प्रेम करायचे आणि सांगायला लाजायचे हे कसले प्रेम ? प्रेम हे व्यक्त करता यायला हवे तरच त्याचा आनंद मिळू शकेल. अन्यथा त्यातून दुःख ही होऊ शकते. जीवन हे आनंद उपभोगण्यासाठी आहे. दुःखी होऊन कण्हत बसणे म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी ।
पिसें आणि न भुलवी ।तरी तेंचि काई ।।124 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 6
ओवीचा अर्थ – प्रेम आहे आणि तें लाज उत्पन्न करतें, तर ते प्रेम कसले ? तसेंच व्यसन आहे आणि त्यानें जर शीण होत असेल तर ते व्यसन कसले ? वेड आहे, परंतु भ्रम पाडीत नाही, तर ते वेड कसले ?
व्यसन हे वाईटच अशीच आपली मानसिकता आहे. मात्र चांगल्या गोष्टीचे व्यसन असू शकते. कोणत्याही व्यसनाला मर्यादा आहे. गोड खायची आवड आहे. म्हणून आपण अख्खे भांडे भरून केलेले गुलाबजामून संपवू शकत नाही. गोड खाण्यालाही एक मर्यादा असते. ठराविक मर्यादेपर्यंतच त्याची गोडी वाटते त्यानंतर ते नकोसे वाटते. तसेच व्यसनाचे आहे. कोणतेही व्यसन जोपर्यंत आनंद देते तोपर्यंत चांगले असते. आनंद देते तोपर्यंतच व्यसन करावे. त्याचे दुष्परिणाम जाणवू लागेल की ते व्यसन सोडून देणेच योग्य असते.
प्रेम करायचे आणि सांगायला लाजायचे हे कसले प्रेम ? प्रेम हे व्यक्त करता यायला हवे तरच त्याचा आनंद मिळू शकेल. अन्यथा त्यातून दुःख ही होऊ शकते. जीवन हे आनंद उपभोगण्यासाठी आहे. दुःखी होऊन कण्हत बसणे म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखे आहे. म्हणजेच कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते. मर्यादा ओलांडली की अतिरेक होतो. त्यातून हाती सुख न लागता दुःखच पदरी पडते.
साधना का करायची ? साधना कशासाठी करायची ? जबरदस्तीने साधना होत नाही. साधनेत मन रमायला हवे. त्यातून आनंद मिळायला हवा. तरच ती साधना योग्य असते. त्यातूनच सिद्धी मिळते. अन्यथा साधनेतूनही दुःखच पदरी पडते. म्हणूनच धर्माची सक्ती कधीही करू नये. धर्म हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. अध्यात्म हे आवडीने करायचे असते. अध्यात्म सक्तीने शिकवता येत नाही. आवड असेल तरच ते स्वीकारले जाऊ शकते. अध्यात्म आवडीने करावे. आवड नसेल तर ते करू नये.
देवाच्या देवळात जायचे का ? देव दर्शन घ्यायचे का ? हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. कोणी देवळात जाण्यासाठी सक्ती करू नये. देव मानणे आणि न मानणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. साधना करूनही बऱ्याचदा दुःखच होते. अशी साधना काय कामाची ? ज्यातून दुःख मिळत असेल ती गोष्ट कितीही चांगली असेल तर ती वाईटच वाटते. देवाचा कधी कधी आपणास तिटकारा येतो. म्हणजे या सर्व गोष्टी या मानसिक आहेत. मनाला आनंद देण्यासाठी, सुखी करण्यासाठी साधना करायला हवी. दुःख मिळत असेल तर साधना कधीही करू नये.
साधनेचा कंटाळा आला असेल तर त्याची सक्ती करू नये. आज साधना होणार नाही. उद्याही करावीशी वाटणार नाही. अशावेळी साधना करू नये. त्यातून दुःख मिळत असेल तर ती कधीही करू नये. आपल्या मनाला आवडेल, पटेल तेव्हाच ध्यान धारणा, साधना करावी. अशी साधनाच आनंद देते. साधनेचे व्यसन असावे, पण त्यातून दुःख मिळणार असेल तर ते व्यसन वाईट असते. सुखाने मर्यादा ओलांडली की पदरी दुःखच पडते. यासाठी कोणतीही गोष्ट मर्यादेत असावी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.