जीवनाशी थेटपणे भेटणाऱ्या साहित्यिकांचा अंतर्भाव कुळवाडी दिवाळी अंक २०२३ मध्ये झालेला दिसून येतो. या अंकाच्या विविध विभागातून आलेले साहित्य व विचार वाचकाला अंतर्मुख करणारे आहेत.
डॉ. कमलाकर चव्हाण
प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख
श्री योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमत जि. हिंगोली.
भ्र. ९४२१३८१३५०
कुळवाडी हा दिवाळी अंक माधव जाधव यांनी संपादित केलेला आहे. माधव जाधव हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांच्या संकल्पनेतून व कल्पकतेतून कुळवाडी हा पहिलाच दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. या दिवाळी अंकातील साहित्य नजरेखालून घातल्यास आपल्या लक्षात येते की, हा वाचकांची अभिरूची संपन्न करणारा दिवाळी अंक आहे. यामधील साहित्य निवड अत्यंत डोळसपणे आणि प्रयत्नपूर्वक केलेली दिसून येते. यामध्ये एकूण सात विभाग असून त्यात कथा व ललित, कविता, लेख, मुलाखत, बालसाहित्य,बालविश्व, आणि स्वागत नव्या पुस्तकांचे यांचा अंतर्भाव केलेला आहे. यामधील साहित्य, वैचारिकता आणि अंकाची निर्मिती वाचकांचे लक्ष वेधून घेणारी आहे, हे या अंकाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे.
ललित लेखातून सामाजिक व वाड्.मयीन मूल्यांचा अविष्कार
कथाही वयपरतवे माणसाची साथसंगत करत असते. कथेला मौखिक व लिखित परंपरा आहे. कथाही आदर्श मूल्यांची पेरणी करून मानवी जीवन समृद्ध करत असते. या अंकात उमेश मोहिते, विद्याधर बन्सोड, सचिन वसंत पाटील, मोतीराम राठोड, विनय मिरासे, अनंता सूर, निशा डांगे, ललिता गादगे, सुरेंद्र पाटील, शीलवंत वाढवे यांच्या लेखनाचा समावेश कथा व ललित विभागात करण्यात आला असून हे लेखन लक्षवेधी स्वरूपाचे आहे. यामधून समाजवास्तव आणि मानवी जीवनजाणिवांची प्रभावी अभिव्यक्ती झालेली दिसून येते. तसेच या लेखातून सामाजिक व वाड्.मयीन मूल्यांचा अविष्कार झालेला आहे. या विभागाची संपादकीय जबाबदारी अमरावती विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक व लेखक डॉ. माधव पुटवाड यांनी पार पाडली आहे.
कवितेतून मानवी जीवनविश्वाला समृद्ध करणारा आशय
काव्यनिर्मितीचा संबंध माणसांच्या जगण्याशी असतो. कवी समाजातील सत्याचा शोध घेतो. तसेच कवितेला लगटूनच कवीचा जीवनविषयक दृष्टिकोनही व्यक्त होत असतो. कवी सहज लिहीत नाही तर अस्वस्थ भोवताल आणि अंतःकरणातला कोलाहल त्याला स्वस्थ बसू देत नाही. समाजातील विसंगती, विकृती नाहीशी करून समाज सुंदर करण्याचा ध्यास काव्यलेखनाच्या मुळाशी असतो. या अंकातील काव्य विभागात जगदीश कदम यशवंत मनोहर, केशव सखाराम देशमुख,उत्तम कोळगावकर, डी. के. शेख, हबीब भंडारे मारुती कटकधोंड, मनीषा पाटील, रावसाहेब कुंवर, एकनाथ पाटील, गणपत माखणे, ललित अधाने, इंद्रजित घुले, विद्या बयास ठाकूर, हर्षानंत, संजय बालाघाटे, ऐश्वर्य पाटेकर इत्यादी कवींचा समावेश आहे. सामाजिक, राजकीय, ग्रामीण, स्त्रीवादी, व्यक्तीचित्रणात्मक इत्यादी स्वरूपाचा आशय या कवितांमधून प्रकट झालेला पहावयास मिळतो. या कवितेतून मानवी जीवनविश्वाला समृद्ध करणारा आशय व्यक्त झाला आहे. त्याचबरोबर समाजाच्या उत्थानाची आस या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. प्रसिद्ध कवी व समीक्षक डॉ. कमलाकर चव्हाण यांनी कविता या विभागाच्या संपादनाचे कार्य केले आहे.
विचारप्रवर्तक अशा लेखांचा समावेश
या अंकातील लेख विभागात अत्यंत महत्त्वाचे व विचारप्रवर्तक अशा लेखांचा समावेश आहे. ‘महात्मा फुले आणि ग्रामीण साहित्य’ हा डॉ.वासुदेव मुलाटे यांचा महत्त्वपूर्ण असा लेख आहे. शेतकरी, शिक्षण आणि स्त्रियांचे प्रश्न घेऊन महात्मा फुले आयुष्यभर संघर्षरत राहिले. त्यांच्या विचारकृतीचे नीट आकलन करून ग्रामीण लेखकांनी साहित्यनिर्मिती व कार्यप्रवण व्हावे, हा विचार मांडला आहे. ‘लोकमहर्षी डॉ. भाऊसाहेब देशमुख : काही अलक्षित पैलू’ हा डॉ. अशोक इंगळे यांचा लक्षवेधी लेख आहे. त्यांच्या शेती, शिक्षण व इतर प्रश्नांवर मांडलेल्या चिंतनशील विचारांची गरज आजही समाजाला आहे. डॉ. इंगळे यांनी भाऊसाहेबांच्या दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंवर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. तसेच डॉ. व्ही.एन.शिंदे यांचा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा लेख मौलिक विचार देणारा आहे. विवेकवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या समाजनिर्मितीची आस या लेखनाच्या मुळाशी असलेली दिसून येते. कृषिविचारवंत विजयअण्णा बोराडे यांचा ‘मृद व जलसंधारण आणि ग्रामीण विकास’ या लेखाचा अंतर्भाव आहे. मृदा व जलसंधारण हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यावर ग्रामीण जीवनाचा विकास अवलंबून आहे, हे या लेखातून आपल्या लक्षात येते.’ राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० : एक अवलोकन’ या लेखात डॉ. डी. एन. मोरे यांनी या धोरणाची उच्च शिक्षणाच्यासंदर्भात साधकबाधक चर्चा केली आहे. हे धोरण शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारे असल्यामुळे या लेखातील विचार समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विभागाची संपादकीय जबाबदारी अक्षरगाथाचे संपादक डॉ. मा. मा. जाधव यांनी सांभाळली आहे.
दीर्घ मुलाखतीतील विचार शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
परभणी येथील कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त विस्तार शिक्षण संचालक डॉ. उत्तमराव इंगळे यांची डॉ. माधव जाधव व डॉ. सुधाकर इंगळे यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत या अंकात प्रकाशित केली आहे. डॉ. इंगळे यांनी शेतीला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी म्हणून आयुष्यभर महनीय कार्य केले आहे. शेती, शेतकरी आणि कृषिअधिकारी यांच्यात सुसंवाद घडल्याशिवाय शेतीला चांगले दिवस येणार नाहीत, ही त्यांची पक्की धारणा आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी राज्य व देशाच्या प्रशासन सेवेत आहेत. त्यांच्या ह्या मुलाखतीतील विचार शेती करणाऱ्या शेतकरी बांधवास निश्चितच उपयुक्त ठरणारे आहेत. या विभागाचे संपादन डॉ . माधव जाधव यांनी केले आहे.
आदर्श मूल्यांची रुजवणूक करणारे बालसाहित्य
या अंकातील बालसाहित्य या विभागात डॉ .सुरेश सावंत, एकनाथ आव्हाड, बबन शिंदे, मीनाक्षी आचमे- चित्तरवाड, प्रा. देवबा पाटील, मनोहर भोसले यांच्या कथा आहेत. तर याच विभागात वीरभद्र मिरेवाड, शंकर वाडेवाले, आनंद पुपलवाड, पंडित पाटील यांच्या बालकवितांचा अंतर्भाव आहे. संस्कारमूल्यांचा विचार बालसाहित्याच्या केंद्रस्थानी असतो. तसेच अभ्यास, चांगल्या सवयी, श्रमप्रतिष्ठा, वडीलधाऱ्या माणसांबद्दलचा आदरभाव, सत्यनिष्ठा, बंधुभाव इत्यादी आदर्श मूल्यांची रुजवणूक हे साहित्य आत्मीयतेने करते. या वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब बालसाहित्य विभागातील कथा, कवितांमधून ठळकपणे उमटलेले दिसून येते. बालसाहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांना बालमानसशास्त्राचे उत्तम भान असणे आवश्यक असते. या विभागातील साहित्य वाचल्यानंतर हे भान उत्तम असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या विभागाचे संपादन सुप्रसिद्ध बालसाहित्य दत्ता डांगे यांनी केले आहे.
बालविश्व या विभागात लहान मुलांच्या साहित्याचा समावेश आहे. यामध्ये रोहन गावडे, अंकिता अन्नारे, स्वरा तिवडे, साक्षी काजळे, वैष्णवी सुतार, गिरीश धोंगडे, प्राजक्ता गवड, गौरी हिंगे यांनी आपल्या बालविश्वातील विचार, भावनांना शब्दरूप दिले आहे. अशा प्रकारचे उपक्रम उद्याचे चांगले लेखक घडविण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरतात. कुळवाडी या दिवाळी अंकाने हा वेगळा आणि लेखक घडविण्यासाठीचा एक उत्तम प्रयोग केला असून तो दखलपात्र असाच आहे. प्रसिद्ध कवी, बालसाहित्यिक बबन शिंदे यांनी बालविश्व या विभागाच्या संपादनाचे कार्य केले आहे.
जीवनाशी थेटपणे भेटणाऱ्या साहित्यिकांचा अंतर्भाव
या अंकामध्ये स्वागत नव्या पुस्तकांचे हा एक विभाग देण्यात आला आहे. काही ग्रंथ त्यामधील विचार, तत्त्वज्ञान, संस्कृतीचित्रण, आशय, अविष्कारशैली इत्यादी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. तसेच काही पुस्तके कायमच चर्चेत राहिलेली असतात. अशा साहित्य विश्वातील दर्जेदार, कसदार ग्रंथांची ओळख रसिक – वाचकांना व्हावी, या उद्देशाने या विभागाची निर्मिती झालेली दिसते. यामध्ये ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’, ‘राजमाता जिजाऊ…’, ‘ग्रामीण साहित्य चळवळ: एक ध्यासपर्व’, ‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’, ‘सोयरे सांगाती’, ‘उच्च शिक्षण धोरण : आव्हाने आणि दिशा’, ‘वाळसरा’, ‘मायबापहो – हाक गाडगेबाबांची’, ‘आधुनिक शाहिरी’, ‘समीक्षा आणि समीक्षक’ या ग्रंथांचा परिचय अनुक्रमे डॉ. प्रशांत गायकवाड, प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण, डॉ. जगदीश कदम, डॉ . ज्ञानदेव राऊत, डॉ. व्यंकटी पावडे, डॉ. दत्ता सावंत, डॉ.यादव सूर्यवंशी, डॉ. काशीनाथ बऱ्हाटे, डॉ. संजय जगताप, डॉ. दीपक चिद्दरवार या अभ्यासकांनी करून दिला आहे. यामधून या ग्रंथाचे स्वरूपविशेष व वेगळेपण लक्षात आणून दिले आहेत. या विभागाचे संपादन डॉ. रंगनाथ नवघडे यांनी केले आहे.
जीवनाशी थेटपणे भेटणाऱ्या साहित्यिकांचा अंतर्भाव कुळवाडी दिवाळी अंक २०२३ मध्ये झालेला दिसून येतो. या अंकाच्या विविध विभागातून आलेले साहित्य व विचार वाचकाला अंतर्मुख करणारे आहेत. विजय चित्तरवाड यांचे मुखपृष्ठ आशयगर्भ व लक्षवेधी झालेले आहे. जितेंद्र साळुंखे व सुनील यावलीकर यांची रेखाटने अंकाचे सौंदर्य वाढवून आशयाकलनास साह्यभूत ठरणारे आहेत. सायास पब्लिकेशन, नांदेड यांनी हा अंक प्रकाशित केला असून अंकाची निर्मिती, मांडणी वाचकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. मुख्य संपादक डॉ. माधव जाधव व कार्यकारी संपादक डॉ. सौरभ जाधव यांनी सर्वांगसुंदर दिवाळी अंक दिला असून हा अंक वाचकांची अभिरूची संपन्न करणारा आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.