October 6, 2024
It is possible to remove the stones of mental disorders
Home » Privacy Policy » मनातील विकारांचे खडे साधनेने दूर करणे शक्य
विश्वाचे आर्त

मनातील विकारांचे खडे साधनेने दूर करणे शक्य

तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरू कंहीच न सांडिसी ।
तुझेनि नामे अपयशी । दिशा लंधिजे ।। ८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा

ओवीचा अर्थ – एऱ्हवी तूं अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस, कधीहि धीर सोडीत नाहीस, तुझें नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडी पळून जावे.

भारतात अनेक थोर विभूती होऊन गेल्या आहेत. आजही त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायीले जातात. त्यांचे नाव घेताच अंगावर शहारे उभे करणारा त्यांचा पराक्रम डोळ्यासमोर उभा राहातो. इतके त्यांच्या नावाचे सामर्थ्य आहे. नुसत्या नावानेच यश प्राप्त होते असे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे ज्या भाषेत रचले गेले त्या भाषेलाही रांगडेपणा लाभला आहे. त्या भाषेचे सौंदर्यही त्या पराक्रमाने खुलले आहे. पोवाडे ऐकताना डफाच्या आवाजाबरोबरच त्या भाषेतून अंगात एक वेगळीच उर्जा भरते. रक्तात ती उर्जा भिनभिनते अन् रक्त सळसळून उठते. मेघ गर्जनेसह पाऊस पडावा अन् सर्वत्र अल्हादायक वातावरण व्हावे तसेच त्या पराक्रमी गीतांच्या वर्षावाने होते. कडक उन्हाने सुकत चाललेल्या झाडावर या पावसाने नवे कोंब फुटतात. तसे या गीतांच्या वर्षावाने मनात उर्जेचे नवे कोंब फुटतात.

अशा या सामर्थ्यवान व्यक्तींच्या आयुष्यातही चढउतार हे येत असतात. पण त्यांचा धीर कधीही सुटत नाही. धीर सुटावा अशी वादळे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. पण धीर हा सुटू द्यायचा नसतो. अशा कालावधीत योग्य मार्गदर्शन अन् योग्य मार्गाची निवड ही खूप महत्त्वाची असते. यासाठीच आत्मज्ञानी संताचे मार्गदर्शन अन् अनुभव हे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे ठरतात. अर्जुनाला कृष्ण भेटला तसे आपणासही योग्य मार्गदर्शन करणारे आत्मज्ञानी गुरू भेटायला हवेत. आपल्या आयुष्यातील चढउतारात त्यांचे मार्गदर्शन हे गरजेचे असते. सत्संग हा यासाठीच करायचा असतो. सत्याची अन् न्यायाची बाजू ओळखून त्याबाजूने लढायचे असते. हे लढण्याचे सामर्थ्य गुरु देतात.

मातीचा घडा तयार करताना चिखलाच्या गोळ्याला योग्य आकार द्यावा लागतो. हा आकार देताना त्या मातीच्या चिखलात खडे असतील तर त्याचा दर्जा घसरतो. असा घडा भाजताना फुटतोही. केलेली सर्व मेहनत यामुळे व्यर्थ जाते. यासाठी त्या मातीच्या चिखलातील खडे माती मळण्यापूर्वीच काढणे गरजेचे असते. माती चाळूण घ्यायला हवी. त्यात खडे राहाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. खडे निवडून बाजूला करावे लागतात. माणसाच्या मस्तकरुपी मडक्याला आकार देतानाही त्यातील विकारांचे खडे हे बाजूला करावे लागतात. मनातील अयोग्य गोष्टींचे खडे चाळूण दूर करावे लागतात. हे खडे हटविल्यावरच मनाचा उत्तम विकास होतो.

नव्या तंत्रज्ञानाच्या युगात खडे दुर करण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. कमी कष्टात अन् कमी वेळात हे काम कसे होईल हे त्यात पाहीले जाते. खडे कोणत्या द्रावणात विरघळतात हे शोधून त्या द्रावणात ही माती भिजवली जाते. अशाने खडे आपोआपच बाजूला होतात. यात फारसे कष्टही पडत नाहीत अन् वेळेचीही बचत होते. रसायनांचा वापर करून खड्यांचा आकारही बारीक माती इतका करण्याचे यशस्वी प्रयोगही करण्यात आले आहेत. मनातील विविध विकारांचे खडे दूर करण्यासाठी विकार विरघळणाऱ्या द्रावणांचा शोध घ्यावा लागेल. मनातील दोष कोणत्या द्रावणात विरघळतात हे शोधणे गरजेचे आहे. हे द्रावण शोधल्यानंतर मनाची शुद्धता साधता येते. साधनेचे द्रावण हे शुद्धतेसाठी योग्य आहे. साधनेने मनातील सर्व खडे दूर केले जाऊ शकतात. मनाची १०० टक्के शुद्धता ही मनाच्या विकासासाठी गरजेचे आहे. ही शुद्धता साधनेतून साधता येते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading