महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय शाहूपुरी शाखेने घेतला आणि सातारा पॅटर्न म्हणूनही तो उदयास आणला आहे. मराठी भाषा पंधरवड्याचा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येत आहे आणि असा कार्यक्रम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे मराठी माणसे राहतात तिथे तिथे व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी
कवी कुसुमाग्रजांचा जन्म दिवस… कवी ‘विंदां’चा स्मृतीदिन..
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी (सातारा) तर्फे मराठी भाषा पंधरवड्याचे राज्यात प्रथमच आयोजन
‘पत्रव्यवहार चालू आहे…. दुसऱ्यामुर्तीसाठी
पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या
तसे म्हटले तर गाभाऱ्याचे महत्व अंतिम असते
कारण गाभारा सलामत तर देव पचास..”
‘गाभारा’ या आपल्या कवितेतून समाजातील प्रवृत्तीवर कोरडे ओढणाऱ्या कवी कुसुमाग्रजांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ! कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस ते कवी ‘विंदां’ चा स्मृतीदिन गुंफुन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा येथील शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, उपाध्यक्ष अजित साळुंखे, कार्यवाह अॕड चंद्रकांत बेबले, डाॕ. उमेश करांबळेकर, कोषाध्यक्ष राजेश जोशी यांनी परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात प्रथमत:च गेल्या १० वर्षांपासून मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
” मराठी भाषा गौरवदिन” म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी २०१३ रोजी शासन निर्णय प्रसिध्द केला. २७ फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसापासून या पंधरवड्याला सुरुवात होते. आणि १४ मार्च रोजी ‘ विंदां’ करंदीकरांच्या स्मृती दिनी या पंधरवड्याची सांगता होते.
या पंधरवड्यात विविध विषयांवर परिसंवाद, व्याख्याने आणि काव्यवाचन यांची मेजवानी मराठी रसिकांसाठी सातत्याने ठेवली जाते मराठी भाषेचा गौरव या पंधरवड्याच्या माध्यमातून केला जातो. सर्व प्राथमिक शाळांना, शासकीय कार्यालयांना कवी कुसुमाग्रजांचे छायाचित्र आणि पत्र देवून मराठी भाषा दिन मोठया प्रमाणात साजरा करण्याविषयी अध्यक्ष श्री. कुलकर्णी यांनी स्वत: भेटून आवाहन केले आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय शाहूपुरी शाखेने घेतला आणि सातारा पॅटर्न म्हणूनही तो उदयास आणला आहे. मराठी भाषा पंधरवड्याचा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येत आहे आणि असा कार्यक्रम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे मराठी माणसे राहतात तिथे तिथे व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. हिंदी भाषा पंधरवड्याच्या धर्तीवर मराठी भाषा पंधरवडा साजरा करावा यासाठी त्यांचा पाठपुरावा आणि प्रयत्न सुरु आहे.
‘तरी तुम्ही भाग्यवान
एकेक जात जमात तरी
तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यतील भिंती !’
कुसुमाग्रजांच्याच ‘अखेर कमाई’ मधील वरील ओळीत व्यक्त केलेली महात्मा गांधीजींची खंत त्यांच्या वाट्याला येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी सर्व मराठी रसिकांची आहे. महाराष्ट्राबाहेरही जेथे जेथे मराठी बांधव असतील तेथे तेथे मराठीचा गोडवा सांगण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने साजरा करण्यात यावा. तसेच त्यापुढेही अन्य भाषिकांमध्येही मराठीचे ज्ञान या निमित्ताने रुजविणे याची जबाबदारी समस्त मराठी रसिकांची आहे.
याच ध्येयाने प्रेरित होऊन तसा प्रयत्न श्री कुलकर्णी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून हा मराठी भाषा पंधरवड्याचा उपक्रम राज्यात सुरु केला आहे. हा उपक्रम अन्य जिल्ह्यांतही राबविला जाईल, असा विश्वास आहे. महाराष्ट्र साहित्य परिषेदच्या या राज्यात होणाऱ्या मराठी भाषेच्या पंधरवड्या विषयी शुभेच्छा देऊन ‘विंदां’च्या ‘जडाच्या जांभया ‘ या कवितेतून एवढेच सांगता येईल,
‘इथे आता युध्द नाही
इथे आता बुध्द नाही
दु:ख देण्यात, दु:ख घेण्यात
इथे आता शुध्द नाही
भावनेला गंध नाही
वेदनेला छंद नाही
जीवनाची गद्य गाथा
वाहते ही, बंध नाही’
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.