एक चांगला लघुपट पाहिल्याचा अनुभव या पुस्तकाने दिला. लहान मुलांना एका संवेदनशील आणि आजच्या काळात कळीचा बनलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा सहजपणे गोष्टींच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी ही कादंबरिका जरूर वाचायला हवी.
गोविंद पाटील, कोल्हापूर
नामदेव माळी हे नाव मराठी साहित्य विश्वात कादंबरीकार म्हणून ख्यातकीर्त आहे. कादंबरी, कथा आणि शैक्षणिक असा लेखन प्रवास असलेल्या नामदेव माळी यांनी मुलांना अभिव्यक्त करण्यासाठी बालकुमार साहित्य लेखन वाचन कार्यशाळा घेतल्या आहेत. साहित्य संमेलन आयोजित करून मुलांच्या लेखनासाठी मंच उपलब्ध करून दिला आहे. मुलांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्या पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. साधना प्रकाशनाच्या वतीने त्यांची” एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य “ही बालकादंबरिका प्रकाशित झाली आहे.
नव्वद पानांची ही गोष्ट आहे…
गब्रू नावाच्या एका रुबाबदार कोंबड्याची ही कथा…
सांगलीत घडणारी…गौरव या सृजन कट्यावर जाऊन काही नवनवीन शिकणाऱ्या मुलाच्या कुटूंबातली…
गौरवचे आईबाबा सांगलीत राहतात..आजी गावाकडे… किती बोलावली तरी ती शहरात यायला तयार नाही..गावी तिच्या खूप कोंबड्या आहेत.. त्यांच्याशिवाय ही राहू शकत नाही… त्यामुळे अखेर गौरवचे बाबा त्या सगळ्या खटाल्यासह तिला शहरात घेऊन येतात…त्यात आहे हा देखणा, रूबाबदार, बळकट पंखाचा कोंबडा गब्रू…. त्याच्या परिसरात त्याचा दरारा आहे…. उंच जागी उभा राहून तो बांग देतो आहे कुकचकू….ही गोष्टीची सुरुवात….
त्याच्या आवाजाचा त्रास जवळच्या कुटुंबातील आजी आजोबांना होतो आणि ते तक्रार करतात. विविध ठिकाणी…. अशी पुढं जाते ..गौरव आणि त्याचे मित्र सृजन कट्यावर अभिव्यक्तीची विविध रूप रोजच्या जगण्यातील अनुभव, कल्पना, तर्कशक्ती वापरून कशी करता येईल यावर सातत्याने काम करत आहेत..त्यांना मार्गदर्शन करायला कृष्णादादा ,दयादादा अर्चनाताई अशी मंडळी आहेत…या माध्यमातून या कोंबड्याचा विषय केंद्रस्थानी येतो आणि मुलं वेगवेगळ्या मार्गाने तपशील गोळा करायला लागतात…कुणी घरातील मोठ्या माणसांकडून दंतकथा गोळा करतं…कुणी पुस्तकातून माहिती जमवतं..कुणी गुगल, यू ट्यूब सर्च करून प्राणी आणि पक्ष्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर मिळालेलं हे संचित कसं मांडायचं यावर चर्चा करत ही बालकादंबरिका आकाराला येते…
प्राणी, पक्षी बोलायला लागले तर काय बोलतील हा कल्पनेचा भाग या संवेदनशील लिहित्या मुलांच्या माध्यमातून, स्वप्नातून आपल्यापर्यंत येतो…प्राणी पक्ष्यांची सभा भरली तर ते माणसाबद्दल काय विचार करू शकतील… त्यांच्याबद्दल माणसांचे किती गैरसमज आहेत…अलिकडच्या प्रदूषणाचा त्यांना किती त्रास होतो…माणूस इतका अमानुष का होत चाललाय ही त्या सभेतली चर्चा आपल्याला अंतर्मुख करते.. आणि गबरू नावाच्या या कोंबड्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला येतोय तो कसा परतवून लावता येईल याची व्यूहरचना आकार घेते…
पोलिस स्टेशनपासून, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या ठिकाणी न्याय मागणारे शेजारचे आजी आजोबा अखेर जिल्हाधिकारी यांच्याकडे ही तक्रार नेतात.. लोकशाही दिनात ही तक्रार चर्चेला येते..तोवर सृजन कट्टा, विविध सामाजिक संस्था ,सजग नागरिक यांच्या माध्यमातून गब्रूचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर शहरात चळवळ उभी राहते… लोकशाही दिनात गौरवची अशिक्षित आजी ठामपणे याबाबतचे तिचे विचार मांडते…गौरव गब्रू काय म्हणणं मांडेल हे डोळ्यासमोर ठेवतो… तक्रारदार आजी आपलं म्हणणं मांडतात… त्या खलनायिका होण्यापासून लेखकाने त्यांना शिताफीने वाचवले आहे…एक वेगळीच कलाटणी देत वृद्ध दांपत्याचे प्रश्न मांडले आहेत…आजकालचे आजी आजोबा मुलं नातवंडे जवळ नसल्याने,परदेशी असल्याने कसे एकाकी होऊन निराशेच्या गर्तेत जात आहेत … हा वास्तव मुद्दा केंद्रस्थानी आणत या बालकादंबरीचा शेवट केला आहे….
एक चांगला लघुपट पाहिल्याचा अनुभव या पुस्तकाने दिला. लहान मुलांना एका संवेदनशील आणि आजच्या काळात कळीचा बनलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा सहजपणे गोष्टींच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी ही कादंबरिका जरूर वाचायला हवी. अभिव्यक्तीचे काही निराळे प्रयोग लेखकाने यात केले आहेत. यात गाण्यांच्या नावाचा अतिवापर खटकतो. बाकी पुस्तक मुलांसाठी अनुरूप आहे. बालकादंबरिका असली तरी मोठ्यांनाही अंतर्मुख व्हायला भाग पाडणारी ही कलाकृती आहे.
पुस्तकाचे नावः एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य
प्रकाशकः साधना प्रकाशन, पुणे
पाने – ९०
किंमत – १२५ रूपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.