गोल्डन पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘काळच उत्तर देईल’ हा कादंबरीकार म्हणून सुपरिचीत असणाऱ्या आणि बाल साहित्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या कवी श्रीकांत पाटील यांचा कविता संग्रह मराठी साहित्य विश्वात दाखल झालेला आहे. हा कवितासंग्रह विज्ञानामुळे झालेल्या मानवाच्या दुरावस्थेकडं लक्ष वेधतो आहे.
डॉ स्मिता पाटील, मोहोळ
आजचे वर्तमान अत्यंत संभ्रमित आहे. आजच्या यंत्र युगात माणूस ही यंत्रवत झाला आहे. त्याच्यातील संवेदना,सद्भावना,सहिष्णुता या भावनांचा अस्त होऊ पाहत आहे. अस्वस्थ करणाऱ्या या भयावह वास्तवाने आपल्यापुढे अनेक प्रश्न मांडले आहेत, हे खरे असले तरी या वर्तमानाच्या प्रश्नांना येणारा काळच उत्तर देईल आणि ते नक्कीच आशादायी असेल असा विश्वास या कवितासंग्रहात कवीने व्यक्त केला आहे.
हा कवितासंग्रह चार आयामात विभागला आहे. हाय हॅलो च्या जमान्यात, ओल हरवलेली माती, सातबाराच्या बेड्या आणि क्षितिजाच्या पलीकडे. या चारही आयामातील विविध कविता वाचकाला एक भावस्पर्शी अनुभव देत चिंतनाच्या डोहाकडे नेत आहेत.
संग्रहातील कविता निसर्ग, शेतीची दुरावस्था, यंत्र युगाने आणलेले माणुसकीच्या धर्मावरचे संकट आणि पर्यावरणाची दुरावस्था यावर बोट ठेवतात. चंद्रावर पोहोचणारा माणूस सूर्याच्या अंतरंगाचा अभ्यास करतो आहे. विज्ञानाच्या मदतीने अंतरिक्षात स्वैरविहार करतो आहे. भूमी वरील विविध प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी नवनवीन याने अंतराळात सोडतो आहे पण याच माणसाला एकमेकांच्या काळजात वाकून पाहणे अशक्य झाले आहे. परस्परांच्या व्यथा वेदना जाणून घेण्यास, परस्परांच्या हृदयात डोकावण्यास त्याच्याकडे वेळ नाही, किंबहुना तशी त्याची इच्छाही नाही. अशा आशयाच्या एका कवितेत कवी म्हणत आहे..
सूर्याभोवती फिरणाऱ्या यानातून अभ्यास होईलच धरित्रीवरील परिणामांचा पण माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला शोधावं लागेल नवं यान काळजाभोवती फिरणारं!
सत्ता संपत्ती मागे लागलेल्या मृगजळांपाठी धावणाऱ्या माणसाचा आज चेहराच हरवला आहे. परस्परांमध्ये स्नेह, माया ही दुर्लभ होत आहे. गर्दीचा महापूर ओसंडून वाहत असताना माणसाचा स्वतःचा चेहरा असा हरवून जाताना पाहणे खरंच वेदनादायक आहे अशी व्यथा कवीने आपल्या तरल रचनांमधून व्यक्त केली आहे.
सध्याच्या आभासी जगामध्ये सारेच आभासी होते आहे. झाडांची मुळे घट्ट रोवली जावीत अशी नाती दुर्मिळ होत आहेत. क्षणात जुळणारी नाती क्षणात तुटतही हात आहेत. एकमेकांना घट्ट धरून ठेवणारी काळजाची ओल हरवली आहे. परस्परांच्या हृदयातील जागा हरवली आहे. फेसबुक इन्स्टा व्हाट्सअप यासारख्या नेटवर्कने सोडले जाणारे जग आपल्या जिवलगांपासून मात्र दूर जाते आहे. कुटुंब व्यवस्था एका अर्थाने धोक्यात आली आहे. एकाच कुटुंबात राहणारी माणसे एकमेकांपासून खूप दूर गेली आहेत. घरातील माय बाप पोरके झाले आहेत, मुले दिशाहीन झाली आहेत, साऱ्यांचेच संवाद मुके झाले आहेत. मोबाईलचा परिणाम फक्त शहरातच होतो आहे असं नाही.
मोबाईल युगाने खेड्यांना सुद्धा तितकेच प्रभावित केले आहे. एकेकाळी अतिशय रम्य, निखळ प्रेमाच्या रंगाने रंगलेले सुंदर असे ग्रामजीवन आज निरस, रंगहीन झाले आहे. मोडकळीस आलेल्या नात्यांमुळे चिरेबंदी वाड्याच्या भक्कम भिंती सुद्धा कोसळु पाहत आहेत. सख्खे भाऊ पक्के वैरी होताना दिसत आहेत. शेताचे टोकरणारे बांध केवळ शेतांनाच टोकरत आहेत असे नव्हे तर, ते नात्यांना सुद्धा पोखरत आहेत. हे ग्रामजीवनाचे कटू वास्तव रेखाटताना कवी आपल्या कवितेत म्हणतो..
खोल गेली ओल
वांझ झाली नाती
चिरेबंदी वाड्याच्या कोसळल्या भिंती
आभासी जगात नाती, प्रेम ही आभासी झाले आहे.
फेसबुक, इन्स्टा, व्हाट्सअप यावर केवळ कोरडे संदेश वाहत राहतात. कागदी फुलांसारखी गंधहीन आत्माही फुले आनंदही फसवा देतात. आज माणूस खऱ्या आनंदापासून सारखा झालेला आहे. मनामनातील आस्थेचे झरे आटत चालले आहेत. केवळ कृत्रिम भावनांचे कृत्रिम फुलांचे बाजार थाटले गेले आहेत. मनात अडी ठेवून माणसे एकमेकांपासून दूर जात आहेत.
माया, ममता, स्नेह, प्रेम यांच्या जागी हृदयात केवळ राग, द्वेष, मोह, अहंकारच नांदत आहे. माणसांनी स्वतःहूनच सुखाची आस सोडून द्वेषाच्या दगड धोंड्यांच्या खडतर वाटेचा प्रवास स्वीकारला आहे. या वाटेवर मग शांतीचे ओंजळभर पाणी कुठून गवसणार? आपसुकच सुखाच्या, समाधानाच्या सोनेरी क्षणांना माणसं पारखी होतात. एकटी एकटी चालता कुढत राहतात, मनातल्या मनात सडत राहतात आणि हा संसर्ग केवळ कुटुंबापुरताच मर्यादित नाही राहिला तो तर अख्या समाजाला कवेत घेतो आहे. न्यायनिष्ठा, सचोटी या तत्त्वांपासून समाज खूप दूर जातो आहे. स्वार्थाची बजबजपुरी माजली आहे. भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार, काळे व्यवहार सर्रास सुरू आहेत. हे सांगताना कवी म्हणतो..
काळ्या मनांचा काळा बाजार, काळा व्यवहार काळाच शेजार
अनाचाराचा कळस गाठून त्याने थाटलाय भ्रष्ट संसार
पैसा प्रतिष्ठेसाठी लोक परस्परांचे बळी घेत आहेत. सत्तेचा ही गैरवापर होताना सर्रास दिसतो आहे. माणसे दुराचार करताना जराही लाजत नाही. मानवतेपासून दूर जात आहेत,विषमतेचे विषारी बीज नव्याने रुजताना दिसते आहे. जात, धर्म, प्रांत यासाठी लोक परस्परांचे शत्रू होत आहेत. सामाजिक एकोपा नष्ट होऊ पाहत आहे. समाजाच्या पडझडीचे वर्णन करताना कवी म्हणतो…
वाळवी फत्त लाकडालाच लागते असं काही नाही
समाज ही पोखरला जातोय भेदांच्या वाळवीनं..
कधी ती धर्म बनून येते तर कधी जात म्हणून शिरते
भाषा, वंश, प्रांत अशी विविध रूपे धारण करते
आणि समाजाला विकलांगता आणते
कवीची वृत्ती मुळातच पर्यावरण प्रेमी आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कवितेत येणं अगदीच साहजिक आहे. शेतीमातीची, बळीराजाची वेदना सुद्धा तितक्याच गांभिर्याने कवितेत व्यक्त झाली आहे. नदीला येणारे पूर, धरणी कंप, दुष्काळ, डोंगरकड्यांची वाताहत या साऱ्या निसर्गाच्या ऱ्हासाला मानवाची अमानवी भूकच जबाबदार आहे.आजही माणूस जागा झाला नाही तर उद्याच्या पिढ्यांना डोंगर, झाडे, प्राणी, पक्षी पहावयासही मिळणार नाहीत अशी खंत कवी व्यक्त करतो. जगाचे वाढणारे तापमान हाही गंभीर विषय आहे पण लोक या सर्वच गोष्टींना गंभीरपणे घेताना दिसत नाहीत मग त्याचे दुष्परिणाम भोगणे क्रमप्राप्त होते. ही वेदना व्यक्त करताना कवी म्हणतो..
जंगलाचा झालाय ऱ्हास
मातीची बदललीय कूस
थंडगार ओलाव्याला
उन्हाळ्याची लागलीय घूस
एकूणच कवितांचा बाज हा सामाजिक आहे. ‘बुडती हे जनता देखवेना डोळा येतो कळवळा म्हणूनिया’ तुकोबांची ही तळमळ कवीच्या अंतरंगात पुरेपूर दाटून आहे याचा प्रत्यय येतो.
बदलत्या यंत्र युगाने यंत्रवत झालेला माणूस आणि लहरी विनाशकारी झालेला निसर्ग या दोन्हींची खंत संग्रहाच्या पानोपानी व्यक्त होताना दिसते. त्यासाठीच ही कविता पसायदान मागते. शेतीमातीच्या, नात्यांच्या, निसर्गाच्या, बदलत्या काळाच्या वेदना अशा विविध आशयांनी सजलेला हा काव्यसंग्रह अप्रतिम आहे.
कवितासंग्रहाचे नाव – काळच उत्तर देईल
कवी – डॉ श्रीकांत पाटील
प्रकाशन – गोल्डन पेज पब्लिकेशन
किंमत – १८० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.