December 2, 2023
India-China-Border-Bumla-pass-Tourism-Spot
Home » भारत चीन सीमेवरील बुमला पास
पर्यटन

भारत चीन सीमेवरील बुमला पास

क्षणाचे महत्व काय असते याचा अनुभव होता पण क्षणाची आणि तीही धोकादायक क्षणांची अनुभूती काय असते हे आज प्रत्यक्ष अनुभवले. स्नो फाल थांबलेला होता. निर्णय झाला की पुढे जावे आणि गाडी पुढे निघाली आणि १२ वाजता बुमला पास १५२०० फुट उंचीवर पोहचलो.

राजन लाखे

काही क्षण असे असतात जे अनुभवताना अविस्मरणीय ठरतात कारण ते क्षण, तशी परिस्थिती, तसे वातावरण पुन्हा येण्याची शक्यता कमी असते. असेच काही क्षण अनुभवले ते अरुणाचल प्रदेश मधील भारत चीनच्या सीमारेषेवर. अरुणाचल प्रदेश राज्य हा भारताचा पुर्वांचल भाग असून पुर्वात्तर सीमा एजन्सी ( north east frontier agency ) NEFA या नावाने हा भाग पुर्वी ओळखल्या जात होता.

१४ मार्च २०२३ ला सकाळी एक उत्सुकता होती ! उत्साह होता ! भारत सीमा रेषेवर जाण्याचा ! १५२०० फुट उंचीवरील वातावरण अनुभवण्याचा ! लाईन ऑफ ऐक्चुअल कण्ट्रोल प्रत्यक्ष बघण्याचा !
भारत चीन सीमारेषा असलेले बुमला पास हे अरुणाचल प्रदेश राज्यातील तवांग या शहरापासून ३७ किलोमिटर अंतरावर १५२०० फुट उंचीवर स्थित आहे. येथे भारतीय सेना आंणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी च्या मध्ये वर्षाला चार बैठकी होतात ज्याला बोर्डर पर्सनल मीटिंग म्हणतात.

येथे क्षणाक्षणाला वातावरणात बदल होतात. क्षणात स्नो फाल होतो तर क्षणात उन पडते. उणे तापमान असलेल्या या क्षेत्रात भारतीय सेना रात्रंदिवस आपले कर्तव्य चोख बजावत असते. अशा उणे तापमान असलेल्या स्थळावर जाण्यासाठी जशी उत्सुकता होती तसे मनावर दडपण ही होते म्हणून तेथील थंडीवर मात करण्यासाठी लागणारे कपडे घालून सकाळी ८ वाजता सज्ज झालो. सकाळीच का? तर याचे उत्तरही मिळाले की येथे दुपारच्या नंतर वातावरणात झपाट्याने बदल होत असतात म्हणून. ठरलेल्या वेळेनुसार ८ वाजता बुमला पास च्या दिशेने रवाना झालो. वाटेत बुमला रस्त्यावर प्रथम १६ किलोमिटर अंतरावर १२९४६ फुटावर तप्सो (Tspso ) लेक लागला ज्यावर बहुतांश बर्फाचा थर बघायला मिळाला अर्थातच चारी बाजुला असलेले प्राकृतिक सौंदर्य नजरेस भरल्याशिवाय राहले नाही.

पुढे गेल्यावर वाय जंक्शन येते. तेथून एक रस्ता खाली माधुरी लेक ला जातो तर वरचा रस्ता बुमला पासला जातो. माधुरी लेक हे प्राकृतिक सौंदर्याने नटलेले अप्रतिम स्थळ आहे. या लेकचे मूळ नाव शौन्गस्तर ( shungatser lake) लेक असे आहे. परंतु १९९५, ९६ ला येथे कोयला फिल्म ची शूटिंग झाली आणि त्यावेळी माधुरी दिक्षीत च्या गाण्याचे या तलावाच्या बाजुला चित्रीकरण झाल्यानंतर या तलावाला माधुरी लेक हे नाव पडले. हा लेक ११८६५ फुट ( ३७०८ मी. ) उंचीवर असून या लेक वर पहाडावरील बर्फाच्छादित पहाडांमधून जाणा-या नागमोडी रस्त्यावरुन ९.४५ वाजता पोहचलो. थंडी “मी” म्हणत होती. गाडीतून उतरताच अतिगार वा-याने सर्वांना घेरले. संरक्षणार्थ उब कपडे होतेच पण वा-याचे उग्र रुप पाहून, डोळे सोडून चेह-याच्या सर्व भागाला झाकून अतिरिक्त संरक्षण द्यावे लागले. असो, पण डोळ्यानी तेथे सौदर्य पहिले, नव्हे अनुभवले त्याला तोड नाही, एवढे म्हणण्यातच सर्व आले. हिरवाईवर शुभ्र ठिपक्यांची नक्षी असलेली चादर ओढलेल्या पहाडांच्या मध्ये जमिनिवर ठेवलेला मोठ्या पारदर्शक काचाचे सौंदर्य ” ह्याची देही ह्याची डोळा ” आम्ही अनुभवत होतो. हिमालयातच भगवान शंकराचा वास आहे. नितळ पाण्यात शिवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी युगानुयुगे तपश्चर्या करणा-या योग्याप्रमाणे निष्पर्ण झाडे आपली मुळे जेथे घट्ट रोवुन जेथे उभी आहेत ते म्हणजे माधुरी जलाशय.

इथला आनंद घेऊन बुमला पास कडे 11 वाजता प्रयाण केले. आधी नमुद केल्याप्रमाणे वाय जंक्शन ला येउन वरच्या बाजुला म्हणजे बुमला पास अर्थात भारत चीन बोर्डरकडे गाडी वळली. तसा तेथून एक तासाचा रस्ता होता. थोडे पुढे गेल्यावर अचानक स्नो फाल सुरु झाला. गाडी पुढे जात होती. रस्त्यावर बर्फाचा थर साचायला लागला. गाडी घसरायला ( स्लिप) लागली. वाहन चालकाने हळूहळू अर्धा किलोमीटर बर्फावरुन गाडी नेली. रस्त्यावर बर्फाचा थर वाढायला लागला. गाडीत माझ्यासोबत असलेल्या काही मित्र मंडळीच्या मनात भीती दाटली.

वाहन चालकाने गाडी थांबवली. बर्फावरुन गाडी घसरू नये म्हणून टायरला बांधायाला चेन काढली. बाहेर बर्फ कोसळत होता. तेवढया कोसळणा-या बर्फात त्याने टायरला चेन बांधली. असा बर्फावरुन चालण्यासाठी चेन बांधताना मी प्रथमच पहिले. येथून परत फिरावे असे काही मंडळींचे मत होते तर काहींचे मत पुढे जावे असे होते पण हे सर्व तेथील परिस्थितीवर अवलंबून होते.
वाहन चालक हिंमतीचा होता त्याने गाडी सुमारे 1 किलोमिटर पुढे नेली. पुढे बुमला पास कडे जाणा-या गाड्या उभ्या होत्या त्यांच्या मागे नेऊन थांबवली. तेथे असे कळले की बर्फामुळे पुढचे रस्ते बंद झाले आहेत तेंव्हा धोका पत्करणे इष्ठ नाही. परत फिरणेच योग्य.

पुढच्या गाड्या वळायला सुरवात झाली तीन गाड्या वळल्यानंतर अचानक स्नो फाल बंद झाला आणि क्षणात चक्क ऊन पडले. थोडा वेळ वाट पहावी असे ठरले कारण वातावरणाचा भरवसा नव्हता.
क्षणाचे महत्व काय असते याचा अनुभव होता पण क्षणाची आणि तीही धोकादायक क्षणांची अनुभूती काय असते हे आज प्रत्यक्ष अनुभवले. स्नो फाल थांबलेला होता. निर्णय झाला की पुढे जावे आणि गाडी पुढे निघाली आणि १२ वाजता बुमला पास १५२०० फुट उंचीवर पोहचलो.

थंडी प्रचंड आणि प्राणवायू कमी, अशा परिस्थीतीत तेथे असलेल्या आर्मी कँटीनला गेलो. आर्मी अधिकाऱ्याने सर्वाना भारत चीन सीमा रेषा (लाईन ऑफ ऐक्चुअल कण्ट्रोल ) दाखवण्याअगोदर तेथील वातावरणाचा त्रास होऊ नये म्हणून १५ मिनिटे बसायला सांगीतले. त्यानंतर तेथील आर्मी अधिकाऱ्याने तेथून २०० मिटर वर असलेल्या बोर्डर रेषे कडे फारच हळूहळू चालायला सांगीतले कारण कमी प्राणवायू असल्याने, श्वासाला होणा-या त्रासाचा अनुभव थोड्या फार प्रमाणात येतच होता. या सीमारेषेवर त्या अधिका-याने १९६२ ला भारतीय सैन्याने केलेले शौर्य आपल्या आर्मीशैलीत कथन केले.

२० ऑक्टोबर १९६२ चीनने जेंव्हा या सीमारेषेच्या आत घुसुन भारतावर आक्रमण करण्याच्या प्रयत्न केला तेंव्हा सुभेदार जोगिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखालील एक नंबर च्या शिख तुकडीने चीनच्या सैन्याशी निकर झुंज दिली. त्यावेळी भारतीय बटालियन मध्ये २७ जवान तर चीनच्या सैन्यात २०० जवान होते. सुभेदार जोगिंदर सिंग यांनी कित्येक चीनच्या सैनिकांना मृत्युचा रस्ता दाखवला आणि त्यांचा हल्ला परतवून लावला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा चीनच्या २०० सैनिक असलेल्या तुकडीने हल्ला केला तेंव्हा जोगिंदर सिंग आणि त्यांच्या साथीदार “जो बोले सो निहाल सत श्री अकाल” अशी आरोळी ठोकून चिनी तुकडीवर तुटून पडले. त्यांना रोखताना झालेल्या युद्धात भारतीय तुकडीकडे असलेला दारुगोळा संपला. तसेच सुभेदार जोगिंदर सिंग जखमी झाले. त्याही परिस्थीतीत त्यांनी स्वत: मशीनगनने कित्येक चिनी सैनिकांना मृत्यूमुखी पाडले. परंतु संख्याबळ कमी पडल्याने टिकाव धरु शकले नाही. चिनी लष्कराने जखमी जोगिंदर सिंग यांना पकडून नेले. त्यांनी चीनचे अन्न पाणी व औषधे घेण्यास नकार दिला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. या लढाईत दाखवलेल्या अतुलनीय शौर्य साहसाबद्दल सुभेदार जोगिंदर सिंग यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

हे शौर्य कथन भारत चीन सीमारेषेवर, भारतीय सैन्याच्या अधिकार-याच्या तोंडून ऐकताना सोबत उपस्थित असलेली सर्व मंडळी अतिशय भावूक झाली होती.
“आम्ही इथे असेपर्यंत चीनला भारताच्या हद्दीत एक इंचही येऊ देणार नाही, त्यासाठी आमचे सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढतील” असे त्या अधिका-याने सांगताच सर्व मंडळींचा ऊर भरुन आला आणि सर्वानी भारत माता की जय असा नारा देऊन एकसाथ सलाम ठोकला.

तो क्षण, ती सीमारेषा, ते वातावरण , येताना आलेला स्नो फालचा अनुभव, उतरल्यानंतर आर्मी अधिका-याशी झालेला संवाद, त्याने केलेले भारतीय सैनिकांचे शौर्यकथन हे सर्वच रोमांचक होते.
या बुमला पासची सीमारेषा आपल्यापैकी कित्येक जणांनी बघितलीही असेल पण ज्यांनी बघितली नाही त्यांनी शक्य असेल तेंव्हा १५२०० फुटावर असलेला हा अनुभव एकदा जरुर अनुभवावा आणि अनुभवल्यानंतर तेथे बलिदान दिलेल्या आपल्या भारतीय सैनिकांची शौर्यगाथा आर्मी अधिका-याच्या तोंडून भारत चीन सीमारेषेवर प्रत्यक्ष ऐकताना ऊर भरुन आला नाही तरच नवल!

Related posts

पोवारी बोली संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – ॲड. लखनसिंह कटरे

Saloni Art : ट्रान्सफॉर्मर कार तयार करायची आहे ? मग पाहा हा व्हिडिओ…

महर्षी शिंदेंना टिळकांनी या प्रश्नावर स्वाक्षरी देणे टाळले – डॉ. जनार्दन वाघमारे

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More