भूल देण्याचा इतिहास हा मानवाचे दु:ख, वेदना कमी करण्यासाठी संशोधकांनी केलेल्या प्रयत्नाचा इतिहास आहे. तो प्राचीन काळात अफुपासून सुरू झाला. अफूचा वेदनाशामक म्हणून वापर थांबला आणि मादक पदार्थ म्हणून वापर आणि व्यापार वाढला. वनस्पतींपासून सुरू झालेला हा प्रवास रासायनिक भूलीपर्यंत पोहोचला आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
अपघात झाला की लोकांच्या वेदना आणि त्यामुळे त्यांचे विव्हळणे ऐकणे खूप त्रासदायक असते. अशा लोकांना होणारा त्रास, अगदी डॉक्टरनाही पाहवत नसे. अशा लोकांचा निखळलेला सांधा जोडणे, हाडे जोडणे डॉक्टरना कठीण होत असे. आजकाल मात्र हे काम भलतेच सोपे झाले आहे. अशा रूग्णांना काही काळासाठी बेशुद्ध करून, त्यांच्या शरीराचा तो भाग बधीर करून, सहज उपचार केले जातात. हे शक्य झाले आहे ते भूलीचा शोध लागल्यामुळे!
भुलीचा इतिहास मोठा आहे. हिप्पोक्रॅटिक कॉर्पस आणि संवाद टिमियस या प्राचीन ग्रंथामध्ये सर्वप्रथम ॲनेस्थिशिया हा शब्द वापरण्यात आला आहे. ॲनेस्थिशिया म्हणजे संवेदनाहीन किंवा संवेदनाशिवाय. १६७९ मध्ये स्टीव्हन ब्लॅकार्टने लॅटिन भाषेतील वैद्यक परिभाषा कोशात हा शब्द सर्वप्रथम वापरला. मात्र त्याही अगोदर प्रागैतिहासिक काळात वनस्पतींपासून तयार केलेले अल्कोहोल वेदनाशामक म्हणून वापरण्यात येत असे. इसवी सन पूर्व सुमारे ४००० वर्षांपूर्वी मेसोपोटेमियामध्ये ते वापरण्यात येत असे.
सुरुवातीस इथेनॉलचा वापर भूल देण्यासाठी करण्यात येत असे. सुमेरियन लोक इसवी सन पूर्व ३४०० वर्षांपूर्वी अफूची लागवड करत. त्या काळात अफूला ‘आनंदाची वनस्पती’ म्हणत. काही भागात अफूला ‘गिल’ असेही म्हणत. सुमेरियन देवता ‘निदाबा’च्या खांद्यातून अफूची झाडे उगवलेली दाखवण्यात येत असत. पुढे सुमेरियन राज्य बॅबिलोनियन साम्राज्याचा भाग बनले आणि अफू त्यांना माहीत झाली. त्यांनी पर्शिया आणि इजिप्तपर्यंत अफू नेली. पुढे इजिप्शियन लोकांनी मॅन्ड्रेक फळांपासूनचा अर्क आणि अफू यांचे मिश्रण करून वेदनाशामक बनवले. साहित्यामध्ये अठराव्या शतकात लिहिलेल्या ‘इजिप्शियन वैद्यकीय पॅपिरस’ या ग्रंथामध्ये शस्त्रक्रियेत अफूचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो. ग्रीक संस्कृतीतील झोपेची देवता हिप्नोस, रात्रीची देवता निक्स आणि मृत्यूची देवता थानाटोस यांना चित्रीत करताना अफूची बोंडे वापरण्यात येत असत. त्याहीपूर्वी भारत आणि चीनमध्ये कॅनॅबीस धूप आणि ॲकोनिटमचा भूल देण्यासाठी वापर करत असत. इसवी सन पूर्व ४०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथात भूल देण्यासाठी कॅनॅबीसच्या धूपासह मद्याचा वापर करण्यासंदर्भात उल्लेख येतात. आठव्या शतकात अरब व्यापाऱ्यानी अफू भारतात आणि चीनमध्ये पोहोचवली.
फिरदौसी या दहाव्या शतकातील पर्शियन कवीने त्याच्या महाकाव्य ‘शाहनामेह’मध्ये रूदाबावर केलेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वर्णनात विशिष्ट पद्धतीने तयार केलेली दारू वापरल्याचा उल्लेख येतो. १०२० च्या दरम्यान डब्न सिना यांच्या ‘द कॅनन ऑफ मेडिसीन’मध्ये सुगंधी पदार्थ आणि मादक पदार्थांचा स्पंज वेदनाशामक म्हणून वापरल्याचा उल्लेख आढळतो. हा स्पंज नाकाजवळ ठेवण्यात येत असे. दहाव्या ते तेराव्या शतकापर्यंत अफू युरोप आणि आशियात पोहोचली. इग्लंडमध्ये १२००-१५०० या काळात ड्वेल नावाचे औषध भूल म्हणून वापरत असत. यामध्ये अल्कोहोल, अफू, लेट्युस, ब्रायोनी, हेनबेन, हेमलॉक आणि व्हिनेगर यांचा वापर करण्यात येत असे. हॅम्लेट या नाटकात आणि ओड टू अ नाईटिंगेल या कवितेमध्ये ड्वेलचा उल्लेख आढळतो. तेराव्या शतकात कच्च्या तुती, अंबाडी, मॅड्रागोराची पाने, आयव्ही, लेट्युसच्या बिया, लॅपॅथम आणि हेमलॉकच्या रसामध्ये भिजवलेला स्पंज वापरण्यात येत असे.
पुढे १२७५ मध्ये डायइथिल इथर हे रॅमन लुल या रसायनशास्त्रज्ञाने शोधले. त्यांनतर जवळपास अडीचशे वर्षांनंतर त्याचे वेदनाशामक गुणधर्म संशोधक पॅरासेल्सस यांनी शोधले. १५४० मध्ये त्याचा व्हॅलेरियस कॉर्डस यांनी प्रथमच त्याचे विश्लेषण करून औषधी गुणधर्माची नोंद केली. पुढे यालाच ऑगस्ट सिगमंड फ्रोगेनिया यांनी १७३० मध्ये ‘स्पिरिटस विनी एथेरियस’ नाव दिले. पुढे जोसेफ प्रिस्टले यांनी नायट्रस ऑक्साईड, नायट्रीक ऑक्साईड, अमोनिया, हायड्रोजन क्लोराईड इत्यादी संयुगाचा शोध लावला. त्यांनी ऑक्सिजनचाही शोध लावला. त्यांच्या पुस्तकात विविध संयुगांचे वर्णन आल्यानंतर त्यांचे गुणधर्म अभ्यासले जाऊ लागले.
थॉमस बेडोस (१७६०-१८०८) यांनी औषधोपचारासाठी वायुंचा वापर कसा करता येईल हे अभ्यासण्यासाठी एका संस्थेची स्थापना केली. या संस्थेत हंफ्रे डेव्ही आणि प्रिस्टलेही सहभागी झाले. येथेच डेव्ही यांनी नायट्रस ऑक्साईडचे भूल देणारे गुणधर्म शोधले. जपानी संशोधक हानाओका सेईशु यांनी अनेक वनस्पतींचा वापर करून एक त्सुत्सेन्सन हे वेदनाशामक बनवले होते. १७९६ मध्ये शुतेई नाकागावा यांनी एका ६० वर्षीय महिलेची स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया त्सुत्सेन्सन वेदनाशामक वापरून केली. अशा १५०पेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. १९व्या शतकात दंतवैद्य फ्रेडरिक सर्टनर यांनी अफूपासून मॉर्फिन वेगळे केले. स्वप्नांचा ग्रीक देव मॉर्फियसच्या नावावरून हे नाव दिले.
१८२० मध्ये हेन्री हिल हिकमननी कार्बन डायऑक्साईडचा भूल देण्यासाठी वापर केला. हिकमन यांना आज भूलशास्त्राचे जनक मानले जाते. त्याचवेळी डेव्ही यांचे संशोधन सर्वत्र चर्चेत आले होते. विविध वायुच्या खोलीत प्रत्यक्ष त्या वायुचे गुणधर्म अनुभवणाऱ्या एलिजा पोप यांनी १८३९मध्ये प्रथमच वायुचा भूल म्हणून वापर करून दात काढले. ही पहिली शस्त्रक्रिया होती. क्रॉफर्ड लॉग यांनी इथरचा वापर करून शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रथमच इनहेलशनद्वारे इथर देऊन रूग्णांना संवेदनाहीन केले. मात्र त्यांनी आपले अनुभव प्रकाशित केले नाहीत.
पुढे १६ ऑक्टोबर १८४६ मध्ये बोस्टन येथे विल्यम मॉर्टन यांनी इथरच्या सहाय्याने भूल देऊन शस्त्रक्रिया करण्याचे पहिले जाहीर प्रात्यक्षिक केले. हा दिवस आधुनिक भूलशास्त्राचा जन्मदिन मानला जातो आणि १६ ऑक्टोबर ‘इथर डे’ म्हणून साजरा केला जातो. मात्र सामान्य भूलशास्त्राचे जनक म्हणून जॉन स्नो यांना ओळखले जाते. त्यांनी क्लोरोफॉर्मचा वापर आणि भूल देण्याचे शास्त्र विकसीत केले. क्लोरोफॉर्म, क्लोरोएथिल आणि इतर अनेक भूल देणारी औषधे पुढे शोधण्यात आली. आज भूल देणे हे सर्वांनाच सवयीचे झाले आहे. सुरुवातीस भूलीची मात्रा जास्त झाल्याने काही शस्त्रक्रियांमध्ये रूग्ण दगावल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे एखाद्या रूग्णाची शारीरिक अवस्था पाहून त्याला किती मात्रा द्यावी, याचे प्रमाण निश्चित करण्यात आले. तसेच अत्याधुनिक उपकरणांमुळे भूल देणे सहज, सोपे आणि सुरक्षित झाले.
भूल देण्याचा इतिहास हा मानवाचे दु:ख, वेदना कमी करण्यासाठी संशोधकांनी केलेल्या प्रयत्नाचा इतिहास आहे. तो प्राचीन काळात अफुपासून सुरू झाला. अफूचा वेदनाशामक म्हणून वापर थांबला आणि मादक पदार्थ म्हणून वापर आणि व्यापार वाढला. वनस्पतींपासून सुरू झालेला हा प्रवास रासायनिक भूलीपर्यंत पोहोचला आहे. मानवाच्या जीवनातील शारीरिक वेदना कमी करण्यात भूलशास्त्राने मोठे योगदान दिले. तसेच शस्त्रक्रिया तंत्रच बदलले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
