शहरीकरणाचे अतिक्रमण थोपवले पाहिजे. नव्या पिढीला जुन्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्याशिवाय त्यांची नात्यांशी भावनिक नाळ जुळणार, टिकणार नाही. काळ झपाट्याने बदलत आहे. खेडेगावातील अनेक गोष्टी लुप्त होतायत. या परिस्थितीत प्रतिभा दिवाळी अंकाने हरवलेलं गाव हा विषय घेणे हे दुर्मिळ आणि आनंददायी आहे.
अभिनेते किरण माने
इस्लामपूर : सध्या वर्चस्ववादी लोक जुने सगळे पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या वेगळ्या प्रकारच्या साहित्याचे मार्केट जोरात असताना ‘प्रतिभा’ मात्र जुनी मुळे धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अभिनेते किरण माने यांनी काढले.
प्रतिभा दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र फौंडेशन (अमेरिका) पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आनंद विंगकर अध्यक्षस्थानी होते. प्रतिभा अंकात यंदा ‘हरवलेलं गाव’ हा विषय घेण्यात आला आहे. अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या मनोगतात मायणी गावच्या आठवणींना वाट करून दिली.
प्रत्येकाच्या जगण्यात गावाचा किती महत्वाचा वाटा असतो आणि हे गावपण टिकले पाहिजे यासाठी प्रतिभा सारखे अंक कसे मौल्यवान योगदान देत आहेत.
अभिनेते किरण माने
ते म्हणाले, “शहरीकरणाचे अतिक्रमण थोपवले पाहिजे. नव्या पिढीला जुन्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्याशिवाय त्यांची नात्यांशी भावनिक नाळ जुळणार, टिकणार नाही. काळ झपाट्याने बदलत आहे. खेडेगावातील अनेक गोष्टी लुप्त होतायत. या परिस्थितीत प्रतिभा दिवाळी अंकाने हरवलेलं गाव हा विषय घेणे हे दुर्मिळ आणि आनंददायी आहे. पूर्वीच्या आणि आताच्या लोकांनी नॉस्टॅल्जिक होणे यात खूप फरक आहे. दिवाळी हा बहुजनांचा आनंदोत्सव आहे. प्रतिभा हा त्याचा खऱ्या अर्थाने बळी महोत्सव आहे.”
आनंद विंगकर यांनी ग्रामीण भागातून निघणाऱ्या ‘प्रतिभा’ ने आजवर विविध विषयांची केलेली हाताळणी साहित्य क्षेत्राला पोषक ठरत आल्याचे कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. संजय थोरात यांनी प्रास्ताविकात दिवाळी अंकांच्या परंपरेचा आढावा घेतला. धर्मवीर पाटील यांनी स्वागत केले. मानसतज्ञ कालीदास पाटील, चित्रकार अन्वरहुसेन, जलसंपदा विभागातील अधिकारी जयंत खाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गौर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उत्तम सावंत, दिग्दर्शक सचिन जाधव, अभिनेता फिरोज शेख, ग्रामीण कथाकार हिम्मत पाटील, सुधीर कदम, आत्मशक्ती पतसंस्थेचे संचालक सूर्यकांत शिंदे उपस्थित होते. सचिन जाधव यांनी आभार मानले.
