पासष्ट वर्षांनी या मुद्रांचे छायाचित्र पाहताना केवळ मुद्रांचे आज मूल्य काय असेल इतकेच न पाहता, त्या ऐतिहासिक क्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांचे स्मरण ठेवणे संयुक्तिक होईल. त्यांच्या लढ्यामुळे व त्यागामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात एक ‘सुवर्ण पान’ कोरले गेले !
उमेश काशीकर
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या वेळी राज्य शासनाने सुवर्ण व रौप्य मुद्रा (नाणे) खास बनवून घेतल्या होत्या. जुन्या परिभाषेत शासनाने या मुद्रा ‘टांकसाळीतून पाडून घेतल्या’ होत्या !! सुरुवातीला मोजक्याच सुवर्ण व रौप्य मुद्रा बनवून घेतल्या व राज्य निर्मिती सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पंतप्रधान व इतर मान्यवरांना स्मृतिचिन्ह म्हणून भेट दिल्या. परंतु कालांतराने शासनाने जनतेकडून मागणी नोंदवून त्यानुसार मुद्रा विक्रीने उपलब्ध करून देण्याचे ठरवले. ताम्र मुद्रा देखील लवकरच तयार होतील असे सांगण्यात आले. १६ मे १९६० रोजी महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी संचालकांनी एक इंग्रजी परिपत्रक जारी केले व मुद्रा कोठून व कश्या प्राप्त करता येईल याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन केले !
सोन्याचा भाव १३ रुपये ग्रॅम
यातील मजेची गोष्ट म्हणजे १९६० साली सोन्याचा भाव १३ रुपये ग्रॅमपेक्षा कमीच होता. आज तो १२००० च्या आसपास फिरत आहे !!! शासनाने त्यावेळी साडेचार तोळे सुवर्ण मुद्रेची किंमत ६२५ रुपये ठेवली होती. पोस्टेज खर्च व पॅकेजिंग खर्च वेगळा !!
अनेक वर्षे १ तोळा म्हणजे ११.६६ ग्रॅम धरले जायचे. त्यामुळे साडेचार तोळे सुवर्ण मुद्रा नेमकी ४५ ग्रॅमची होती की अंदाजे ५० – ५२ ग्रॅमची होती याचा उलगडा होत नाही. एक गोष्ट मात्र नक्की की १९६० साली अवघ्या ६२५ रुपयांना ४५ ते ५० ग्रॅम सोने मिळायचे !! शासनाने चांदीच्या चार तोळे वजनाच्या ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ मुद्रेची किंमत ठेवली होती १५ रुपये !! हे परिपत्रक पूर्ण वाचण्यासारखे आहे.
परिपत्रकाचा स्वैर अनुवाद
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी संचालकांकडून शुभेच्छांसह
वैशाख २६, १८८२ (१६ मे १९६०)
महाराष्ट्र राज्य महोत्सव मुद्रासार्वजनिक विक्रीसाठी महाराष्ट्र राज्य स्थापने प्रित्यर्थ जारी करण्यात आलेली “महाराष्ट्र राज्य महोत्सव मुद्रा” आता सोने आणि चांदीत सर्वसामान्य जनतेला विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तांब्याच्या मुद्रा देखील लवकरच तयार होत आहेत. या मुद्रेत (पदकात) महाराष्ट्रातील प्रत्येक घरात तेवत ठेवला जाणारा ‘लामण दिवा’ या पारंपरिक तेलाच्या दिव्याचे चित्र आणि शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी जारी झालेल्या सुवर्ण मोहोरातील लेखाचे चित्रण आहे.
या मुद्रेची कलाकृती (डिझाईन) मुद्रा सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे प्राचार्य प्रा. व्ही. आडारकर यांनी तयार केली आहे. सुरुवातीला, सोन्याच्या मोजक्याच मुद्रा तयार करण्यात आल्या होत्या. या मुद्रा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी; मध्य प्रदेशचे राज्यपाल एच. व्ही. पाटसकर, पंजाबचे राज्यपाल गाडगीळ, केरळचे राज्यपाल बी. रामकृष्ण राव, महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीप्रकाश, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, भारताचे संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन आदी मान्यवरांना देण्यात आल्या.
सोन्याच्या मुद्रेची किंमत अंदाजे रु. ६२५ (पॅकिंग आणि टपाल खर्च वगळून) आणि चांदीच्या मुद्रेची किंमत अंदाजे रु. १५ (पॅकिंग व टपाल खर्च वगळून) इतकी असेल. चांदीची मुद्रा सुमारे चार तोळे वजनाची आणि सुवर्ण मुद्रा अंदाजे साडेचार तोळे वजनाची असून, मुद्रेचा व्यास सुमारे एक पूर्णांक सात अष्टमांश इंच आहे. सोन्या किंवा चांदीची मुद्रा खरेदी करताना खरेदीदारांकडून प्रत्यक्ष किमतीनुसार मूल्य आकारण्यात येईल. परंतु सोन्या व चांदीचा दर मुद्रा बनवताना घेतलेल्या सोने व चांदीच्या बाजारभावावर अवलंबून राहील. मुद्रेच्या किंमती व्यतिरिक्त, खरेदीदाराला मुद्रा ठेवावयाच्या डिलक्स पेटीचा अतिरिक्त खर्च भरावा लागेल. चांदीच्या मुद्रेच्या डिलक्स पेटीची किंमत रु. १.७५ तर सोन्याच्या मुद्रेच्या डिलक्स पेटीची किंमत रु. ५.५० राहील. उपरोक्त खर्चाव्यतिरिक्त, मुंबई शहराबाहेरील खरेदीदारांना मुद्रा पाठविण्यासाठी टपाल खर्च देखील भरावा लागेल.
सोन्या किंवा चांदीच्या मुद्रेची खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपली मागणी प्रसिद्धी संचालक, महाराष्ट्र शासन,सचिवालय, मुंबई ३२ यांचेकडे नोंदवावी. आपली मागणी दिनांक ३१ मे १९६० पूर्वी नोंदविण्यात यावी. मागणीपत्रासोबत आगाऊ रक्कम म्हणून चांदीच्या मुद्रेसाठी रु. १५ व सुवर्ण मुद्रेसाठी रु. ६२५ पाठविणे आवश्यक आहे. मुद्रा ताब्यात घेताना खरेदीदारांना मुद्रेचे संपूर्ण मूल्य अदा करावे लागेल. मागणी नोंदविल्यानंतर ग्राहकाला मुद्रा दहा दिवसांच्या आत पुरवण्यात येईल. मुंबई शहाराबाहेरील खरेदीदारांनी मुद्रेची रक्कम, बॉक्सचे मूल्य तसेच विमाकृत रजिस्टर्ड पार्सल व पॅकिंगचा खर्च मनी ऑर्डरने पाठवावा. नोंदणीकृत विमाकृत पार्सल पाठविण्याचे शुल्क चांदीच्या मुद्रेसाठी रु. १.७५ असेल तर सोन्याच्या मुद्रेसाठी रु. ३.०० असेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
