October 26, 2025
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवरील शिवसेनेचा ठाम विरोध आजही कायम. ऑपरेशन सिंदूरपासून ‘माझं कुंकू माझा देश’ मोहिमेपर्यंतचा प्रवास व राजकीय घडामोडींचा आढावा.
Home » पाकिस्तानबरोबर क्रिकेट, ऑपरेशन सिंदूर ते माझं कुंकू…
सत्ता संघर्ष

पाकिस्तानबरोबर क्रिकेट, ऑपरेशन सिंदूर ते माझं कुंकू…

इंडिया कॉलिंग

Sukrut Khandekar

भारत पाकिस्तान सामना बघण्याचे आकर्षण मोठे असते. पण यावेळी लोकांमधे फारशी उत्सकता नव्हती. भारताने सामना जिंकल्यावरही जसे नेहमी फटाक्यांची आतषबाजी नाक्या नाक्यावर, चौका- चौकात होते तशी यावेळी बघायला मिळाली नाही. फटाक्यांच्या माळांचा आवाजही कुठे दणादणाला नाही. पहलगाम हत्याकांडानंतर पाकिस्तानविषयी लोकांच्या मनात असलेली चीड कमी झालेली नाही.
– डॉ. सुकृत खांडेकर

भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्याला उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने नेहमीच विरोध केलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानापासूनचा हा विरोध आजही कायम आहे. जम्मू काश्मीरमधे पाकिस्तानप्रेरीत दहशतवाद थांबत नाही तोपर्यत भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नये अशी शिवसेनाप्रमुखांची रोखठोक भूमिका होती. जम्मू- काश्मीरमधे जोपर्यंत हिंदुंचे रक्त सांडलो जात आहेत तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळता येणार नाही, दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाहीत अशी गर्जना शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा केली होती. शिवसेनाप्रमुखांच्या घोषणेमागे निव्वळ कठोर देशभक्ति व देशप्रेम होते. तेव्हा भाजप व ठाकरेंची शिवसेना यांच्यात महाराष्ट्रात युती होती. ठाकरेंच्या भूमिकेला छेद देण्याची तेव्हा भाजपच्या कोणाही नेत्याची हिम्मत नव्हती. ठाकरेंचे बोट धरून महाराष्ट्रात भाजप वाढत होती. तेव्हा ठाकरे म्हणतात ते भाजपला शंभर टक्के बरोबर वाटत असे. मग आता ठाकरेंच्या शिवसेनेने भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध केला म्हणून भाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडत आहेत. विशेष म्हणजे काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी एप्रिल महिन्यात हिंदू पर्यटकांवर पाँईंट ब्लँक गोळ्या झाडल्या व २६ जणांची हत्या केली. या घटनेला पाच महिनेही झाले नसताना भारताने पाकिस्तानबरोबर दुबईत जाऊन क्रिकेट सामना खेळायची गरज होती का ? या सामन्यातून कोट्यवधी रूपयांची दोन्ही देशांना कमाई झाली असेल पण भारतातील कोट्यवधी जनता मात्र नाराज झाली . पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याचा निर्णय देशातील बहुसंख्य जनतेला पटलेला नाही .

दुबईला पाकिस्तानबरोबर सामना खेळण्याचा निर्णय केंद्र सरकारचा आहे, नियामक मंडळ व खेळाडूंना तो मान्य करणे भाग पडले, असे सुनिल गावस्कर यांनी म्हटले आहे. माझ्या लोकांचे रक्त सांडले, ज्यांनी ते सांडवले त्यांच्यासोबत आम्ही का खेळावे , असा सवाल नाना पाटेकर यांनी विचारला आहे. या सामन्याने आपण निराश झालो, खेळलो नसतो तर भारत आशियायी चषक स्पर्धेतून बाद झाला असता का ? असा प्रश्न अॅडगुरू भरत दाभोळकर यांनी विचारला आहे. रशियातील ऑलिम्पिकवर अमेरिकेने बहिष्कार घातला होता नि अमेरिकेतील ऑलिम्पिकवर रशियाने बहिष्कार घातला होता , याची आठवण करून दिली जात आहे. बहिणीच्या कुंकवापेक्षा ( मंत्र्यांच्या ) लेकाचे करिअर महत्वाचे अशी उपरोधिक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला विरोध म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने माझं कुंकू, माझा देश ही मोहीम राबवली. पक्षाच्या महिलांनी घरोघरी जाऊन जमा केलेल्या कुंकवाचे पार्सल दिल्लीला पंतप्रधानांकडे पाठवून दिले. भारत पाकिस्तान सामन्याला आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, आयएमआयएमचे अससुद्दीन ओवेसी यांनीही जाहीरपणे विरोध केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शांत राहणे पसंत केले. पहलगाम येथे झालेल्या निर्घृण हत्याकांडानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवून पाकिस्तानला धडा शिकविण्याचा प्रयत्न केला. शंभरपेक्षा जास्त दहशतवादी त्यात ठार झाले, पाकिस्तानमधील नऊ हवाई तळांवर भारतीय लढाऊ विमानांनी हल्ले केले. भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. रक्त आणि पाणी एकाचवेळी वाहू शकत नाही, असे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावले. मग रक्त आणि क्रिकेट एकाच वेळी कसे चालू शकते, असा भेदक सवाल उध्दव ठाकरे यांनी केला. देशात क्रिकेटप्रेमींची संख्या कोट्यवधी आहे. भारत पाकिस्तान सामना बघण्याचे आकर्षण मोठे असते. पण यावेळी लोकांमधे फारशी उत्सकता नव्हती. भारताने सामना जिंकल्यावरही जसे नेहमी फटाक्यांची आतषबाजी नाक्या नाक्यावर, चौका- चौकात होते तशी यावेळी बघायला मिळाली नाही. फटाक्यांच्या माळांचा आवाजही कुठे दणादणाला नाही. पहलगाम हत्याकांडानंतर पाकिस्तानविषयी लोकांच्या मनात असलेली चीड कमी झालेली नाही.

भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्याविषयी ठाकरेंची शिवसेना नेहमीच आक्रमक राहिली आहे. क्रिकेटपेक्षा राष्ट्रहित महत्वाचे आहे हीच शिवसेनेची त्यामागची भूमिका आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर ऑक्टोबर १९९१ मधे भारत पाकिस्तान क्रिकेट सामना ठरला होता. १८ ऑक्टोबर १९९१ रोजी भारत – पकिस्तान सामना मुंबईत होऊ देणार नाही, अशी घोषणा शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थावरून केली. त्यावेळी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. सामना होणारच, टीव्हीवरून थेट प्रक्षेपण होईल असेही त्यांनी जाहीर केले. शिवसेनाप्रमुखांचे कडवट शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी मुलुंडमधील त्यांचे सहकारी राज केतकर, संजय घागरे, विलास पालवे, गणेश म्हात्रे, आदी शिवसैनिक बरोबर घेऊन २१ ऑक्टोबर १९९१ रोजी स्टेडियमवर धडक मारली व कुदळीचे घाव घालून तेथील धावपट्टीच उखडून टाकली. एवढेच नव्हे तर धावपट्टीवर त्यांनी इंजिन ऑईल ओतले. त्यावर सामना खेळता येणार नाही अशी व्यवस्था केली. या घटनेची बातमी सर्वप्रथम बीबीसीने दिली. शिवसेना व शिशिर शिंदेचे नाव जगात पोचले. त्यांच्या आंदोलनाने सामना रद्द करणे भाग पडले. पोलिसांनी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. रात्रभर त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात ठेवले. दुसऱ्या दिवशी कोर्टात जामीन मिळाल्यावर ते सर्व विजयी वीरांच्या थाटात मातोश्रीवर शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनाप्रमुख स्वत: मातोश्रीच्या पायऱ्या उतरून खाली आले व त्यांच्या पाठिवरून हात फिरवून त्यांचे कौतुक केले. नंतर नगरसेवक व दोन वेळा आमदार झालेले शिशिर शिंदे आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उपनेते आहेत.

जानेवारी १९९९ मधे दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर ( अरूण जेटली स्टेडियम ) भारत पाकिस्तान सामना ठरला होता पण तेथेही मुंबई प्रमाणेच शिवसैनिकांनी मैदानावर घुसून धावपट्टीची नासधूस केली. १९९३ मधे मुंबईत बॉम्बस्फोटाची मालिका घडविणाऱ्या कुविख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीमला पाकिस्तानने अगोदर भारताच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी कोटला मैदानावरील सामन्याला शिवसेनेने विरोध केला होता. हा सामना रद्द न करता पुढे ढलकण्यात आला व तो सामना चेन्नईला झाला. नंतर मात्र दुसरा सामना दिल्लीला घेण्यात आला. कोटला मैदानावरील याच सामन्यात अनिल कुंबळेने दहा गडी बाद करून विश्वविक्रम करणारा दुसरा गोलंदाज असा सन्मान मिळवला.

भारत पाकिस्तान सामन्याला विरोध म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेने ऑक्टोबर २०१५ मधे मुंबईत पुन्हा आपला हिसका दाखवला. तेव्हा बीसीसीआयचे मुख्यालय मुंबईतच होते. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहारयर खान यांची बैठक होणार होती. शिवसैनिकांनी बीसीसीआयच्या कार्यालयावरच हल्ला केला व मोठी नासधूस केली. शिवसैनिकांनी तेथे पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. अखेर भारत व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांची बैठक रद्द करणे भाग पडले.

भाजप व ठाकरेंची शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण झाल्यापासून भाजपने आपली वेगळी भूमिका मांडायला सुरूवात केली. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला ठाकरेंचा एवढा विरोध होता तर मग जावेद मियाँदाद या पाकिस्तानी क्रिकेटपटूला त्यांनी मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण का दिले असा प्रश्न भाजपने विचारायला सुरूवात केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत, म्हणून ठाकरेंची शिवसेना अमित शहांना टार्गेट करीत आहे. पाकिस्तानबरोबर सामना झाला त्याचा जाब मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेल्या शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकरांना विचारा असा पलटवार भाजपने ठाकरे सेनेवर केला आहे. भाजपचे मंत्री आशीश शेलार हेही आशियायी क्रिकेट परिषदेचे सदस्य आहेत अशी आठवण ठाकरेंची शिवसेना करून देत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading