July 24, 2024
haryana-cm-change-khattar-out-saini in
Home » हरियाणात खट्टर गेले, सैनी आले…
सत्ता संघर्ष

हरियाणात खट्टर गेले, सैनी आले…

हरियाणामध्ये भाजपने नेतृत्वबदल केला आणि राजकारणातील अनेकांची मती गुंग झाली. तसे बघितले तर हरयाणा हे एक छोटे राज्य आहे. १९६६ मध्ये पंजाबपासून हा प्रदेश वेगळा करून नवीन राज्य निर्माण करण्यात आले. राजधानी दिल्लीच्या सीमेवर असल्याने महत्त्वाचे राज्य आहेच. पण जाट समाजाचा प्रभाव हे त्याचे वेगळेपण आहे. एकीकडे हरयाणातील गुरुग्राम सायबर सिटी म्हणून देशाच्या नकाशावर आहे व दुसरीकडे जाट आरक्षण आणि शेतकरी आंदोलनाने या राज्याचे नाव माध्यमांमध्ये सतत झळकत असते. राज्याच्या विधानसभेत ९० जागा आहेत, तर लोकसभेचे १० मतदारसंघ या राज्यात आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून म्हणजेच सन २०१४ पासून हरयाणा राज्यावर भारतीय जनता पक्षाचा कब्जा आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर होत असताना मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व त्यांच्या जागी नायबसिंह सैनी यांनी हरियाणाचा राजमुकुट मस्तकावर चढवला. हे सर्व वेगाने घडले. अचानक असे काय घडले की, भाजपच्या श्रेष्ठींना हरियाणाच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदल घडवावासा वाटला ? मुळातच मनोहरलाल खट्टर हे कोणी लढाऊ नेते नाहीत. ते संघाचे प्रचारक व स्वयंसेवक हीच त्यांची ओळख आहे. ज्याला प्रशासकीय कसलाही अनुभव नाही, ज्याने कधी सत्तेच्या राजकारणात भाग घेतलेला नाही, त्याला मोदी-शहांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसवले. खट्टर हे सरळमार्गी आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कधी थेट आरोप झाले नाहीत. पण मुख्यमंत्री म्हणून ते आपल्या कामगिरीचा ठसा उमटवू शकले नाहीत.

मोदी-शहांची निवड म्हणून ते थेट मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर बसले व लोकसभा निवडणुकीत ते पक्षाला शंभर टक्के यश देऊ शकणार नाहीत, हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा त्यांना हरियाणाच्या सर्वोच्च पदावरून क्षणार्धात पायउतार करण्यात आले. खट्टर हे संघ स्वयंसेवक असल्याने ते रुसणार नाहीत. कशाला नाही म्हणणार नाहीत. पक्ष जबाबदारी देईल, ती ते प्रामाणिकपणे पार पाडतील. आता त्यांना हरियाणातून पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. कालपर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले खट्टर हे दोन महिन्यांनी लोकसभेत खासदार दिसतील. तसेच काल-परवापर्यंत लोकसभेत खासदार असलेले नायबसिंह सैनी यांची अचानक लॉटरी लागली व ते हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

जसा खट्टर यांचा साडेनऊ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून प्रवेश अचानक झाला होता, तसाच त्यांचा राजीनामाही अचानक झाला. आदल्या दिवशी हरियाणामधील कार्यक्रमात खट्टर व पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र होते. खट्टर यांनी राज्याच्या विकासाला गती दिली म्हणून पंतप्रधानांनी त्यांच्यावर प्रशंसेचा वर्षाव केला. आपण व खट्टर प्रचारक म्हणून राज्यात स्कूटरवरून कसे सर्वत्र फिरलो, याच्याही रम्य आठवणी सांगितल्या. त्यावेळी खट्टर यांना आपल्याला दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची पाळी येणार आहे, याची पुसटशीसुद्धा कल्पना नव्हती.

सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणातील सर्व १० लोकसभा मतदारसंघांत भाजपचे खासदार विजयी झाले. त्या निवडणुकीत भाजपला ५८ टक्के मते मिळाली होती. पण नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत लक्षणीय घसरण झाली व भाजपला विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता आला नाही. म्हणूनच दुष्यंत चौटाला यांच्या हरयाणा जननायक पक्षाला बरोबर घेऊन मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले. चौटाला यांना उपमुख्यमंत्रीपद दिले. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणातही मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिले नव्हते.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांनी हरियाणात आपल्या पक्षाला दोन जागा मिळाव्यात, अशी भाजपकडे मागणी केली. भाजपने ती फेटाळून लावताच त्यांनी सरकारमधून अंग काढून घेतले. तरीही अपक्षांच्या पाठिंब्यावर खट्टर सरकारकडे बहुमत होते. पण त्यांनाच पक्षाने राजीनामा द्यायला सांगितले व नायबसिंह सैनी यांच्यावर नवे कप्तान म्हणून जबाबदारी सोपवली.
हरियाणा हे राज्य जाटबहुल आहे. खट्टर हे पंजाबी होते, तर आता सैनी हे ओबीसी आहेत. राज्यात जाट प्रभावशाली असले तरी ओबीसींची लोकसंख्या मोठी आहे. म्हणूनच भाजपने
बिगर जाट मुख्यमंत्री देण्याचे दुसऱ्यांदा धाडस केले आहे.

खट्टर हे साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनीच सैनी यांना राजकारणात महत्त्व दिले. खट्टर यांच्या पहिल्या टर्ममध्ये सैनी हे त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. सैनी हे अंबाला जिल्ह्यातील मिर्झापूरमधील मिर्झा गावाचे. जन्म २५ जानेवारी १९७०. मुजफ्फरपूरच्या डॉ. आंबेडकर विद्यापीठातून ते बीए झाले. नंतर येथील चौधरी चरणसिंग विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. १९९६ पासून ते संघ-भाजप परिवाराकडे आकर्षित झाले. सन २००२ मध्ये ते भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस होते. २००५ मध्ये युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. २००९ मध्ये नारायणगढ मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्या मतदारसंघात भाजपला कधीच यश मिळाले नव्हते. पहिल्या निवडणुकीत तर सैनी यांना पाचव्या क्रमांकाची मते मिळाली. पण २०१४ मध्ये मोदी लाटेत त्यांनी काँग्रेस उमेदवाराला २४ हजार मतांनी पराभव केला व खट्टर यांनी आपल्या सरकारमध्ये त्यांना मंत्री केले. २०१४ ते २०१९ ते राज्यात कॅबिनेट मंत्री होते. २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर कुरूक्षेत्रमधून लोकसभा निवडणूक लढवली व ४ लाख मतांनी विजय संपादन करून ते खासदार झाले.

हरियाणामध्ये जाटांचे वर्चस्व असले तरी जाट मतदार हा काँग्रेस, हरयाणा जननायक पार्टी व इंडियन नॅशनल लोकदल या पक्षात विभाजित आहे. हरियाणात ओबीसी लोकसंख्या २८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ओबीसी मतदार हा प्रामुख्याने भाजपच्या पाठीशी असल्यानेच बिगर जाट मुख्यमंत्री देण्याचे धाडस भाजपने दाखवले आहे. मनोहरलाल खट्टर हे राजकारणी नाहीत, पण त्यांना सार्वजनिक जीवनात आदराचे स्थान आहे. म्हणूनच सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते सर्वांसमक्ष खट्टर यांच्या पाया पडले व त्यांना चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

केंद्रात भाजप सत्तेवर असताना निवडणुकीपूर्वी देशात राज्यांच्या नेतृत्वात बदल घडविण्याच्या यापूर्वी चार घटना घडल्या आहेत. गुजरातमध्ये विजय रूपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून भूपेंद्र पटेल यांच्या मस्तकार राजमुकुट ठेवण्यात आला. त्रिपुरात विप्लब दास यांना हटवून माणिक सरकार यांना मुख्यमंत्री करण्यात आले. उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांना दूर करून तीर्थ सिंह रावत व नंतर त्यांनाही हटवून पुष्कर सिंह धामी यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. कर्नाटकमध्ये बी. एस येडियुरप्पा यांना हटवून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदावर बसविण्यात आले. आता असाच प्रयोग हरयाणात करण्यात आला आहे.

भाजपने हरियाणात स्थानिक किंवा प्रादेशिक पक्षांबरोबर यापूर्वी अनेकदा युती केली आहे. जननायक जनता पार्टीच्या अगोदर बन्सीलाल यांची हरियाणा विकास पार्टी, हरियाणा जनहित काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल यांच्याशी भाजपने युतीचा प्रयोग केला होता. १९९८ मध्ये भाजपने हरियाणा विकास पार्टीशी समझोता करून लोकसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या. १९९९ मध्ये भाजपने इंडियन नॅशनल लोकदलाशी युती करून सर्व १० जागा जिंकल्या होत्या. सन २००९ मध्ये भाजपने इनलोशी युती तोडली व स्वबळावर निवडणूक लढवली. पण पक्षाला यश मिळाले नाही. नंतर कुलदीप वैष्णोई यांच्या हरियाणा जनहित काँग्रेसबरोबरही समझोता केला, २०१४ च्या निवडणुकीपूर्वी तो तोडला. राजकीय अस्थिरतेमुळे हरियाणाने यापूर्वी तीन वेळा राष्ट्रपती राजवटीचाही अनुभव घेतला आहे.

आमदार नसलेले नायबसिंह सैनी हे हरियाणाचे चौथे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी भूपिंदर सिंह हुड्डा, बन्सीलाल, ओम प्रकाश चौटाला, हे नेते आमदार नसताना मुख्यमंत्री झाले होते. आमदार नसलेला नेता राज्याचा सहा महिने मुख्यमंत्रीपदावर राहू शकतो. पण या काळात त्याने विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे. हरियाणा विधानसभेचे सदस्य नसलेले सैनी आमदारकीशिवाय ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुख्यमंत्रीपदावर राहू शकतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

दुखभरे दिन बीते रे भैय्या…

मनाच्या योग्य स्थितीतच बीजाची पेरणी फलदायी ठरते

भारतातील लोकशाही “सदोष”; स्थान ४६ वे !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading