September 9, 2024
Rain will reduce in Marathwada for a week
Home » मराठवाड्यात आठवडाभर पावसाचा जोर कमी राहणार !
गप्पा-टप्पा

मराठवाड्यात आठवडाभर पावसाचा जोर कमी राहणार !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

प्रश्न – मराठवाड्यात आठवडाभरात पावसाचा जोर कसा राहील ?

माणिकराव खुळे – मराठवाड्यात हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जवळ काल केंद्रित अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकल्यामुळे उद्या बुधवार ( दि.४ सप्टेंबर) पासून मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड अश्या पाच जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होईल. तेथे केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ, हलक्या ते मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते. उर्वरित हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर अश्या तीन जिल्ह्यात उद्या (बुधवार दि.४) ते मंगळवार ( दि.१० सप्टेंबर) पर्यंत आठवडाभर मात्र मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे.

प्रश्न – मुंबईसह कोकणात या आठवड्याभरात पाऊस कसा असेल ?

माणिकराव खुळे – मुबईसह कोकणात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. मान्सूनचा मुख्य आस काहीसा दक्षिणेकडे सरकलला आहे. अरबी समुद्रात संपूर्ण पश्चिम किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर ‘ऑफ-शोअर ट्रफ ‘ ची उपस्थिती आहे. तसेच अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून दिड किमी उंचीपर्यंत ताशी ४८ किमी वेगाचे येणारे आर्द्रतायुक्त पश्चिमी वारे, वेग कमी होवून  प्रत्यक्षात ताशी २०-२५ किमी वेगाने मुंबई किनारपट्टीवर आदळत आहे. ह्या सर्वांच्या एकत्रित परिणामातून मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात मंगळवार ( दि.३ सप्टेंबर) ते मंगळवार ( दि. १० सप्टेंबर पर्यंत )आठवडाभर अतिजोरदार पावसाची शक्यता ही कायम टिकून आहे.

प्रश्न – मध्य महाराष्ट्र व विदर्भात या आठवड्याभरात कसा पाऊस असेल ?

माणिकराव खुळे – मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज ( मंगळवार दि.३ ) ते मंगळवार दि. १० सप्टेंबरपर्यंत आठवडाभर खान्देश, विदर्भ आणि नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या २१ जिल्हात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही कायमच आहे.

प्रश्न – धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग कसा राहील ?

माणिकराव खुळे – सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील पावसाचा जोर पाहता आज मंगळवार दि. ३ ते मंगळवार दि. १० सप्टेंबरपर्यंत आठवडाभर धरणांतून होत असलेला जलविसर्ग असाच टिकून राहू शकतो, किंवा त्यात अधिक वाढही होवु शकते. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावर पूर-परिस्थितीची शक्यता ही कायम राहील, असे वाटते.

प्रश्न – महाराष्ट्रात आठवडाभरात तापमान कसे असेल ?

माणिकराव खुळे – विदर्भ वगळता महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ डिग्रीने खालावून २८ डिग्री से. ग्रेड च्या आसपास आहे. तर पहाटेचे किमान तापमानही सध्या सरासरीइतके म्हणजे २२ डिग्री से. ग्रेडच्या आसपास जाणवते आहे. ह्या कमाल व किमान अश्या दोन्ही तापमानातील फरक कमी कमी होत, ६ डिग्री से. ग्रेड पर्यन्त खालावला आहे. त्यामुळे सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारीही सरासरीपेक्षा वाढतीकडे झेपावत आहे.  प्रचंड अश्या ह्या होणाऱ्या आर्द्रतेच्या उपलब्धतेतून आणि फक्त कमाल तापमानातील विशेष अश्या घसरणीमुळे,  येथे-तेथे पडणाऱ्या उष्णता संवहनी प्रक्रियेच्या पावसास सध्याचे वातावरण मारक ठरून,  व्यापक क्षेत्र कव्हर करणाऱ्या मान्सूनच्या पावसाला पूरक ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तश्याच प्रकारचा व्यापक क्षेत्र कव्हर करणारा दमदार पावसाचा लाभ होत आहे. आज पासून दोन दिवसानंतर म्हणजे गुरुवार दि. ५ सप्टेंबरला बंगाल उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असुन सप्टेंबर मधील सध्याच्या पावसाच्या आवर्तनासाठी पूरक ठरेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

तळमळ वाचन चळवळ रुजवण्याची…

हा तर ग्रामीण कथेचा सन्मान

Saloni Arts : असे रेखाटा चमच्याचे थ्रीडी चित्र

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading