मराठी भाषा दिनी कणकवली कॉलेजमध्ये ‘मराठी भाषा आणि आपण’ विषयावर व्याख्यान
कणकवली – प्रस्थापित लोकांचे जगणे जसे चकचकीत होत जाते तसे आपली भाषाही ते तोलून मापून बोलतात. त्यामुळे प्रस्थापित लोकांपेक्षा अप्रस्थापित लोकच भाषा जिवंत ठेवतात. कष्टकरी, कामगार, गांव गुंड असे लोकही नव्या शब्दांची निर्मिती करत असतात. जो पर्यंत खेड्यापाड्यातील अगळ पगळ बोलणारा वर्ग जास्त आहे तो पर्यंत भाषा जिवंतच राहणार आहे, असे प्रतिपादन कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी कणकवली महाविद्यालयात आयोजित केलेल्या मराठी भाषा दिन व्याख्यानात केले.
मराठी भाषा दिनानिमित्त कणकवली कॉलेजच्या मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता – हमी कक्ष विभागातर्फे कवी कांडर यांचे ‘मराठी भाषा आणि आपण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना कांडर यांनी इतिहासकार राजवाडे यांनी शंभर वर्षांपूर्वी मराठी भाषेला धोका असल्याचे सांगितले. तरीही भाषा अजून जिवंत आहे. पण बोली संपली तर आपली प्रमाण मराठी भाषा संपवू शकते असेही आग्रहाने सांगितले.
यावेळी प्राचार्य युवराज महालिंगे, कनिष्ठ पर्यवेक्षक महादेव माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सीमा हडकर, कनिष्ठ सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हरीभाऊ भिसे, प्रा.विजयकुमार सावंत, प्रा. विनिता ढोके, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाळकृष्ण गावडे उपस्थित होते.
कवी कांडर म्हणाले, खेड्यापाड्यातील अडाणी लोकांनी भाषा जिवंत ठेवली. अप्रस्थापित लोकच भाषा जिवंत ठेवत असतात. बोलीतील दोन माणसं जगभरात कुठेही एकत्र आली तर त्यांनी आपल्या बोलीतच बोलायला हवं. आता विद्यापीठ पातळीवर बोली साहित्याचाही विचार केला जातो. ही भाषेच्या दृष्टीने चांगली घटना आहे. बोलीत जास्त लेखन होत नाही हा भाषा संपण्याचा धोका असू शकतो त्यामुळे बोलीतही मोठ्या प्रमाणात लेखन होत राहिले पाहिजे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली. पण यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
भाषेवरून जगात मोठा संघर्ष केला जातो परंतु कोणतीच भाषा कुठल्या दुसऱ्या भाषेची दुश्मन होऊ शकत नाही. दुसऱ्या भाषेला जो वर्ग दुश्मन समजतो तो वर्ग आपल्या भाषेचाही दुश्मन असतो. आपली आई आपल्याला प्रिय असते याचा अर्थ अन्य कुणाची आई वाईट असते असा होत नाही. भाषेचही तसंच असतं आपली भाषा वाढविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.
अजय कांडर
त्याचबरोबर दुसऱ्या भाषेचा आदर बाळगला तरच आपलीही भाषा वाढू शकते .त्यातूनच आपल्या भाषेला इतर भाषेचे नवनवीन शब्द मिळत असतात. पण ही समज अपवादात्मक साहित्यिकांकडे, सामाजिक कार्यकर्त्यांकडे आणि राजकीय लोकांकडे असते. कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यानंतर त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. पण हा भाषेचा अभिमान कायमच आपण आपल्या मनात जपला पाहिजे, असेही कांडर म्हणाले.
प्रा.सीमा हडकर यांनी अभिजात भाषा म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत हे सांगून मराठी भाषा आज डिजिटल युगात स्वतः चे अस्तित्व टिकवून आहे ती सकस व समृद्ध होत आहे असेही सांगितले.
प्रा.महादेव माने यांनी मराठी भाषा ही एक महत्त्वाची भाषा असल्याचे सांगून तिचे वेगळेपण सांगितले. प्रा. हरीभाऊ भिसे यांनी मराठी भाषेतील लोकसाहित्याचे महत्त्व विशद केले.
प्रास्ताविक प्रा. विजयकुमार सावंत यांनी तर सूत्रसंचालन मृणाल गावकर यांनी केले आभार प्रा. माधुरी राणे यांनी मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.