December 1, 2023
More than 400 companies on the Fortune 500 list operate in Karnataka Narendra Modi COmment
Home » फॉर्च्युन 500 यादीतील 400 हून अधिक कंपन्या कर्नाटकात – नरेंद्र मोदी
काय चाललयं अवतीभवती

फॉर्च्युन 500 यादीतील 400 हून अधिक कंपन्या कर्नाटकात – नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले.

मागील सरकार वेगाला चैन मानत होते आणि मापन हा धोका मानत होते”,आमच्या सरकारने हा कल बदलला आहे. आम्ही वेगाला आकांक्षा मानतो आणि मापनाला भारताचे सामर्थ्य मानतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकमध्ये  बंगळुरू येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले. याआधी सकाळी पंतप्रधानांनी विधान सौधा येथे संतकवी कनक दास आणि  महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. तसेच बेंगळुरू येथील केएसआर  रेल्वे स्थानकावरुन वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते बंगळुरू इथल्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 चे उदघाटन झाले आणि नादप्रभू केम्पेगौड़ा यांच्या 108 फुट उंच कांस्य पुतळ्याचेही  अनावरण झाले.

कर्नाटक मधील दोन महान व्यक्तीच्या जयंतीदिनी कर्नाटकमध्ये उपस्थित असल्याचा विशेष आनंद वाटत आहे, असे पंतप्रधान एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले. त्यांनी संत कनक दास आणि ओनाके ओबाव्वा यांना आदरांजली वाहिली. कर्नाटकाला आज पहिली मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेली वंदे भारत ट्रेन मिळाली असून त्याद्वारे चेन्नई, स्टार्टअपची  राजधानी बेंगळुरू आणि वारसा शहर म्हैसूर, एकमेकांशी जोडले जातील, असे ते म्हणाले. कर्नाटकातील लोकांना अयोध्या, काशी आणि प्रयागराजच्या  दर्शनासाठी सोईची ठरेल अशा भारत गौरव काशी दर्शन रेल्वेगाडीचा देखील आज शुभारंभ झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रत्यक्ष निर्मिती ही   पूर्वकल्पना देणाऱ्या  रुपरेषेपेक्षा  अधिक सुंदर आणि भव्य आहे, असे पंतप्रधान याविषयी बोलताना म्हणाले. पंतप्रधानांनी नादप्रभू केंपेगौडा यांच्या स्मारकस्थळी उभारलेल्या  पुतळ्याचा देखील उल्लेख केला आणि भविष्यातील बेंगळुरू आणि भारताच्या निर्मितीसाठी हे स्थान एक प्रेरणा म्हणून कार्य  करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्टार्ट अप्स च्या जगात भारताची ओळख निर्माण करण्यात बेंगळुरूने महत्वाची भूमिका बजावली आहे, बंगळुरू हे भारतातील स्टार्ट अपच्या चैतन्याचे प्रतिनिधित्व करते आणि हीच भावना देशाला इतर जगापासून वेगळे बनवते असे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम बेंगळुरूच्या सळसळत्या उत्साहाचे  प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

वंदे भारत ही केवळ एक रेल्वेगाडी नाही तर नवीन भारताची नवी ओळख आहे, भारतीय रेल्वेचा  संपूर्ण कायापालट करण्याच्या  ध्येयासह देशाने आता कुंठितावस्थेचे दिवस  मागे टाकल्याचे प्रतीक म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस होय. 400 हून अधिक वंदे भारत ट्रेन आणि व्हिस्टा डोम कोच भारतीय रेल्वेची नवीन ओळख बनत आहेत. समर्पित फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचा वेग वाढेल आणि वेळेची बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला  व्यापक  ब्रॉडगेज योजनेमुळे रेल्वेच्या  नकाशावर नवनवीन क्षेत्र येत आहेत, असे ते म्हणाले. रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, बेंगळुरू रेल्वे स्थानकावरील  सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलमुळे,  प्रवाशांना एक अतिशय उत्कृष्ट  अनुभव मिळत आहे. कर्नाटकसह अन्य स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची  माहिती त्यांनी दिली.

विकसित भारताचा दृष्टीकोन अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, शहरांमधील कनेक्टिव्हिटी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि ती काळाची गरजही आहे. कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी केम्पेगौडा विमानतळाचे नवीन टर्मिनल 2 नव्या सुविधा आणि सेवा उपलब्ध करून देईल असे पंतप्रधान म्हणाले. विमान प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वेगाने वाढत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 2014 पूर्वी देशात फक्त 70 विमानतळ होते, मात्र आज ही संख्या दुप्पट होऊन 140 हून अधिक झाली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.”व्यवसायाच्या विस्तारासाठी विमानतळ एक नवीन कार्यक्षेत्र तयार करत आहेत तसेच देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहेत”, असे मोदी यांनी सांगितले.

संपूर्ण जगाने भारताप्रति दाखवलेला विश्वास आणि आकांक्षांचा लाभ कर्नाटकला मिळत आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जग कोविड महामारीशी लढा देत असताना कर्नाटकात झालेल्या 4 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीकडे पंतप्रधानांनी सर्वांचे लक्ष वेधले. “गेल्या वर्षी, कर्नाटकने देशात थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आघाडी घेतली होती”, असे त्यांनी सांगितले. ही गुंतवणूक केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापुरती मर्यादित नसून जैवतंत्रज्ञानापासून संरक्षण क्षेत्रातही झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.भारताच्या विमान आणि अंतराळ प्रक्षेपक उद्योगात कर्नाटकचा 25 टक्के वाटा असल्याची माहिती त्यांनी दिली.भारताच्या संरक्षणासाठी तयार केलेली सुमारे 70 टक्के विमाने आणि हेलिकॉप्टर कर्नाटकात तयार होतात, असेही त्यांनी नमूद केले. फॉर्च्युन 500 यादीतील 400 हून अधिक कंपन्या कर्नाटकात कार्यरत आहेत, असे ते म्हणाले. राज्यातील इतक्या लक्षणीय विकासाचे श्रेय त्यांनी कर्नाटकच्या दुहेरी -इंजिन सरकारला दिले.

“प्रशासन असो किंवा प्रत्यक्ष आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास , भारत पूर्णपणे वेगळ्या स्तरावर काम करत आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले. भीम यूपीआय (BHIM UPI )आणि भारताने विकसित केलेल्या 5जी तंत्रज्ञानाची उदाहरणे देताना पंतप्रधान म्हणाले की, बंगळुरूच्या व्यावसायिकांनीच हे दूरचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे मागील सरकारची विचार प्रक्रिया कालबाह्य होती त्यामुळे 2014 पूर्वी असे सकारात्मक बदल कल्पनेपलीकडचे होते , याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “मागील सरकार वेगाला चैन मानत होते आणि मापन हा धोका मानत होते”,“आमच्या सरकारने हा कल बदलला आहे. आम्ही वेगाला आकांक्षा मानतो आणि मापनाला भारताचे सामर्थ्य मानतो.”, असे पंतप्रधान म्हणाले. सरकारने सर्व विभाग आणि संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि परिणामी, विविध संस्थांना डेटाचे पंधराशेहून अधिक स्तर उपलब्ध केले जात आहेत, असे पीएम गतिशक्ती बृहद योजनेवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारची अनेक मंत्रालये आणि डझनभर विभाग या व्यासपीठाच्या मदतीने एकत्र येत आहेत. “, असे ते म्हणाले. “आज भारत पायाभूत सुविधा गुंतवणुकीच्या येऊ घातलेल्या 110 लाख कोटी रुपयांच्या उद्दिष्टासाठी काम करत आहे”,” प्रत्येक माध्यम दुसर्‍या घटकांना आधार देईल या अनुषंगाने बहुआयामी पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे .”, असे त्यांनी सांगितले . नॅशनल लॉजिस्टिक धोरणाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या धोरणामुळे देशातील वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल आणि त्यात नाविन्यही येईल.

सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा

  • देशातील गरीब जनतेसाठी 3.4 कोटी पक्क्या घरांची सुविधा, त्यापैकी 8 लाख घरे  कर्नाटकातील आहेत
  • देशभरात 7 कोटी घरांना नळाने पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली त्यापैकी 30 लाख घरे कर्नाटकातील
  • आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ज्या 4 कोटी रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले गेले त्यापैकी 30 लाख रुग्ण कर्नाटक राज्यातील आहेत.
  • देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अडीच लाख कोटी रुपये जमा करण्यात आले, त्यापैकी कर्नाटकातील  55 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्येकोटी  11हजार कोटी रुपये जमा करण्यात आले.
  • स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील 40 लाख फिरत्या विक्रेत्यांना आर्थिक मदत देण्यात आली त्यापैकी २ लाख विक्रेते कर्नाटकातील आहेत.

लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणामध्ये देशाच्या वारशाबाबत अभिमान बाळगण्याच्या मुद्द्याची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपला हा वारसा सांस्कृतिक आहे तसेच अध्यात्मिक देखील आहे. ते म्हणाले की, भारत गौरव रेल्वे गाड्या देशातील श्रद्धा आणि अध्यात्मिक स्थानांना जोडत आहेतच पण त्याचबरोबर ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेला देखील सशक्त करत आहेत. या गाडीने आतापर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये 9 मार्गांवरील प्रवास पूर्ण केला आहे अशी माहिती त्यांनी दिली. “शिर्डीचे मंदिर, रामायण यात्रा, दिव्य कशी यात्रा इत्यादी सर्व गाड्यांच्या प्रवासाने, भाविकांना अत्यंत आनंददायी अनुभव दिला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. कर्नाटकहून काशी, अयोध्या तसेच प्रयागराज येथे जाण्यासाठी आज सुरु झालेली ही रेल्वे गाडी कर्नाटकातील जनतेला काशी आणि अयोध्येला भेट देण्यासाठी  अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या प्रसंगी, कनकदास यांनी भरड धान्यांना दिलेल्या महत्त्वाकडे पंतप्रधानांनी सर्वांचे लक्ष वेधले.राम धान्य चरित या कनक दास यांच्या रचनेचा ठळक उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या ‘रागी’ किंवा नाचणी या भरड धान्याचे उदाहरण घेऊन या काव्यातून कनकदासांनी सामाजिक समतेचा संदेश दिला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की नादप्रभू केम्पेगौडाजी यांनी पाहिलेल्या स्वप्नानुसारच बेंगळूरूचा विकास व्हायला हवा. “हे शहर वसवून केम्पेगौडाजी यांनी येथील लोकांप्रती मोठे योगदान दिले आहे.,” ते पुढे म्हणाले. बेंगळूरूच्या जनतेच्या सोयीसाठी अनेक दशकांपूर्वी ज्या प्रकारे व्यापार आणि संस्कृतीच्या संदर्भातील कार्य उभे राहिले त्याचे अतुलनीय तपशील पंतप्रधानांनी यावेळी ठळकपणे सांगितले. “बेंगळूरूच्या लोकांना आत्ताच्या काळात देखील कनक दास यांच्या दूरदृष्टीचा फायदा होतो आहे,”

पंतप्रधान मोदी म्हणाले. याबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की आज येथील उद्योगांमध्ये मोठे परिवर्तन घडून आले असले तरीही ‘पेटे’ हा बेंगळूरू मधील विभाग आताच्या काळात देखील शहराची व्यापारी जीवनवाहिनी म्हणून कायम आहे. बेंगळूरूची संस्कृती समृद्ध करण्यात नादप्रभू केम्पेगौडा यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सुप्रसिध्द गावी गंगाधरेश्वर मंदिर आणि बसवनगुडीभागातील मंदिराचे उदाहरण दिले. “या मंदिरांच्या माध्यमातून केम्पेगौडाजी यांनी बेंगळूरूची सांस्कृतिक जाणीव कायमची जिवंत ठेवली आहे,”ते म्हणाले.   

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की बेंगळूरू हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि आपल्याला आपल्या वारशाचे जतन करतानाच या शहराला आधुनिक पायाभूत सुविधांच्या मदतीने अधिक संपन्न केले पाहिजे. “सबका प्रयास अर्थात सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे सर्व करणे शक्य आहे,” ते शेवटी म्हणाले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि अश्विनी वैष्णव,केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंजलाजे, राजीव चंद्रशेखर, ए. नारायणस्वामी आणि भगवंत खुबा, संसद सदस्य बी.एन.बाचे गौडा, आदिचंचनगीर मठातील स्वामी डॉ.निर्मलनंदनताह स्वामीजी आणि कर्नाटक राज्य सरकारमधील अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Related posts

सर्वसामान्यांच्या शब्दातही प्रकटतो एकरुपतेतून ब्रह्मरस

शिवपूर्व कालीन महाराष्ट्र…

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना महाराष्ट्र सरकार आणणार

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More