April 2, 2025
A grand literary conference in Telangana celebrating the thoughts and contributions of Rashtrasant Tukdoji Maharaj, with scholars discussing his impact.
Home » राष्ट्रसंत साहित्य विचारकृतीचा तेलंगानात डंका
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत साहित्य विचारकृतीचा तेलंगानात डंका

सांगडी (तेलंगणा राज्य) येथे झालेल्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनावर एक दृष्टिक्षेप…

🖊️ डॉ. धर्मा वाघुजी गावंडे
सदस्य , राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन समिती
भ्रमणध्वनी – 9421720676

‘वाड.मयी सेवा सेवाची जाण ।
जेणे मार्गी लागती जण ।
जन जन तितका जनार्दन । जाणूनी कार्य करावे’ ।। ग्रामगीता

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील पहिल्या अध्यायातील ही साहित्य विषयक ओवी खूप काही सांगून जाते. वंदनीय महाराजांनी समाज परिवर्तनासाठी आपल्या सद्विचारांच्या दीपाने जगातील अंधःकार दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजाची चिंता वाहिली. जनहित व राष्ट्रहितासाठी झटले. जनतेच्या मार्गदर्शनासाठी समाज घटना म्हणजेच ग्रामगीता लिहिली. नवभारताच्या निर्मितीत ग्राम सुधारण्याचे महत्त्व ओळखून ग्रामीण जनतेला प्रेरणा दिली. त्यांच्या साहित्यामुळे अनेक गावे स्वच्छ ग्राम, तंटामुक्त ग्राम, आदर्श गाव, सुंदर गाव म्हणून नावारूपास येत आहे. या गावांनी ग्रामगीतेतून कार्य प्रेरणा घेतलेली आहे.

राष्ट्रसंतांच्या विचारांचा साहित्यांचा प्रचार प्रसार ठिकठिकाणी होत राहावा, जनतेने बोध घ्यावा, समाज जीवनात सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती २००३ पासून दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे आयोजन करीत असते. राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक तथा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस अॅड. राजेंद्र जेणेकर, विलास उगे, श्रीकांत धोटे, डॉ. बानासुरे, संजय वैद्य आणि संपूर्ण समिती राष्ट्रसंतांच्या विचारांच्या प्रचारार्थ करीत असलेले साहित्य सेवाकार्य अतिशय कौतुकास्पद आहे.

यावर्षीचे १९ वे आंतरराज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार कृती संमेलन सांगडी येथे गेल्या ६ व ७ मार्च २०२५ रोजी झाले. आदिलाबाद जिल्ह्यातील सांगडी हे भौगोलिक दृष्ट्या अतिशय संपन्न असा वारसा लाभलेलं गाव आहे. तेथील पैनगंगा नदी ही उत्तर वाहिनी आहे. तेथील जमीन अतिशय सुपीक असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पन्न असल्याचे बोलल्या जाते. त्या गावांमध्ये डॉ. मोतीजी महाराज गुरुदेव सेवाश्रम आहे. सर्व जाती धर्माचे लोक निःशुल्क अशी सेवा त्या ठिकाणी देत असते. राष्ट्रसंतांचे निस्सिम सेवक कर्मयोगी डॉ. मोतीजी महाराज हे या गावाचे श्रद्धास्थान आहे. सामुदायिक प्रार्थना मंदिराच्या परिसरात त्यांची पावन समाधी आहे. तसेच गावाच्या जैनत मार्गावर डॉ. मोतीजी महाराज फंक्शन हॉल भव्य स्वरूपात उभा आहे. पैनगंगेला लागून प्रशस्त असे शिवमंदिर निर्माणावस्थेत आहे. गावाजवळच हेमाडपंथी मंदिर सुद्धा आहे. सांगडी गावाला राष्ट्रसंतांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे‌. त्याचप्रमाणे कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य आणि संत बाजीराव महाराज यांनीही येथे भेट दिली होती. डॉ. मोतीजी महाराज हे आयुर्वेदिक तज्ज्ञ होते. त्यांनी आयुष्यभर निःशुल्क सेवा देत अनेकांसाठी ते जीवनदाते ठरले होते. आजन्म ब्रह्मचारी राहून त्यांनी जनतेची सेवा करत संतपदी पोहचले.

अशा या पावन स्थळी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि सांगडी श्रीगुरुदेव सेवा मंडळ, ग्रामस्थांच्या सहकार्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन आदिलाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहासिनी रेड्डी चिट्टाला यांचे हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून पुणे येथील गोविज्ञान अभ्यासक पंढरीनाथ चंदनखेडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाळ पदवाड, नागपूर श्रीगुरुदेव सेवाश्रमाचे अध्यक्ष अशोक यावले, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, युवा फिल्म निर्माते अनुप श्रीरामे, स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे, माजी सैनिक तथा जरूड गावाचे माजी सरपंच सुधाकर मानकर, विजया दहेकर, मारोतराव इचोडकर, विठ्ठल पुनसे, डॉ. चंद्रकांत शहासने, डाखरे महाराज आदींची उपस्थिती होती.

संमेलनाध्यक्ष पंढरीनाथ चंदनखेडे म्हणाले की, साहित्य विश्वातील श्रेष्ठ कलाकृती म्हणजे ग्रामगीता हा ग्रंथ आहे. याच ग्रामगीतेतील पंधरावा अध्याय गोवंश सुधार असून अलीकडच्या काळात गोमातेची घटती संख्या लक्षात घेता गोमातेचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. गोमातेची सेवा करणे म्हणजे मातृत्वाच्या सागराचे महाकाव्य अनुभवणे आहे. गोमाता ही ममतेचा सागर असून ते देशाचे अध्यात्म शास्त्र आहे, असे संमेलनाध्यक्ष श्री. चंदनखेडे म्हणाले.

यावेळी सुहासिनी रेड्डी म्हणाल्या की, राष्ट्रसंताचे समग्र साहित्य मानवतावादी तसेच परिवर्तनवादी आहे. त्यामुळे हे साहित्य नव्या पिढींमध्ये रूजले गेले पाहिजे यासाठी तेलंगणा स्टेट मधील शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

राष्ट्रसंत साहित्य स्वकाळाच्या पलीकडे जाऊन भावी काळाची जडणघडण करण्याची ऊर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले तर एड. यावले यांनी तेलंगण स्टेटमध्ये साहित्य संमेलनाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल परिषदेचे कौतुक केले. डॉ. बाळ पदवाड, अनुप श्रीरामे यांनीही राष्ट्रसंत साहित्यावर प्रकाश टाकला. स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे यांनी सांगडी गावाचा इतिहास आणि डॉ. मोतीजी महाराजांचे योगदान याबाबत विचार मांडले.

सूत्रसंचालन राजेंद्र जेनेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजि. विलास उगे यांनी मानले‌. यावेळी उध्दव साबळे (नागपूर) यांच्या ग्रामगुज या ग्रंथाचे प्रकाशन तसेच केशवराव दशमुखे गुरूजी संपादित गडचिरोली पत्रिकाच्या संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

त्यानंतर दुपारच्या पहिल्या सत्रात ‘श्रीगुरुदेव सेवा मंडळातील माणिक मोती’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. यावेळी गीताचार्य श्री तुकारामदादा यांचे सेवाकार्य आणि लेखन यावर प्रा.डॉ. श्रावण बानासुरे (बल्लारपूर) यांनी प्रकाश टाकला तर, आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या साहित्य लेखन संबंधाने उद्धव साबळे (नागपूर) यांनी विचार मांडले. विठ्ठल डाखरे महाराज (वडगांव) यांनी डॉ . मोतीजी महाराज जीवन व कार्य संबंधित मनोगत व्यक्त केले तर श्रीकांत धोटे (टाकळी) यांनी प्रा. रघुनाथ कडवे यांच्या राष्ट्रसंत साहित्य अनुषंगाने केलेल्या ११५ साहित्य ग्रंथ संबंधाने मौलिक विचार व्यक्त केले.

सूत्रसंचालन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले तर सुरेंद्र चोथले यांनी आभार मानले. सायंकाळच्या सामुदायिक प्रार्थनेवर ज्येष्ठ प्रचारक लटारू मत्ते गुरुजी (राजुरा ) यांचे चिंतन प्रस्तुत झाले.‌ सामुदायिक प्रार्थनेचे नियोजन श्रीकृपा श्रीगुरुदेव सेवा मंडळ राजुरा यांनी केले. संमेलनाध्यक्षाची मुलाखत प्रा. नामदेव मोरे यांनी घेतली तर प्रबोधन संध्या सत्रात सुधाकर चौधरी (गोदोंडा ) यांचे कीर्तन, चेतन ठाकरे व अनुराग मुळे (आरमोरी) यांचे भारूड, पालिकचंद बिसणे(सिंदीपार) यांचे बासरी वादन तसेच पुरूषोत्तम लांजेवार (कवडशी डाक) यांचे एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रम संपन्न झाले.

पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनोहर पासपुते, संजय वैद्य, सुखदेव चौथाले, डॉ. उदार, सुरेंद्र चोथले, चंदू पाथोडे, संजय तीळसम्रृतकर, गणेश भेदोडकर, भूमा रेड्डी तसेच ग्रामस्थ सांगडीच्या आयोजन समितीने अथक परिश्रम घेतले.

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारे विशेष पुरस्कार सुधाकर मानकर, केशव दशमुखे, पुरूषोत्तम लांजेवार, सुधाकर चौधरी, प्रेमेश्वर बारसागडे, मारोती साव, नामदेव पिज्दूरकर तसेच आदर्श विद्यार्थी सन्मान कु. मोक्शा सामावार, कु. तृप्ती मालेकर, सुरीदास अड्डीकवार, वेदन नवघरे यांना प्रदान करण्यात आला. या संमेलनात विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रात विचार कृतीने प्रेरित झालेल्या आणि वृद्ध महिला, गुरुदेव सेवा मंडळातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती अशा बहुसंख्य व्यक्तींचा सन्मान सत्कार करण्यात येतो हे विशेष आहे.

क्षणचित्रे:

१. राष्ट्रसंत साहित्य दिंडीत सांगडी – बेला परिसरातील मोठ्या प्रमाणात गुरुदेव भक्त मंडळी सहभागी झालेली होती.
२. मराठी भाषेच्या अभ्यासकांनी अनेक तेलगू शब्द आपल्या भाषणात वापरून संमेलनात रंगत आणली.
३. सांगडी लगतच्या उत्तर वाहिनी पैनगंगेच्या नदीच्या पात्रात अनेक प्रतिनिधींनी स्नानाचा आनंद घेतला.
४. राष्ट्रसंत साहित्य दिंडीत राष्ट्रसंताची ग्रामगीता, श्री तुकारामगाथा, विवेकानंद साहित्य, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, बायबल , कुराण आणि भारतीय संविधान ग्रंथ ठेवण्यात आले होते.
५. संमेलनाची सुरूवात ग्राम सफाई व सामुदायिक ध्यानाने झाली.

संमेलनाचे समारोप आणि तीन ठराव

राष्ट्रसंताचे साहित्य माणूस या संकल्पनेशी नाते जोडते. त्यांचे साहित्य म्हणजे जीवनसृष्टी देणारे ज्ञानभांडार आहे, ते साहित्य जगणे शिकवते. तसेच राष्ट्रसंतांचे परमशिष्य ब्र. डॉ. मोतीजी महाराज यांनी राष्ट्रसंत साहित्याचा प्रचार आणि प्रसार तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात केला, असे प्रतिपादन आदिलाबाद चे आमदार पायल शंकर यांनी साहित्य विचार साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी केले.

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि सांगडी श्रीगुरुदेव सेवा मंडळ, ग्रामस्थांच्या सहकार्याने सांगडी (मंडल -बेला), जि. आदीलाबाद येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलना समारोप शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष पंढरीनाथ चंदनखेडे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, साहित्य प्रसारक अर्जुन पारूडकर (किल्लारी), परिषदेचे सरचिटणीस राजेंद्र जेनेकर, डाखरे महाराज, कवी अरुण झगडकर (गोंडपिपरी), धम्ममित्र नामदेव गेडकर, चंद्रकांत शहासने (पुणे), स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे आदींची उपस्थिती होती. यावेळी कवयित्री शशिकलाताई गावतुरे (मुल) यांच्या ‘ माह्या झाडीमंदी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पायल शंकर यांच्या हस्ते झाले.

संमेलनात तीन ठराव पारित

१. राष्ट्रसंतांचे साहित्य तेलंगणा स्टेट मधील शालेय तथा विद्यापीठ अभ्यासक्रमात लावण्यात यावे.
२. सांगडी येथील डॉ. मोतीजी महाराज श्रीगुरुदेव सेवाश्रमाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.
३. राष्ट्रसंत विचारधारा अध्यासन तेलंगणा स्टेट मधील सर्व विद्यापीठात सुरू करण्यात यावे.

समारोपिय कार्यक्रमात बळीराम बोबडे, सुभाष पावडे, उध्दव नारनवरे, सचिन झाडे, इंदिरा कुडे, चेतन ठाकरे, विनायक सोयाम, सतिश देवाळकर, प्रल्हाद खुणे, डॉ. श्रावण बाणासुरे, उध्दव बेलूरकर, डॉ. हर्षानंद हिरादेवे आदींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सकाळच्या सत्रात स्वच्छता अभियान , सामूदायिक ध्यान, योगासने व निसर्गोपचार विषयावर विनायक साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.

मी अनुभवलेली एक ओवी हा परिसंवाद ग्राम. प्रेमलाल पारधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी त्यात प्रल्हाद खूणे, विलास चौधरी, हरिश्चंद्र बोढे, श्यामसुंदर कारेकर, केवलराम गेडाम, डॉ. उदार, महादेव हुलके, गजानन बोबडे, खुशाल गोहोकार, पांडुरंग शेंडे, हुसेन किन्नाके, मोहन वडस्कर, इंदिरा कुडे तसेच पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी अनुभव कथन केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading