April 26, 2024
Increase sattvic qualities for self-knowledge development
Home » आत्मज्ञान विकासासाठी वाढवा सात्विक गुण
विश्वाचे आर्त

आत्मज्ञान विकासासाठी वाढवा सात्विक गुण

प्राण्यामध्ये सत, रज, तम हे त्रिगुण असतात. हे गुण प्रत्येक प्राण्याच्या वाट्याला आलेले आहेत. त्यात बदल होत नाही. पण त्याची तिव्रता कमी जास्त करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. सात्विक गुणांची वृद्धी होण्यासाठी, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी राजस आणि तामस गुण त्यात मिसळणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

बीज मोडे झाड होये । झाड मोडे बिजी सामाये ।
ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ।। ५९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा

ओवीचा अर्थ – बीज नाहीसे होऊन त्याचे झाड होते. झाड नाहीसे होऊन त्याचा बीजांत समावेश होतो. हा क्रम कोट्यावधी कल्पे चालला तरी झाडाची जात नष्ट होत नाही.

वाढत्या लोकसंख्येचा तुलनेत शेतीमालाचे उत्पादनही वाढणे तितकेच गरजेचे आहे. अन्यथा भुकबळी, कुपोषणाची समस्या वाढेल. यातूनच संकरित बियाण्यांचा शोध लागला. आता तर उत्पादन वाढीसाठी, गुणवत्तेसाठी बीजाच्या जनुकिय रचनेतच बदल केला जात आहे. त्यामध्ये अन्य प्राण्याचीही जनुके मिसळण्यात येत आहेत. अशाने उत्पादन जरूर वाढले आहे. पण मुळ बियाण्यात भेसळही वाढत आहे. त्याबरोबरच उत्पादिक बियाण्यापासून पुन्हा बीज तयार होत नाही हेही विचारात घ्यायला हवे. संकरित बियाणे उत्पादन हे दरवर्षी घ्यावे लागते. निसर्गानेच तशी योजना केली आहे. निसर्गाचा हा नियम विचारात घेण्यासारखा आहे. जबरदस्तीने तुम्ही काही बदल करत असाल तर त्याला निसर्गानेच मर्यादा घालून दिली आहे. हे विचारात घेण्याची गरज आहे.

पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन ही आता गरज झाली आहे. उत्पादनवाढीच्या हव्यासापोटी, बीजाची गुणवत्ता वाढावी, चव सुधारावी, किड-रोगांपासून झाडाचे संरक्षण व्हावे या व अशा अनेक कारणांसाठी बियाण्यात जनुकिय बदल घडवून आणले जात आहेत. जनुकिय रचना बदलून उच्च प्रतिचे बियाणे तयार केले जात आहे. यामुळे उत्पादन जरूर वाढले आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे संकरित, जनुकिय बदलाचे बियाणे दरवर्षी नव्याने घ्यावे लागते. कारण या बियाण्याला येणाऱ्या झाडातून बीज उत्पन्न होते पण ते वांझ असते. ते उगवत नाही. संकरित बियाण्यापासून वांझ बियाणे उत्पादित होते. यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात अशा संकरित बियाण्याचे उत्पादन घ्यावे लागत आहे. ही बदलत्या काळाची गरज आहे हे जरी खरे असले तरी याला निसर्गानेच मर्यादा घालून दिली आहे याचाही विचार होणे गरजेचे आहे.

संकरित बियाण्यांची गुणवत्ताही काही कालावधीनंतर कमी होते. त्यालासुद्धा कालमर्यादा आहे. त्यामुळे त्या संकरित बियाण्यातही उच्च प्रतिचे बियाणे तयार करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करावे लागतात. संकरित बियाणे हे पारंपारिक बियाण्यात संकर घडवून घेतले जाते. यासाठी पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन हे गरजेचे आहे. हे लक्षात घ्यायला हवे. पारंपारिक बियाणे पेरले की उगवते. त्यापासून उत्पादित होणारे झाड व त्यास लागणारे बीज हे वांझ नसते. म्हणजे त्याची जात ही नष्ट होत नाही. अशा बियाण्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यात अन्य बियाण्यांची भेसळ होणार नाही. यात अन्य बिजाचा संकर होणार नाही. याची काळजी घ्यावी लागते. या पारंपारिक बियाण्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी ही भेसळ रोखणे गरजेचे असते.

प्राण्यामध्ये सत, रज, तम हे त्रिगुण असतात. हे गुण प्रत्येक प्राण्याच्या वाट्याला आलेले आहेत. त्यात बदल होत नाही. पण त्याची तिव्रता कमी जास्त करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. सात्विक गुणांची वृद्धी होण्यासाठी, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी राजस आणि तामस गुण त्यात मिसळणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. राजस आणि तामस गुणांची भेसळ रोखता आल्यास सात्विक गुणांची वाढ जोमाने होईल. आत्मज्ञानाच्या विकासासाठी, तो मार्ग सुकर होण्यासाठी सात्विक गुणांची वृद्धी ही गरजेची आहे. सात्विक विचार वाढावेत यासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आत्मज्ञानाची परंपरा ही पूर्वापार चालत आली आहे. पण यासाठी सात्विक गुणांची वाढ ही तितकीच गरजेची आहे. म्हणजेच संकरित बियाणे उच्च प्रतिचे, उच्च गुणवत्तेचे कसे तयार होईल असा प्रयत्न असतो. तसाच प्रयत्न सात्विक गुणांच्या वाढीतून करणे आवश्यक आहे. प्राण्यात सात्विक गुणांची वृद्धी झाल्यास अन् त्यात रज, तमची भेसळ रोखल्यास आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होऊ शकेल.

Related posts

प्रेम उठाव परिवर्तन चळवळीच्या अंगाने जाणारा काव्यसंग्रह…..

नित्य सिद्ध आत्म्यास जाणणे हेच आत्मज्ञान

सत्याने संशयावर करा मात

Leave a Comment