July 21, 2024
Importance of Donation in Society
Home » दातृत्व शक्तीचे सामाजिक स्थान
मुक्त संवाद

दातृत्व शक्तीचे सामाजिक स्थान

समाजात सामाजिक संबंधाचे जाळे आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर निर्भर आहे. जन्मापूर्वीपासूनच ही प्रक्रिया सुरू होते. उदाहरणार्थ आईच्या उदरात असताना डॉक्टर, परिचारिका, औषध विक्रेते, नातेवाईक इत्यादी लोकांचे सहकार्य जन्मणाऱ्या बाळाला सहाय्यक ठरतात त्याचप्रमाणे समाजात काही वंचित गरीब, असाह्य, अपंग, दीन, दुःखी, अनाथ यांना अर्थसाहाय्याची आवश्यकता असते. समाजात श्रीमंत, सधन, व्यापारी हा एक वर्ग आहे. तो वंचित दुर्बल वर्ग या शक्तीवर अवलंबून आहे.

दान हे अन्य प्रकारचे असू शकते. वैराग्यमूर्ती गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमानुसार १) भुकेल्यांना अन्न; तहानलेल्यांना पाणी; बेघरांना घर; गरीब मुला मुलींचे लग्न लावून देणे; शिक्षण; रोग यांना औषध; इत्यादी प्रकारच्या दानाची आवश्यकता समाजाला आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा होय !

समाजामध्ये दानशूर आपल्या दातृत्वाने माणसातील ईश्वराची पूजा करतात. हे एक प्रकारचे चंद्राचे शितल चांदणेच आहेत. समाजातील पीडा, दैन्य, दुःख, दारिद्र्य दूर करण्याकरिता उदारपणाच्या वर्षावाने जगाची पापरुपी पीडा दूर करतो. अशा या थोर समाजसेवकाला माणसातच ईश्वराचे दर्शन घडते. जनकल्याणाची तळमळ ज्याच्या हृदयात आहे; त्याला ईश्वर कोठे शोधण्याकरता जावे लागत नाही.
हे दान देताना डोळसपणे दान दिले पाहिजे: फक्त मंदिरातच देण्यात येणार दान म्हणजेच दान नव्हे तर ईश्वर हा सार्वत्रिक आहे: मंदिरापुरता मर्यादित नाही.
जे जे भेटे भूत ! ते ते मानिजे भगवंत !
यानुसार ईश्वर चराचरात भरला असून व्यापक आहे. श्रीमद् भगवद्गीते सांगितले आहे की,
देश काले च पात्रेच!
ततद्धांम सात्विक स्मृतम!
दान देणे कर्तव्य आहे या भावनेने दे दान देश; काल; आणि पात्र मिळाली असता उपकार न करण्याला दिले जाते ते सात्विक दान होय:
देश ज्या दिवशी किंवा काळी ज्या वस्तूचा तुटवडा असेल ती वस्तू पुरवून प्राण्यांची सेवा करण्यास तो देश व तोच काळ योग्य समजल्या जातो. काल भुकेलेले, अनाथ, दुःखी, रोगी आणि असमर्थ व भिकारी इत्यादी अन्न, वस्त्र व औषधी यापैकी जी वस्तू ज्याच्याजवळ नसेल ती वस्तू त्याला पुरवून सेवा करण्याबद्दल ते पात्र समजले जातात. श्रेष्ठ आचरणाचे विद्वान; ब्राह्मण धनादी सर्व पदार्थ आणि सेवा करण्यास योग्य पात्र समजले जातात.

पात्र_जसे बहुधा सध्याच्या काळी फंड देणे किंवा आकडे इत्यादी प्रसंगी धन दिले जाते ते दान योग्य होय.
ज्ञानदान, अन्नदान, जलदान, देहदान, रक्तदान इत्यादी प्रकारे दान दिल्या जाते व ते श्रेष्ठ दान होय:

निसर्गाचे दान आपल्याला भरभरून मिळाले आहे. आपल्याला या सृष्टी पासून शिकण्यासारखे आहे. हवा, पाणी, अन्न,फळे, फुले, ऊर्जा, इंधन ही सर्व नैसर्गिक देन मानवाला मिळाली आहे. समुद्र, नद्या, वृक्ष, पर्वत, आकाश, पृथ्वी फक्त आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यांचे हे औदार्य पाहून मनोमन खजिल झाल्यासारखे वाटते की केवढी ही मनुष्य प्राण्याची कृपणता?

जनसेवा हीच ईश्वर सेवा ! मानून ती जणू परमेश्वराने सुवर्णसंधीच आपल्याला प्राप्त करून दिली आहे. जगात अनेक दानशूर व्यक्तिमत्व जन्माला आलेले आहेत. त्यावरच या समाजाची उभारणी आहे
जिसने सच काम किया!
उसने नाम लिया ना लिया!

ज्यांनी पुण्य कर्म; सत्कर्म केले त्याला नामस्मरणाची गरज नाही असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.

आपल्या भारत देशात अनेक दानशूर लोक होऊन गेले आहेत. त्यापैकी कर्ण हा दुर्योधनाचा खास मित्र होता तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकामा पाठवीत नव्हता. अशी त्याची ख्याती होती. प्रतिदिन तोच नदीवर जाई. पाण्यात उतरून सूर्याला अर्घ्य देत असे. स्नान झाल्यावर परत येत असताना त्याच्यापुढे जो याचक येईल तो कधीही विन्मुख परत जात नसे.

एकदा भगवान श्रीकृष्ण व अर्जुन गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता कर्णाच्या दानशूरपणा विषयी बोलणे चालू होते. कृष्ण म्हणाला कर्ण इतकी उदार व्यक्ती दुसरी कोणी नाही या बोलण्याचे अर्जुनाला जणू आश्चर्यच वाटले. म्हणून अर्जुन म्हणाला श्री कृष्णा”धर्मराज ही दानशूर आहेत पण ..

श्रीकृष्ण म्हणाला या गोष्टीची प्रचिती आणून देण्यासाठी आपण धर्मराज आणि कर्ण दोघाकडे जाऊ. श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराज यांच्याकडे गेले. येण्याचे कारण विचारले असता त्यांनी आपली अडचण सांगितली. राजधानीत बांधकाम सुरू आहे त्यासाठी लाकडी हवी आहेत. धर्मराजाने आपल्या सेवकाला बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रकारचे लाकडे आणण्याची आज्ञा केली. बराच वेळ झाला तरी सेवक काही परतले नाहीत. बराच वेळाने सेवक परत आला तेही खाली मान घालून धर्मराजा पुढे उभा राहिला.

धर्मराज म्हणाले”काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत काय ? सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेली होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नाहीत. आता दोघेही श्रीकृष्ण व अर्जुन कर्ण यांच्याकडे गेली त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले.

कर्ण म्हणाला एवढेच ना? असे म्हणून लाकडे आणण्यासाठी आपल्या सेवकाला पाठविले. पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली आहेत असे सेवकांनी सांगितले. सेवकाचे बोलणे ऐकता क्षणीच कर्ण आत गेला. श्रीकृष्ण व अर्जुन त्याच्या पाठोपाठ गेले. बघतो तर काय? कारण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवले होते.”कर्ण एवढ्यासाठी तू तुझे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडतोस?

त्यावर कर्ण म्हणाला या वस्तू पुन्हा बनवता येतील पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा यासारखे दुःख ते कोणते असेल ? पुढे याच कर्णाने आपली वरदान मिळालेली कवचकुंडले देखील दान केले. अशा या दानशूर कर्ण याचा इतिहास आपल्या भारत देशाला लाभला आहे.

दान देताना शास्त्रानी यथाशक्ती शब्द वापरला आहे. आपल्या कुटुंबाचे भरण पोषण करून आपल्या स्वकमाईने, सत मार्गाने मिळविलेल्या मिळकतीचा दहावा भाग समाजातील वंचित घटकाला, गरजू व्यक्तीला दान करावे असे शास्त्र सांगते.

गीता शास्त्र सांगते, क्या तुमने साथ लाया था ? क्या लेकर जाना है ? यही से लिया ! यही से दिया ! क्यू व्यर्थ चिंता करते हो ? या सर्व शास्त्रांचा विचार केला असतांना माणूस व्यापक बनतो व आपले सामाजिक कर्तव्य करण्याकरता तत्पर होतो.
देणे तुझे इतुके शिरी !
आलो ऋणी जन्मांतरी !

हे ईश्वरा, भगवंता तुझे देणे अमाप आहे याचे ऋण फेडण्याकरता जनता जनार्दनाची सेवा करण्याकरता ही संधी मला प्राप्त झाली आहे. हे ऋण फेडण्यासाठी जनता जनार्दनाची सेवा करण्याची संधी तू दिली आहेस. ते दान समाजाच्या पदरात पाडून उतराई होण्याचं कार्य मी करीन अशी ईश्वरचरणी प्रार्थना करावी. फक्त अर्थदान केल्यानेच दान होणार नाही तर , ज्ञानदान, श्रमदान, अन्नदान, जलदान, देहदान, रक्तदान, वस्त्रदान, गृह दान इत्यादी रूपाने दान करता येते.

नदीचा प्रवाह जर रोखून ठेवला तर त्यात शेवट माती कचरा साठणार तसेच धन सुद्धा साठवून ठेवले तर अन्य मार्गाने नष्ट होते. म्हणून धन हे समाजकार्यासाठी प्रवाहित झाले पाहिजे नाहीतर शास्त्रात 15 अनर्थ सांगितले.

सौ पुष्पा सुनील वरखेडकर,
माजी पर्यवेक्षिका, पी डी कन्या शाळा वरूड


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Neettu Talks : सामान्य सर्दीवर उपाय…

मोठी स्वप्नेच आयुष्य घडवितात…

शिवरायांची धर्मनीती: एक आकलन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading