सचिन होळकर यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा एक लाख रुपयाचा पुरस्कार जाहीर..
राज्य सरकारचे 2021 सालचे महाराष्ट्र राज्य वाङ्ममय पुरस्कार अंतर्गत कृषी व कृषीपूरक लिखाण, साहित्यासाठी वसंतराव नाईक पुरस्कार लासलगाव येथील कृषीतज्ञ व ख्यातनाम लेखक सचिन आत्माराम होळकर यांच्या “शेती शोध आणि बोध” या पुस्तकाला जाहीर झाला.
शेती क्षेत्रातील विविध समस्या व त्यांवरील उपाय योजना आणि शेतकऱ्यांची वस्तुस्थितीचा आढावा घेणार त्यांचं शेती शोध आणि बोध हे सहावं पुस्तक राज्य पुरस्कारासाठी निवडले आहे. या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, करार शेती, दुग्ध उत्पादन, द्राक्ष उत्पादन, शेतमजुरांच्या समस्या, यशोगाथांची सत्यता, आर्थिक चक्रव्यूवहात अडकलेला शेतकरी, संकरित वाण, रासायनिक खते, कृषी कर्ज वितरण, सरकारी अनुदान, वनशेती, सेंद्रिय शेती इतर अनेक विषयांचा सखोल उहापोह केला आहे.
पुस्तकाबद्दल बोलताना सचिन होळकर म्हणाले, पीक उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर लिखाण नेहमीच सुरू असते, मात्र शेतीचे प्रश्न इथे थांबत नाही. शेतीच्या गरजा आणि समस्या खूप मोठ्या आहेत. हे सर्व पाहता त्या प्रश्नांना खरा हात घालण्याची फार दिवसांची इच्छा होती. उत्पादन तंत्रज्ञानाच्या बाबतीत शेतकरी बऱ्यापैकी स्थिर झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. मात्र धोरण बदलण्याची गरज आहे. याशिवाय शेती करताना अनेक बाबी डोळसपणे बघायला पाहिजे. या सर्व बाबींचा ऊहापोह लेखन करून मी सुरुवात केली. त्यानंतर मात्र राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी मला फोनवरून संपर्क साधायला सुरुवात केली. त्यांच्या प्रश्नांना आणि समस्यांना मर्यादा नव्हती माझ्या लिखाणाला देखील मी कोणतीही मर्यादा घालून ठेवत नाही. राज्यातील अनेक शेतकरी नियमित माझ्या संपर्कात असतात. त्यांच्या जिज्ञासूपणाचं कौतुक करावसं वाटतं. मात्र माझे इतर सर्व विषयांचे वैचारिक स्वरूपाचे लेख सर्वांनाच सर्वत्र उपलब्ध होऊ शकत नाही. अर्थात ते पाठवणे मला ही शक्य होणार नाही. अनेक वाचकांचे फोन आल्यावर ते या विषयावर तुमचं काय मत आहे? किंवा या विषयावर तुम्ही लिखाण करा अशी विचारणा होते. मात्र त्याच विषयावरील माझा प्रसिद्ध होऊन गेलेला लेख त्यांच्या वाचनात आलेला नसतो हे ऐकून दुःख होते. म्हणून माझ्या अनेक प्रसिद्ध अप्रसिद्ध लेखांचा पुस्तकरूपी संग्रह असावा असं वाटायला लागलं व त्यात अनेक शेतकरी मित्रांनी तशी कल्पना देखील सुचवली आणि त्यातून माझ्या ह्या “शेती शोध आणि बोध” ह्या पुस्तकाचा जन्म झाला.
सचिन होळकर हे सुवर्णपदकासह कृषी पदवीधारक असून त्यांनी आजवर सात पुस्तकांचे लिखाण केले आहे याशिवाय महाराष्ट्रातील विविध नियतकालिकांमधून, वृत्तपत्रांमधून जवळपास 500 पेक्षा अधिक लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. आकाशवाणी नाशिक, आकाशवाणी औरंगाबाद, रेडिओ वसुंधरा बारामती, गावकरी कृषिमंच इत्यादि अनेक माध्यमातून त्यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम देखील झाले आहेत. त्यांच्या शेती आणि सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शेतीमित्र पुरस्कारा व्यतिरिक्त इतर नामांकित संस्थेचे त्यांना 40 पुरस्कार प्राप्त आहे.