माळढोकनं घशातून काढलेला ‘हूम’असा आवाज वाचकाला कुठेतरी गूढ वातावरणात घेऊन जातो. विणीच्या काळात माळढोकनं हंबरण्यासारखा काढलेला आवाज दूरपर्यंत ऐकू येत असतो. एकमेकांना साद घालण्यासाठी ते अशी हाक देत असतात. असे अनेक गूढ निरीक्षणं लेखकाने पानोपानी नोंदवली आहेत.
बाबा कोटंबे, परभणी
साहित्यिक, आदर्श शिक्षक म्हणून सर्वांना परिचित असलेले माणिक पुरी यांचे ‘तळे, पक्षी आणि माळरान’ हे दुसरे पुस्तक. या आधी ‘पक्षी येती अंगणी’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झालेली आहे. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.
‘तळे, पक्षी आणि माळरान’ अतिशय लालित्यपूर्ण लिहिलेला लेख संग्रह, अर्थातच पक्षी, प्राणी हा विषय घेऊनच लिखाण केलेले आहे.
आजी,
तू चिऊ काऊच्या घासासोबत
रान वाचायला शिकवलंस
शिकवलीस पाखरांची भाषा
तू दिलेली इस्टेट मी जीवापाड सांभाळीन…
या अर्पण पत्रिकेनं या लेख संग्रहाची सुरूवात होते. सोपी आणि ओघवती भाषा वाचकांना खिळवून ठेवते. सापडलं सापडलं म्हणत असतानाच हातातून केव्हा निसटून जाते कळत नाही, अशी अवस्था वाचकांची होते. प्राणी किंवा पक्षांच्या सानिध्यात लेखक वाचकाला घेऊन जातो, वाचत असताना कधी न अनुभवलेले किंवा न पाहिलेले काही तरी अद्भूत आपल्याला पाहायला मिळणार आहे या आशेवर वाचक पुढे सरकत असतो. नुकतेच रांगायला लागलेल्या बाळासमोर खेळणं ठेवावे आणि बाळ जवळ येताच आणखी दूर सरकवत न्यावे, अशी अवस्था पुरी वाचकांची करतात. वाचकही पुढे सरकत राहतो. काही तरी अमुल्य माहिती सापडल्याचा आनंद वाचकाला मिळतो परंतु प्रतिक्षा करायला लावण्यात लेखक बऱ्यापैकी यशस्वी झालेला असतो. कुठल्याही गोष्टीचा सहज उलगडा होत असेल तर आनंद उपभोगता येत नाही हेही तितकेच खरं.
‘तळे, पक्षी आणि माळरान’ या पुस्तकात एकूण पंधरा लेख आहेत. पक्ष्यांच्या बाळंतपणाची गोष्ट हा संग्रहातील पहिलाच लेख, लांडोर ते चिमणी पर्यंतच्या बाळंतपणाची सखोल माहिती देणारा लेख. लेखकाच्या आजीचं आणि पक्ष्यांचं नातं अतिशय हळुवारपणे पुरी यांनी रेखाटले आहे. हेच पहा ना. एक लांडोर पायवाटेवरून आडवी गेली. तिच्या पाठोपाठ पाच पिलं सुध्दा होती, एवढं सुंदर दृश्य. ती लांडोर ओढ्यात उतरण्यापूर्वी आजीकडे पहात होती.
“आजी ती लांडोर तुझ्याकडं पाहत होती का गं?” लेखक विचारतात.
“लांडोर तिच्या पिलांना घेऊन भेटायला आली होती.”आजी म्हणाली.
एखाद्याच्या डोळ्यात पाहून त्याला काय म्हणायचंय याची जणू विद्याच आजीनं हस्तगत केली होती. असे मानवी मनाला ऊर्जितावस्थेत नेणारे अनेक प्रसंग या पुस्तकात रेखाटले आहेत. चिऊ काऊच्या गोष्टी सांगणाऱ्या, घराला घरपण देणाऱ्या आजी घरातून हद्दपार होत चालल्या आहेत, अशी खंतही लेखक शेवटी व्यक्त करतात. या पहिल्याच लेखाने वाचकांच्या मनाचा तळ गाठलेला आपणास दिसून येतो.
माळढोक आणि लखनगाव, हा लेख सुध्दा प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारा आहे. माळढोक पक्ष्यावरील हा लेख निसर्ग आणि पक्षी प्रेमी लोकांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे, कारण माळढोक पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. माळढोक पक्ष्याचा अधिवास शोधण्यासाठी लेखकाने बरीच भटकंती केलेली दिसते. या भटकंतीत काही निरिक्षणे लेखकाने मागे सोडले आहेत. अभयारण्यात भटकताना चारही बाजूला गवत कंबरेपर्यंत पोहोचलेलं, त्याचा पिवळा रंग फिका पडू लागला. वाळत चाललेल्या गवतातून अनेक प्रकारचे नाकतोडे हातावर येऊन बसत. हात झटकला की पाच सहा नाकतोडे गवतात पडत. टोळधाड येऊन गेल्यानंतर काही टोळ आपला वंश पाठीमागं ठेवतात तसं तर नसावं ? अशी बारीक निरीक्षणंही लेखकाच्या नजरेतून सुटत नाहीत.
एखादे मच्छर आपल्या भोवती घोंगावू लागले तर आपण चिडतो, इथे तर पाच सहा नाकतोडे हातावर बसतात. मग पायांवर, अंगावर किती बसत असतील ! हे सगळं वाचताना आपल्या अंगावर काटा येतो. तर असे हे, एकाच्या शोधात असताना दुसरेच काहीतरी हाताला लागून जाते, हे लेखकाच्या भटकंतीत अनेकवेळा घडलेले दिसते.
माळढोकनं घशातून काढलेला ‘हूम’असा आवाज वाचकाला कुठेतरी गूढ वातावरणात घेऊन जातो. विणीच्या काळात माळढोकनं हंबरण्यासारखा काढलेला आवाज दूरपर्यंत ऐकू येत असतो. एकमेकांना साद घालण्यासाठी ते अशी हाक देत असतात. असे अनेक गूढ निरीक्षणं लेखकाने पानोपानी नोंदवली आहेत.
पाडस हा लेख वाचतानाही मनाला चटका लावून जातो. पाडस म्हणजे हरिणीचे पिल्लू गोंडस आणि भित्रेही तेवढेच, भटकंतीत लेखकाच्या नजरेतून सुटत नाही. दूरवर पसरलेल्या गवतात एकटच निराधार होऊन बसलं होतं. त्याची आई कुठे असावी ? त्याला कळपातून बाहेर ढकलायला तसं त्याचं वय सुध्दा नव्हतं. त्याचे सवंगडी कुठे गेले ?असे अनेक प्रश्न लेखकाला पडलेले असतात. सगळं माळरान हुंदडणारं पाडस एका जागेवर खिळून बसलेलं बघवत नसतं. लेखकाला पाहून त्याच्या मनात अनेक विचारांची वावटळ तयार झालेली असते. पाडसाचे उभारलेले कान, भोकराएवढे काळे डोळे, डोळ्याभोवती पांढऱ्या रंगाचे वर्तुळ. नाकपूडी काळसर, पोटाखालचा भाग पांढऱ्या रंगानं चित्तारलेला. सोनेरी रंगाची पाठ. हे सगळं लेखक डोळ्यात साठवत असतानाच ते उभे राहते आणि काही कळायच्या आत मेडशिंगीच्या दिशेने झेपावतं. पाडस धडधाकट असते, त्यानं मारलेल्या उड्या डोळ्यात साठवत लेखक रानवाटेनं मागे फिरतो. असे अनेक विलक्षण अनुभव, प्रसंग आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात.
अस्वलाचे झाड, रानडुक्कर, वाघ, घारीचं झाड, निवळीचे तळे, निलगाय आणि तरस, इत्यादी लेख वाचनीय आहेत. या पुस्तकावर अनेक लेखकांनी परिक्षणं लिहीली आहेत, बोलल्या गेलं आहे. सुबक छपाई, मुकुंद धुर्वे यांचे बोलके आणि मनमोहक मुखपृष्ठ या सर्व गोष्टी लक्षात घेता ‘तळे पक्षी आणि माळरान’ हा लेख संग्रह वाचनीय झाला आहे. माणिक पुरी यांच्याकडून अशीच निसर्गाशी नाते जोडणारी साहित्य निर्मिती निर्माण होवो अशी सदिच्छा.
पुस्तकाचे नाव – तळे, पक्षी आणि माळरान
लेखक – माणिक पुरी
किंमत – १६० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
