December 29, 2025
From Lokshahi to Locationshahi How Land Scams Became the Real Power in Indian Politics
Home » लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, पण आता ती झालीय लोकेशनशाही अर्थात भूखंडांची सत्ता !
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, पण आता ती झालीय लोकेशनशाही अर्थात भूखंडांची सत्ता !

भारत देश महान ! इथं माणूस जन्मतो तो थेट ‘मातीतून’, पण मोठा झाला की त्या मातीवरचा हक्क घेतो. ‘भुखंड’ म्हणून ! आणि राजकारणात आला की मग त्याचं जीवनसूत्र होतं “भुखंड आहे म्हणून मी आहे !”

पूर्वी राजकारणी देश वाचवायचे म्हणायचे, आता ते भुखंड वाचवतात. एखाद्या नेत्याचं चरित्र लिहायचं म्हटलं, तर पहिल्या प्रकरणाचं शीर्षकच असावं — ‘शून्यातून भूखंडाकडे’ !

माणूस साधारणपणे ‘जमिनीवर’ राहतो, पण आपले राजकारणी ‘जमिनीच्या आत’ जातात — रजिस्ट्रेशन ऑफिस, नकाशे, गाळे, पुनर्नामकरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे “टिपणीतील टिपणी”!
हे सगळं करताना त्यांच्या तोंडात नेहमी एकाच गोष्टीचा गोडवा असतो — श्रीखंडाचा !
काय म्हणावं, एवढं श्रीमंतीचं श्रीखंड त्यांनी खाल्लंय की आता एखाद्या वाडग्यात श्रीखंड पाहिलं तरी ७/१२ चं उतारा आठवतो!

बारामतीच्या मातीतली गोडी तर आणखीनच विलक्षण. तिथं ऊस सुद्धा जमीन पाहून उगवतो. “ही जमीन कोणाच्या नावावर आहे?” असं विचारल्याशिवाय तो रस देत नाही !
पवार कुटुंबाने तर ‘राजकारणाची भुई’ इतकी सुपीक केली आहे की त्यात जरी साधा खडा टाकलात तरी पुढच्या निवडणुकीत तो नगरसेवक बनतो.

खडसे साहेबांची कहाणीही काही कमी नाही. त्यांना नुसतं ‘जमिनीचा वास’ आला की फाईल आपोआप उघडते म्हणे ! शेवटी त्यांचं नाव ‘खडसे’च आहे — म्हणजेच ‘खडकासारखं ठाम’!
पण ह्या साऱ्या ठामपणाचं मूळ काय?
जमिनीची माया, की मायेची जमीन — कोण ठरवणार?

राजकारणात ‘साखर’ आणि ‘भुखंड’ या दोन उद्योगांनी इतकं महत्त्वाचं स्थान मिळवलंय की मंत्र्यांच्या तोंडात रोजचा मंत्र असतो — “दे जमीन, वाढव प्लॉट !”
आणि जेव्हा चौकशी लागते, तेव्हा सगळे म्हणतात — “ही जमीन माझ्या नातवाच्या नावावर आहे, मी तर फक्त ती पाहतो !”
अरे हो ! पाहतो म्हणजे काय ? दयाळू राजकारणी म्हणून जमिनीवर लक्ष ठेवतो !

पूर्वी लोक म्हणायचे — “माणूस शेती करतो.”
आता म्हणायचं झालं — “शेती माझ्यासाठी काम करते !”
कारण, एकदा का भुखंडाचा गोडवा लागला की मग ती जमीनच माणसाला गिळते. त्याचं नाव मग ‘सद्गृहस्थ’ न राहता ‘सद्भूखंडस्थ’ होतं.

आजकालच्या नेत्यांचं आर्थिक विधान इतकं सोपं असतं — “जमिनी वाढल्या म्हणजे माझं प्रेम वाढलं.”

जनतेला मात्र त्या प्रेमात फक्त ‘रेती’ मिळते. तेवढं समाधान — कारण आता वाळवंटातही ‘रिसॉर्ट’ उभं राहू शकतं!

सगळ्या नेत्यांच्या फोटोंच्या मागे एक सावली असते — ती म्हणजे “७/१२ उतारा”.
जनतेचा राजा, जनतेचा सेवक, जनतेचा दोस्त… पण या सर्व पदव्यांच्या मागे असलेलं खरं ओळखपत्र म्हणजे — भूखंड क्रमांक ३४२, तालुका पुणे !

लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता म्हणे. पण आता ती झालीय ‘लोकेशनची सत्ता’.
आधी विचारायचे, “तुमचं मत काय आहे ?”
आता विचारतात, “तुमचं प्लॉट कुठं आहे ?”

राजकारण, सत्ता, निवडणुका, पक्ष, गट, आणि उपगट — सगळं शेवटी येऊन थांबतं ते “जमिनीच्या वाटणी”वर.
कारण शेवटी आपण सर्वजण ‘भू’वर आहोत, आणि हीच ‘भू’ ठरवते कोण वर आणि कोण खाली.

जनतेने मात्र आता थोडं श्रीखंड खाणं थांबवावं — कारण तेवढं श्रीखंड नेत्यांनी आधीच चाखलंय.
आता जनता जर ‘मिसळ’ खायला लागली, तर कदाचित या श्रीमंतांना घाम फुटेल !

✍️ शेवटी एवढचं
“राजकारण म्हणजे नाटकच ! फक्त प्रेक्षकांना तिकीट द्यावं लागतं आणि कलाकार मात्र जमिनीवरून आकाशात जातात !”


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

दसरा मेळाव्यात रामदास कदम असे का बोलले ?

‘डेनिम घातलेला गांधी’….!!

चोल साम्राज्यात कुडावोलई अमैप्पू द्वारे लोकशाही पद्धतीने निवडणुका – नरेंद्र मोदी

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading