June 19, 2024
Incubator accelerator and 46 starts up wins national award
Home » एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सीलरेटरसह 46 स्टार्टअप्सना राष्ट्रीय पारितोषिक
काय चाललयं अवतीभवती

एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सीलरेटरसह 46 स्टार्टअप्सना राष्ट्रीय पारितोषिक

राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिक विजेते म्हणून  एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सीलरेटरसह 46 स्टार्टअप्सच्या नावांची घोषणा

“स्टार्ट अप इंडिया म्हणजे लाखो लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा मार्ग आहे,” असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. वर्ष 2021 साठीच्या राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार समारंभात बोलताना ते म्हणाले की, स्टार्ट अप अभियान हे आत्म-निर्भर आणि आत्म-विश्वासपूर्ण भारताचे प्रतीक आहे.

“चेन्नई येथील एका मच्छिमाराचा मुलगा असो किंवा काश्मीरमध्ये बोट चालविणाऱ्याची मुलगी, या सर्वांनाच त्यांच्या कुटुंबांसाठी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी समृद्धता आणायची आहे आणि म्हणूनच ते अधिक मोठ्या प्रमाणावर आणि अधिक धाडसाने विचार करत आहेत”, असे गोयल पुढे म्हणाले.

भारताला जगातील पहिल्या क्रमांकाची स्टार्टअप व्यवस्था म्हणून घडविण्यासाठी मुख्यतः पाच क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यक्त केली:

1. समस्यांवरील उपाय आणि साहित्य भारतीय भाषांमध्ये विकसित करणे

2. अधिक मोठ्या प्रमाणावर सामाजिक तसेच आर्थिक परिणाम घडविणारी उत्पादने आणि उपाय यांना प्रोत्साहन देणे.

3. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात स्टार्ट अप्सच्या विकासाला प्रोत्साहन देणे- प्रत्येक जिल्ह्यात ‘स्टार्ट अपपर्यंत पोहोचण्याची सुविधा देणारी केंद्रे’ स्थापन करणे.

4. नागरी स्थानिक संस्थांच्या पातळीवर अभिनव संशोधन विभाग निर्माण करणे आणि

5. जगभरातील उत्तम प्रक्रिया आत्मसात करणे आणि भारताची वैश्विक स्पर्धात्मकता अधिक वाढविणे.

या सन्मान सोहळ्यासोबतच राष्ट्रीय स्टार्टअप पारितोषिकांच्या पहिल्या आवृत्तीमधील अंतिम फेरीच्या विजेत्यांना वर्षभर देण्यात आलेले सहकार्यात्मक पाठबळ आणि 2021 च्या राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिकांचा संपूर्ण प्रवास याविषयीच्या माहितीवर भर देणारा ई-अहवाल देखील जारी करण्यात आला.

या कार्यक्रमात 2021 च्या राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिक स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी, एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सीलरेटरसह एकूण 46 स्टार्ट अप्सच्या नावांची घोषणा करण्यात आली.

या स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये 15 क्षेत्रे आणि 49 उप-क्षेत्रे यांमधून अर्ज मागविले आहेत. यामध्ये कृषी, पशुपालन, पेयजल, शिक्षण आणि कौशल्यविकास, उर्जा, उद्योग तंत्रज्ञान, पर्यावरण, आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, आरोग्य आणि स्वास्थ्य, उद्योग 4.0, अवकाश क्षेत्र तसेच वाहतूक आणि प्रवास या क्षेत्रांचा समावेश आहे. 

समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या विलक्षण स्टार्टअप्सच्या कार्याला ओळख प्राप्त करून देण्यासाठी सहा विशेष श्रेणी देखील निर्माण केल्या होत्या. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी नवोन्मेषी उपाय शोधणाऱ्या तसेच कोविड-19 महामारी विरुद्ध राष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या उपाययोजनांना पूरक ठरणारे कार्य करणाऱ्या असामान्य स्टार्ट अप्सना देखील या पुरस्कारांच्या 2021च्या आवृत्तीमध्ये सन्मानित करण्यात आले.

जांभळी क्रांतीत महत्त्वपूर्ण योगदान

“जांभळी क्रांती” हे “स्टार्ट-अप्स इंडिया” मध्ये जम्मू आणि काश्मीरने दिलेले महत्वपूर्ण योगदान आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, (राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण  व निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये स्टार्ट अप्स इंडियाचा प्रारंभ केला आणि आज आपण पहिला राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस साजरा करत आहोत, असे सिंग यांनी सांगितले.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) माध्यमातून सुरू केलेल्या सुगंध अभियानाबद्दल त्यांनी माहिती दिली.  या अभियानामुळे भारतात सुप्रसिद्ध “जांभळी क्रांती” झाली आहे, असे त्यांनी सांगितले. सीएसायआरने सुरुवातीला डोडा, किश्तवार, राजौरी या जिल्ह्यांमध्ये आणि नंतर रामबन, पुलवामासह इतर जिल्ह्यांमध्ये लागवडीसाठी जम्मू स्थित प्रयोगशाळेच्या साहाय्याने, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन्स (IIIM) द्वारे उच्च-मूल्याचे  तेल असलेल्या लव्हेन्डर पीकाद्वारे सुरुवात केली,अशी माहिती सिंग यांनी दिली. 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  सीएसआयआरने टप्पा -I पूर्ण झाल्यानंतर सुगंध अभियानाचा  टप्पा-II सुरू केला आहे अशी घोषणा डॉ जितेंद्र सिंह यांनी  केली. टप्पा- I   मध्ये सीएसआयआरने 6000 हेक्टर जमिनीवर लागवड करण्यास मदत केली आणि देशभरातील 46 आकांक्षीत जिल्ह्यांचा समावेश केला. 44,000 हून अधिक लोकांना प्रशिक्षित केले गेले आणि कोट्यवधींची उत्पन्न निर्मिती झाली.

Related posts

कागदी लिंबाकरिता हस्तबहराचे नियोजन

मोहाची पोळी (मोहाची पुरणपोळी) – विदर्भाची खाद्यसंस्कृती

दहा वर्षाच्या संदीपचे १३ गोष्टींचे पुस्तक प्रकाशित

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406