रावसाहेब पुजारी यांच्या ‘कातरबोणं कादंबरीचे प्रकाशन शुक्रवारी ( २५ जुलै २०२५ ) जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते व कृष्णात खोत व प्राचार्य राजेंद्र कुंभार हे उपस्थित दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या निमित्ताने….
'कातरबोणं' समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरणारा ग्रंथ
'कातरबोणं' या ग्रंथाला ठराविक एका वर्गीकरणात बसवतां येत नाही. म्हटलं तर हा मेंढपाळ समाजाच्या जगण्याचा शोध आहे. छोट्या छोट्या कथांचा संग्रह आहे, सलग वाचत गेलो तर ती एक कादंबरी आहे, म्हटलं तर ते एका गावाचं चरित्र आहे, एका समाजाची भ्रमण गाथा आहे. कोल्हापूर परिसरातील मेंढपाळ समाजाचे जगणे पाळीव जनावरांशी अधिक जोडलेले असते. माणसाइतकच मेंढरं, जनावरं, कुत्री, घोडी या सगळ्यांचं मिळून बनलेलं समूह जीवन आहे. या सगळ्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब 'कातरबोणं मध्ये प्रत्ययास येते.
मेंढपाळ समूहाच्या स्वतःच्या अशा प्रथा परंपरा, चालीरीती, श्रध्दा अंधश्रध्दा आहेत. देव देवस्की, यात्रा - खेत्रा, सण-समारंभ आहेत. त्यांची जगण्याची स्वतंत्र रीत आहे. मेंढपाळ समाजात जातीची उतरंड आहे. श्रेष्ठ-कनिष्ठ भेदभाव आहे. या साऱ्याच्या तपशीलवार नोंदी या पुस्तकात सापडतात. माणूस आणि प्राणी यांचे खोल नातेसंबध, राग लोभ या साऱ्याचा शोध येथे लेखक घेताना दिसतो.
हे मेंढपाळ विश्व मिश्र भाषिक संस्कृतीने बनलेले आहे. फिरस्ती करणाऱ्या या समाजाची भाषा अनेक भाषिक समूहांचे संस्कार घेऊन आकाराला येते. यांची दैवत परंपरा मिश्र स्वरूपाची आहे. लेखक या साऱ्याचा शोध सखोलपणे घेण्याची आकांक्षा बाळगतो. त्यामुळे हे लेखन अधिक वैशिष्ठपूर्ण बनलेले आहे. एका समूहाचा सर्वांगिण शोध घेणारे हे लेखन ललित लेखन म्हणून महत्वाचे आहेच, त्या बरोबरच समाजशास्त्राच्या अभ्यासकांना अधिक उपयुक्त ठरणारे आहे. म्हणून या ग्रंथाचे मोल मराठी साहित्यात अधिक आहे. रावसाहेब पुजारी यांनी ही मराठी साहित्यात घातलेली मोलाची भर आहे.
- डॉ. राजन गवस सुप्रसिद्ध साहित्यिक
'कातरबोणं' ही मानवकेंद्री आणि निसर्गप्रेमी कादंबरी
'कातरबोणं' ही मानवकेंद्री आणि निसर्गप्रेमी कादंबरी आहे. दौलतवाडी गावत गेल्या ३०-४० वर्षांत झालेले सर्व बदल लेखकाने बारकाईने टिपले आहेत. रूढ अर्थाने या कादंबरीला नायक नाही. निसर्ग हाच तिचा नायक म्हणून पुढे येतो. किंबहुना, निसर्ग आणि समन्वयवादी सहसजीव आणि उन्नतीकडे घेऊन जाणारे गावचं राजकारण या घटकांभोवती ही कादंबरी फिरताना दिसते. म्हणून या कादंबरीचे नायकत्व हेच तिचे यश आहे.
मेंढपाळ समाजाचे जगणे आणि त्याचे प्राक्तन अधोरेखित करणारी ही कादंबरी साचेबद्ध नाही. निसर्ग आणि माणुसकीचा धागा पकडून धनगर संस्कृती कशी बहरते याचे चित्रण ही कादंबरी सांगते. मेंढपाळाचं जगणे, खाणे, गाणे आणि वाजविणे या जीवनशैलीचा अविष्कार या कादंबरीचा मुख्य आशय आहे. तो अधिक भावतो. एकाच वेळेला कृषि आणि मेंढपाळ अशा दोन संस्कृती आणि त्यातील होणारे बदल टिपणारी मराठी वाङमयातील ही महत्त्वाची साहित्यकृत्ती आहे. मेंढपाळ समाजाच्या अस्सल जगण्याचं वास्तव वेध घेणारी ही कांदबरी मराठी साहित्यातील महत्त्वाचा दस्तऐवज ठरते.
प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार,
ज्येष्ठ विचारवंत
'कातरबोणं ग्रंथात मेंढपालांचे बदलतं समाजचित्र
तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं दौलतवाडी हे गाव आता नव्या वळणावर आहे. गावानं जणू कात टाकली आहे. गावाच्या वेशीवर विकास आला तरी अजून मेंढपाळांना मेंढरं घेऊन गावोगावी भटकंती करावीच लागते. गावोगावी त्यांची संख्या घटली असली तरी त्याचं बारमाही भटकंतीचं जगणं आहे. ते मांडणारी 'कातरबोणं' ही लक्षवेधी साहित्यकृत्ती.
महाराष्ट्राचे राजकारण गेल्या तीनचार दशकांत पार पालटून गेलं आहे. जागृती तळच्या वर्गापर्यंत पोचली आहे. त्यामुळे विकासाचा झिरपाही वेगवान होऊन सुखसमृद्धी सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत येऊन ठेपली आहे. विकासाचं केंद्र तालुका व गाव येथपर्यंत गेल्या काही काळात पोचलं आहे. तळाचा माणूस विकास प्रक्रियेत आता मध्यवर्ती येऊन कर्तबगारी करतो आहे.
अजून मेंढकं जित्राब घेऊन रानावनात डोंगरखोऱ्यात, गावोगावी जात आहेत, पण त्यांचं - त्यांच्या घराचं जीवनमान बदलून गेलं आहे. रावसाहेब पुजारी यांनी तेच बदलतं समाजचित्र पुऱ्या तपशिलांनी वेधक रीत्या रेखाटलं आहे. त्यामधून समाजगटांची प्रगती - त्यातील संघर्ष, हक्कांची जाणीव, बदललेले सामाजिक नातेसंबंध… अशा मोठ्या कॅनव्हासवर मेंढकं व त्यांच्या मेंढ्यांचं हृद्य भावचित्र उभं राहतं.
दिनकर गांगल,
संस्थापक, ग्रंथाली, थिंक महाराष्ट्र
पुस्तकाचे नाव – कातरबोणं
लेखक – रावसाहेब पुजारी
प्रकाशक – तेजस प्रकाशन, 9322939040, 8308858268
किंमत – ३०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
भाजप जिंकलीच कशी ? समजवण्याचा विश्लेषणात्मक प्रयत्न