेच राहते. सागाची फळे अठळीयुक्त असतात. ती हिरवी असतात. फळे पक्व होण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा काळ लागतो. तीन फळांतील एका फळाचे बीज रूजण्यास योग्य असते. फळातील २३ टक्के फळे बीज नसणारी असतात. एकच बीज असणारी ५२ टक्के फळे असतात. तर एकापेक्षा जास्त बिया असणारी २५ टक्के फळे असतात. पक्व होताना त्यांचा रंग बदलत जातो आणि ती पिवळसर किंवा तपकिरी होतात. फळे गोलाकार पाच ते २० मिलीमीटर आकाराची असतात. त्यांच्या बाह्य आवरणावर जाड आखूड केसाळ आवरण असते. बिया चार भागांच्या असतात. फळे नोव्हेंबर ते जानेवारी या काळात पिकतात. त्यातील काही फळे जमिनीवर पडतात. मात्र काही फळे संपूर्ण उन्हाळा तशीच झाडावर असतात. सागवानाची खाली पडलेली फळे गोळा करून पोत्यामध्ये घालून रगडली जातात. त्यानंतर ती उफणून कचरा वेगळा करून अठळ्या मिळवतात. या अठळ्या चांगल्या वाळवून साठवतात. अठळ्यामध्ये चार कप्पे असतात. बियांचा आकार एक ते दीड सेंटिमीटर असतो. एका किलोमध्ये ११५० ते २८०० पर्यंत फळे असतात. दमट हवामानातील फळे वजनाने कोरड्या हवामानातील फळांपेक्षा जड असतात.

सागवानाच्या लाकडाचा उपयोगच केवळ आपल्या लक्षात राहतो. मात्र सागाची कोवळी पाने, सागाच्या बियांचे तेल यांचा उपयोग आयुर्वेदामध्ये करण्यात येतो. सागाच्या बारीक फांद्या इंधन म्हणून वापरण्यात येतात. झाड वाढत उंच होत जाते. घनदाट जंगलातील जुनी सागाची झाडे दीडशे फुटापर्यंत वाढतात. सागाचे लाकूड हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. या लाकडाचा मुख्यत्वे इमारत बांधकामावेळी आणि फर्निचरसाठी केला जातो. लाकूडावर असणाऱ्या छान नक्षीमुळे आणि त्याच्या टिकाऊपणामुळे हे लाकूड मौल्यवान ठरते. लाकूड मध्यम वजनाचे टिकाऊ आणि कठीण असते. ते गडद तपकिरी किंवा पिवळ्या रंगाचे असते. सागवानाचे झाड कापल्यानंतर त्याचे खोड आडवे तसेच पडू दिले जाते. साल आणि लाकडाचा बाह्य भाग वाळवीस अन्न म्हणून खाऊ दिले जाते. वर्षभरात लाकूड वाळते. तसेच टिकाऊ नसणारा भाग वाळवी खाऊन टाकते. उरलेला भाग वाळवीला खाता येत नाही. त्यामुळे असे कमावलेले लाकूड इमारत बांधकामासाठी वापरल्यास त्यास वाळवी लागण्याचा धोका राहात नाही.

सागाच्या पानांवर मोठ्या प्रमाणात कीड लागते. मात्र लाकडाला शक्यतो कीड लागत नाही. पाणी अती झाल्यास मूळे कुजून सागाची झाडे वाळतात. पेनिओफोरा आणि पॉलिपोरस, पॉलिपोरस झोनॅलिस, फोम्स लिव्हिड्स जातींच्या कवकांमुळे सागाच्या खोडांत पोकळ्या निर्माण होतात. नेक्ट्रियामुळे खोडांवर जखमा होतात. त्यातून डिंक आणि रंगद्रव्ये बाहेर पडतात. यातून खोडाला उभ्या- आडव्या चिरा पडतात. याला सलरोग म्हणतात. क्वचित बांडगुळेही सागवानावर राहायला येतात. बांडगुळे सागातील अन्नरस शोषून झाडाचे मोठे नुकसान करतात. सागाची पाने, फुले, बिया, आणि मुळे यांना सुमारे पन्नास किडींचा आणि रोगांचा त्रास होतो. सागावर पडणाऱ्या रोगावर प्रतिबंधात्मक रसायने किंवा उपाय शोधण्यात आले आहेत. यातील रासायनिक पदार्थांचा वापर जैवसाखळी तोडत असल्याने वापर करणे टाळले पाहिजे. 

 सागाची वाढ जलद होते. वर्षाला त्याचा घेर पाच सेंटिमीटरने वाढतो. पुरेसे पाणी मिळाल्यास उंचीही दीड ते दोन मीटरने वाढते. भारतातही पूर्वी ज्या भागात सागाची झाडे नाहीत, अशा आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, अंदमान निकोबार बेटावर लागवड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यांमध्ये साल वृक्षाऐवजी साग लावण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थाने हुशारीने सागाची लागवड करतात. या भागातील ऊस हे प्रमुख पीक. ऊसाच्या शेतातील बांधावर शेतकरी साग लावतात. बुंध्याला फुटणाऱ्या फांद्या ते पावसाळा सुरू होताच ते तोडतात. त्यामुळे नवी पालवी फुटताना खोड मोठे होते. मात्र फांद्यांच्या विस्तार नसल्याने सावलीमुळे पिकांचे नुकसान होत नाही. काही शेतकरी सागाची शेती करण्यासाठी लागवड करतात. जवळजवळ लावलेल्या सागाची झाडे उंच वाढतात, मात्र त्यांची जाडी वाढण्यासाठी दीर्घकाळ जातो. तर काही शेतकरी मोठे अंतर ठेवून सागवानाची झाडे लावतात आणि या झाडांच्या शेतात आंतरपिक घेतात. अशा लागवडीखालील शेतात सागवानाची झाडे चांगली वाढतात.

सागवान अत्यंत उपयुक्त वृक्ष आहे. सागवानाच्या लाकडाचे महत्त्व लक्षात येताच ब्रिटिशांनी भारतातील सागवान वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आणि सागाचा मोठा साठा बाहेर पाठवला. मात्र तेवढ्याच प्रमाणात सागाच्या झाडांची लागवड केली. आज भारतात आढळून येणाऱ्या मोठ्या सागाची लागवड ब्रिटिश काळात झालेली आढळते. सागाचे महत्त्व ओळखूनच ब्रिटिशांनी वन कायदा बनवला. त्यांनी सागवानाच्या जंगलांची वर्गवारी केली. सागाच्या लाकडाच्या टिकाऊपणामुळे इंग्रज आश्चर्यचकित झाले होते. केरळमधील निलंबूर सागवानाचे लाकूड भारतातील सर्वोत्तम लाकूड मानले जाते. महाराष्ट्रातील आलापल्ली साग, मध्य प्रदेशातील सिवनी आणि बस्तर भागातील साग, आंध्रप्रदेशातील गोदावरी खोऱ्यांतील साग आणि तेलंगणातील आदिलाबाद भागातील साग प्रसिद्ध आहेत. यांची प्रत्येकाची वैशिष्ट्ये आहेत.

लाकडात लाकूड म्हणजे सागाचे! सागवानाचे लाकूड इतर कोणत्याही झाडाच्या लाकडापेक्षा टिकाऊपणा, आकार आणि स्थिरतेबाबत सर्वोत्कृष्ट आहे. म्हणूनच त्याला लाकडातील सोने म्हणतात. सोन्याला वास नाही, मात्र लाकडातील सोन्याला एक मंद गंध असतो. सागाचे लाकूड पांढरट, पिवळे किंवा तपकिरी असते. लाकडाच्या फळ्या काडल्यावर त्यावर गर्द रेषा आढळतात. समुद्रातील भोके पाडणाऱ्या किड्यापासून मात्र ते अर्धसंरक्षित असते. सागावर पाण्याचा परिणाम होत नाही. हजारो वर्षांपूर्वीचे सागाचे लाकूड आजही सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. सागवान आम्लरोधक आहे. हे लाकूड वाकत मात्र नाही. लाकूड मध्यम वजनाचे असते. सागाच्या लाकडाचा उपयोग जहाजे, नावा, पूल बांधणीसाठी केला जातो. बंदरातील खांब, रेल्वेचे डबे आणि इतर वाहनांचे भाग बनवण्यासाठीही सागवानाचे लाकूड वापरण्यात येते. घरातील सजावट, फर्निचर, लहानमोठे खांब, शेतीची अवजारेख्‍ खोकी, गिरणीतील काही उपकरणे इत्यादींकरिता सागवानाचे लाकूड वापरण्यात येते. 

रासायनिक उद्योग आणि प्रयोगशाळांतील टेबलांचे पृष्ठभाग सागवानाच्या लाकडांचे बनवतात. वनस्पती तेल, फळांचे रस साठवण्याकरिता सागवान लाकडाच्या फळ्यापासून पिंप बनवले जातात. व्हायोलिन, सतार, हार्मोनियम बाजाची पेटी बनवण्यासाठी सागवान लाकडाच्या फळ्या वापरल्या जातात. विविध तक्ते, हार्डबोर्ड, गणित, चित्रकलेतील साधनसामुग्री बनवण्यासाठीही हे लाकूड उपयोगाला येते. भारतात लोहमार्ग टाकताना इंग्रजानी सागाच्या लाकडाचे स्लीपर्स वापरले. लाकडाचा वापर रेल्वेच्या डब्यांच्या निर्मितीतही केला. या लाकडाचा मौल्यवान नसणारा भाग कागद किंवा कोळसा बनवण्यासाठी वापरला जातो.

सागाचे आयुर्वेदामध्ये उपयोग सांगण्यात आले आहेत. धन्वंतरी निघण्टूमध्ये ‘साग: खरच्छदो भूमिसहो दीर्घच्छदो मत:l साग: श्लेष्मनिलास्रघ्नो गर्भसंधानदो हिम:ll’ अर्थात कोणत्याही भूमीमध्ये येतो, खरखरीत दीर्घ पाने असणारा साग, कफ, वात, रक्तदोषनाशक, गर्भसंधान करणारा आणि शीत आहे. लाकडाचे उर्ध्वपतन करून तेल मिळवले जाते. सागाचे तेल पिवळ्या रंगाचे असते. ते अल्कोहोलमध्ये विरघळते. हे तेल काही देशांत औषधात आणि जवसाच्या तेलास पर्याय म्हणून वापरतात. सागवान लाकडाची भुकटी कातडीच्या दाहावर बाहेरून लावतात. ही भुक्टी वस्त्रगाळ करून पोटातील दाहावरही वापरली जाते. बस्तर भागातील काही आदिवासी सागाच्या भुकटीपासून मिळणारा स्निग्ध पदार्थ त्वचारोगावर वापरतात. कोकणात हा पदार्थ जनावरांच्या जखमावर लावतात. त्यामुळे जखमामध्ये अळ्या होत नाहीत. 

याखेरीज लाकडाचा उपयोग मूळव्याध, जळवात, पित्तप्रकोप आणि अमांशावर होत असल्याचे उल्लेख मिळतात. सागवानाच्या पानाचा क्षयरोगावरही उपयोग होतो. सागाची कोवळी पाने मोहरी आणि तिळाच्या तेलात गरम करून सूज आलेल्या भागावर चोळतात. यामुळे सांध्याची झीज कमी होते. साग वृक्षांच्या बियांपासून तेल काढले जाते. हे तेल कृमीनाशक म्हणून वापरले जाते. सागांच्या बियांचा औषधी वापर होतो. बियांपासून काढण्यात आलेले तेल खरूज, नायटा अशा त्वचाविकारावर उपयुक्त असते. हे तेल केशवर्धकही आहे. बिया भाजून पाण्यात भिजत ठेवल्या जातात. हे पाणी पिल्यानंतर मूत्रदोष नाहिसे होतात. काही आदिवासी कोवळ्या पानाची भाजी करतात. सागाची फुले चवीला कडू असतात. मात्र ती पित्तविकार, खोकला आणि मूत्रविकारावर उपयुक्त असतात.

सागवानाच्या पानात सहा टक्केपर्यंत टॅनिन असते. पानांमध्ये पिवळे किंवा लाल रंगद्रव्य असते.  राळेत पाने मिसळून लाल रंग मिळवण्याची पद्धत अनेक वर्षांपासून वापरण्यात येते. पानांपासून रेशीम रंगवण्याची कलाही प्राचीन आहे. पूर्ण वाढ झालेल्या सागाच्या वाळलेल्या पानापासून ॲसिटोनच्या सहाय्याने क्विनॉईन मिळवले जाते. त्यातून गर्द लाल रंगाचे अँथ्रॅक्विनोन हे रंगद्रव्य मिळवतात. वाळलेल्या पक्व झाडाच्या पानापासून सोडियम कार्बोनेट विद्राव्याचा वापर करून रंग बनवण्याचे उद्योग निर्माण झाले आहेत. 

हा रंग लोकर रंगवण्यासही उपयोगी पडतो. सुती कपडे रंगवताना यामध्ये रंगबंधक (कलर बाईंडर) वापरावा लागतो. या रंगामध्ये रासायनिक द्रवांचा वापर करून विविध छटा आणता येतात. खेड्यातील लोक पळसाप्रमाणेच सागाच्या पानाचा उपयोग झोपडीचे छत बनवण्यासाठी करतात. फणसाच्या जावा या देशात लाकडास झिलई देण्यासाठी सागाची खडबडीत पाने घासली जातात. सोयाबिनचे किण्वण घडवून आणण्यासाठी ते सागाच्या पानात गुंडाळून ठेवले जाते. सागवानाच्या सालीत ७.९४ टक्के टॅनिन असते. ते कातडी कमावणे आणि रंगनिर्मितीसाठी वापरतात. ते आकुंचन करणारे (स्तंभक) असते. सालीचा वापर घशाच्या विकारावर उपयुक्त असते. मुळांची साल चट्ट्यांवर लावतात.

इमारती लाकूड म्हणून फांद्या नसणारे खोड महत्त्वाचे असते. त्याचा आकारही महत्त्वाचा असतो.  उत्तर कारवारातील सागाची झाडे उंच आणि सरळ वाढलेली असतात. उत्तर कारवारमधील वृक्षांचा घेर ५ ते सात मीटर असतो. या झाडांचे सोट पंचवीस फुटापर्यंत मिळतात. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात १५ ते वीस फूट उंचीचे दीड ते दोन मीटर घेर असलेले सोट मिळतात. कोरड्या जंगलातील सागाच्या सोटांची लांबी मात्र कमी असते. 

केरळमधील वायनाड, अन्नामलईच्या टेकड्यांवरील साग सर्वात उंच आढळतात. निलांबूर दरीत करण्यात आलेली सागाची लागवड यशस्वी ठरली आहे. तमिळनाडूमध्ये निलगिरी, कोईमतूर, मदुराई, कन्याकुमारी, तिरूनेरवल्ली येथील सागाची जंगले लहान आहेत. कर्नाटकमधील सागाचा मोठा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगात आहे. महाराष्ट्रातील सर्व पानझडी जंगलात साग आढळतो. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हृयातील साग चांगल्या दर्जाचा मानला जातो. गुजरातमध्ये सुरत आणि डांग जिल्ह्यात सागाचे प्रमाण मोठे आहे. भडो, बडोदा, पंचमहाल आणि सांबरकांथा भागातील साग हलक्या प्रतीचा मानला जातो. मध्य प्रदेशमध्ये पूर्व आणि दक्षिण भाग वगळता सर्वत्र साग आढळतो.

साताऱ्याचे श्रीमंत थोरले प्रतापसिंह महाराज यांनी १८२४ मध्ये जुना राजवाडा बांधला. त्यांच्या पश्चात त्यांचे धाकटे बंधू अप्पासाहेब महाराज यांनी शेजारीच १८४४ मध्ये नवा राजवाडा बांधला. हा नवा राजवाडा बांधताना वापरण्यात आलेले संपूर्ण लाकूड सागवानाचे आहे. लाकूड दीर्घकाळ टिकावे, याकरिता सागवानाचे सोट काही दिवस करंजाच्या तेलात भिजत ठेवण्यात आले होते. साताऱ्याची गादी ब्रिटिशानी खालसा केली आणि या राजवाड्यात न्यायालय भरू लागले. या राजवाड्यात एप्रिल २००३ पर्यंत न्यायालय भरत असे. त्यानंतर या वाड्याची देखभाल कशी होते? ते प्रत्यक्षच पाहावे. केवळ सागवानाच्या लाकडाचे बांधकाम असल्याने हा वाडा टिकून आहे, हे मात्र खरे. फलटण भागात संस्थानकालीन नागेश्वर मंदिराला रेखीव कौलारू छप्पर आहे. त्यासाठी वापरण्यात आलेल्या सागाच्या लाकडावर सुरेख नक्षीकाम करण्यात आले आहे. याच भागात असणारे राम मंदिर बांधतानाही सागवानाच्या लाकडावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. शेजारीच असणाऱ्या दत्त मंदिरातही सागवानाच्या लाकडाचा वापर करण्यात आला असून त्यावरही सुंदर नक्षीकाम आहे.

सागवान अत्यंत उपयुक्त झाड असूनही त्याला सर्वच भागात लोकसाहित्य आणि संस्कृतीत महत्त्व मिळालेले दिसत नाही. सागाचा उल्लेख रामायणात मात्र आहे. दंडकारण्यात वास्तव्याला असताना सीतामाईने सागाचे पान हातात घेऊन कुस्करले आणि ते पाण्याने भरले. सगळ्या हातावर रक्त यावे, तसा लाल रंग पसरला आणि सीतामाईने ‘रक्त, रक्त’ म्हणून टाकून दिले. सागाचे पान हातात घेऊन कुस्करले तर हात रक्ताने माखल्यासारखे लाल होते. पूर्वी मेहंदीसाठी या पानांचा वापर केला जात असे. 

गावातील मेहंदी रंगण्याचे गुपीत माहीत असणाऱ्या मुली, स्त्रिया नागपंचमी, संक्रात, हादग्यावेळी आवर्जून सागाची पाने आणून वापरायच्या. जिच्या हातावरची मेहंदी जास्त रंगते, तिचा नवरा तिच्यावर जास्त प्रेम करतो, असे मानले जायचे. एखाद्या महिलेचा नवरा दररोज बडवत जरी असला, तरी सागाचे गुपित माहित असल्यामुळे इतरांपेक्षा जास्त मेहंदी रंगवून आपल्या नवऱ्याचे किती प्रेम आहे, हे ती लोकांना पटवत असे. सागाच्या शक्तीमुळे, टिकाऊपणामुळे त्याला शाक हे नाव प्राप्त झाले. चरकसंहितेत त्याचा उल्लेख द्वारदा असा आहे. याखेरीज अनेक ग्रंथांत सागाचे उल्लेख असल्याचे अभ्यासक सांगतात. मात्र त्याच्या गुणानुसार नावे वापरण्यात आल्याने त्याचे संकलन मिळत नाही.

सागाचे कोवळे पान हातात कुस्करले, तर हाताला लाल रंग येतो. यासंदर्भात एक दंतकथा तयार झाली आहे. विशेष म्हणजे माणसाला सागाच्या एका पानावर पोटभर जेवू घालता येईल, असा त्याचा आकार असतानाही सागाची पाने जेवणासाठी, पत्रावळी म्हणून वापरली जात नाहीत. पळसाची पाने सागाच्या पानापेक्षा जास्त कुस असणारी असतात, तरीही ती पत्रावळीसाठी वापरली जातात. सागाची पाने न वापरणे आणि कोवळ्या पानाना कुस्करल्यानंतर लाल रंग येण यासंदर्भात एक दंतकथा ऐकावयास मिळते. एका गावामध्ये एक गरीब तरूण राहात होता. गरीबीत जीवन जगणाऱ्या या तरूणाला एका धनवंताने काही गायी दान केल्या, मात्र त्याला एक अट घातली. 

या अटीनुसार त्याने त्याचेकडे कोणी काही मागितले आणि ते त्याच्याकडे असेल तर ते त्याने याचकाला दान केले पाहिजे. नसेल तर द्यायचे नाही. मात्र असताना दिलेच पाहिजे. काहीच नसणाऱ्या त्या तरूणाने ही अट मान्य केली. तो या गायींना चांगले सांभाळू लागला. गायी त्याला दूध द्यायच्या. तो ते दूध गावातील लोकांना द्यायच. त्या बदल्यात लोक त्याला अन्नधान्य द्यायचे. त्याचे सर्व काही व्यवस्थित चालले होते. मात्र त्याला गायी देणाऱ्या धनाढ्य गृहस्थाला त्याची परीक्षा घ्यायची इच्छा झाली. वेश बदलून तो दुपारच्या वेळी त्या युवकाकडे गेला. 

त्याला म्हणाला, ‘ मला खूप भूक लागली आहे. मला काही तरी खाण्यासाठी दे.’  युवकांने त्या वृद्धास सांगितले, दुपारचे माझे जेवण झाले आहे. माझ्याकडे माझे भोजन असते, तर मी दिले असते. गाईंचे दूधही दुपारीच काढले आहे. आता त्या काही दूध देणार नाहीत. माझ्याकडे काहीच नाही.’ 

यावर तो वृद्ध म्हणाला, ‘ तू विचार कर, मी स्नान करून येतो. मला खायला दे. तुझ्याकडे आहे.’  तो वृद्ध आंघोळीसाठी म्हणून गेला. युवकाने खूप विचार केला. त्याने एका भाकड गाईचे मांस काढ, शिजवले आणि ते सागाच्या पानावर वाढून त्या वृद्धाची वाट पाहात बसला. तो वृद्ध आला. त्याने सागाच्या पानावरील मांसाहारी जेवण पाहिले. त्याची खाण्याची इच्छा झाली. तेवढ्यात त्याचे लक्ष लंगडणाऱ्या गाईकडे गेले. वस्तुस्थिती लक्षात येताच त्याने ते भोजन नाकारले आणि नाराज झाला. त्या वेळेपासून सागाचे पान भोजनासाठी वापरत नाहीत आणि सागाचे पान हातावर कुस्करल्यास हाताला लाल रंग गायीच्या रक्तामुळे येतो, असे मानले जाऊ लागले.  

आधुनिक कवींनी मात्र सागवानाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. रानात, शेतात, झाडात, पिकपाण्यात रमणाऱ्या इंद्रजित भालेरावांनी मात्र सागालाही काव्यात बांधले आहे. त्यांनी साग आणि जांभूळ झाडाची तुलना केली आहे. सागाच्या पानांना पावसाळ्यानंतर खूप विद्रुप रूप येते. पाने पिवळी होतात. धुळीचे थर सागावर साठतात. मात्र सागाच्या लाकडाचा रंग आणि मोल सोन्याचे असते. तर त्याउलट जांभळीची पाने सदा चकाकत असतात. मात्र खोड सागासारखे नसते. नेमकी ही बाब टिपून त्याला भालेराव सरांनी काव्यरूप दिले आहे.

‘मळकी फाटकी l पाने सागावर

काळजात थर l सोनियाचे

हिरव्या पानांचं l चकाकतं लेणं

काळजात हीन l जांभळीच्या

नवकवीना सागाने भुरळ घातली नसली तरी निसर्गालाच आपले सर्वस्व मानणाऱ्या आदिवासींच्या जीवनात सागाचे महत्त्व खूप मोठे आहे. आदिवासींच्या विविध उत्सवात, लग्नविधीमध्ये विविध गाणी येतात आणि त्यामध्ये साग येतो. या गाण्यांमध्ये सूर आणि ताल येतो. विंझना म्हणजेच पंखा हे गाणे खालीलप्रमाणे आहे.

‘सागू फुलेला एकू सागावं

चंदनू फुलेला एकू चंदनाव

येगू चंदनाची एखली भारजा

भारजा घाली विंझनवारा

हातीचा विंझना खाली पडेला

खाली पडेला धुलीने माखला

धुलीने माखला दुधाने धुवेला

दुधाने धुवेला सलदी ठेवेला

सलद ग सोन्याची ढापना रूप्याचा

ढापना रूप्याचा बिखना मोत्याचा

       सागाच्या आणि चंदनाच्या झाडाला मोहोर आला आहे. चंदनाची बायको पंख्याने वारा घालते आहे. हातातून पंखा खाली पडला आणि तो धुळीने माखला. तो धुळीने भरलेला पंखा दुधाने धुतला. धुतलेला पंखा पेटीत ठेवला. पेटी सोन्याची आणि तिचे झाकण चांदीचे आहे आणि त्याची कडी मोत्यांची आहे. अशा अर्थाचे गाणे वारली समुदायांमध्ये गाईले जाते.

      मुलींना पोसणे कठीण आहे, म्हणून तिला पेटीत घालून समुद्रात लोटून दिल्याच्या अनेक कथा आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रत्यक्षात मुलगी जन्माला येण्यापूर्वीच मारण्याच्या या जमान्यात वारली समाजात गायले जाणारे गीतातील बाप मुलीला जन्माला घालतो, मुलीला सांभाळणे शक्य नसल्याने तो तिला पेटीत घालतो आणि समुद्रात सोडतो. मात्र हे अमानवी कृत्य करतानाही तो सागवानावर विश्वास ठेवतो. ‘राया सुंदरा’ हे गीत खालीलप्रमाणे आहे,

तया होता गिरज्या सांगू गं

तेयी सागाला आवट्या मारल्या गं

तोयी सागू का धरणी पाडीला गं

तेयी सागाचं ओंड पाडीलं गं

तेयी ओंड्याचा फल्या पाडीलया गं

तेयी फल्यांची पेटी बनवली गं

त्यात बसविल्या राया सुंदरी गं

पेती दरीयात लोटूनी दिली गं

पेटी तरत बुडत चालली गं

पेटी माल्याचे मल्याला गेली गं

पेटी माल्यानी खोलून पाहिली गं

त्यां गवसल्या राया सुंदरा गं

पाहून माल्याला आनंद झाला गं

डोंगरावरील सागावर घाव घालून त्याला तोडले. जमिनीवर पाडले. त्याचे ओंडके पाडले. ओंडक्याच्या फळ्या काढल्या. फळ्यांपासून पेटी बनवली. पेटीमध्ये मुली म्हणजेच सुंदर राण्या बसवल्या आणि पेटी समुद्रामध्ये सोडली. पेटी तरंगत, बुडत गेली. शेवटी ती एका माळ्याच्या शेताजवळ गेली. माळ्याला ती मिळाली. माळ्यांने उघडून पाहिल्यावर त्यातील सुंदर राण्या पाहून त्याला आनंद झाला. या गाण्यामध्ये आदिवासी समाजाचा सागाच्या लाकडावर असणारा विश्वास दिसून येतो. सागाच्या लाकडाची पेटी बुडणार नाही आणि आपली मुलगी सुरक्षित कोणाला तरी मिळेल, या विश्वासाने तो सागाची निवड करत असावा. मुलीला मारण्याचे क्रौर्य तो दाखवत नाही आणि तिला सांभाळूही शकत नाही, अशी अगतिकता या गीतातून पहावयास मिळत असताना त्याची निसर्गाची समज जाणवल्यावाचून राहात नाही.

खानदेश महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरचा भाग आहे. या भागाला एका बाजूला गुजरात आणि दुसऱ्या बाजूला मध्यप्रदेशची सीमा आहे. खानेदेशी जीवनावर अर्थातच याचा प्रभाव जाणवतो. या भागातील भाषाही मराठी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांची मिळून बनलेली आहे. सातपुडा पर्वत रांगात भिल्ल समाज राहतो. बुऱ्हाणपूर भागावर गुजरातचा राजा अहमद याची सत्ता होती. या सर्व गोष्टींचा प्रभाव येथील जीवनशैलीवर दिसून येतो. यामुळे येथील विविध उपक्रमांमध्ये गाणी गाताना या घटकांचा प्रभाव दिसतो. लग्नांमध्ये गाणी गातात. या गाण्यामध्ये सागाला स्थान मिळालेले आपणास पाहावयास मिळते. लग्नात उंबरठ्यावर वाटी धरून गाईले जाणारे गाणे खालीलप्रमाणे आहे,

तू उठ रे कबाडी खांदी घेतल्या कुऱ्हाडी

डोई घेतल्या भाकरी, गेला डोंगर पखाडी

साग तोडजोनिबाडी उंबरट गाड्यात घातील

उंबरट शेल्याने झाकीला टाका सुताराच्या दारी

उंबरट सुतार घडीया, उंबरट लव्हार जडीया

उंबरट मिनार मढीया उंबरट वापरे ओ कोन

उंबरट वापरे ओ सिता

हाती इना रत्ने चुडा, मुखी इना पाननां ईडा

माथी इना भंवर जुडा, हाती चंदननी वाटी

सुर्या शिपडत जाय, बाळ खेळाडत जाय

कबाडी उठला आणि कुऱ्हाड घेऊन डोंगरावर गेला. असली सागाचे पक्व लाकूड उंबरठ्यासाठी तोडले. हा उंबरठा बैलगाडीमध्ये घालून शेल्याने झाकला. तो सुताराकडे टाकल्यानंतर सुताराने तो घडवला आणि लोहाराने तो जडवला. त्यावर नक्षीकाम केले. असा हा उंबरठा सितामाई वापरते. सितामाईच्या हातात रत्नजडीत चुडा, डोक्यावर भंवर जुडा आणि मुखामध्ये पानाचा विडा आहे. ती चंदनाची वाटी हातात घेऊन उंबरठ्यावर शिंपडत असताना मध्येमध्ये बाळ लुडबूड करतोय.

खानदेश आणि आदिवासी समाजात सागवान आवर्जून आढळतो. महाश्वेतादेवी यांची एक कथा सागवानाच्या झाडाभोवती गुंफली आहे. कोरकू समाजाचे सागाशी जोडले गेलेले नाते या कथेत मांडले आहे. कोरकू समाजाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्रण या कथेत आहे. या व्यतिरिक्त सागाचे साहित्यात प्रतिबिंब दिसून येत नाही. इतक्या सुंदर फुलांच्या, भव्य पानाच्या कणखर लाकडाच्या झाडाकडे का सर्जनांचे दुर्लक्ष का व्हावे, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.

सागवानाचे झाड मला नेहमीच खुणावत आले, बोलावत आले आणि मीही कळत नकळत त्याच्याजवळ जात राहिलो. बालाघाटच्या जंगलामध्ये बालपणी क्वचितच साग दिसायचा. बालपणी आवर्जून लावलेले सागाचे झाडही दिसत नव्हते. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून सागाचे महत्त्व लोकांच्या लक्षात येऊ लागले. त्यानंतर सूज्ञ लोक सागवानाची लागवड करू लागले. या सागवानाची कोवळी पाने हातात घेऊन कुस्करली की हात लाल रंगाने रंगायचा. बालपणी क्वचितच याचा आनंद घेता आला. पुढे नोकरी करताना विद्यापीठामध्ये विविध ठिकाणी लावलेली सागवानाच झाडे भेटायची. मात्र सागवानाकडे कधी पुरेसे लक्ष देत नव्हतो. नांदेड विद्यापीठामध्ये मुलींच्या वसतीगृहापासून अधिकारी निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या झाडांनी मात्र मला आकर्षित केले. ही फुललेली झाडे पाहताना भान हरपून जायचे. त्यांची कितीतरी छायाचित्रे टिपली. एका सांजवेळी टिपलेल्या सागवानाच्या छायाचित्राने मी नववर्षाचे शुभेच्छापत्रही सजवले होते.

पुढेही सागाच्या झाडाकडे दुर्लक्षच होत असे. कोरोना आला आणि निवांतपणा मिळाला. गर्दी कमी झाली आणि झाडाला बारकाईने वाचण्याची संधी मिळाली. असेच एक दिवस फिरताना सागवानाच्या फुलांनी जमिनीवर घातलेले पांढरे पांघरूण दिसले आणि अवचित लक्ष शेंड्याकडे गेले. साग चांगलाच फुललेला होता. नाजूक, सुंदर खालच्या फांद्यावरील फुले निरखून पाहता आली. सागाची झाडे सर्वाधिक दणकट लाकूड देणाऱ्या या झाडाचे सौंदर्य खुलते ते केवळ पावसाळ्यात. एरवी त्या झाडाची आठवण जनसामान्यांना केवळ घर बांधण्याचा विषय निघाला की येते. एरवी रखरखीत, रूक्ष दिसणारा साग पावसाळ्यात मात्र फुलतो. सागाचे त्या दिवसाचे सौंदर्य पाहिल्यानंतर सहज मनात विचार येतो, मानवी स्वभाव आणि निसर्ग यामध्ये खूप साम्यस्थळे आहेत. माणूस निसर्गाकडूनच नटायला शिकला असावा. एरवी कसेही राहणारा माणूस एखाद्या कार्यक्रमाला जायचे झाले की नटतो, आणि तो आपले दिसणे लोकांच्या नजरेत भरावे असा प्रयत्न करत असतो. सागाचेही अगदी तसेच असते. वर्षभर रूक्ष भासणारा, दिसणारा साग पावसाळ्यात मात्र सौंदर्याने भरलेला असतो. सागाला पाहिल्यानंतर एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे, नेत्रसुखापलिकडे काहीही न देणाऱ्या गुलमोहोराच्या सौंदर्याचे गोडवे गाणाऱ्या मनाला सदुपयोगी सागाचे हे सौंदर्य का उमजत नसावे?


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts to your email.

Related posts

किंमत…

संघर्षातूनच खरी प्रगती साधली जाते

निवडणुकांसाठीच कृषी कायदे रद्दचा निर्णय ? आपणास काय वाटते…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading