दिल्ली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या महादजी शिंदे गौरव पुरस्काराने मातोश्रीची जळजळ वाढली आणि नीलम गोऱ्हे यांनी सोडलेली मर्सिडिज थेट मातोश्रीवर आदळली.
डॉ. सुकृत खांडेकर
तब्बल सत्तर वर्षांनी राजधानी नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे झाले. १९५४ मध्ये झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते, तेव्हा स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. सन २०२५ मध्ये झालेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, स्वागताध्यक्ष माजी केंद्रीयमंत्री व माजी मुख्यमंत्री शरद पवार, तर संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण अप्रतिम झाले. देशभर त्याला ठळक प्रसिद्धी मिळाली. पण संमेलनातील अन्य भाषणे, परिसंवाद व इतर कार्यक्रम यांच्यापेक्षा राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याला अफाट प्रसद्धी तर मिळालीच पण त्यावरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज दिल्यानंतर पद मिळते असे त्यांनी वक्तव्य केले. हा त्यांचा आरोप नव्हता किंवा त्यांनी संशयही व्यक्त केला नाही.
विधान परिषदेवर त्या चार टर्म आमदार आहेत. उपसभापती म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. मग त्या खोटे बोलतीलच कशा ? त्यांनी जे वक्तव्य केले, ते धादांत खोटे आहे असे कोणी म्हटलेले नाही पण उबाठा सेनेच्या पक्षप्रमुखांचा त्यांनी अवमान केला आहे अशी त्यांच्यावर मातोश्रीच्या गोतावळ्यातून टीकेची झोड उठवली जात आहे.
दिल्लीच्या साहित्य संमेलनात आम्ही असे घडलो, या विषयावर एक परिसंवाद योजला होता. प्रश्न विचारणारे ज्येष्ठ पत्रकार होते व त्याला उत्तर देणारे मुरब्बी राजकारणी होते. याच परिसंवाद बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दोन मर्सिडिज दिल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेत पदे मिळतात, असा थेट मातोश्रीवर हल्ला चढवला. या परिसंवादात माजी केंद्रीयमंत्री व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनीही भाग घेतला होता, पण त्यांच्या बोलण्यातून कुठे वाद किंवा कटुता निर्माण झाली नाही.
आम्ही असे घडलो असे सांगताना ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज दिल्यानंतर पदे मिळतात हे सांगण्याची नीलम यांना गरज होती का? पदे मिळविण्यासाठी पक्षाच्या प्रमुखांना काय काय भेटी किंवा गिफ्ट द्यावे लागते असा कोणी प्रश्न विचारला होता का? नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर मर्सिडिज आणताना त्यांना नेमके काय अभिप्रेत होते? तसे बोला असे त्यांना कोणी सांगितले होते की त्यांनी आपणहून उबाठा सेनेच्या पक्षप्रमुखांना टार्गेट केले?
मर्सिडिज ही महागडी मोटार आहे. त्याची किंमत साठ लाखांपासून चार-पाच कोटींपर्यंत आहे. दोन मर्सिडीज देऊन पदे मिळवणारा नेता किती गब्बर असावा याची सामान्य शिवसैनिकांना कल्पना करणेही त्याच्या आवाक्याच्या पलीकडचे आहे. सत्तेच्या परिघात व राजकीय संघटनेत प्रमुखांना किंवा त्यांच्या चौकडीतील नेत्यांना इच्छुकांकडून असे गिफ्ट मिळत असतात. शुभेच्छा देण्यासाठी व आशीर्वाद मागण्यासाठी कोणी फुलांचा गुच्छ किंवा मिठाई देतो, तर काही सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा पाकिटे देतात.
पैसै देऊन पदे किंवा तिकिटे दिली जातात, असा आरोप वर्षानुवर्षे केला जातो आहे. त्यावर पक्षानेही कधी खुलासा केला नाही किंवा त्याचा इन्कारही केलेला नाही. मग नीलम गोऱ्हे चुकीच्या बोलल्या असे कसे म्हणता येईल? नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आटापिटा करणारे त्या त्यांच्या पक्षात असताना गप्प का बसले होते? त्या पैसे मागतात, साड्या मागतात, मातोश्रीवर जाऊ देत नाहीत, असे आरोप त्यांच्यावर आता केले जात आहेत. तरीही त्यांना पक्षाने चार टर्म आमदारकी, उपनेतेपद, विधान परिषदेत उपसभापती पद का दिले? तेव्हा त्यांचा पक्षाला काही ना काही उपयोग होता म्हणून त्यांना पक्षाकडून विधिमंडळात सतत पाठवले जात होते ना… आता त्यांनी साहित्य संमेलनात मर्सिडिज काढताच त्या एकदम वाईट्ट ठरू लागल्या..
नीलम गोऱ्हे यांनी रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पक्षात, प्रकाश आंबेडकर यांच्या भारीप बहुजन महासंघमध्ये, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काम केले. पण त्यांना राजकीय जीवनात लॉटरी लागली ती ठाकरेंच्या शिवसेनेत. बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. सन २००० पासून त्या विधान परिषदेवर आहेत. पक्षासाठी रस्त्यावर लढणाऱ्या महिलांना डावलून पक्षाने नीलम गोऱ्हे यांना सातत्याने आमदारकी दिली, म्हणून महिला आघाडीत गेले वीस वर्षे असंतोष आहे. तोच संताप आता नीलमताईंनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मर्सिडिज आणल्यामुळे बाहेर पडला असे दिसले.
ठाकरेंच्या शिवसेनेने नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदही दिले. सन २०२३ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यावर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. शिंदे मुख्यमंत्री असतानाच नीलम गोऱ्हे या ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला व त्याचा फायदा त्या उपसभापती पदावर कायम राहिल्या, एवढेच नव्हे, तर त्यांच्या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला.
नीलम गोऱ्हे मुंबईत उबाठा सेनेच्या विरोधात एवढ्या जोरात कधी जाहीरपणे बोलल्या नाहीत किंवा पक्षप्रमुखांना त्यांनी टार्गेटही केले नाही. मग दिल्लीत अचानक त्यांनी मर्सिडिज कशी व्यासपीठावर आणली याचे कुतूहल अनेकांना आहे. चार टर्म त्या आमदार आहेत पण त्यांना मंत्रीपद कधी मिळाले नाही. आपणाला पद मिळविण्यासाठी काही द्यावे लागले नाही, पण आपल्या निरीक्षणाच्या आधारे आपण बोललो असे त्या सांगत आहेत. त्यामुळेच साहित्य संमेलनात मर्सिडिस धावली त्याचे गूढ वाढले आहे.
निवडणूक आयोग मान्यताप्राप्त शिवसेनेचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या वादळात नीलम गोऱ्हे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. ते म्हणतात – नीलम गोऱ्हे या काही खोटे बोलल्या नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेत मर्सिडिज दिल्यावर पद मिळते, असे त्या ज्या व्यासपीठावर बोलल्या ते योग्य होते की चुकीचे होते हा भाग वेगळा आहे. यापूर्वी असेच अनेक नेते बोलले आहेत. आम्ही देना बँक आहोत, समोरचे लेना बँक आहेत.
नीलम गोऱ्हे जे बोलल्या ते कटू सत्य आहे. नीलम गोऱ्हे या महिलांवर अत्याचार झाला की त्या धावून जात. तेव्हा त्या चांगल्या होत्या. शक्ती विधेयकातही त्यांचे मोठे योगदान आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्या चांगले काम करतात, ही त्यांची (पक्षप्रमुख) पोटदुखी आहे. ती थांबत नाही, कारण ते डॉक्टरकडून नव्हे तर कंपाऊंडरकडून औषध घेतात… असा टोला एकनाथ शिंदेंनी उबाठा सेनेच्या पक्षप्रमुखांना लगावला आहे. याच साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सार्वजनिक कार्याचा गौरव म्हणून महादजी शिंदे पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या साक्षीने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंवर पवारांनी गुणगौरवांचा वर्षाव केला. त्यामुळे उबाठा सेनेचे पित्त खवळले. ज्यांनी गद्दारी करून पक्ष फोडला आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, त्या गद्दाराला महादजी शिंदे पुरस्कार कसा दिला असा प्रश्न विचारून शरद पवारांच्या विरोधातही उबाठा सेनेने थयथयाट केला.
संमेलनाच्या व्यासपीठावरून नीलम गोऱ्हे यांनी मातोश्रीवर सोडलेल्या दोन-दोन मर्सिडिज आणि शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर केलेला स्तुतिसुमनांचा वर्षाव यामुळे उबाठा सेना रक्तबंबाळ झाली. दलालांचे संमेलन, सरकारी विळख्यात संमेलन अशी टीका झाली. साहित्य महामंडळाने माफी मागावी तसेच शरद पवारांनी व तारा भवाळकरांनी या दोन्ही बाबींचा निषेध करावा अशी मागणी झाली. शिंदे व गोऱ्हे यांच्या उपस्थितीने व त्यांच्या भाषणांनी उबाठा सेनेचा जळफळाट झाला. शरद पवारांवर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो मग पक्षप्रमुखांवर आरोप होतात तेव्हा पवार गप्प कसे असा प्रश्न उबाठा सेनेने विचारला.
पवारांनी पत्रकार परिषद घेऊन नीलम गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे होते, असे सुनावले. राज्याच्या विधिमंडळात त्या ४ टर्म आमदार आहेत पण त्या कशा मिळाल्या, हे महाराष्ट्राला ठाऊक आहे… असेही म्हटले. मात्र एकनाथ शिंदे यांचा आपण केलेल्या सत्काराचे पवारांनी ठामपणे समर्थन करून उबाठा सेनेला जास्त लुडबूड करू नका असा सज्जड दम दिला. मी कुणाचा सत्कार करायचा व कुणाचा नाही, यासाठी परवानगी घ्यावी लागत असेल, तर मी लक्षात ठेवेन… शिंदेंसह १५ जणांचा तेथे सत्कार झाला, पण १४ लोकांची नावे कुणी छापलीही नाहीत… दिल्ली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या महादजी शिंदे गौरव पुरस्काराने मातोश्रीची जळजळ वाढली आणि नीलम गोऱ्हे यांनी सोडलेली मर्सिडिज थेट मातोश्रीवर आदळली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.