अनेक वर्षे काळोखात असणाऱ्या घराच्या भिंती विजेच्या लख्ख उजेडाने प्रकाशमान झाल्या. आता रॉकेलच्या दिव्यांचं कामही संपुष्टात आलं. गरजच उरली नसल्याने त्यांना कोणीही हाताळेनासं झालं. एका फळीवर रांगेत ठेवले गेलेल्या या दिव्यांवर कालांतराने माती आणि कोळीष्टक बसले. सुरक्षित म्हणून बत्ती माळ्यावरील एका खुंटीला अडकवून ठेवली गेली. आज ३४ वर्षानंतरही निरुपयोगी झालेली बत्ती त्याच खुंटीला लटकत आहे. या बत्तीच्या उजेडात आमच्या वाटा मात्र प्रकाशमान झाल्या.
जे. डी. पराडकर 9890086086
काही लोक सायंकाळच्या वेळी देवापुढे लावल्या जाणाऱ्या उदबत्ती आणि निरांजनाला ‘ बत्ती ’ लावणे असे म्हणतात. आम्हाला माहित असणारी बत्ती म्हणजे गॅस बत्ती ! या बत्तीची आठवण आम्हाला थेट आमच्या बालपणात घेऊन जाते. बत्तीच्या अनेक आठवणी आमच्या मनात आजही कायम आहेत. बत्ती म्हणजे स्वच्छ आणि अधिक प्रकाश देणारा रॉकेलचा एक मोठा दिवा. बत्तीची बनावट खरोखरच वाखाणण्याजोगी होती. आमच्या आंबेडखुर्दच्या घरी एक उत्तम बनावटीची बत्ती आजही आहे . घरी बत्ती आहे म्हणून, ती दररोज लावली जात नसे. ती लावण्यासाठी काही ना काही निमित्त असावे लागे. सण – उत्सव, घरी संपन्न होणारा एखादा कार्यक्रम, रात्रीच्या वेळी पाच-सहा जण मिळून कोठे जाण्याची वेळ आली, तरच बत्ती लावली जात असे. बालपणी या बत्तीने आपल्या उजेडातून आम्हाला केवळ रस्ताच दाखवला असं नव्हे, तर माणसांचे खरे चेहरे देखील स्पष्टपणे दाखवले. घरात बत्ती लावली गेली, की रॉकेल वरचे छोटे दिवे उजेड देण्यास फिके पडत. बत्तीच्या उजेडात आपली ओळख आणि उजेड देण्याची ताकद कमी होत असल्याचे पाहून छोटे दिवे मात्र नाराज होत असल्याचा आम्हाला भास होई. छोट्या दिव्यांच्या ज्योतीची होणारी फडफड हा त्यांच्या नाराजीचाच एक प्रकार असे. पूर्वीच्या काळी इंधन हे जपून वापरावे लागे. किराणा मालाच्या दुकानात त्यावेळी रॉकेल मिळायचे . एकदा भरून आणलेला पाच लिटरचा कॅन ठराविक दिवस पुरवण्याचे गणित प्रत्येक घरात आखून ठेवलेले असे. बत्ती, कंदील आणि रॉकेलचे सर्व दिवे दररोज संध्याकाळी साफसुफ करण्याचा एक सोहळाच संपन्न व्हायचा. त्याकाळी मेणबत्तीला मात्र घरात फारसा थारा नव्हता. रॉकेल, कंदील असे शब्द आल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल, हा सारा काळ घरी वीज प्रवाह सुरू होण्यापूर्वीचा होता. बत्ती असो अथवा रॉकेलचा कोणताही दिवा या सर्वांनी आमच्या आयुष्यात मात्र उत्तम प्रगतीचा उजेड पाडला.
स्वयंपाक घराला लागून असलेल्या पडवीत एका बाजूला धान्याचे मोठे लाकडी कोठार, या कोठाराच्या जवळच दगडी वाईन आणि एक लाकडी उखळ, भाजणी आणि तत्सम धान्य भाजण्यासाठी एक चूल, कोपऱ्यात लाकडी मुसळं, विविध प्रकारची हत्यारं, चूली जवळच्या भिंतीला पाच फुटावर एक लाकडी फळी आणि त्यावर सर्व प्रकारचे रॉकेलचे दिवे ठेवलेले असत. आमच्या घरी त्यावेळी दोन कंदील, एक गॅस बत्ती, रॉकेलचे सहा छोटे दिवे अशी प्रकाशाची व्यवस्था होती. दिव्यांना असणाऱ्या वाती काजळी धरत असल्यामुळे दररोज सायंकाळी साफ कराव्या लागत. त्या सर्व दिव्यांची पडवीत देखभाल सुरू असताना, आम्ही भावंड कोंडाळ करून काकूच्या आणि आमच्या आईच्या भोवती बसत असू. दिव्यांची काळजी कशी घ्यायची याची शिकवण आम्हाला यातून आपोआप मिळत गेली. कोणतीही गोष्ट मला शिकव असे सांगून शिकता येत नाही, तर त्यासाठी आपण मन लावून स्वतःहून ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा लागतो. छोटे दिवे देखभालीसाठी आमच्या हातात दिले जात असले, तरी कंदीलाची काच मात्र काकू अथवा आईच साफ करत असत. बत्तीच्या देखभालीचा अधिकार आबांना आणि श्रीकांत काकांनाच होता. घरातील सर्वच रॉकेलचे दिवे नेहमीच चकचकीत असल्याचे पाहायला मिळे. सर्व दिव्यांमध्ये गॅसबत्ती ही घराची एक मोठी शोभा होती. गॅस बत्ती साठी घरात मेंटल आणून ठेवावी लागत. त्याकाळी लाल काळया रंगाच्या पत्र्याच्या चपट्या डब्यात प्रसिद्ध अशा ‘ फारगो ’ कंपनीची दर्जेदार अशी मेंटल मिळत असत.
अंधार पडण्यापूर्वी रॉकेलचे सर्व दिवे प्रज्वलित केल्यानंतर कंदीलाची जागा ओटीवर असे. अन्य दिवे जेथे गरज असेल, तसे ठेवले जात. रात्रीच्या भोजनाप्रसंगी घरातील पुरुष मंडळींबरोबर कंदील देखील स्वयंपाक घरात येत असे. दिव्यांचा प्रकाश सर्वत्र पडावा यासाठी ते विशिष्ट उंचीवर ठेवावे लागत. दिवे ठेवण्यासाठी लाकडाचे उंच स्टॅन्ड बनवून घेण्यात आले होते. या स्टॅन्डला ग्रामीण भागात ‘ ठाणवी ’ असे म्हटले जाते. अंधारात ठाणवीवर दिवा विराजमान झाल्यानंतर सर्वत्र सोनेरी प्रकाश पडे. अंधार दूर करणारा हा रॉकेलचा दिवा विशिष्ट उंचीवर जाऊन आपले कर्तृत्व कसे सिद्ध करावे ? याची जणू आम्हाला शिकवणच देत होता. आमच्या घरी असणाऱ्या दिव्यांमधील काही दिवे चक्क मुंबईहून आणण्यात आले होते. त्यामध्ये पितळी, तांब्याचे अशा दिव्यांचा समावेश होता. या दिव्यांनी अनेक वर्षे आम्हाला सेवा दिली. काही निमित्ताने आठवण निघताच, आजही त्यांचे आकार आणि रंग माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे तरळू लागतात. पावसाळ्यात वापरण्यासाठी छोटी काच असणारे विशिष्ट प्रकारचे दिवे होते. पावसाळ्यात वारा सुटल्यानंतर दिव्यांची ज्योत विझू नये यासाठी त्यावर छोटी काच बसवलेली असे. बत्ती साठी जशी फारगो मेंटल आणून ठेवली जात तशाच कंदीलाच्या आणि दिव्यांच्या वाती आणून ठेवलेल्या असत. बत्तीचा उजेड जरी अधिक असला, तरी कंदील अथवा अन्य छोट्या दिव्यांचे महत्त्व कधीही कमी झाले नाही.
आंबेडच्या घरी बत्ती लावण्याच्या अनेक आठवणी आमच्या संग्रही आहेत. मुंबईहून गावी कोणी चाकरमाने येणार असेल, तर त्यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या बस शिवाय अन्य कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. या बस पहाटेच्या दरम्याने मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या आंबेडखुर्द बस थांब्यावर येत असत. चाकरमान्यांना घरी घेऊन येण्यासाठी आमचे चुलते आबा पहाटेच्या वेळी महामार्गावर जायचे. बस थांब्यापासून आमचे घर जवळपास अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. या दरम्यान दोन घाट्या चढाव्या लागत. मुंबईतून येणाऱ्या मंडळींना पायाखालचा रस्ता व्यवस्थित दिसावा यासाठी आबा बत्ती घेऊन बस थांब्यावर जात असत. घरी मुंबईकर चाकरमानी येणार, म्हणजे जणू एक सोहळाच असे. घरातील वातावरण आनंदाने बहरून जायचे. चाकरमानी मंडळींना आणण्यासाठी आबा बरोबर आम्ही मुलं देखील पहाटेच्या वेळी बस थांब्यावर जात होतो. पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान आबा मुलांना हाक मारायचे. चला रे, येताय ना बस थांब्यावर ? चाकरमान्यांना आणायला जाण्यासाठी मन आतुर असल्याने आम्ही लगेचच डोळे किलकिले करून उठून बसायचो. घरून बस थांब्यावर जाताना कंदील आणि बॅटरीच्या उजेडावर आम्ही जात होतो. आबांच्या हातात बत्ती असे मात्र त्याचा उपयोग येताना चाकरमान्यांसाठी केला जायचा. मुंबईहून येणारी बस आमच्या येथील बस थांब्याजवळ येताना वेग कमी करून येऊ लागली, की आमचे चाकरमानी आल्याची आम्हाला वर्दी मिळे.
बस मधून चाकरमानी आणि त्यांचे सामान खाली आले, की आबा बत्ती लावायला घेत. पहाटे पाचच्या सुमारास सारा परिसर बत्तीच्या स्वच्छ प्रकाशाने उजळून निघे. आमची आणि चाकरमान्यांची भेटा भेट झाली, की जसे जमतील तसे त्यांच्या सामानाचे बोजे डोक्यावर घेऊन आम्ही घरची वाट चालू लागायचो. मुंबईहून आलेली मंडळी वाटेत कोठे धडपडू नयेत म्हणून आबा, बत्तीचा उजेड त्यांना व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने वाट चालत. घरी गेल्यानंतर चाकरमान्यांबरोबरच बत्ती देखील ओटीवर विराजमान होई. तोपर्यंत बाहेर अंधूकसे दिसायला लागे. काकूने आणून दिलेला चहा घेऊन झाल्यानंतर, आबा बत्तीची हवा सोडून टाकत. जेवढे दिवस आंबेडखुर्दच्या घरी चाकरमान्यांचा मुक्काम असे, तेवढे दिवस दररोज अंधार पडल्यानंतर बत्ती लावली जायची. चाकरमान्यांचा मुंबईला परतण्याचा दिवस आला, की बस रात्रीची असल्याने आम्ही आबां बरोबर त्यांना सोडण्यासाठी बस थांब्यावर जायचो. सायंकाळी प्रज्वलित केलेली बत्ती रात्री अकराच्या दरम्याने विश्रांती घेत असे. मे महिन्यात आंबेडखुर्दच्या घरी अक्षरशा गोकुळ फुले. किमान २५ ते ३० माणसं वेळेला घरात असत. आंब्या फणसासह रानमेव्याची मुबलकता हे यामागचे मुख्य कारण असे. यामध्ये चाकरमान्यांचा देखील समावेश असे. मे महिन्यात कोकणची सांस्कृतिक परंपरा असलेले नमन खेळे आमच्या घरी दरवर्षी नाचवले जात. जवळपास संपूर्ण गावच आमच्या मांडवात नमन पाहण्यासाठी एकत्र यायचा. ज्या दिवशी आमच्या घरी नमनचा कार्यक्रम असे, त्यादिवशी आबा आणखी दोन बत्त्या उपलब्ध करत. मांडवात दोन बत्त्या लावल्यानंतर त्या उजेडात पहाटेपर्यंत नमनचा सुंदर कार्यक्रम संपन्न व्हायचा. अधून मधून बत्त्यांना हवा भरणे, रॉकेल भरणे अशी कामे नमन खेळातील मंडळीच करत असत. बत्तीच्या उजेडात संपन्न झालेले नमन खेळाचे कार्यक्रम म्हणजे आमच्या अविस्मरणीय आठवणी आहेत.
गणेशोत्सवा दरम्यान दोन-तीन वेळा घरी बत्ती लावली जायची. आरत्यांचा कार्यक्रम एक तासापेक्षा कमी वेळात कधीही आटोपला नाही. भर पावसात घराबाहेर सुरू असणारे रातकिडे, बेडूक आणि अन्य कीटकांचे आवाज आमच्या आरत्या सुरू झाल्यानंतर शांत होत. एकाअर्थी आमच्या टिपेच्या आवाजापुढे या छोट्या कीटकांचे आवाज विरून जात असत. एक आरती झाल्यानंतर दुसरी आरती सुरू करेपर्यंत मध्ये जो वेळ जाई, त्यादरम्यान बाहेरून येणारे कीटकांचे छोटे छोटे आवाज म्हणजे आमच्या आरत्यांना सुरू असणारे ते पार्श्वसंगीतच वाटे. गणेशोत्सवात विविध ठिकाणी भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जात. अनेक वर्षे मौजे असुर्डे येथे ढोल्ये, मुळये, पाध्ये, देवस्थळी यांच्या घरी भजनांचे कार्यक्रम संपन्न होत. किमान दोन वेळा तरी आम्ही आंबेड खुर्द येथून आमच्या घरातील आरत्या आटोपून मौजे असूर्डे येथे भजनासाठी चालत जायचो. अंतर लांबचे असल्याने आणि भजन आटोपल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता असुर्डयातून परत निघायचे असल्याने सोबत प्रकाशासाठी बत्ती असे. एका रात्री आम्ही आंबेड मधून आठ वाजण्याच्या सुमारास निघालो. त्यावेळी रस्त्याला कोणतीही वर्दळ नसे. घाटी उतरून आम्ही महामार्गावर आलो आणि चालत चालत कोंड आंबेड गावात पोहोचल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास अचानक आमच्या वाटेवरील दोन झाडे हलू लागली. एकमेकांजवळ सुरू असणाऱ्या गप्पा अचानक थांबल्या. भावंडात मी सर्वात लहान होतो , आबा हातात काठी घेऊन सर्वांच्या पुढे होते. बत्ती आमच्या भावाच्या हातात होती. अचानक झाडे हल्ल्यानंतर मी जो घाबरलो, तो भावाला जाऊन बिलगलो. हातात बत्ती घेऊन तो चालत असल्याने त्याचा तोल गेला आणि बत्ती रस्त्याला टेकली. एका क्षणात बत्तीचे मेंटल गेले आणि सारा अंधार झाला. आता तर माझी मेंटल व्हायची वेळ आली. आबा आम्हा सर्वांना उद्देशून म्हणाले घाबरू नका, त्यांनी लगेचच खिशातून बॅटरी काढली आणि सर्वांनी मला मध्ये घेऊन आम्ही बॅटरीच्या उजेडात मौजे असुर्डयाची वाट चालू लागलो.
असुर्डे येथे भजनाचा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला. आता जसे अधिकचे बल्ब अथवा ट्यूब घरात आणलेल्या असतात, तशी पूर्वी घराघरात बत्ती असेल, तर मेंटल आणून ठेवली जात. भजन असणाऱ्या घरातून आबांनी एक मेंटल घेतले, ते बत्तीला चढवले आणि ती पेटवल्यानंतर आमचा आंबेडला जायचा पुढील प्रवास सुरू झाला. परतीच्या प्रवासात मला भीती वाटेल असा कोणताही प्रसंग घडला नाही. घरी पोहोचल्यानंतर आबांनी मला सांगितले, त्या झाडावर वानर बसले होते आणि उजेड पाहिल्यानंतर त्यांनी झाडे जोरात हलवली. यावर मी आबांना कोणताही पोट प्रश्न वा शंका विचारली नाही. आबांनी सांगितलेला प्रसंग खरा, की खोटा ? हे त्यांचे त्यांनाच माहीत. माझ्यामुळे मात्र अचानक बत्तीचे मेंटल गेले आणि सर्वत्र अंधार पसरला, ही बत्तीची मला मेंटल करणारी त्यावेळची आठवण माझ्या मनात आजही कायम आहे. वीज प्रवाह नसल्याने रेडिओ व्यतिरिक्त अन्य कोणतीही करमणूकीची साधने त्यावेळी आमच्या घरी नव्हती. आम्ही सर्व एकत्र आलो, की शेजारी मधुअप्पांच्या घरी आमचा मेंढीकोटचा डाव रंगे. या खेळासाठी मात्र आबा आवर्जून बत्ती लावत. रात्री दहा वाजता सुरू झालेला आमचा पत्त्यांचा डाव पहाटेपर्यंत सुरू असे. अधून मधून बत्तीत हवा भरणे, रॉकेल भरणे ही कामे आळीपाळीने सुरू असत. बत्तीच्या स्वच्छ प्रकाशात पत्त्यांचा डाव उत्तरोत्तर रंगत जाई. या दरम्यान किमान तीन वेळा चहा आणि मध्यरात्री एकदा भरपेट नाश्ता देखील होत असे. सकाळ झाली, की बत्तीची हवा सुटून प्रत्येक जण आपापली आन्हीके उरकून कामाला लागे. मेंढीकोटच्या खेळावर आम्ही सहा भिडूनी प्रभुत्व मिळवल्याने परिसरात आमचे या खेळातील कौशल्य सर्वांनाच परिचित झाले होते.
आमच्या घरासमोरील विस्तीर्ण अंगणात भात कापणीच्या हंगामानंतर किमान चार तरी अडव्या घातल्या जात. वाडीवरील शेतकऱ्यांची शेती आमच्या घराच्या जवळपास असल्याने, कापलेले पीक घरी नेणे त्यांना अशक्य होई. आमचं अंगण त्यांना भाताची अडवी घालण्यासाठी दरवर्षी दिले जायचे. डिसेंबर जानेवारीच्या सुमारास भात जोडणीचा कार्यक्रम संपन्न व्हायचा. दिवसभर कामात असणारी गडी माणसं भात जोडणीचे काम शक्यतो रात्रीच्या वेळीच करत. अंगणात असणारी भात जोडणी, म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणीच ठरे. अंगात जोश आल्याप्रमाणे सुरू होणारे भात झोडणीचे काम, गाणी म्हणायला सुरुवात झाल्यानंतर अधिक वेग घेई. या भात जोडणीसाठी शेतकरी मंडळींना आबा बत्ती लावून देत असत. बत्तीच्या प्रकाशात भात जोडणीचे काम पाहायला आम्हा भावंडांना मोठी मौज वाटे. आमचं बालपण हे अशा अनेक आनंददायी आणि रहस्यमय प्रसंगांनी ओतप्रोत भरलेलं होतं. ९० च्या सुमारास आमच्या घरी महतप्रयासानं वीज प्रवाह सुरू झाला. यासाठी विजेचे अनेक खांब टाकावे लागले. आमचा मोठा भाऊ जयंत याने मोठ्या जिद्दीने हे काम पूर्णत्वास नेले. अनेक वर्षे काळोखात असणाऱ्या घराच्या भिंती विजेच्या लख्ख उजेडाने प्रकाशमान झाल्या. आता रॉकेलच्या दिव्यांचं कामही संपुष्टात आलं. गरजच उरली नसल्याने त्यांना कोणीही हाताळेनासं झालं. एका फळीवर रांगेत ठेवले गेलेल्या या दिव्यांवर कालांतराने माती आणि कोळीष्टक बसले. सुरक्षित म्हणून बत्ती माळ्यावरील एका खुंटीला अडकवून ठेवली गेली. आज ३४ वर्षानंतरही निरुपयोगी झालेली बत्ती त्याच खुंटीला लटकत आहे. या बत्तीच्या उजेडात आमच्या वाटा मात्र प्रकाशमान झाल्या.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.