संवाद हरवत चालल्याची जाणीव यात आहे, ओल हरवलेल्या मातीचे कण्हणे यात आहे. येणाऱ्या युगाचे दर्शन यात आहे. बळीराजाच्या आयुष्याला पडलेल्या सातबाराच्या बेड्या यात आहेत, आणि बुरखा पांघरलेली वेगळ्या तत्त्वांची माणसे तोही यात दिसतात. या घडीचे हे समग्र जगणे आहे, त्याची विफलता, त्या मागचे क्रौर्य, माणुसकीचा अभाव आणि या सर्वांमागची सल हे सारे डॉ. पाटील यांच्या चितनाचे विषय आहेत.
अरुण म्हात्रे shabd.arun@gmail.com
डॉ. श्रीकांत पाटील हे अत्यंत संवेदनशील आणि तरीही अत्यंत तीव्रपणे आपल्या मनातील खळबळ व्यक्त करणारे उत्कट व्यक्तिमत्व आहे. ‘काळच उत्तर देईल’ या शीर्षकातच काही प्रश्न दडलेले आहेत. आणि कवी श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांची उत्तर शोपलेली आहेत. जगण्यासाठी जसं प्रेम, जिव्हाळा, आस्था, आपुलकी, माणुसकी, सौहार्द हे सारं आवश्यक असतं, तसंच एखाद्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाची अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी राग, चीड, तळतळाट, विद्रोह हेसुद्धा तितकंच आवश्यक असतं. हा विद्रोह काही उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर काही चांगले नवीन निर्माण करण्यासाठीही असतो. आणि एखाद्या जाणत्या कवीला असा विद्रोह पदरी बांधण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मनात हे सगळे प्रश्न का उभे राहत असतील ? याचं कारण त्यांचं हृदय अत्यंत जिवंत आहे आणि ते सतत सत्य असत्याचा वेध घेत असतं. कवितेने कवीला दिलेली ही खूप मोठी देणगी आहे. निसर्गाचे सुंदर चित्र व्यक्त करता करता जगण्याची अत्यंत क्रूर हिरा अशी बाजू दाखवणे हेसुद्धा कवीचं निहित कर्तव्य बनून जातं.
निसर्गाच्या, हिरवळीच्या चांदण्यांच्या, फुलाफुलांच्या आनंदाच्या आणि गोड नात्यांच्या कविता लिहिणारे अनेक जण असतात. मात्र जगण्याला पडलेले प्रश्नांचे भोक, बळीराजाचा आक्रोश, ‘नाही रे गटातल्या माणसांचे संघर्ष आणि आपत्तीने हैराण झालेल्या माणसांचे दुःख सांगणे हे कार्यकर्त्यांचे मन असलेल्या कवींचे निहित कार्य ठरते. डॉ. पाटील याचे तगमगते मन आणि एकूण अस्वस्थता याचा प्रभाव या संग्रहावर आहे. एकूण चार भागात विभागलेल्या ह्या काव्यसंग्रहाचे सांगणे म्हणजे डॉ. पाटील यांच्या अनुभवाचे आणि अभ्यासाचे संचित आहे. संवाद हरवत चालल्याची जाणीव यात आहे, ओल हरवलेल्या मातीचे कण्हणे यात आहे. येणाऱ्या युगाचे दर्शन यात आहे. बळीराजाच्या आयुष्याला पडलेल्या सातबाराच्या बेड्या यात आहेत, आणि बुरखा पांघरलेली वेगळ्या तत्त्वांची माणसे तोही यात दिसतात. या घडीचे हे समग्र जगणे आहे, त्याची विफलता, त्या मागचे क्रौर्य, माणुसकीचा अभाव आणि या सर्वांमागची सल हे सारे डॉ. पाटील यांच्या चितनाचे विषय आहेत.
एकूण झपाटून जावं असं या काव्यसंग्रहाचं स्वरूप तुम्हाला बोचकारेही काढतं आणि उर्मी करतं, अस्वस्थ करतं आणि संघर्षांला तयार ही करतं. डॉ. पाटील यांची कविता है नव्या काळाच्या कोरडेपणाला एका जागृत कवीने दिलेले चोख उत्तर आहे.
पुस्तकाचे नाव – काळच उत्तर देईल
कवी – डॉ. श्रीकांत पाटील
प्रकाशन – गोल्डन पेज पब्लिकेशन
किंमत – ₹180
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.